वनस्पति, प्रकटबीज उपविभाग : बीज निर्मिणाऱ्या वनस्पतींच्या दोन प्रमुख गटांपैकी हा एक गट असून आवृतबीज वनस्पती उपविभाग [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग ] हा दुसरा गट आहे. प्रकटबीज वनस्पतींच्या फक्त ७५० जाती असल्या, तरी त्या सर्व वनस्पतींपेक्षा अदिक परिचित, महत्त्वाच्या व जीववैज्ञानिक दृष्ट्या कुतूहलजनक आहेत. यांपैकी पाइन, स्प्रूस, सीडार, जूनिपर, ॲरोकॅरिया व कौरी या काही वनस्पती असून त्या जगाच्या पुष्कळ विभागांतील वनश्रींचा (एखाद्या प्रदेशातील संपूर्ण वनस्पतींचा) प्रमुख घटक आहेत. प्रकटबीज वनस्पतींच्या पुष्कळ जाती इमारती लाकूड, शोभेच्या व अन्य वनस्पती, तसेच बाष्पनशील (बाष्परूपाने हवेत उडून जाणारी) तेले व अन्य उत्पादनांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. काही जाती औषधी वनस्पती म्हणूनही उपयुक्त आहेत. इतिहासपूर्व काळातील प्रकटबीज वनस्पतींच्या वनांतील अवशेष हा कार्बनी द्रव्याचा मोठा भाग असतो आणि त्यापासून दगडी कोळसा तयार झाला. रूप व संरचना यांतील विविधता, सध्याचा व भूतकाळातील प्रसार आणि उत्तम रीत्या परिरक्षित (टिकून राहिलेली) जीवाश्मांची (शिळारूप झालेल्या अवशेषांची) बरीचशी परिपूर्ण माहिती (अभिलेख) या गोष्टींमुळे प्रकटबीज वनस्पती जीववैज्ञानिक दृष्ट्या फारच महत्त्वाच्या आहेत.
शंकुमंत (सूचिपर्णी) वनस्पती, गिंको व बर्मी (टॅक्सॅड) यांचा समावेश असलेला कॉनिफेरोफाइट सायकसांचा समावेश असलेला सायकॅडोफाइट आणि नीटम, जॉइंट फर व वेल्विशिया यांचा समावेस असलेला नीटोफाइट हे हल्लीच्या जिवंत प्रकटबीज वनस्पतींचे प्रमुख गट आहेत.
आर्थिक महत्त्व : सर्वांत मौल्यवान इमारती लाकूड प्रकटबीज वनस्पतींपासून मिळते. उत्तर गोलार्धात पाइन, डग्लफस फर, सीडार व रेडवुड आणि दक्षिण गोलार्धात कौरी, पोडोकार्प, डॅक्रिडियम व ॲरोकॅरिया या प्रमुख वनस्पती आहेत. कागदाच्या निर्मितीत लगदा तयार करण्यासाठी हेमलॉक, स्प्रूस, फर व पाइन या वनस्पती महत्त्वाच्या आहेत. प्रकटबीज वनस्पतींचे काष्ठ ‘मृदुकाष्ठ’ असते व ते आवृतबीज वनस्पतींच्या (वृक्षांच्या) काष्ठापेक्षा (कठीण काष्ठ) संरचनात्मक दृष्ट्या भिन्न असते. एवढे असूनही काही थोड्या प्रकटबीज वनस्पतींचे लाकूड काही आवृतबीज वनस्पतींच्या लाकडापेक्षा कठीण असते.
लोकप्रियता व महत्त्व या बाबतींत शोभेच्या वनस्पती म्हणून प्रकटबीज वनस्पतींचा क्रमांक वरचा आहे. पाइन, स्प्रूस, फर, डग्लस फर, सीडार, जूनिपर, लार्च, आर्बरव्हिटी, हेमलॉक, यू, पोडोकार्प, ॲरोकॅरिया, गिंको, सायकस, कनिंगहॅमिया व कॅमीसायपॅरिस ह्या सर्व वनस्पती लागवडीत आहेत. यांपैकी काही विशेषकरून स्प्रूस, जूनिपर कॅमीसायपॅरिस या त्यांच्या अनेकविध उद्यानवैज्ञानिक प्रकारांसाठी प्रसिद्ध आहेत. ⇨पादपगृहात वाढविल्या जाणाऱ्या प्रकटबीज वनस्पतींपैकी सायकस, कौरी, ॲरोकॅरिया या बहुधा अगदी सामान्य आहेत. गृहवनस्पती म्हणून प्रकटबीज वनस्पती फारच मोठ्या आहेत परंतु ॲरोकॅरियासारख्यांची रोपे लोकप्रिय झाली आहेत. काही प्रकटबीज वनस्पती, उदा., पाइन व जूनिपर यांचा ⇨बॉनसाईसाठी उपयोग करतात.
अन्नोत्पादक वनस्पती म्हणून प्रकटबीज वनस्पतींना मर्यादित महत्त्व आहे. पाइन ‘नट’ हे व्यापारी दृष्ट्या गौणच आहे. ॲरोकॅरिया, गिंको, नीटम, टोरेया यांच्या बिया स्थानिक लोक खातात. प्रकटबीज वनस्पतींमध्ये सायकसांचा उपयोग अन्न म्हणून सर्वांत जास्त होतो. त्यांच्या बिया व खोडापासून पिष्ठमय पदार्थ मिळतो [⟶ साबुदाणा ]. स्वादकारक म्हणून सामान्य जूनिपर महत्त्वाचा आहे. त्याच्या मृदुफळांचा (मांसल शंकूंचा) उपयोग जिन व इतर अल्कोहॉलयुक्त पेयांना विशिष्ट स्वाद आणण्यासाठी होतो.
वन्यजीवांचे अन्न व निवारा या दृष्टींनी काही प्रकटबीज वनस्पती फारच महत्त्वाच्या आहेत. उदा., पाइन वृक्षाची पौष्टिक फळे पुष्कळ पक्षी खातात व चरणारे स्तनी (सस्तन) प्राणी पाला खातात. अशाच प्रकारचे प्रकटबीज वनस्पतींचे (स्प्रूस, हेमलॉक, फर, जूनिपर व जॉइंट फर यांचे) अन्य उपयोग होतात. काही सायकसांच्या बिया प्राणी खातात. दक्षिण आफ्रिकेत बॅबून हा प्राणी एनसेफॅलार्टॉसच्या बिया एवढ्या फस्त करतो की, स्थानिक पातळीवर सायकस निर्वंश (विलुप्त) होण्याची भीती निर्माण झाली आहे.
याउलट पाइन, सायप्रस, जूनिपर, यू व सायकस यांची पाने चरणाऱ्या प्राण्यांना धोकादायक असतात. ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत सायकस खाल्ल्याने प्राण्यांना विषबाधा होते त्यामुळे तेथे चराऊ रानातील सायकसाच्या निर्मूलनाचे प्रयत्न झाले आहेत. सायकसाच्या बिया खाण्याने माणसांना विषबाधा होते. ज्या प्रदेशात सायकसांचा अन्न म्हणून वापर होतो, तेथे विशिष्ट तंत्रिकावैज्ञानिक (मज्जा संस्थेचे) विकार आढळतात. शेंदरी मांसल आवरण असलेल्या यूच्या बिया व त्यांच्या कठीण गाभ्यामुळे माणूस मरतोही.
स्प्रूस, पाइन, जूनिपर, फर, हेमलॉक व आर्बरव्हिटी यांसारख्या प्रकटबीज वनस्पतींपासून बाष्पनशील तेले मिळतात. त्यांचा उपयोग सुगंधी साबण, हवा सुवासिक करण्यासाठीची द्रव्ये, जंतुनाशके, औषधी द्रव्ये, सौंदर्यप्रसाधने व सुवासिक द्रव्यांत करतात. हेमलॉक व स्प्रूस यांच्या सालीपासून टॅनीन मिळवितात. एके काळी भरपूर व्यापारी उपयोग असलेल्या नैसर्गिक रेझिनांचे महत्त्व आता कमी झाले आहे. कौरी कोपल हे अधिक माहीत असलेले व प्रकटबीज वनस्पतीपासून (ॲगॅथीस ऑस्ट्रेलिस) मिळणारे रेझीन असून जमीन खणून त्याचे तुकडे काढतात. बाल्टिक अंबर हे रेझीन निर्वंश पाइनपासून मिळते. टर्पेंटाइने ही सर्वांत महत्त्वाची ओलिओरेझिने (रेझीन व बाष्पनशील तेल यांची मिश्रणे) पाइन वृक्षापासून मिळवितात. ओलिओरेझिनांचे ऊर्ध्वपातन (प्रथम वाफ करून मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळण्याची क्रिया) करून टर्पेटाइन व रोझीन (राळ) मिळवितात. त्यांचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत. बाल्सम फर व यूरोपीय लार्च या वनस्पतींपासूनही टर्पेटाइन मिळते.
पुष्कळ प्रकटबीज वनस्पतींचे स्थानिक औषधी उपयोग होत असले, तरी व्यापारी महत्त्वाचे एकमेव अल्कलॉइड द्रव्य (एफेड्रीन) विशिष्ट जॉइंट फरपासून मिळवितात. त्याचा उपयोग श्वसन तंत्राच्या तक्रारींवर करतात.
बीजी नेचे, कॉर्डाइटेलीझ व प्रारंभीचे शंकुमंत वृक्ष या कार्बॉनिफेरस कल्पातील (सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) विलुप्त प्रकटबीज वनस्पतींचा दगडी कोळसा निर्मितीमध्ये मोठा वाटा आहे. हिरव्यागार वनश्रीचे ⇨पीटसारख्या द्रव्याचे जाड थर तयार झाले आणि लक्षावधी वर्षे खोलवर गाडले जाऊन व दाबले जाऊन त्याचा दगडी कोळसा तयार झाला.
बहुतेक प्रकटबीज वनस्पती तण संबोधिल्या जात नाहीत परंतु विशिष्ट परिस्थितीत म्हणजे नको तेथे वाढल्यास त्या उपद्रवी तण होतात. पिन्यन पाइन व जूनिपर यांच्या आक्रमणामुळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागातील चराऊ रानांची किंमत ढासळली आहे. त्यांनी उपयुक्त गवताळ वनश्रीची जागा घेतली आहे. पाइन व जूनिपर हे नापेर रानात लगेच उगवतात. त्यामुळे त्या रानात पुन्हा पेरणी करणे अवघड होते.
जूनिपर हे सफरचंदाच्या व गुलाब कुलातील इतर वनस्पतींच्या ‘सीडार ॲपल तांबेरा’ या रोगाच्या कवकाचे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचे) पर्यायी आश्रयी आहेत. उत्तर अमेरिकेच्या व्हाइट पाइनला (पायनस) ‘व्हाइट पाइन उत्स्फोट तांबेरा’ रोगाच्या कवकांची गंभीर स्वरूपाची बाधा होते.
सायकसांच्या मुळांवर हवेतील नायट्रोजनांचे स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजीव राहतात [⟶ सहजीवन]. नायट्रोजन चक्रामध्ये सायकस कोणते कार्य करतात हे माहीत नसले, तरी ज्या भागात अशा वनस्पती विपुल असतात, तेथे जमिनीमध्ये (मृदेत) नायट्रोजनाचा पुरवठा करण्याच्या कामी सायकसांनी निश्चित मोलाचे कार्य केले आहे.
डग्लस फर, फर पाइन, जूनिपर, स्प्रूस इ. विविध प्रकारांच्या प्रकटबीज वृक्षांवर ‘ख्रिसमस वृक्ष उद्योग’ अवलंबून आहे. ख्रिसमस वृक्ष नैसर्गिक भूमीतून किंवा लागवड केलेल्या क्षेत्रातून (मळ्यातून)मिळविलेले असतात.
नैसर्गिक किंवा लागवड केलेल्या वनश्रीमध्ये धूप नियंत्रणात, विशेषेकरून शंकुमंत वृक्ष महत्त्वाचे आहेत. पाइन, ॲरोकॅरिया, पोडोकार्प, क्रिप्टोमेरिया व लार्च या वृक्षांची पुनर्वनरोपणासाठी बरीच लागवड केली जाते. प्रकटबीज वनस्पतींची वने इतर वनांप्रमाणेच जलोत्सारण संरक्षणाचे मोलाचे कार्य करतात. निवारा पट्टा व वातरोधी म्हणून जूनिपर, डग्लस फर, स्प्रूस आणि कॅलिट्रिस यांची बरीच लागवड करतात.
निसर्गेतिहास : प्रसार व विपुलता : अंटार्क्टिका खंडाखेरीज इतर सर्व खंडांत प्रकटबीज वनस्पतींचा विस्तृत प्रसार झालेला आहे. विशेषतः समशीतोष्ण कटिबंधात त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उष्ण कटिबंधात कमी उंचीच्या प्रदेशापेक्षा पर्वतमय प्रदेशात त्या जास्त आढळतात. यूरेशियामध्ये अन्य कोणत्याही खंडापेक्षा प्रकटबीजी वनस्पतींच्या जास्त जाती (सु. ३५०) आढळतात. उत्तर अमेरिकेत सु. १५० जाती आढळतात तर आफ्रिका, दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे प्रत्येकी सु. ५० जाती आढळतात. त्यांच्या सु. दोन तृतीयांश जातींचे मूलस्थान उत्तर गोलार्धात आहे, तर एक तृतीयांश जातींचे मूलस्थान दक्षिण गोलार्धात आहे. ६७ प्रजातींपैकी ३५ प्रजातींचा प्रसार उत्तर गोलार्धापुरता मर्यादित आहे, तर २० प्रजातींचा प्रसार दक्षिण गोलार्धातच झाला आहे सायकसांच्या तीन प्रजाती (सायकस, मॅक्रोझॅमिया व झॅमिया), जॉइंट फर, नीटम, शंकुमंतांच्या सात प्रजाती (ॲगॅथीस, डॅक्रिडियम, जूनिपेरस, पॅपुआसीड्रस, फायलोक्लॅडस, पायनस व पोडोकार्पस) यांची वने विषुववृत्तापलीकडे जातात. त्यांच्या ३९ प्रजाती जुन्या जगात, ११ नव्या जगात व १७ दोन्हीकडे आढळतात.
सर्वांत अधिक क्षेत्र व्यापणारी प्रजाती म्हणजे जूनिपेरस (जूनिपर) होय. त्याची वने उत्तर गोलार्धाच्या बऱ्याच भागांत आर्क्टिकपासून उष्ण कटिबंधातील पर्वतांवर व दक्षिण गोलार्धात पूर्व आफ्रिकेमध्ये पसरलेली आहेत. उत्तर अमेरिका व यूरेशियामध्ये विपुल प्रसार असलेल्या प्रजाती म्हणजे ॲबीस (फर), लॅरिक्स (लार्च), पिसिया (स्प्रूस), पायनस (पाइन) या होत. पोडोकार्पस ह्या दक्षिणेकडील प्रजातीने सर्वाधिक क्षेत्र व्यापले असून मेक्सिकोपासून दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, आफ्रिका, मादागास्कर, आग्नेय आशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व बरीच दक्षिण पॅसिफिक बेटे येथे ती आढळते. याच्या उलट मर्यादित प्रसार असलेल्या प्रजातीही बऱ्याच आहेत. उदा., सेक्वोया कॅलिफोर्निया व ऑरेगन, सेक्वोयाडेंड्रॉन कॅलिफोर्निया, मायक्रोसायकस क्यूबा, सॅक्सिगोथिया चिली व पॅटागोनिया, स्ट्रँजेरिया दक्षिण आफ्रिका, बॉबेनिया ईशान्य ऑस्ट्रेलिया, मायक्रोकॅक्रिस टास्मानिया, निओकॅलिट्रॉपिस न्यू कॅलेडोनिया व तैवानिया तैवान येथे आढळतात.
प्रकटबीज वृक्ष आवृतबीज वृक्षांपेक्षा अधिक उत्तरेकडे आढळतात. उत्तर अमेरिकेत आर्क्टिकच्या सीमेलगत (खंडीय वृक्ष रेषेलगत) स्प्रस व लार्च ह्या दोन प्रकारांचे वृक्ष आढळतात. वाहिनीवंत (अन्नरसाची ने-आण करणारे घटक असलेल्या) वनस्पती ज्या सर्वाधिक उंचीवर वाढतात तेथेही प्रकटबीज वनस्पती वाढतात. काश्मीरमध्ये ५,३५० मी. उंचीवर जॉइंट फर आढळला आहे.
प्रकटबीज वनस्पती, विशेषतः शंकुमंत वनस्पती, जगाच्या विविध भागांतील खास करून उत्तर गोलार्धातील वनश्रींमध्ये प्रमुख वनस्पती आहेत. भरपूर प्रसार असलेली शंकुमंतांची जंगले आर्क्टिकच्या दक्षिणेस उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात आणि उत्तर यूरेशियात उत्तर वने म्हणून संबोधली जातात. उत्तर वनांच्या दक्षिणेस, उत्तर समशीतोष्ण कटिबंधातील पर्वतांवर, रॉकी पर्वत, आल्प्स पर्वत व हिमालय पर्वताप्रमाणे शंकुमंत वृक्षांची विपुल वने आहेत. उत्तर गोलार्धातील या शंकुमंतांच्या वनांमध्ये पिसिया, पायनस, ॲबीस, लॅरिक्स, त्स्युगा, जूनिपेरस व सीड्रस या प्रजातींचे भरपूर प्रतिनीधी आहेत.
दक्षिण गोलार्धात शंकुमंतांची वने उत्तर गोलार्धाच्या मानाने बरीच कमी आहेत. न्यूझीलंडमधील कौरी (ॲगॅथीस) वनांचा व दक्षिण ब्राझीलमधील पराना पाइन (ॲरोकॅरिया) वनांचा उल्लेख येथे आवर्जून केला पाहिजे. दक्षिण गोलार्धातील पुष्कळ शंकुमंत विविध कठीण लाकडाच्या वृक्षांच्या मिश्र वनांत वाढतात. ऑस्ट्रेलियातील विशिष्ट वर्षावने (ॲरोकॅरिया, ॲगॅथीस, पोडोकार्पस) व दक्षिण आफ्रिकेतील क्निस्नय वन (पोडोकार्पस) यांसारख्या वनांमध्ये हे शंकुमंत प्रमुख वनस्पती असू शकतात.
सध्याच्या जातींची संख्या अधिक असूनसुद्धा प्रकटबीज वनस्पती वनश्रीमध्ये बहुधा कधीही प्रमुख झाल्या नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे परंतु वनस्पतींचे आकारमान व ठसठशीतपणामध्ये त्या प्रमुख आहेत उदा., उत्तर वन, पाइन, फर, स्प्रूस, लार्च यांच्या सापेक्षतः अल्प जातींचा प्रभाव आहे. प्रकटबीज वनस्पतींच्या आवृतबीज वनस्पतींच्या व बहुधा कायक वनस्पतींच्यासुद्धा किती तरी अधिक जाती आहेत.
विशिष्ट प्रकारच्या प्रकटबीज वनस्पती भूवैज्ञानिक काळात विस्तृतपणे पसरलेल्या आढळतात. उदा., गिंको एको काळी पूर्व व पश्चिम गोलार्धात आढळत होते. चीनमधील गिंको बायलोबा किंवा मेडनहेअर वृक्ष [⟶ गिंकोएलीझ ] ही एकमेव जिवंत राहिलेली जाती मानवाने लागवड केल्यामुळे निर्वंश होण्यापासून वाचली. एके काळी आर्क्टिक ते अंटार्क्टिकपर्यंत आढळणाऱ्या सायकसांचा प्रसार आता उष्ण कटिबंधातील व उपोष्ण कटिबंधातील अल्पशा भागात सीमित झाला आहे. एक गट म्हणून ते निर्वंश होण्याच्या मार्गावर आहेत. डॉन रेडवुड (मेटोसेक्वोया) एके काळी उत्तर अमेरिकेत व यूरेशियात वाढत होते. खरे पाहता ही प्रजाती जीवाश्मांवरून माहीत झाली होती.
जीवनचक्र : पाइनाचे जीवनचक्र हे प्रकटबीज वनस्पतींचे प्रारूपिक (नमुनेदार) जीवनचक्र होय (आ. १). सर्व प्रकटबीज वनस्पतींमध्ये अलैंगिक अवस्थेत बीजुकधारी (सूक्ष्म लाक्षणिक प्रजोत्पादक अवयव म्हणजे बीजुक निर्माण वा धारण करणारी) पिढी व लैंगिक अवस्थेत गंतुकधारी (जनन कोशिका म्हणजे गंतुक धारण करणारी) पिढी असे पिढ्यांचे एकांतरण असते [⟶ एकांतरण, पिढ्यांचे ]. बीजुकधारी वृक्ष असून त्याला मुळे, खोड, फांद्या, पाने व शंकू हे अवयव असतात. शंकू बीजुके निर्माण करतात व ती विकास पावून गंतुकधारी बनतात. गंतुकधारी नर व मादी हे सूक्ष्म असतात व ते गंतुके निर्माण करतात. त्यांना अंदुक व रंदुक म्हणतात. फलित अंड्याचा नंतर विकास होऊन बीजुकधारी बनतो.
पराग व बीज शंकू एकाच वृक्षावर येतात. पराग शंकूंच्या परागकोशात (लघुबीजुककोशांमध्ये) लघुबीजुकजनन कोशिका (पेशी) नावाच्या पुष्कळ कोशिकांचे अर्धसूत्री विभाजन [⟶ कोशिका] होते. त्यामुळे रंगसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या घटकांची) द्विगुणित संख्या (पायनसमध्ये २४) घटून एकगुणित (१२) होते. प्रत्येक लघुबीजुकजनन कोशिकेपासून चार एकगुणित लघुबीजुके तयार होतात. सरतेशेवटी प्रत्येक लघुबीजुकाचा परागकण तयार होतो. गळून पडण्याच्या वेळेस परागकण हा चार कोशांचा असतो. त्यात दोन ऱ्हास पावणाऱ्या पूर्वकायकीय कोशिका, एक जनन कोशिका व एक नलिका कोशिका असते. परागकण हवेत तरंगत असतात व ते एवढे विपुल असतात की, पाइन वृक्षांच्या जवळपासच्या जमिनीवर त्यांचा पिवळा थर साचून ती पिवळी दिसते किंवा तळी व डबक्यांतील पाण्यावर त्यांचा दाट तवंग जमतो. बीज शंकूकडे ते वाहून नेले जातात तेथे ते खवल्यांमधून खाली सरकून बीजकांच्या (अपक्क बीजांच्या) संपंर्कात येतात.
बीज शंकूच्या प्रत्येक खवल्याच्या वरच्या पृष्ठभागावर अक्षाजवळ दोन बीजके असतात. प्रत्येक बीजक हा गुरूबीजुककोश (प्रदेह) या मध्यवर्ती भागाचा बनलेला असतो. गुरूबीजुककोश आवरणाने आवेष्ठिलेला असतो. बीजकाच्या टोकाला सूक्ष्मछिद्र असते. ते शंकूच्या अक्षाच्या समोर असते. तयार होणाऱ्या एकगुणित कोशिकांपैकी एक कोशिका सोडून बाकीच्या सर्व ऱ्हास पावतात. उरलेली एक कोशिका म्हणजे गुरूबीजक नंतर गुरूबीजुककोशाच्या भिंतीमध्ये (सीमा) वाढून स्त्री-गंतुकधारी तयार होते. वाढ पूर्ण झाल्यावर हा गंतुकधारी ही एक लहान बहुकोशिक (बहुधा २,००० किंवा अधिक कोशिका असलेली) संरचना असते व ती गंतुकधारीच्या टोकाला व सूक्ष्मछिद्राला अगदी जवळ सामान्यतः दोन किंवा सहा अंदुककलश निर्माण करते. प्रत्येक अंदुककलशाचे एक अंडे तयार होते.
बीजकापर्यंत वाहून आणलेले परागकण परागण थेंबाला चिकटतात. हा थेंब सूक्ष्मछिद्रातून बाहेर टाकलेला असतो. परागकण या थेंबात तरंगतात किंवा बाष्पीभवनाने ते आवरण व गुरूबीजुककोश यांच्या मधील कोष्ठात ओढून घेतले जातात. तेथे कणांचे अंकुरण होते व प्रत्येकाची एक परागनलिका तयार होऊन ती गुरूबीजुककोशामधून अंदुककलशापर्यंत वाढते. अंदुककलशात ही नलिका दोन रेतुके सोडते. रेतुकासह परागनलिका ही पुं-गंतुकधारी असते.
अंड्याचे फलन झाल्यावर गर्भाची वाढ होऊन लागते. बीजक मोठे होऊन बीज तयार होते. बीजावरण त्वचेपासून तयार होते. बीजाच्या विकिरणाच्या वेळी गर्भामध्ये एक अक्ष व बीजपर्ण किंवा दलिक (पायनसमध्ये सरासरीने आठ) असतात. अक्षाचे खालचे टोक आदिमूल होय व त्यापासून प्रारंभिक मूळ तयार होते वरचे टोक आदिकोरक असून त्यापासून खोडाचे वरचे भाग व रोपाची पहिली पाने तयार होतात. बीजाभोवती स्त्री-गंतुकधारीने निर्माण केलेले पोषक ऊतक (समान रचना व कार्य असलेला कोशिकासमूह) असते. सामान्यतः गंतुकधारीने एका वेळेला एकापेक्षा जास्त अंदुककलश व एकापेक्षा जास्त अंड्यांचे फलन होत असले, तरी सर्वसाधारणतः एका गर्भापासून एक बीज तयार होते.
शंकुमंत वनस्पती परागणासाठी वाऱ्यावर अवलंबून असतात तथापि काही सायकस, काही जॉइंट फर व वेल्विशिया यांचे परागण कीटकांद्वारे होते. प्रकटबीज वनस्पतींच्या बीजांचे विकिरण, विशेषतः प्राणी व वाऱ्यांद्वारे होते. वार्यामद्वारे विकिरण होणारी बीजे सपक्ष (पंखयुक्त) असतात पाइन, लार्च व कौरी ही याची उदाहरणे होत. प्राण्यांद्वारे विकिरण होणारी बीजे, विशेषतः पक्षी व स्तनी प्राणी अन्न म्हणून खातात. त्यांमध्ये सायकस, नीटम, यू व पोडोकार्प यांचा समावेश असून त्यांच्या बीजावर मांसल खाद्य आवरण असते. बाल्ड सायप्रसांची बीजे पाण्याने वाहून नेली जातात. प्राणी, विशेषतःपक्षी, जूनिपरांच्या बीजांचा प्रसार करतात.
रूप व कार्य : आकारमान व संरचनेतील विविधता : प्रकटबीज वनस्पतींपैकी ६०%जाती वृक्ष असून बाकीच्या बहुतेक क्षुपे (झुडपे) आहेत. काही नीटम वेल असून त्यांचे खोड वेढे घेणारे असते. पुष्कळ सायकस ताडामाडासारखे, तर काही नेचासारखे दिसतात. जॉइंट फर घनदाट शाखायुक्त झुडपे असून वाळवंटी प्रदेशातील अन्य वनस्पतींप्रमाणे त्यांची पाने खूपच बारीक असतात. बेल्वशिया मिरॉबिलीस ही नैर्ऋत्य आफ्रिकेतील वनस्पती प्रकटबीज वनस्पतीच नव्हे, तर सर्व वनस्पतींत विलक्षण आहे. हिच्या सलगमाच्या आकाराच्या खोडाचा शेंडा क्वचित जमिनीतून ४५ सेंमी. वर उघड्यावर येतो बहुधा खोड जमिनीत गाडलेले असते. खोडाचा उघडा पडलेला भाग ६० सेंमी. व्यासाचा असू शकतो. त्याच्या दोन्ही बाजूंनी चामड्यासारखी दोन पाने वाढतात. ती पाने वनस्पतीच्या आयुष्यभर असतात व सु. ३०० सेंमी. पर्यंत लांब होतात. ती जून होऊ लागली की, जमिनीवर टेकतात व उभी चिरली जाऊन त्यांच्या लांब चिरफळ्या (ताणे) निघतात. पक्क वेल्बिशियाची झाडे मोठ्या ऑक्टोपसाप्रमाणे वाळवंटातील वाळूवर ऊन खात पडल्यासारखी दिसतात.
बहुधा सर्वांत लहान प्रकटबीज वनस्पती म्हणजे झॅमिया पिग्मीया हा क्यूबातील सायकस होय. तो ५–८ सेंमी. उंच वाढतो. डॅक्रिडियम फंकी ही चिली येथील शंकुमंत वनस्पती झुडूप असून ती उंचीला ३० सेंमी. पेक्षा कमी असते. जगातील प्रकटबीज वनस्पतींमध्ये सर्वांत मोठी (अवाढव्य) आणि सर्वात उंच व पुरातन वनस्पती म्हणजे कॅलिफोर्नियातील सेक्कोया वृक्ष होत. त्यांच्या खोडाचा व्यास जमिनीलगतचा व्यास सु. १२ मी. असतो. ‘जनरल शेर्मन सेक्कोया’ हा जगातील सर्वांत मोठा जिवंत सजीव असून त्याचे लाकूड इतर कोणत्याही एका वृक्षापेक्षा जास्त भरेल. कॅलिफोर्नियातील रेडवुड हे सर्वांत उंच प्रकटबीज वनस्पती होत. त्यांच्यापैकी पुष्कळाची उंची ११२ मी. पेक्षा जास्त आहे. सर्वांत पुरातन प्रकटबीज वनस्पती व पुरातन वृक्ष म्हणजे कॅलिफोर्नियाच्या व्हाइट मौंटन येथील ब्रिसलकोन पाइन होय.
बहुतेक प्रकटबीज वनस्पती सदापर्णी आहेत म्हणजे त्यांची पाने एका वर्षापेक्षा जास्त काळ झाडावर असतात. गिंको व पुष्कळ शंकुमंत तसेच लार्च, डॉन रेडवुड व बाल्ड सायप्रस याला अपवाद आहेत. त्यांची पाने वाढीच्या एका हंगामानंतर गळून पडतात. बहुतेक प्रकटबीज वनस्पतींची पाने साधी असतात फक्त सायकसांची पाने संयुक्त असतात म्हणजे ती पर्णकांमध्ये विभागलेली असतात.
पानांच्या रूपामध्ये खूपच विविधता असते. सायकसांची पाने माड किंवा नेचांसारखी असतात. गिंकोच्या पानांची बाह्यरेषा पंख्याच्या आकाराची असून जिवंत प्रकटबीज वनस्पतींमध्ये एकमेव अशी आहेत, कारण त्यांच्या शिरा द्विशाखायुक्त (पुन्हा पुन्हा एका ठिकाणी दोन शाखा होणाऱ्या ) आहेत. नीटमच्या पानांत शिरांची जाळे असते. त्यामुळे ती आवृतबीज वनस्पतींच्या पानांसारखी दिसतात. शंकुमंतांच्या पानांमध्ये एवढी विविधता असते की, त्यांचे वर्गीकरण करणे अवघड असते. त्यांचे सुईसारखी, खवल्यासारखी व रूंद हे तीन प्रकार ओळखले जातात. सुईसारखी पाने लांब व अरूंद असून ती गोल, तिकोनी किंवा चौकोनी अथवा आडव्या छेदात पसरट दिसतात. पाइन, स्प्रूस, फर, लार्च, हेमलॉक, सीडार, डग्लस फर ही सुईसारख्या पानांच्या शंकुमंतांची उदाहरणे होत. खवल्यासारखी पाने सापेक्षतः लहान, पसरट, कमीअधिक (किमानपक्षी टोकाला तरी) तिकोनी असून माशांच्या खवल्यांसारखी ती एकावर एक असतात. जूनिपर, आर्बरव्हिटी, सेक्कोया, सायप्रस व कॅमीसायपॅरिस ही खवल्यांसारख्या पानांच्या शंकुमंतांची उदाहरणे होत. विशिष्ट शंकुमंतांच्या रूंद पानांची बाह्यरेषा काही आवृतबीज वनस्पतींच्या पानांसारखी असते. पसरट पाती तीस सेंमी.पर्यत लांब व पाच सेंमी.पर्यंत रूंद असून त्यांच्या कडा पर्णतलापासून बाहेर वळलेल्या व टोकाला एकत्र आलेल्या (जुळलेल्या) असतात. अशी पाने नमुनेदार जाड, चामड्यासारखीसुद्धा आणि त्यांना एक शीर (मध्यशीर) असू शकते किंवा एकमेकींना कमीअधिक समांतर पुष्कळ शिरा असतात. कौरी, ॲरोकॅरिया व पोडोकार्प ही रूंद पानांच्या शंकुमंतांची उदाहरणे होत.
पानांची रचना (मांडणी) सर्पिल अथवा एकाआड एक, संमुख (समोरासमोर) किंवा मंडलित (चाकाच्या आऱ्यांप्रमाणे) असू शकते. पुष्कळांच्या बाबतीत पानांची गर्दी किंवा त्यांचे लहान आकारमान यामुळे रचना अस्पष्ट दिसते. काही शंकुमंतांची पाने द्विरूपी (दोन स्पष्टपणे भिन्न रूपे असलेली) असतात. उदा., पाइनची प्रारंभीची पाने लहान, कागदासारखी, क्वचित पानासारखी व त्यांचे टोकाच्या कळीमध्ये सहज दिसणारे एकावर एक रचलेले खवले तयार होतात. पुष्कळ पाइनांमध्ये ह्या प्रारंभिक पानांचे तळ फांद्यांवर सुयांच्या किंवा द्वितीयक पानांच्या मागे राहतात.
जॉइंट फर व फायलोक्लॅडस हे प्रकटबीज वनस्पतींमध्ये एकमेवाद्वितीय आहेत. कारण त्यांची पाने नव्हे, तर, खोडे मुख्यत्वे ⇨प्रकाशसंश्लेषणाचे काम करतात. जॉइंट फरची पाने अल्पविकसित, पांढरट किंवा भुरकट असून त्यांचे विरूद्ध किंवा मंडलित खवले हिरव्या खोडांच्या सांध्यावर येतात. फायलोक्लॅडसांची पाने सूक्ष्म खवले असून ती अगदी पानांसारख्या, पसरट, हिरव्या पर्णक्षोडांच्या (पानांसारख्या खोडांच्या) कडावर येतात.
जिवंत प्रकटबीज वनस्पतींचे पराग व बीजे वेगवेगळ्या शंकूंमध्ये निर्माण होतात. हे दोन प्रकारांचे शंकू सायकस, यू, गिंको, जॉइंट फर आणि वेल्विशिया यांच्याप्रमाणे भिन्न वनस्पतींवर (वेगवेगळ्या झाडांवर) किंवा बहुतेक शंकुमंतांप्रमाणे एकाच झाडावर येतात.
काही जूनिपरांचे पराग किंवा पुं-शंकु सु. २ मिमी. लांब तर काही सायकसांचे पुं-शंकू ८० सेंमी. लांब व २० सेंमी. व्यासाचे असतात. प्रत्येक पराग शंकूंमध्ये मध्यवर्ती अक्षावर रचलेले अनेक खवले (लघुबीजुकपर्णे) असतात. प्रत्येक खवल्याच्या खालच्या बाजूच्या पृष्ठभागावर म्हणजे शंकूच्या तळाकडील पृष्ठभागावर दोन किंवा अधिक लघुबीजुककोश किंवा परागकोश असतात. गिंकोचे लोंबते पराग शंकू ओकवृक्षांच्या नतकणिश (लोंबत्या कणसासारख्या) पुष्पबंधासारखे [फुलोऱ्यासारखे ⟶ पुष्पबंध] दिसतात.
बीज किंवा ‘स्त्री’ शंकू, विशेषतः शंकुमंताचे शंकू, हे परिचित आहेत. विशिष्ट सायकसांचे बीज शंकू हे जिवंत किंवा निर्वंश वनस्पतींमध्ये सर्वांत मोठे आहेत. ऑस्ट्रेलियन मॅक्रोझॅमिया डेनिसनी या सायकसांचे बीज शंकू १०० सेंमी. लांब व ३८ किग्रॅ. वजनाचे असतात. आफ्रिकन एनसेफॅलार्टॉस कॅफर याचे बीज शंकू वजनाला यापेक्षा थोडे जास्त असू शकतात. शंकुमंतांमध्ये सर्वांत मोठे बीज शंकू अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पश्चिमेच्या शुगर पाइनचे (पायनस लँबर्टिआना) आहेत. याच्या प्रत्येक शंकूची लांबी ५० सेंमी. पर्यंत असते. विशिष्ट जूनिपरांचा बीज शंकू सर्वात लहान म्हणजे ४–५ मिमी. व्यासाचा असतो. शंकुमंतांच्या बीज शंकूंचे खवले कागदासारखे किंवा काष्ठयुक्त आणि स्प्रूस व पाइनप्रमाणे स्पष्ट असतात किंवा ते मांसल असू शकतात. आणि जूनिपराप्रमाणे शंकू एकजीव होऊन बदरीफळासारखे होतात.
काही प्रकटबीज वनस्पतींच्या (काही शंकुमंतांसह) फळासारख्या संरचनेमध्ये बीजे धारण केलेली असतात. गिंकोची बीजे लांब देठांना एकटी किंवा जोडीने लोंबतात, तर यू, पोडोकार्प, टोरेया व सेफॅलोटॅक्सस यांची बीजे पानांमध्ये एकटीच असतात. त्यांचे बाहेरचे मांसल आवरण व आठळीसारखा कठीण गाभा या सारखेपणामुळे या फळांचे अलुबुखाराशी संरचनात्मक साम्य असते.
पुष्कळ जिवंत प्रकटबीज वनस्पतींचे शंकू साधे आहेत. कारण त्यांत मध्यवर्ती अक्षांवर फक्त एकच प्रकारच्या संरचना–बीजुकपर्णे–आहेत. हीच बाब शंकूमंतांचे पराग शंकू गिंकोचे पराग शंकू व सायकसांच्या दोन्ही प्रकारांच्या शंकूंची आहे. याउलट पाइनसारख्या शंकुमंतांचे शंकू संयुक्त असतात. मध्यवर्ती अक्षावर छदे व खवले या दोन प्रकारांच्या संरचना असतात. आकारवैज्ञानिक दृष्ट्या त्या बीजुकपर्णे नसून खूपच रूपांतरित पार्श्विक प्ररोह (बाजूच्या फुटी) आहेत. छदांच्या बगलेतून (वरच्या कोनातून) प्रत्येक खवला येतो व त्याच्या वरच्या पृष्ठभागावर एक वा अनेक बीजे असतात. जॉइंट फर, नीटम व वेल्विशिया यांचे पराग शंकू व बीज शंकू हेही संयुक्त आहेत.
विभेदक लक्षणे : प्रकटबीज वनस्पतींचे प्रमुख विभेदक लक्षण म्हणजे त्यांची नग्न (उघडी) बीजे हे होय. ती पानांमध्ये देठांवर किंवा शंकू खवल्यांच्या पृष्ठभागांवर (हवेत) कमी अधिक उघडी असतात (आ. २). याउलट आवृतबीज वनस्पतींची बीजे किंजपुटापासून व कधीकधी फुलाच्या अन्य अवयवांपासून विकास पावलेल्या फल ऊतकांमध्ये असतात. परागकण बीजकांपर्यंत वाहून नेले जातात तेथे त्यांचे अंकुरण होते व परागनलिका किंजपुटाच्या ऊतकाला भेदून जाते. याच्या उलट आवृतबीज वनस्पतींचे परागकण बीजकांच्या संपर्कात येत नाहीत परंतु फुलाच्या किंजल्कावर पडतात. तेथे त्यांचे अंकुरण होते व किंजपुटाला भिडण्यापूर्वी परागनलिका वाढते व शेवटी किंजपुटाला भेदते.
प्रकटबीज वनस्पती व आवृतबीज वनस्पती यांच्यामधील भेद स्पष्ट करणारी अधिक लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : (१) काष्ठात वाहिनी नसतात (नीटेसी अपवाद) (२) प्रकाष्ठात सहचरी कोशिकांचा (विशेषित कोशिकांचा) अभाव (३) अनेक कोशिक किंवा अनेक प्रकली (५०० किंवा जास्त) स्त्री-गंतुकधारी (४) स्त्री-गंतुकधारींमध्ये अंदुककलश असतात (नीटम व वेल्विशिया याला अपवाद) व (५) दुहेरी फलनाचा अभाव (आवृतबीज वनस्पतींचे एकमेव लक्षण). सर्व प्रकटबीज वनस्पती काष्ठयुक्त आहेत पण पुष्कळ आवृतबीज वनस्पती तशा नाहीत.
पुष्कळ वनस्पतिआकारवैज्ञानिक फूल ही संज्ञा आवृतबीज वनस्पतींच्या प्रजोत्पादक संरचनेसाठी मर्यादित अर्थाने वापरतात. फुलामध्ये संदले, प्रदले, केसरदले व किंजदले हे नमुनेदार अवयव असतात [⟶ फूल ]. अशा मर्यादित अर्थाने प्रकटबीज वनस्पतींमध्ये फुले नसतात.
क्रमविकास (उत्क्रांती) व पुराजीवविज्ञान : पहिल्या बीजी वनस्पती (कार्बॉनिफेरस कल्पातील म्हणजे सु. ३५–३१ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील लायकॉप्सिडांच्या दोन प्रजातींखेरीज) प्रकटबीज वनस्पती असून त्या उत्तर डेव्होनियन कल्पातील (सु. ४२ ते ३६.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) आहेत. पूर्व क्रिटेशसपर्यंतचे (सु. १४ कोटी वर्षापूर्वीपर्यंतचे) आवृतबीज वनस्पतींचे निर्विवाद जीवाश्म आढळले नाहीत. मध्यजीव महाकल्पात (सु. २३–९ कोटी वर्षापूर्वीच्या काळात) प्रकटबीज वनस्पतींचा महत्तम विकास झाला होता तेव्हा त्या जगातील प्रमुख वनस्पती होत्या. क्रिटेशसमध्ये मात्र त्या कमी होऊ लागल्या व त्या कल्पाच्या शेवटी त्यांची जागा आवृतबीज वनस्पतींनी घेतली होती.
पुष्कळ आकारवैज्ञानिक प्रकटबीज वनस्पतींचे तीन प्रमुख गट मानतात. ते नीटेसी, सायकॅडेसी व पायनेसी हे असून या लेखात ते उपविभाग मानले आहेत.
यांपैकी नीटेसी (नीटोफायट्सच) हा सर्वांत लहान आहे. त्यात पुढील तीन प्रजाती असून त्या एकमेकींपासून व अन्य प्रकटबीजी वनस्पतीपासून खूपच वेगळ्या आहेत. एफेड्रा (४० जाती) नीटम (३० जाती) व वेल्विशिया (एक जाती). (१) काष्ठात वाहिन्या असणे, (२) संयुक्त शंकु, पराग व बीज दोन्ही, (३) परिदल मंडलाचे अस्तित्व, वरकरणी पाकळ्या व पुष्पकोशासारखे पराग उत्पादक व बीज उत्पादक संरचनांशी साहचर्य व (४) दोन आवरणांचे अस्तित्व. आतील आवरणाचे लांब, नलिकाकृती सूक्ष्मछिद्र तयार होते. या चार लक्षणांमुळे नीटेसी एकत्रित झाल्या आहेत. नीटेसीमधील विशिष्ट लक्षणांमुळे या वनस्पती प्रारूपिकपणे आवृतबीज वनस्पतींसारख्या दिसतात. पूर्वी काही आकारवैज्ञानिक त्यांना सपुष्प वनस्पतींचे पूर्वज मानीत. नीटेसी हा उपविभाग वेगळा असून त्याचे जीवाश्म आढळले नाहीत. मूलतः याच्या उगमाविषयी व क्रमविकासाविषयी काहीही माहिती नाही.
प्रकटबीज वनस्पतींचे उरलेले दोन उपविभाग म्हणजे सायकॅडेसी (सायकॅडोफाइट्स) व पायनेसी (कॉनिफेरोइट्स) हे पाने, काष्ठ व बीजे या लक्षणांवरून एकमेकांपासून वेगळे ओळखले जातात. डेव्होनियन कल्पातून (सु. ४० कोटी वर्षापूर्वीपासून) या वनस्पती असून त्यांचे विपुल जीवाश्म आढळले आहेत. त्यांच्या शाखा समान उगमापासून निघाल्या असाव्यात. सायकॅडेसी व पायनेशी या दोन्ही उपविभागांतील गण निर्वंश झालेले आहेत.
सामान्यतः अशाखित खोडे, सापेक्षतः मऊ व सैल लाकूड, मोठी बहुतेक संयुक्त पाने व अरीय (त्रिज्यीय) सममित (समान मिती) बीजे ही सायकॅडोफाइट्सची लक्षणे आहेत. चारांपैकी तीन गण निर्वंश झालेले आहेत. त्यांतील सर्वांत पुरातन सायकॅडोफिलिकेलीझ किंवा बीजी नेचे यांचा काळ डेव्होनियन ते जुरासिक (सु. १८.५ ते १५.५ कोटी वर्षापूर्वीचा) असून कार्बॉनिफेरस कल्पात ते विपुल होते. ते बऱ्याच अंशी सध्याच्या वृक्षी नेचांसारखे दिसतात. नमुनेदार बीजी नेचांना सापेक्षतः सडपातळ खोडे व बरीच विभागलेली मोठी नेचासारखी पाने होती. त्यांची बीजे नेहमीच्या पानांवर किंवा विशेष रूपांतरित पानांवर (गुरूबीजुकपर्णे) होती. बीजी नेचांची लक्षणे बरीचशी नेचांसारखी असली, तरी खऱ्या नेचांपासून त्यांचा उगम झाला आहे, हे सप्रमाण सिद्ध होत नाही. बीजी नेचे व खरे नेचे हे समान पूर्वजांपासून उगम पावले असावेत. सायकॅडेसीच्या इतर गणांचा उगम बीजी नेचांपासून झाला, हे निश्चित नाही.
केटोनिएलीझ हा सायकॅडेसीतील दुसरा निर्वंश झालेला गण असून त्याचा शोध १९२६ मध्ये लागला. तो ट्रायासिक कल्पापासून (सु. २३ कोटी वर्षांपूर्वीपासून) ते पूर्व क्रिटेशस (सु. १४ कोटी वर्षापूर्वीपर्यंत) अस्तित्वात होता. त्यातील वनस्पतींची पाने संयुक्त, हस्ताकृती असून पर्णकांची संख्या तीन ते सहा होती. त्यांच्या बीजकांचे चषिकांमध्ये (बटव्यासारख्या संरचनेत) झुपके होते व अक्षालगत त्यांच्या जोड्या होत्या. बीजांसहित चषिका व आवृतबीज वनस्पतीची किंजपुटे यांमधील साम्यामुळे केटोनिएलीझ खरोखरी आद्य आवृतबीज वनस्पती असाव्यात, असे अनुमान काढण्यात आले पण आता ते मागे पडले आहे. हा गण आता बीजी नेचांची उपशाखा असल्याचे व त्याचा वंश उरलेला नाही. असे मानतात. [⟶ केटोनिएलीझ ].
बेनेटाइटेलीझ (सायकॅडिओड्स) हा सायकॅडेसीचा तिसरा निर्वंश गण असून तो ट्रायासिक कल्प ते पूर्व क्रिटेशस कल्पाच्या अखेरीपर्यंत अस्तित्वात होता. मध्यजीव महाकल्पास (सु. २३–९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळास) एके काळी ‘सायकसांचे युग’ मानले जाई परंतु त्या काळच्या सायकसांसारखा पर्णसंभार हा प्रत्यक्षात सायकससदृश वनस्पतींचा होता, हे सप्रमाण दाखवून दिले गेले आहे. सायकससदृश वनस्पतींची खोडे शाखित (शाखायुक्त) किंवा अशाखित आणि पाने संयुक्त (क्वचितच साधी) होती. त्यांच्या शंकूंची संरचना ही सुद्धा एक उल्लेखनीय बाब होती. शंकूमध्ये बीजोत्पादक किंवा परागोत्पादक संरचना होत्या किंवा दोन्हींच्या विरूद्ध बाजूंना पानांसारखी असंख्य छदे होती. जेव्हा दोन्ही प्रकारांच्या संरचना असत तेव्हा परागोत्पादक अवयव अक्षालगत मांडलेले होते व बीजके अक्षाच्या टोकाला झुबक्याने होती. दोन्ही प्रकारांच्या संरचना एका अक्षावर आढळणे ही बाब सायकससदृश वनस्पतींबरोबर उगम पावली. बहुधा बीजकांचे देठ लांब होते व त्यांमध्ये आंतररेतुक शल्क (खवले) नावाच्या पर्णवत लहान फिती होत्या. एकूण संकू वरकरणी अगदी फुलासारखा होता. असे द्विलिंगी शंकू हे आवृतबीज वनस्पतींच्या द्विलिंगी फुलांचे पूर्वज होते, हे गृहीतक मात्र आता अमान्य झालेले आहे. सायकससदृश वनस्पतींचा उगम हा वादग्रस्त विषय आहे, बीजी नेचांशी त्यांचे नाते जोडले जाते पण त्यासाठी निर्णायक पुरावा हाताशी आलेला नाही. त्यांचा आधुनिक वारस आढळत नाही. [⟶ बेनेटाइटेलीझ ].
सायकॅडेलीझ (सायकस) हा सायकॅडेसीचा अस्तित्वात असलेला गण आहे. त्याच्या नऊ प्रजाती व १०० जाती आहेत. पिसासारखी संयुक्त पाने असलेल्या माडासारख्या किंवा नेचासारख्या या वनस्पती असून त्यांना भिन्न व्यक्तिगत वनस्पतीवर आदर्शपणे शंकूंना पराग व बीजे ही दोन्ही येतात. सायकस ही प्रजाती पानासारख्या संरचनेच्या (गुरूबीजुकपर्णे) कडेवर बीजे धारण करणे, हे याला अपवाद आहे. या संरचनेचा शंकूमध्ये समावेश होत नाही. सर्वांत पुरातन सायकस ट्रायासिक कल्पाच्या सुरूवातीच्या काळातील आहेत. २० कोटी वर्षापासून अस्तित्वात असलेल्या गटाचे प्रतिनिधी म्हणजे सध्याच्या जाती होत. सायकसांचे रेतुक चर असून ज्ञात वाहिनीवंत वनस्पतींमध्ये ते सर्वात मोठे असून ३० मायक्रॉन (एक मायक्रॉन म्हणजे मीटरचा दहा लाखावा भाग) लांब आहेत, ते नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात. बीजी नेचांपासून सायकसांचा क्रमविकास झाला असण्याची शक्यता आहे परंतु त्यांचा उगम निश्चित माहीत नाही.
प्रकटबीज वनस्पतींचा शेवटचा उपविभाग म्हणजे पायनेसी (कॉनिफेरोफाइट्स) होय. शाखायुक्त खोडे, सापेक्षतः घट्ट लाकूड, सापेक्षतः लहान साधी पाने व द्विपार्श्व सममित बीजे ही त्यांची खास लक्षणे होत. चार गणांपैकी कॉर्डाइटेलीझ हा एक गण निर्वंश झाला आहे. डेव्होनियन कल्प ते पर्मियन कल्प (सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वी) हा त्यांचा काळ आहे व उत्तर कार्बॉनिफेरस कल्पात त्यांचा सर्वाधिक विकास झाला होता, तेव्हा त्यांची मोठी वने तयार झाली होती. त्यांतील उंच भव्य वृक्षांच्या खोडांच्या शेंड्याला फांद्यांचा मुकुटासारखा माथा असे. पाने पट्टीच्या (वादीच्या) आकाराची व द्विशाखित (दुबळकेयुक्त) शिरा असलेली होती. स्वतंत्र असल्या, तरी परागधारक आणि बीजधारक संरचना सारख्याच होत्या. सडपातळ अक्षावर छदांच्या दोन रांगा होत्या. प्रत्येक छदाच्या बगलेत सर्पिल मांडणीचा खवल्यासारख्या उपांगाचा (अवयवाचा) अक्षावर कळीसारखा अवयव होता. प्रत्येक कळीत टोकाला असलेले उपांग परागकोश किंवा बीजके धारण करीत होते. कॉर्डाइटेलीझच्या उगमाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ते व बीजी नेचे समान पूर्वजांपासून उगम पावले असण्याची शक्यता आहे. शंकुमंत आणि गिंको यांचे पूर्वज कॉर्डाइटेलीझ असावेत. [⟶ कॉर्डाइटेलीझ].
गिंकोएलीझ हा पायनेसीचा दुसरा गण असून त्याचा प्रसार बहुतेक सर्वत्र होता. गिंको बायलोबा हा एकमेव जिवंत प्रतिनिधी असून आता त्याची लागवड रस्त्याच्या कडेला करतात. हा एक जिवंत जीवाश्म आहे. त्याची पाने आधुनिक गिंकोसारखी असून तो ट्रायासिक कल्पात आढळला होता. या गणातील सर्वांत पुरातन वनस्पती पूर्व पर्मियन कल्पातील आहेत. गिंकोएलीझमध्ये पट्टीच्या आकाराची (फक्त जीवाश्मरूपातील वनस्पतींत) व खोलवर विभागलेली पंख्याच्या आकाराची पाने असलेल्या वृक्षांचा समावेश होतो. पानांच्या शिरा द्विशाखाक्रमी असतात. पराग शंकू नतकणिशासारखे असतात. लांब शाखित किंवा अशाखित अक्षावर दोन ते दहाच्या (आधुनिक जातींत जोडीने) गटांत बीजके असतात. रेतुके चल असतात. गिंकोएलीझचा उगम अनिश्चित असून तो कॉर्डाइटेलीझपासून असण्याची शक्यता आहे. [⟶ गिंकोएलीझ ].
टॅक्सेलीझ हा पायनेसी उपविभागातील तिसरा गण असून त्यात पाच जिवंत प्रजाती व सु. २० जातींचा समावेश होतो. बहुधा तो शंकुमंतांबरोबरीचा समजत असले, तरी ट्रायासिक कल्पापर्यंत मागे जाणाऱ्या त्याच्या जीवाश्मांच्या नोंदीवरून तो एक अगदी स्वतंत्र गट आहे. यू हे जिवंत ट्रॅक्सेलिझांचे सर्वपरिचित उदाहरण आहे. टॅक्सेलीझ गणातील वनस्पतींची पाने लहान, सुईसारखी असतात. लहान शंकूंमध्ये पराग तयार होतात. बीजके एकाकी (एकएकटी) असून आखूड प्ररोहाच्या (कोंबाच्या) टोकावर येतात. प्रत्येक बीज बीजोपांगयुक्त असते म्हणजे ते रसाळ चषकासारख्या संरचनेपासून तयार झालेले असते. टॅक्सेलीझचा उगम अज्ञात आहे.
कॉनिफेरेलीझ (शंकुमंत गण) हा प्रकटबीज वनस्पतींचा शेवटचा गण होय. तो सर्वांत मोठा सध्या त्याचा सर्वांत विस्तृत प्रसार झालेला आहे. त्याच्या सहा कुलांत ५० प्रजाती व ५७० जाती आहेत. त्यांच्या जीवाश्मांची नोंद कार्बॉनिफेरस कल्पापर्यंत मागे जाते. शंकुमंतांचे वृक्ष किंवा झुडपे असून पाने लहान व साधी असतात. दोन्ही प्रकारांच्या प्रजोत्पादक संरचना शंकूंवर असतात. पराग शंकू साधे व बीज शंकू संयुक्त असतात. प्राथमिक शंकुमंतांचे कॉर्डाइटेलीझशी साम्य आहे व त्यांपासून त्यांचा उगम झाला असावा.
वर्गीकरण : विभेदक वर्गीकरणवैज्ञानिक लक्षणे : परंपरेने प्रकटबीज वनस्पतींना वर्गीकरणात आवृतबीज वनस्पतींच्या बरोबरीने एका मोठ्या गटाचा (वर्गीकरणाच्या पद्धतीप्रमाणे विभाग, उपविभाग किंवा उपवर्ग) दर्जा देतात. यामध्ये नग्न बीजे या लक्षणावर अधिक भर दिलेला असतो. याउलट वर्गीकरणाच्या काही पद्धतींमध्ये प्रकटबीज वनस्पतींचे दोन ते चार गट पाडतात व तो प्रत्येक गट आवृतबीज वनस्पतींच्या दर्जाच्या बरोबरीचा मानतात. यामध्ये नग्न बीजे या लक्षणाकडे दुर्लक्ष केलेले असते परंतु प्रकटबीज वनस्पतींच्या विविध प्रमुख प्रकारांतील पुष्कळ मूलभूत फरकांवर भर दिलेला असतो.
सटीप वर्गीकरण : या नोंदीत अनुसरलेले वर्गीकरण हे सोव्हिएट वनस्पतिवैज्ञानिक आर्मेन तख्तजान यांचे असून ते इतर अनेकांच्या वर्गीकरणांपेक्षा अधिक अचूक नाही. प्रकटबीज वनस्पतीच्या मोठ्या व विविधतापूर्ण गटांचे निश्चित वर्गीकरण करणे कदापीही शक्य होणार नाही, याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक पद्धती व्यक्तिगत व माहितीच्या बदलत्या स्पष्टीकरणावर अवलंबून असते.
प्रकटबीज वनस्पतींच्या सु. ५० प्रजातींच्या एका डझनापेक्षा कमी जाती आहेत. पन्नासापैकी पंचवीस प्रजातींत फक्त एकच जाती आहे. पोडोकार्पस व पायनस या दोन सर्वांत मोठ्या प्रजाती. पोडोकार्पसमध्ये ८० जाती व पायनसमध्ये ९५ जाती आहेत. खंजीराची (†) खूण असलेले गट निर्वंश असून त्यांचे फक्त जीवाश्म माहीत आहेत.
पिनोफायटा विभाग (जिम्नोस्पर्मी) : (प्रकटबीज वनस्पती). काष्ठयुक्त वनस्पती, लहान झुडपे ते मोठे (उंच) वृक्ष. बीजके अनावृत (नग्न), किंजपुटात आवेष्टिलेली नसतात स्त्री-गंतुकधारी ५०० किंवा अधिक कोशिकांचा व (नीटम, वेल्विशिया यांच्याव्यतिरिक्त) स्पष्ट अंदुककलश निर्माण करतात काष्ठात वाहिन्या नसतात (नीटेसी याला अपवाद) प्रकाष्ठात सहचरी कोशिका नसतात. दुहेरी फलन नसते.
सायकॅडेसी उपविभाग : माडासारख्या किंवा नेचासारख्या वनस्पती, पाने बहुधा संयुक्त, जिवंत जातींतील रेतुके चल काष्ठात वाहिन्या नसतात ते सापेक्षतः मऊ व भरीव नसते. सूक्ष्मशंकू जेव्हा असतात तेव्हा साधे, बीजकाला एक आवरण, बीजे अरीय सममित असतात.
सायकॅडोफिलिकेलीझ : डेव्होनियन ते जुरासिक महाकल्पात निर्वंश झालेल्या नेचासारख्या वनस्पतींचा गण. पाने बहुधा सापेक्षपणे मोठी. पिसासारखी संयुक्त ते विसंयुक्त. बीजके पिसासारख्या संयुक्त गुरूबीजुकपर्णाच्या कडांलगत किंवा पृष्ठभागावर स्वतंत्रपणे धारण केलेली गुरूबीजुकपर्णे सामान्यतःपर्णसंभारातील पानांसारखी, शंकूंमध्ये नसतात. लघुबीजुकपर्णे पिसासारखी संयुक्त, शंकूंमध्ये नसतात.
केटोनिएलीझ : ट्रायासिक ते क्रिटेशस कल्पातील निर्वंश वनस्पतींचा गण. पाने हस्ताकृती, ३–६ पर्णकांची व जाळीदार शिरांची पिसासारख्या संयुक्त गुरूबीजुकपर्णांवरील चषिकांमध्ये बीजके धारण केलेली ती शंकूंमध्ये नसतात, लघुबीजुकपर्णे पिसासारखी संयुक्त, शंकूंमध्ये नसतात. [⟶ केटोनिएलीझ ].
बेनेटाइटेलीझ : ट्रायासिक ते क्रिटेशस कल्पातील सायकसांसारख्या निर्वंश वनस्पतींचा गण. पाने अखंड किंवा पिसासारकी संयुक्त. साध्या गुरूबीजुकपर्णांवर बीजके एकटी किंवा अग्रावर असतात. गुरूबीजुकपर्णांच्या झुपक्यांच्या विरूद्ध बाजूस कधीकधी लघुबीजुकपर्णे असतात. लघुबीजुकपर्णे पिसासारखी संयुक्त असतात. [⟶ बेनेटाइटेलीझ ].
सायकॅडेलीझ : ट्रायासिक कल्प ते आजतागायतच्या माड किंवा नेचासारख्या वनस्पतींचा गण. पाने पिच्छाकृती (पिसासारखी) किंवा द्विपिच्छाकृती संयुक्त. बीजके सामान्यतः साध्या गुरूबीजुकपर्णांवर असतात (सायकस अपवाद). लघुबीजुकपर्णे साधी (शंकूमध्ये एक अर्वाचीन कुल सायकॅडेसी त्यात नऊ प्रजाती) असतात.
पायनेसी उपविभाग : साध्या पानांच्या वनस्पती, ती माड किंवा नेचासारखी नसतात. जिवंत जातींमध्ये चर रेतुके नसतात (गिंको अपवाद), काष्ठात वाहिन्या नसतात सापेक्षतः भरीव लघुशंकू साधे, बीजकांना एक आवरण, बीजे द्विपार्श्व सममित असतात.
गिंकोएलीझ : पर्मियन कल्प ते आतापर्यंतच्या काळातील वृक्षांचा गण. पाने पट्टीच्या आकाराची किंवा पंख्याच्या आकाराची, द्विशाखाक्रमी शिरांची मांडणी बीजके २–१० , शाखित किंवा बहुधा अशाखित अक्षाच्या टोकाला, लघुशंकू नतकणिशासारखे, रेतुक चर, गिंको बायलोवा (गिंको किंवा मेडनहेअर फर्न) ही एकच जिवंत जाती, मूलस्थान चीन, सर्वत्र लागवडीत पुष्कळ प्रातिनिधिक जीवाश्म आहेत. [⟶ गिंकोएलीझ ].
कॉर्डाइटेलीझ : डेव्होनियन ते पर्मियन कल्पातील निर्वंश वृक्षांचा गण. पाने पट्टीच्या आकाराची दोन प्रकारांचे शंकू, दोन्ही साधे प्रत्येक प्रकारात वांझ उपांगे खाली व सफल उपांगे वर असतात. [⟶ कॉर्डाइटेलीझ ].
कॉनिफेरेलीझ : कार्बोनिफेरस कल्प ते आतापर्यंतच्या काळातील वृक्ष किंवा झुडपे यांचा गण. पाने सुईसारखी, खवल्यासारखी किंवा रूंद. लघुशंकू साधे, शंकूसारखे गुरूशंकू संयुक्त, बहुधा शंकूसारखे.
सहा अर्वाचीन कुले : पायनेसी १० प्रजाती टॅक्सोडिएसी १० प्रजाती क्युप्रेसेसी १९ प्रजाती पोडोकार्पेसी ७ प्रजाती सेफॅलोटॅक्सेसी १ प्रजाती व ॲरोकॅरिएसी २ प्रजाती वगैरे. सर्व कुलांचा प्रसार विस्तृत आहे. [⟶ कॉनिफेरेलीझ ].
टॅक्सेलीझ : ट्रायासिक कल्प ते आजतागायतच्या काळातील वृक्ष किंवा झुडपे यांचा गण. लघुशंकू शंकूसारखे, बीजके एकाकी व आखूड प्ररोहाच्या टोकाला, बीजोपांगयुक्त. टॅक्सोडिएसी हे अर्वाचीन कुल, पाच प्रजाती. उत्तर अमेरिका, यूरेशिया, इंडोनेशिया व फिलिपीन्स येथे प्रसार झालेला आहे. [⟶ टॅक्सेलीझ ].
नीटेसी उपविभाग : साधी पाने असलेल्या वनस्पती. पाने माडासारखी किंवा नेचासारखी नसतात. जिवंत जातींमध्ये चर रेतुके नसतात काष्ठात वाहिन्या असतात लघुशंकू संयुक्त, बीजकांना दोन आवरणे असतात.
एफेड्रेलीझ : दाट शाखायुक्त झुडपे असलेला गण. सांधेयुक्त खोडे व सूक्ष्म खवल्यासारखी पाने, एक कुल एफेड्रेसी त्यात एफेड्रा ही एकच प्रजाती. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, यूरेशिया व भारत येथे प्रसार झालेला आहे. [⟶ अस्मानिया ].
वेल्विशिएलीझ : मोठे, सलगमासारखे, बहुधा जमिनीखाली खोड असलेल्या वनस्पतींचा गण. पाने दोन, जाड, चामड्यासारखी, लांबट असून वनस्पतींच्या आयुष्यभर टिकतात व त्यांच्या चिरफळ्या (वाद्या) निघतात. एक कुल वेल्विशिएसी. त्यात एक जाती (वेल्वशिया मिरॅविलीस). प्रसार अंगोला व नैर्ऋत्य आफ्रिका. पर्मियन कल्पात वेल्विशियासारखे पराग आढळलेले आहेत, याखेरीज कोणताही जीवाश्म नाही.
नीटेलीझ : (उंबळी गण). काष्ठयुक्त वेल किंवा क्वचित झुडपे वा वृक्ष. पाने समोरासमोर (संमुख), जाळीदार, वरकरणी आवृतबीज वनस्पतींच्या पानांसारखी. नीटेसी हे एक कुल. नीटम ही एक प्रजाती. उष्ण कटिबंधी दक्षिण अमेरिका, आफ्रिका, नैर्ऋत्य यूरेशिया, इंडोनेशिया, भारत (लोणावळा) येथे प्रसार. जीवाश्म आढळले नाहीत. [⟶ नीटेलीझ ].
वरील आराखड्यात समावेश नसलेला पेंटोझायलेलीझ हा प्रकटबीज वनस्पतींचा जुरासिक कल्पातील गण आहे. त्याचे स्थान निश्चित झालेले नाही.
समीक्षात्मक मूल्यमापन : वनस्पतींच्या काहीशा विविधता पूर्ण गटांची वर्गीकरणवैज्ञानिक अस्थिरतेचे सूचक म्हणून कुलाच्या वरच्या वर्गीकरणवैज्ञानिक श्रेणीत फार पूर्वीपासून व सध्याही बदल होत आहेत. यू (टॅक्सेलीझ) विशेषतः वादग्रस्त असूनही काही वर्गीकरणवैज्ञानिक त्यांचा समावेश कॉनिफेरेलीझ गणाचा भाग म्हणून करतात. बीजकांची एकाकी स्थिती व सुस्पष्ट जीवाश्म पुरावा यांच्या आधारावर त्यांना स्वतंत्र व समान गणाचा दर्जा देणे उचित होईल.
वर्गीकरणविज्ञानाच्या दृष्टीने प्रकटबीज वनस्पतींची बहुतेक कुले उत्तम प्रकारे मान्य झाली असली, तरी काही थोड्या कुलांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत व त्या अद्यापही सोडविल्या गेल्या नाहीत. शंकूंच्या संरचनेतील विविधता (मांसल व शुष्क) व पर्णसंभारातील अनेक प्रकार (खवले व आरीसारखी पाने) यांमुळे क्युप्रेसेसी कुलातील प्रजातींच्या पातळीवरील निवड अवघड झाली आहे. टॅक्सोडिएसीप्रमाणे क्युप्रेसेसीचा समावेश पायनेसीत उपकुल म्हणून करतात. पोडोकार्पेसीही तेवढीच विविधतापूर्ण आहे व वनस्पतींचा जटिल (क्लिष्ट) समुच्चय आहे. या वनस्पतींची प्रजातींमध्ये विभागणी करणे ही सोपी गोष्ट नाही. सेफॅलोटॅक्सेसीचा शंकुमंतांशी निकट संबंध असला, तरी काटेकोर स्थान देताना ती नजरेतून निसटून जाते.
पहा : वनस्पति, अबीजी विभाग वनस्पति, आवृतबीज उपविभाग वनस्पति, बीजी विभाग वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग वर्गीकरणविज्ञान.
संदर्भ : 1. Bose, S. C. An Introduction to Gymnosperms, Calcutta, 1966.
2. Bruce, A. Jackson, A. A Handbook of Coniferae and Ginkgoaceae, 1966.
3. Dittmer, H. J. Phylogeny and plant from in the Plant Kingdom, Princeton, New Jersey, 1964.
4. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. I, Cambridge, 1963.
5. Sporne, K. R. The Morphology of Gymnosperms : The Structure and Evolution of Primitive Plants, 1965.
6. Theodore, Delevoryas, Morphology and Evoloution, Fossil Plants, 1962.
परांडेकर, शं. आ. जमदाडे, ज. वि.
“