वनस्पति-रसायनशास्त्र : (फायटोकेमिस्ट्री). वनस्पतीसंबंधीच्या रासायनिक माहितीचा या विषयात समावेश होतो. वनस्पतींचे खनिज पोषण, श्वसन व चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडी) यांसंबंधीच्या माहितीचे अध्ययन वनस्पतींचे शरीरक्रियाविज्ञान व जीवरसायनशास्त्र या विषयांत करण्यात येते [⟶ चयापचय जीवरसायनशास्त्र वनस्पतींचे खनिज पोषण शरीरक्रियाविज्ञान, वनस्पतींचे श्वसन, वनस्पतींचे]. सामान्यतः वनस्पतींद्वारे कार्बनी (सेंद्रिय) पदार्थाची निर्मिती आणि कार्बन डाय-ऑक्साइडाचे स्थिरीकरण तसेच अल्कलॉइडे, ग्लायकोसाइडे, टॅनिने, बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारी) तेले, डिंक, रेझिने, रंजकद्रव्ये, तेले व वसा (मेदे) वगैरे वनस्पतिजन्य पदार्थ यांच्या अध्ययनाचा वनस्पति-रसायनशास्त्रात अंतर्भाव होतो. प्रारंभी ही कार्बनी रसायनशास्त्राची एक शाखा मानण्यात येत होती.
कार्बन डाय-ऑक्साइड व काही अकार्बनी मूलद्रव्ये यांपासून सर्व वनस्पतींत साखर, स्टार्च, वसा, प्रथिने इ. पदार्थ तयार होतात. वनस्पतींच्या काही जातींत काही विशिष्ट पदार्थच तयार होतात. एखादा पदार्थ काही जातींत जास्त प्रमाणात आढळतो, तर तोच पदार्थ दुसऱ्या जातींत अत्यल्प प्रमाणात आढळतो. तसेच एखाद्या जातीत वा गुणात्मक दृष्ट्या तिच्या जवळच्या जातींमध्ये एखादा पदार्थ असा आढळून येतो की, तो इतर ज्ञात जातींत आढळत नाही. त्याचप्रमाणे एकाच कुलातील एखाद्या जातीत जो पदार्थ आढळतो, तो त्याच कुलातील इतर जातींत सापडू शकेलच असे नाही.
वनस्पति-रसायनशास्त्र हे ओषधोपयोगी वनस्पतिजन्य पदार्थ ओळखण्याच्या कार्यात महत्त्वाचे आहे. नवीन वनस्पति-रसायशास्त्रीय पद्धती विकसित झाल्यामुळे वनस्पतींच्या वर्गीकरणविज्ञानविषयी नवीन माहिती उपलब्ध झालेली आहे वा त्यामुळे आधुनिक रासायनिक वा जीवरासायनिक वर्गीकरणविज्ञानाचे नवीन क्षेत्र उदयास आले आहे. नैसर्गिक चयापचयजन्य पदार्थांच्या जीवरसायनशास्त्राच्या बाबतीत वनस्पतीची प्रत्येक जाती दुसऱ्या जातीपासून (अगदी त्याच प्रजातीतील सुद्धा) काही प्रमाणात तरी भिन्न असण्याची प्रवृत्ती आढळते. काही वेळा हा फरक समजण्यास कठीण व सूक्ष्म असतो, तर काही वेळा तो स्पष्ट व सहज दिसण्याजोगा असतो. नवीन वैश्लेषिक तंत्रांमुळे एखाद्या वनस्पतीपासून मिळणारे अनेक पदार्थ चटकन व खात्रीशीरपणे ओळखता येतात. अशी माहिती वनस्पतींच्या वर्गीकरणात वस्तुनिष्ठ व परिमाणात्मक स्वरूपाचा पुष्टीकारक वा पूरक पुरावा म्हणून अतिशय उपयुक्त ठरते.
वनस्पतींपासून मिळणारी टॅनिने, बाष्पनशील तेले, डिंक वगैरे पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार होत असल्सामुळे आणि ते आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे व शास्त्रीय दृष्ट्या जटिल असल्याने त्यांच्याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले. त्यांचे रंग, औषधी गुण, गंध इत्यादींमुळे मानवाचे इतिहासपूर्व काळातही त्यांच्याकडे लक्ष गेले होते. जरी संश्लेषित कार्बनी रसायनशास्त्रात [⟶ संश्लेषण, रासायनिक] अलीकडे खूप प्रगती झालेली असली, तरी वनस्पती ज्याप्रमाणे हे पदार्थ तयार करतात अगदी त्याचप्रमाणे शास्त्रज्ञांना ते प्रयोगशाळेत तयार करता येत नाहीत.
वरीलपैकी काही पदार्थ एखादी वनस्पतीची जातीच अगर काही जातीच तयार करतात. कार्बन डाय-ऑक्साइड व खनिज मूलद्रव्ये यांपासून ज्या मूलभूत रासायनिक विक्रियांद्वारे वनस्पती वरील पदार्थ तयार करतात व ज्या विक्रियांवर पृथ्वीवरील प्राण्यांचे जीवन अवलंबून आहे त्यांकडे पाहिले असता वरील विशिष्ट पदार्थ वनस्पतींच्या शरीरक्रियेस आवश्यक नाहीत, तर हे पदार्थ वनस्पतींच्या दृष्टीने टाकाऊ आहेत, असे स्पष्ट दिसते. तरीही काही वनस्पती ठराविकच पदार्थ का निर्माण करतात व अन्य वनस्पती संपूर्णतः नवीनच पदार्थ अगर त्यांची अनित्य निर्मिती का करतात, असा प्रश्न उत्पन्न होतो. या पदार्थाच्या शरीरक्रियाविज्ञानासंबंधीची माहिती अद्यापि अपुरी असल्याने वनस्पतींच्या शरीरक्रियाविज्ञानाच्या व जीवरसायनशास्त्राच्या माहितीमध्ये वरील पदार्थांच्या रसायनशास्त्राच्या माहितीचा फारसा उल्लेख आढळत नाही मात्र हे पदार्थ वनस्पतींपासून कसे वेगळे करावेत, त्यांचे रसायनशास्त्र आणि त्यांची रासायनिक संरचना ठरविणे यांसंबंधीचे विवरण बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे. वनस्पतीमध्ये या पदार्थांचे संश्लेषण कसे होते व वनस्पतींच्या चयापचयात त्यांचे नेमके स्थान कोणते, यांविषयी फारशी माहिती अद्यापि उपलब्ध झालेली नाही.
पहा : अल्कलॉइडे ग्लापयकोसाइडे ग्लु कोसाइडे टॅनिने डिंक तेले व वसा बाष्पनशील तेले रंजक व रंजक द्रव्ये रबर रेझिने सुवासिक द्रव्ये.
भदे, व. ग.