वन्यजीवांचे रक्षण : पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. वन्य जीवांच्या बरोबरीने पृथ्वीतलावर मानव गुण्यागोविंदाने नांदत आला आहे परंतु गेल्या २-३शतकांत माणसाने वन्य जीवांची प्रमाणाबाहेर हत्या केली अन्नासाठी त्यांच्याशी स्पर्धा करू लागला तसेच प्रदूषणामुळे त्यांच्या प्रजोत्पादनास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली व त्यांच्या राहण्याच्या जागा नष्ट होऊ लागल्या. अशा रीतीने वन्य जीवांना जीवनसंघर्षात टिकून राहणे अवघड झाले, कारण त्यांच्यापुढील या अडचणींवर त्यांना मात करता येणे शक्य नाही. परिणामी पुष्कळ जीवजाती नष्ट किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जगभराच्या विचारवंतांनी विज्ञानयुगाच्या सुरुवातीस होती तशी विविधता पूर्ण जीवसृष्टी परिरक्षित किंवा पुनःस्थापित करण्याकडे आपले लक्ष वळविले.
विध्वंसक किंवा अनाकर्षक गोष्टींचे परिरक्षण कशासाठीकरावयाचे? याचे साधे व सोपे उत्तर म्हणजे जगात आपल्याभोवती असलेल्या विविधतेमुळे आपल्या आनंदात भर पडत असते, हे होय. घनदाट जंगलात राहणारा वाघ किंवा दक्षिणेकडील शीत महासागरांतील निळा देवमासाही कदाचित आपल्याला प्रत्यक्ष पहावयास मिळणार नाही तथापि त्या भागांत त्यांचे अस्तित्व आहे, या कल्पनेनेच आपल्याला आनंद मिळतो नाहीतर आपण या गोष्टींना मुकलो असतो.
जीवांमधील विविधता टिकविण्याची व्यावहारिक कारणेही अधिक सुस्पष्ट होऊ लागली आहेत. विशिष्ट प्राणी व वनस्पती मग त्या अपरिचित व दुर्लक्षित असल्या, तरी शास्त्रीय व आर्थिक दृष्ट्याअत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही जीवजाती प्रयोगशाळांमध्ये अत्यावश्यकच झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे मानवाच्या महत्त्वाच्या शरीरक्रिया वैज्ञानिक प्रक्रियांवर प्रकाश पडला आहे आणि त्यामुळे रोग प्रतिबंध व उपचार यांचा मार्ग सुकर झाला आहे. रानटी बैलासारख्या जातींचा उपयोग करून पशुधनामध्ये नवीन वाणांची पैदास करणे शक्य झाले आहे.
वन्यजीवांना असलेले धोके : अगदी १९८०पर्यंत वन्य जीवांचे रक्षण सापेक्षतः सोपे काम होते. प्राण्यांना धोकादायक ठरू शकणारी कारणे पूर्वी गंभीर स्वरूपाची होती तरी पण ती कमी होती व सामान्यतः कमी तीव्र होती. मोठ्या आकारमानांच्या किंवा दिमाखदार पिसाऱ्याच्या अधिक आकर्षक प्राण्यांच्या हत्येस त्यांची ही वैशिष्ट्ये कारणीभूत ठरली तर अन्य काहींवर इतर लक्षणांमुळे ही वेळ आली. उदा., विशेष परिस्थितीत बदल झाल्यावर त्यांना याचा त्रास होऊ लागला. मोठा ⇨ऑक पक्षी आपले पंख फक्त पोहचण्यासाठी वापरी त्याला दूरच्या उत्तर सागर प्रदेशात कमी शत्रू होते पणजहाजबांधणीच्या नव्या तंत्रांमुळे माणूस तेथे पोहोचू शकला. त्यामुळेऑक पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या झाली. उडू न शकणाऱ्या ⇨डोडोया पारव्यासारख्या पक्षाच्या बाबतीतही असेच घडले आणि आता तो हिंदी महासागरातील फक्त काही बेटांवरच आढळतो. तो सतराव्या शतकात इतर बेटांवर निर्वंश झाला कारण यूरोपियन लोक व परभक्षी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणारे) पाळीव सस्तन प्राणी त्या बेटांवर पोहोचले होते. त्याचप्रमाणे बंदुका विपुल प्रमाणात उपलब्ध झाल्यावर मोठ्या कळपांतून राहणाऱ्या गव्यांची मोठ्या प्रमाणात हत्या झाली. फक्त इंडोनेशियात आढळणाऱ्या कोमोडो ड्रॅगन याची संख्या झपाट्याने घटली. कारण हरणे व रानडुकरे या त्याच्या भक्ष्यांची माणसाने मोठ्या प्रमाणावर शिकार केल्याने त्याची संख्या घटली.
पुष्कळ बाबतींत शिकारीला प्रतिबंध करणारे कायदे करून किंवाअशा धोक्यात असलेल्या जीवजातींसाठी स्वतंत्र संरक्षित प्रदेश राखून ठेवून ही समस्या सोडविता येते. अशी पावले उचलल्यामुळे छंद म्हणून शिकार करणे हा वन्य जीवांना धोका राहिलेला नाही. शासनाने हरिण, शिकारी पक्षी व विशिष्ट दुर्मिळ मासे यांच्या शिकारीवर असे कडक निर्बंध घातलेले आहेत. आफ्रिकेतील देशांनी एकेकाळी मैदानी प्रदेशांत गर्दी करणारे हत्ती, सिंह, हरणे यांच्या शिकारीवर असे निर्बंध घालणारी पावले उचलली आहेत.
स्वार्थी वृत्ती : विसाव्या शतकातील वाढत्या लोकसंख्येच्या विस्फोटाचा वन्य प्राण्यांच्या अस्तित्वावर अभूतपूर्व ताण पडत आहे. माणसाची अवाजवी फायदा कमविण्याची स्वार्थी वृत्ती हे वन्य जीवांची संख्या घटण्याचे एक प्रमुख कारण आहे. उदा., विसाव्या शतकात अनेक देशांनी अद्ययावत जहाजांच्या ताफ्यांनी महासागरांत सर्वत्र देवमाशांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली. आवडते खाद्य पदार्थ, सौंदर्यप्रसाधने, वंगण तेले, साबण, छपाईची शाई इ. मिळून झटपट पैसा कमविण्यासाठी देवमाशांचा उपयोग केला. आंतरराष्ट्रीय देवमासा आयोगाने कोणत्याही प्रकारचा देवमासा पकडण्यावर कायद्याने बंदी घालण्यापूर्वीच त्यांच्या अनेक जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर होत्या.,जपान, नॉर्वे व आइसलॅंड या देवमासे पकडणाऱ्या प्रमुख देशांनी वरील कायद्यांतून पळवाट काढली. शास्त्रीय प्रयोगांसाठी देवमासे पकडून नंतर त्यांचे मांस विकता येईल, या कलमाचा त्यांनी गैरफायदा घेतला.
अशाच प्रकारे वन्य जीवांची बेसुमार हत्या सध्याही चालू असल्याची अनेक उदाहरणे देता येतील. सर्व उष्ण सागरांतील हिरव्याकासवांची खाद्य पदार्थासाठी व पादत्राणांसाठी बेसुमार हत्या होत आहे. कायद्याचे संरक्षण लाभलेल्या आफ्रिकेतील मोठ्या सस्तन प्राण्यांचीही पारधचोर हत्या करीत आहेत कारण जागतिक बाजारपेठेत त्यांच्यापासून मिळणाऱ्या वस्तूंना मिळणारी वारेमाप किंमत. उदा., वाघ, सिंह, सागरी कासव, मगर इत्यादींची कातडी गेंड्याचे शिंग, हस्तिदंत यांना मिळणारे प्रचंड मोल. गेंड्याच्या शिंगाचे चूर्ण कामोत्तेजक म्हणून बऱ्याच देशांत वापरले जाते. भारतात सापाची कातडी, बेडूक इत्यादींचा बेकायदा व्यापार होतो. वेस्ट इंडीजमधील वृक्षावरील गोगलगाईच्या अनेक जाती दुर्मिळ होत आहेत कारण त्यांच्या सुंदर शंखांचा बरेच लोक संग्रह करीत आहेत.
अशा बेकायदा कृत्यांना आळा घालण्याच्या बाबतीत कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेजर्ड स्पीशिज (सीआयटीईएस) हा करार सर्वांत प्रभावी ठरला आहे. तथापि दर वर्षी वरील करारावर सह्या करणाऱ्या देशांपैकी काही देशच त्याचे उल्लंघन करतात.
प्राण्यांची आयात : अपरिचित वातावरणात प्राण्यांची आयात करणे हासुद्धा मानवी हावरटपणाचा एक प्रकार आहे. याची सुरूवात मानवाने नव्या भूप्रदेशात वसती करण्यास सुरुवात केली तेव्हापासून अव्याहतपणे चालू आहे. ऑस्ट्रेलियात सुरुवातील वसाहत करणारांनी आपल्याबरोबर डिंगो किंवा शिकारी कुत्रे नेले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूभागातून थायलॅसीन या मांसाहारी शिशुधान (पिलासाठी पोटावर पिशवी असणाऱ्या) प्राण्यांचे निर्मूलन होत आले. उरलेसुरले थायलॅसीन प्राणी आता पश्चिम टास्मानियाच्या दाट झुडपांच्या प्रदेशात टिकून आहेत. त्यामुळे त्यांना ‘टॉस्मेनियन वोल्फ’ हे नाव पडले आहे.
अशा तऱ्हेने नव्याने आयात केलेले प्राणी नव्या जलवयायुमानाशी (दीर्घकालीन सरासरी हवामानाशी) जुळवून घेऊ शकत नसतील, तरते तेथे जगू शकत नाहीत. जे जिवंत राहतात ते मूळ जीवजाती भक्षणकरून किंवा त्यांच्याशी अन्नासाठी स्पर्धा करून अडचणी निर्माण करतात. छोट्या बेटांवर हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो,कारण तेथे अन्न व राहण्याची जागा यांची चणचण असते. हवाईमध्ये यूरोपमधील वसाहतवाल्यांनी अमेरिका किंवा आशियातून आणलेल्या पक्ष्यांमुळे मूळच्या पक्ष्यांच्या सु. चौदा जाती विलुप्त होण्यास चालना मिळाली. कारण नव्या पक्ष्यांमुळे होणारे रोग किंवा स्पर्धा यांत मूळ पक्षी टिकाव धरू शकले नाहीत.
प्रदूषण : सततच्या व व्यापक विविध प्रकारच्या अशा प्रदूषकांमुळे पाणी, हवा व जमीन प्रदूषित झाली आहेत. आतापर्यंत सस्तन प्राणी प्रदूषकांना प्रतिकार करू शकले आहेत पण पक्षी, मासे, कीटक यांवर त्यांचे लक्षणीय दुष्परिणाम झाले आहेत. प्रदूषणाच्या भयंकर परिणामांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिकारी पक्षी होत. जीववैज्ञानिक अन्न साखळीत जमा होणाऱ्या रासायनिक कीटकनाशकांमुळे बाल्ड गरुड हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्रीय पक्षी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पारा, शिसे व अन्य पर्यावरणीय प्रदूषक पदार्थामुळेही मोठ्या पक्ष्यांच्या ऱ्हासाची गुंतागुंत वाढत आहे.
मोठ्या पक्ष्यांप्रमाणेच प्रदूषकांचा विपरीत परिणाम काही अन्य छोट्या प्राणिजातींच्या बाबतीतही झपाट्याने झालेला दिसतो. त्यांतील काही प्राणीजाती आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी महत्त्वाच्या आहेत. गरूडांना घातक ठरलेल्या किंवा त्यांच्या प्रजोत्पादनाला प्रतिबंध करणाऱ्या कीटकनाशकांमुळे पिकांच्या परागणाचे बहुमोल कार्यकरणाऱ्या मधमाश्याही नष्ट झाल्या आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने उपद्रवी कीटकांचे नियंत्रण करणाऱ्या मिजच्या आकारमानाच्या गांधील माश्यांचाही नाश झाला.
महाकाय तेलवाहू नौकांनाहोणाऱ्या अपघातांमुळे सर्व महासागरांत खनिज तेलाचे तवंग आढळतात. त्यामुळे त्यांतील विषारी घटकांमुळे दरवर्षी कोट्यावधी मासे व सागरी पक्षी मृत्युमुखी पडतआहेत. कीटकनाशके शेतजमिनीतून किनाऱ्यापर्यंत गेल्याने काही किनाऱ्यालगतच्या पाण्यातील सर्व जीव नष्ट झाले आहेत. त्याचबरोबर घरगुती व औद्योगिक सांडपाणी व मैलापाण्यामुळे एकेकाळी भरपूर मासे असलेली तळी व नद्या ओस पडू लागल्या आहेत.
औद्योगिक राष्ट्रांमध्ये अम्लयुक्त पाऊस हे पर्यावरणीय ऱ्हासाचे प्रमुख कारण झाले आहे. वीजनिर्मितीसाठी दगडी कोळसा व अन्य पदार्थ वापरण्यामुळे हे घडते. त्यामुळे हवेमध्ये गंधक व नायट्रोजनाची ऑक्साइडे सोडली जातात. वातावरणात गेल्यावर त्यांच्यामध्येरासायनिक बदल झाल्यावर ही प्रदूषके पाऊस व हिमवर्षाव यांच्याद्वारे पृथ्वीवर परत येतात. त्यामुळे तळी व जलाशयांतील कीटक व मासे यांना ते पाणी अती अम्लीय होते व पर्यायाने त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या जीवांनाही हे जीव अती अम्लीय होतात.
अधिवासाचा नाश : प्राण्यांचे अधिवास (वसतिस्थान) नष्टहोणे, हा फार मोठा धोका आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर मानवाने नैसर्गिक पर्यावरणाचा आपल्या सोयीसाठी फार झपाट्याने उपयोग करून घेतला आहे. वने तोडून शेती केली आहे शाद्वल व गवताळ प्रदेशांत घरे बांधली आहेत. ओढ्यानाल्यांच्या जागी ओसाड दऱ्या निर्माण झाल्या आहेत खोल अरूंद दऱ्यांमध्ये (कॅन्यन) पाणी साठवून जलाशय तयार केले आहेत व दलदलीच्या जागेवर व्यापारी गाळे बांधले आहेत. यामुळे तेथील प्राणी अन्यत्र घालविले गेले व इतरजीवांच्या अस्तित्वाला आवश्यक असे वसतिस्थान स्पष्ट झाले.
पूर्वी शेताच्या कडेच्या कुंपणामध्ये अनेक प्राण्यांची घरटी असत व तेथे त्यांना आसरा मिळे पण आधुनिक सलग व मोठी शेते झाल्यामुळे या वन्य जीवांना निवारा मिळत नाही. अमेरिकेच्या पश्चिम भागात सुरुवातीच्या वसाहत करणारांनी हरण व मृगांचे कळप पाहिले पण आता तेथील उत्तम कुरणांमध्ये फक्त पाळीव जनावरेच चरताना आढळतात.
इंटरनॅशनल कौन्सिल फॉर बर्ड प्रिझर्व्हेशन या संस्थेने नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेल्या पक्ष्यांची यादी तयार केली असून तीत जगातील ४००हून अधिक जातींच्या-उपजातींच्या पक्ष्यांचा समावेश आहे. या संस्थेच्या मते अधिवासांचा नाश हे या पक्ष्यांची संख्या घटण्याचे प्रमुख कारण आहे. यांतील वनात राहणाऱ्या पक्ष्यांवर याचा अधिक विपरित परिणाम होत आहे. ब्राझीलच्या वर्षावनांत असे पक्षी मोठ्या संख्येनेएकत्रित झालेले आढळतात पण ही वने मोठ्या प्रमाणावर तोडली जात आहेत. उष्ण कटिबंधातील जॅगुआर, किंगकजू व टॅपिर हे सस्तन प्राणी व त्यांच्या बरोबर उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) व सरीसृप (सरपटणारे) प्राणी यांचीही संख्या घटत आहे. जगामध्ये वर्षावनांत सर्वत्र अशाप्रकारे जास्तच प्रमाणात अधिवासाचा नाश सुरू आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पुष्कळ प्राण्यांचेभवितव्य धोक्यात आले आहे.
वन्य प्राण्यांच्या जोडीला वनस्पतींचेही संवर्धन केले पाहिजे, याकडे बहुधा दुर्लक्ष होते किंबहुना प्राणी व वनस्पती या दोन्हींना सारखेच महत्त्व दिले पाहिजे. कारण प्राणी व वनस्पती यांच्या जीवनांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. उष्ण कटिबंधातील एखादा मोठा वृक्ष तोडला, तर एकापेक्षा अधिक जीव नष्ट होतात. वृक्षाबरोबर किती तरी परजीवी झाडे व हवाई झाडे आणि त्या झाडांच्या कलशाकार पानांमधील जीवसृष्टी नष्ट होते.
जातींचे विलुप्तीभवन : जीवाश्मांच्या (शिळारूप अवशेषांच्या) अभ्यासाने जातींचा उदय व अस्त यांविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकते. क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) प्रक्रियेत जाती अस्तित्वात येत गेल्या आहेत, काही काळ त्यांची भरभराट झाली आणि त्यानंतर अपरिहार्यपणे त्यांचा नवीन जातींत क्रमविकास झाला किंवा त्या लोप पावल्या. तथापि सध्या विलुप्तीभवन खूपच झपाट्याने होत आहे. पूर्वीच्या विलुप्तीभवनाचा वेग व आधुनिक काळातील वेग त्यांची निश्चित तुलना करता येईल अशी आकडेवारी शास्त्रज्ञ आपल्याला देऊशकत नसले, तरी याबाबतीत आपण काही व्यवहार्य अंदाज बांधू शकतो.
आधुनिक युगाची सुरुवात सु. १६००मध्ये झाली. त्यावेळी असलेल्या जीवजातींच्या उदय व अस्ताविषयी अचूक माहिती देण्याइतपत पुरवा उपलब्ध आहे. तेव्हापासून सु. ३६सस्तन प्राणी विलुप्त झाले, तर डोडोप्रमाणे किमान ८५पक्षी नष्ट झाले. डोडो पक्षी १६८१मध्ये अस्तंगत झालेल्या जातींच्या इतिहासाचा मागोवा घेतला असता शास्त्रज्ञ असे अनुमान काढतात की, ‘निसर्गतः’ शेवट झालेल्या चार जातींपैकी एक जाती अस्तित्वात होती. बाकीच्या विविधप्रकारांच्या मानवी कृत्यांना बळी पडल्या. ही आकडेवारी चारशतकांपूर्वी पृथ्वीतलावर मानव जातीने प्रमुख स्थान मिळविले तेव्हापासून विलुप्तीभवनाचा वेग पूर्वीपेक्षा चौपट वाढला आहे, असे सूचित करते.
प्रवासी पारवा हे अशा विनाशाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. वसाहतवाले उत्तर अमेरिकाभर पसरू लागले. तेथील लाखो जंगली पारव्यांचे थवे पाहून ते घाबरून जात. उत्तर अमेरिकेत या पश्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ३००कोटी होती. यांचे थवे उडत जवळ येऊ लागले म्हणजे चूर्णवाती वादळासारखा आवाज येत असे व सूर्य झाकोळून जात असे.
एवढ्या गर्दीने उडताना किंवा ‘पीजनसिटीज’ मध्ये गर्दी करून जेव्हा ते जंगलामध्ये आश्रय घेत, तेव्हा त्यांची भयंकर हत्या केली जाई व त्यामुळे ते आले म्हणजे अन्न, तेल व पंखांचा सुकाळ समजला जाई. लहान मुले हातात काठी घेऊन थव्यातील डझनभर पक्षी काही मिनिटांत मारीत. ते कधी संपणारच नाहीत असे मानीत. यादवी युद्धाच्या शेवटीही हे पक्षी अगदी विपुल होते. मात्र त्यांच्या ऱ्हासाला केव्हाच सुरुवात झाली होती. ते नव्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत, ते जेथे जमिनीवर उतरत तेथे त्यांच्यावर मानवाकडून एकसारखे हल्ले होत व जंगलतोड झाल्यामुळे त्यांचे खाद्य असलेली बीचनट, ॲकॉर्न व अन्य रानटी फळे मिळेनाशी झाली. ही गोष्ट लक्षात येण्यापूर्वीच प्रवासी पारवा दिसेनासा झाला. अगदी थोडे पिंजऱ्यामध्ये जिवंत राहिले. त्यांतील शेवटची मार्था नावाची मादी सिनसिनॅटी प्राणिसंग्रहालयात १९१४मध्ये मरण पावली.
वन्य जीव रक्षणाच्या पद्धती : भारतात सम्राट अशोकांच्या काळापासून (इ.स.पू. तिसरे शतक) वन्य जीव रक्षणाची जाणीव होती. त्यांनी आपल्या पाचव्या स्तंभांवर वटवाघळे, माकडे, गेंडे, साळी, वृक्ष खारोट्या इत्यादींची शिकारू करू नये व जंगलात वणवे लावू नयेत, असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते व हे इतिहासातील पहिले कायदे होत. कौटिलीय अर्थशास्त्रात वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ अभयारण्ये असावीत याचा उल्लेख आढळतो. ऋग्वेद आणि इतरवेदांतही त्यासंबंधी उल्लेख सापडतात.
इ. स. १८८०-९०या काळात पश्चिमात्य देशांनी व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी यासंबंधी कायदे करून राष्ट्रीय उद्याने, संरक्षित नैसर्गिक प्रदेश, अभयारण्ये इ. निर्माण करून वन्य जीवांना संरक्षण आणि मानवाला ज्ञान व मनोरंजन मिळवून दिले. त्याचबरोबर त्यांपासून आर्थिक लाभही पदरात पडून घेण्यास सुरूवात केली.
भारतात १८८३साली ⇨बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीची स्थापना झाली. वरील बाबींमध्ये भारत सरकारने काही कायदे केले व राष्ट्रीय वननीती तयार केली व एक केंद्रीय ‘वन्य जीव रक्षण मंडळ’ नेमले वरीलप्रमाणे कायदे राज्य शासनांनी करून त्यांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. भारतात सर्व राज्यांत पशू संरक्षण व संवर्धन यांबाबतीत समान कायदे नसले, तरी थोड्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्याचेच फळ म्हणून महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प, आंध्र प्रदेशातील मगर संवर्धन प्रकल्प, ओरिसातील सागरी कासवांचे प्रजनन व संरक्षण असे निरनिराळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
वन्य जीवांच्या संरक्षणाच्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार व्हावयास हवा. त्यात आर्थिक, शास्त्रीय, सांस्कृतिक, धार्मिक, सौंदर्यविषयक व सर्वांत महत्त्वाचा म्हणजे विकासात्मक बाबींचा समावेश होतो. आर्थिक बाबींचा विचार करताना मासेमारी, देवमाशांची शिकार व अन्य प्राण्यांपासून मिळणाऱ्या वस्तू या गोष्टी विचारात घ्यावयास हव्यात. आधुनिक साधने उपलब्ध झाल्यामुळे माशांची संख्या घटू लागली. त्यावर निर्बंध घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती (आयोग)स्थापण्यात आली. १९०१मध्येच शिकारीचे व इतर मासे यांच्यासंरक्षणार्थ कायदे करण्यात आले. त्यांत माशांबरोबर रानटी प्राणी, पक्षी यांचाही समावेश केला. ठराविक लांबीपेक्षा कमी लांबीचे देवमासे, तसेच पिले व माद्या मारण्यावर बंदी घातली विशिष्ट ऋतूत व संरक्षित क्षेत्रात शिकारीस बंदी घातली माकडांचा उपयोग प्रयोगशाळांत माणसावरील औषधाचा परिणाम पाहण्यासाठी केला गेला. कस्तुरी मृगापासून मिळणारी कस्तुरी अनेक रोगांवर औषध म्हणून वापरली जाते. तसेच वाघची चरबी संधिवातावर उत्तम औषध म्हणून गणली जाते, म्हणून त्यांची हत्या होते. यामुळे त्यांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे.
भारतातून नाहीशा झालेल्या व नाहीशा होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने पुढील जीवांचा समावेश होतो : (१) काळे हरिण, (२) चौशिंगा, (३) बारशिंगा, (४) कस्तुरी मृग, (५) जंगली म्हैस, (६) गवा, (७) गोरखूर (रानटी गाढव), (८) गेंडा, (९) सिंह, (१०) चित्ता, (११) हंगुळ. १९५९-६०मध्ये भारत सरकारने ओरिसा व बिहारमध्ये प्रत्येकी एक उद्यान उभारले, तसेच महाराष्ट्रात व राजस्थानात एकएक अभयारण्य उभारले. १९८८−९०पर्यंत भारतभर शंभरापेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने उभारण्यात आली होती. [⟶राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश]
आंतरराष्ट्रीय कार्यक्रम : वन्य जीवांविषयीचे प्रश्न एखाद्या राष्ट्रापुरतेच मर्यादीत नाहीत, हे तज्ञांच्या अधिकाधिक ध्यानात येऊ लागले आहे. उदा., सध्या सर्व जगाला भेडसाविणारा सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे झपाट्याने होणार उष्ण कटिबंधी वर्षावनांचा नाश, हा होय. १९८०−९०दशकाच्या मध्यास दरवर्षी सु. १,५५,०००चौ. किमी. क्षेत्रातील किंवा ऑस्ट्रेलियाच्या सु. दुप्पट क्षेत्रातील वने तोडली जातहोती. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या लक्षावधी जाती त्यामुळे नष्ट होत होत्या. कारण त्या अन्यत्र कोठे जगू शकणार नाहीत. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वॉर्वलर, हळदू व इतर पक्षी उन्हाळी हंगामात समशीतोष्ण कटिबंधातील जंगलात व शाद्वलांमध्ये राहतात व दरवर्षी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वर्षावनांत घालवितात.
वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) व इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस (आययूसीएन) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना पूर्वी ज्या भागांत काम झाले नव्हते अशा ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचे कार्यक्रम उष्ण कटिबंधातील देशांत विशेष महत्त्वाचे आहेत कारण पृथ्वीवरील अधिकतर जननिक विविधतेची पाळेमुळे तेथे आहेत. एक्वादोरमध्ये उभारलेला अलीकडील कार्यक्रम त्यादृष्टीने ह्या प्रश्नांची उकल करणारा ठरणार आहे. त्या देशातील कोतोकाची -कायापास इकॉलॉजिकल रिझर्व हा २०,०४,०००हेक्टर क्षेत्रावर पसरलेला असून त्यांत पक्ष्यांच्या २४०पेक्षा अधिक जाती, तसेच जॅगुआर व ऑसेलॉट या प्राण्यांना संरक्षण मिळाले आहे. झपाट्याने होणारे वसाहतीकरण व इमारती लाकडाची तोड यांमुळे विस्थापित झालेले ७,०००कायापास इंडियन या संरक्षितप्रदेशाच्या जवळच राहतात. वर्ल्ड वाईल्डलाइफ फंडाच्या प्रतिनिधीने कायापास इंडियनांशी संपर्क साधून या प्रदेशाच्या भावी विकास कार्यक्रमांत व व्यवस्थापनातील नोकऱ्यांत इंडियनांना सामावून घेतले.तसेच कायापास इंडियनांना शिकार करता यावी व जंगलातील आवश्यक ती उत्पादने मिळविता यावीत म्हणून त्या प्रदेशात वेगळा विभाग राखून ठेवला. या फंडाने भारत सरकारच्या सहकार्याने व्याघ्र प्रकल्प राबविला. काही वर्षापूर्वी भारतातील वाघांची संख्या घटून सु. १,८००झाली होती. त्यामुळे वाघ नष्ट होतो की काय अशी भीती निर्माण झाली होती व तो फक्त प्राणिसंग्रहालयातच पहायला मिळले, असे वाटले होते परंतु संरक्षित प्रवेश ठेवल्यामुळे वाघांची संख्या ४,०००च्यावर गेली. दोन संरक्षित प्रदेशांच्या जवळचे वाघ कधीकधी माणसावरही चाल करतात, अशावेळी त्यांना पकडून प्राणिसंग्रहालयात किंवा रानात सोडून देतात. [⟶ वाघ].
परिस्थितिवैज्ञानिक क्षेत्रीय अध्यन : अनेक आश्रयस्थाने व राष्ट्रीय उद्याने यांमधील जातींचा ऱ्हास झाल्यामुळे त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांचे लक्ष त्या समस्यांशी संबंधित बाबींकडे वळले आहे. मूलतः सृष्टिसौंदर्य टिकविण्यासाठी व काही महत्त्वपूर्ण जातींना आश्रय देण्याच्या हेतूने बहुतांश संरक्षित प्रदेश राखून ठेवलेले आहेत. हे आता लक्षात आले आहे की, संपूर्ण परिस्थितिवैज्ञानिक प्रणालीत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचे समूह मृदा, खडक व पाणी यांच्या अजैव प्रणालीत किंवा प्रणालीवर जगत असतात. आजकाल एकूण प्रकल्पाच्या वन्य जीव व्यवस्थापनाचे महत्त्वाचे साधन ठरणाऱ्या सविस्तर क्षेत्रीय अध्ययनाचा आस्थापनेत सामान्यतः समावेश करतात. आपल्या परिस्थितीवैज्ञानिक प्रणालीतील अन्य घटकांशी दुर्मिळ किंवा विलुप्ती भवनाच्या मार्गावर असलेल्या जाती कसे वर्तन करतात, याचे शास्त्रज्ञ अध्ययन करतात. अशा सर्वेक्षणात एखाद्या प्राण्याचा उपकरणांच्या मदतीने माग काढणे व संगणकाच्या साहाय्याने त्यांची संख्या पडताळणे ह्या अत्याधुनिक तंत्रांचा समावेश होतो.
उष्ण कटिबंधात वर्षावनाच्या केवढ्या क्षेत्रावर तेथील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व प्राणी यांचे नैसर्गिक समूह जगू शकतील, हे पाहणे हा अशा अध्ययनांचा अंत्म हेतू असतो. या संरक्षित क्षेत्रात शास्त्रज्ञांनी ‘डॉमिनो’ परिणामाकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे. उदा., फुलपाखरू किंवा फलभक्षक वटवाघळासारख्या परागसिंचनास मदत करणाऱ्या वनस्पती नष्ट होतील व अशा तऱ्हेने त्या वनस्पतींवर अवलंबून असणारा प्राणिसमूह नष्ट होईल [⟶ परिस्थितिविज्ञान].
विशेषतः स्थानांतर करणाऱ्या जातींच्या अनेक प्राण्यांची जीवनचक्रे नक्कीच अशा संरक्षित प्रदेशांच्या पार करून जातात. दा., विशिष्ट पक्षी, सागरी कासवे, महासागरी सस्तन प्राणी व मॉनर्क फुलपाखरू या जातींच्या बाबतीत प्रजनन क्षेत्र व हिवाळी घर अशा दोन्ही ठिकाणी दिलेले संरक्षण त्या जाती टिकण्याच्या दृष्टीने अपुरे ठरते. याच्या जोडीने स्थानांतर करताना अन्न घेण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी हे प्राणी जेथे एकत्र येतात, अशा जागा मोकळ्या ठेवण्यासाठी तरतूद अवश्य केली पाहिजे.
सँडपायपर व प्लव्हर गे पक्षी वापरत असलेल्या उत्तर व दक्षिण अमेरिका यांच्या दरम्यानच्या दीर्घ पल्ल्याच्या स्थानांतराच्या मार्गावरील टप्पे ओळखून त्यांचे रक्षण करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. विविध संघटना व मंडळे ‘दुय्यम संरक्षित प्रदेशाचे जाळे’ उभारण्याच्या कामी सहकार्य करीत आहेत. या जाळ्यामुळे पश्चिम गोलार्धातील किनारपट्टीलगतच्या किनारी पक्ष्यांची महत्त्वाची अन्न क्षेत्रे जोडली जातात. पहिले पाऊल म्हणून डेलावेअर उपसागरावरील पुळणी खरेदी करण्यासाठी निधी बाजूला काढून ठेवला. गेली अनेक शतके लक्षावधी किनारी पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत या पुळणींचा उपयोग स्थानांतर अवस्थेतील क्षेत्र (टप्पा) म्हणून करीत आहेत. उपआर्क्टिक प्रजनन स्थाने ते अर्जेंटिना या स्थानांतर मार्गांवरील संरक्षित ठिकाणांची एक मालिका प्रस्थापित करण्याचे रक्षणवाद्यांचे प्रयत्न चालले आहेत.
व्यवस्थापन तंत्रे: शारीरिक संरक्षण ही वन्य जीवरक्षणाची एक बाजू झाली. अनेक वर्षे जीववैज्ञानिक प्रत्यक्ष संख्या वाढवून वा घटवून प्राणिसंख्येचे नियमन करीत. पूर्वी या तंत्राचा वापर प्राण्यांच्या कल्याणापेक्षा माणसाचा आनंद या दृष्टीनेच जास्त केला जाई. क्रीडा मत्स्यांच्या बाबतीत ‘द्या−आणि−घ्या’ प्रक्रिया परिचित आहे. ट्राउट किंवा अन्य क्रीडा मत्स्याची अंडी शासकीय केंद्रात उबवून ती ज्या प्रवाहांतील नैसर्गिक मासे प्रदूषण किंवा अती मासेमारीमुळे नष्ट झाले आहेत, अशा प्रवाहांत सोडतात. नंतर अशा ठिकाणी परवानाधारक व्यक्तींना मासेमारी करण्याची परवानगी दिली जाते. तसेच शासकीय यंत्रणा फेझंट पक्ष्यासारखे क्रीडा पक्षी वाढवून शिकाऱ्यांसाठी जंगलात सोडून देतात.
याउलट कधीकधी वन्य जीवांची संख्या त्यांना मारून कमी करावी लागते. पारंपारिक नियंत्रण नसल्यामुळे काही भागांतील हरणांचे कळप चाऱ्याच्या पुरवठ्याच्या मानाने खपूच झपाट्याने मोठे होतात. त्यामुळे त्या भागातील चारा संपल्यामुळे इतर वनस्पतींचे खूप नुकसान होते, तर काही हरणे उपासमारीने मरतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये काही राज्ये शिकारीचा हंगाम व मारावयाच्या प्राण्यांची संख्याही ठरवितात. अशा तऱ्हेने शिकारी नैसर्गिक परभक्षकाची जागा घेतात व हरणांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात.
विलुप्तीभवनाच्या मार्गावर असलेल्या जाती वाचविण्याच्या जीववैज्ञानिकांच्या अलीकडील प्रयत्नांमुळे वन्य जीवांच्या व्यवस्थापनाने नवीन वळण घेतले आहे. काही जातींच्या बाबतींत कायद्याने पूर्ण संरक्षण देणे व वन्यजीवांसाठी निवारे उभारणे यांसारखी आदर्श व्यवस्थापन तंत्रे वापरूनही त्यांची संख्या घटवण्याचे थांबले नाही, अशा वेळेला जीववैज्ञानिक ‘रुग्णालयीन दृष्टिकोन’ किंवा ‘परिस्थितिवैज्ञानिक सुधारणा’ या तंत्राचा अवलंब करतात. त्यामध्ये संख्या घट रोखण्यापेक्षा तिचे कारण नष्ट करण्याकडे अधिक लक्ष दिले जाते. त्यामध्ये पिंजऱ्यांमधअये पैदास करणे व त्या जातीचे अस्तित्व टिकविण्याच्या व्यवस्थापन तंत्रांचा समावेश होतो.
प्रवासी ससाण्याच्या समस्येच्या बाबतीत रूग्णालयीन दृष्टीकोन तंत्रांना आश्चर्यकारक यश लाभले आहे. अमेरिकेत या मोठ्या व उमद्या पक्ष्याची (ससाण्याची) पैदास बऱ्याच मोठ्या भागात होते. कीटकनाशकांच्या साक्यामुळे त्यांची अंडी निर्जीव होतात. पिंजऱ्यात पाळून पैदास करणे व नंतर जंगलात सोडून देणे, यांमध्ये अडचणी असल्यामुळे ससाणा नष्ट झाला, असेच वाटत होते. तथापि टॉम जे. केड व इतर ससाण्याच्या मदतीने शिकार करणाऱ्या अनुभवी मंडळींनी कॉर्नेल विद्यापीठात एक प्रजनन कार्यक्रम हाती घेतला, त्यामध्ये पूर्वीच्या ससाण्याच्या शिकारीच्या तंत्राचा वापर केला. ससाण्याला मोठ्या पक्ष्यांची शिकार करण्याचे शिक्षण दिले व जगात स्वतःच्या पायावर जगण्याचे शिकविले. डीडीटी या कीटकनाशकाचे पर्यावरणातून दीर्घ काळ टिकणारे साके नष्ट होतील तेव्हा या पिंजऱ्यात पाळून पैदास केलेल्या ससाण्यांची नवी पिढी प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा आहे.
नव्या व्यवस्थापन तंत्रांचा वापर सर्वत्र अधिकाधिक होत आहे.यू.एस. फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसने नॅशनल ऑडुबॉन सोसायटीच्या सहकार्याने कॅलिफोर्निया काँडॉर (गिधाड) वाचविण्यासाठी एक कार्यक्रम आखला आहे. पिंजऱ्यातील प्रजनन तंत्रांचा उपयोग एक पायरी पुढे नेऊन यू.एस. फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसमधील जीववैज्ञानिक रानटी ह्यूपिंग करकोचाच्या शेवटच्या थव्यातील पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी संमिश्र-पालनपोषणतंत्राचा अवलंब करीत आहेत. एकेकाळी प्राणिसंग्रहालये या सार्वजनिक मनोरंजनाच्या संस्था होत्या. आता विलुप्तीभवनाच्या मार्गावर असलेल्या जातींची संगोपनगृहे म्हणून त्यांचा तातडीने उपयोग करून घेण्यात येत आहे. सध्या जगातील प्रत्येकी १२जातींपैकी एका जातीच्यापक्ष्यांचे प्राणिसंग्रहालयात प्रजनन केले जात आहे. पेर डेव्हिड हरिणाचे चीन हे मूलस्थान असून तेथे ते फार पूर्वी विलुप्त झालेले आहे. सध्या मात्र ते प्राणिसंग्रहालयात आणि प्राणीउद्यानांतच अस्तित्वात आहे.
जनजागृती : प्राणीसंग्रहालये, दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि वन्य जीवांना वाहिलेली पुस्तके व नियतकालिके यांनी जनतेमध्ये वन्य जीवांबद्दल व त्यांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांबद्दल अधिकाधिक लोकांमध्ये आस्था निर्माण केली आहे. त्यामुळे वन्य जीवांच्या नाशाची कारणे शोधणे व त्यांवरील उपाययोजनांना प्रोत्साहन देणे, या गोष्टींना चालना मिळाली आहे. धरणे, महामार्ग इ. प्रकल्पांमुळे वन्य जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार असेल, तर अशा प्रकल्पांचे आराखडे बदलण्यात येतात. उदा., केरळ राज्यातील सायलेंट व्हॅली प्रकल्प.
पहा : भारत महाराष्ट्र राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश वन्य जीवांचे आश्रयस्थान वाघ.
संदर्भ : 1. Dasmann, R. F. Environmental Conservation, New York, 1959.
2. Israel, Samuel Sinclair, Toby, Eds. Indian Wildlife, 1967.
3. Rudd, R. L. Pesticides and the Living Landscape, Madison, 1963.
4. Saharia, V. B. Wild Life in India, Dehra Dun, 1982.
5. Thomas, W. L. Ed. International Symposium on Man’s Role in the Changing Face of the Earth, Chicago, 1956.
6. Udall, S. L. The Quiet Crisis, New York, 1963.
7. Vogt, W. People : Challenge to Survival, New York, 1951.
8. Wing, L. W. Practice of Wildlife Conservation, New York, 1951.
जोशी, मीनाक्षी र. जमदाडे, ज. वि.
“