वनस्पति, अबीजी विभाग : (लॅ. क्रिप्टोगॅमिया, क्रिप्टोगॅम्स). वनस्पतींच्या अभ्यासाच्या सोयीसाठी त्यांचे अबीजी (बीजे निर्माण न करणाऱ्या) व बीजी (बियांच्या साहाय्याने प्रजोत्पादन घडवून आणणाऱ्या) वनस्पती असे दोन मुख्य विभाग पूर्वीपासून ओळखले जातात. पहिल्या विभागातील वनस्पतींचे प्रजोत्पादन बीजुकाद्वारे (बहुधा एककोशिक म्हणजे एका पेशीच्या बनलेल्या सूक्ष्म, शरीरापासून अलग झालेल्या व जननक्षम अशा सजीव भागाकरवी) घडून येते बीजे व बाजोत्पादक इंद्रियांचा त्यांच्यात पूर्ण अभाव असतो. या वनस्पतींना फुले येत नसल्याने त्यांना कधीकधी ‘अपुष्प’ वनस्पती असेही म्हणतात [⟶ फूल ].
भिन्न भिन्न वनस्पतींतील विविधता व एकता जाणून घेऊन त्यांचे वर्गीकरण करीत असताना त्यांच्या प्रजोत्पादक इंद्रियांचे महत्त्व अधिक आहे, ही गोष्ट प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ ⇨कार्ल लिनीअस ( १७०७–७८ ) यांच्या लक्षात आल्याने त्यांनी (१७३२ मध्ये हॉर्टस अपलॅन्डिकस या ग्रंथाच्या दुसऱ्याह आवृत्तीत) सर्व वनस्पतींचे एकूण २४ वर्ग करून त्यांपैकी पहिल्या २३ वर्गात सर्व बीजी वनस्पती व शेवटच्या २४ व्या वर्गात अबीजी वनस्पतींचा समावेश केला. त्यांनी ह्या वर्गाचे नाव क्रिप्टोगॅमिया असे ठेवले कारण त्यामध्ये ज्या वनस्पतींची लैगिंक प्रजोत्पादनाची इंद्रिये त्यांना स्पष्ट दिसली नव्हती, पण दडलेली होती, त्यांचाच अंतर्भाव त्यांनी केला. फुलातील लिंगभेदसूचक इंद्रियासारखे (केसरदले म्हणजे पुंकेसर व किंजदले म्हणजे स्त्रीकेसर) भाग त्या वनस्पतींत न आढळल्याने लैंगिक प्रजोत्पादन तेथे स्पष्ट नाही, अशा समजुतीने वरील लॅटिन संज्ञा त्यांनी उपयोगात आणली (क्रिप्टॉस = दडलेली, गॅमॉस = युती). त्या वनस्पतींत लैंगिक प्रजोत्पादन बहुधा असते असे नंतर आढळल्याने आता त्या संज्ञेचा शब्दशः अर्थ न घेता आरंभी सांगितलेला अबीजी हाच अर्थ घेतला जातो. कार्ल लिनीअस यांनी १७५१ मध्ये सर्व वनस्पतींची मांडणी ६७ गणांत करून त्यांपैकी ६४ ते ६७ गणांत अबीजी वनस्पतींच्या ४ गटांच्या ( नेचे, शेवाळी, शैवले व कवक ) समावेश केला आज स्थूलमानाने ही पद्धत सोयीस्कर म्हणून प्रचारात आहे.
⇨चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी आपला क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) सिद्धांत १८५९ मध्ये प्रस्थापित केल्यानंतर वनस्पतींतील आप्तभावांच्या संदर्भात नैसर्गिक वर्गीकरणाच्या पद्धती पुढे येऊ लागल्या. त्यांमध्ये कोणत्याही गटातील मांडणी साध्या वनस्पतीपासून ते अधिक जटिल वनस्पतींपर्यंत अशा गणांच्या स्वरूपात होऊ लागली. यामुळे अबीजी वनस्पतींचे कायक वनस्पती, शेवाळी व नेचाभ अथवा वाहिनीवंत अबीजी वनस्पती (म्हणजे अनुक्रमे थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा) असे भिन्न पातळीवरचे उपविभाग ओळखले जाऊ लागले (१८८०) व थोड्याफार फरकाने आजही ते तसे मानले जातात.
सापेक्षतः अबीजी वनस्पतींतील सर्वांत खालच्या दर्जाच्या वनस्पतींना ⇨कायक वनस्पती म्हणतात, कारण पाने, खोड व मुळे ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये त्यांना नसतात व त्यांची प्रजोत्पादक इंद्रिये एककोशिक असतात. या उपविभागात ⇨शैवले (साध्या हरितद्रव्ययुक्त बव्हंशी जलवनस्पती, उदा., स्पायरोगायरा, यूग्लीना, फ्यूकस इ. सागरशैवले) ⇨कवक (साध्या हरितद्रव्यहीन सूक्ष्म वनस्पती, उदा., बुरशी, भूछत्रे इ.) व ⇨शैवाक (शैवाले व कवक यांच्या परस्पर सागाय्यक जीवनाने ⇨सहजीवन बनलेल्या साध्या वनस्पती, उदा., दगडफुले) यांचा समावेश होतो. ⇨शेवाळीचा उपविभाग त्यापेक्षा वरच्या दर्जाचा मानला जातो, कारण यांची लैंगिक इंद्रिये बहुकोशिक असून त्यांना अंदुककलश आणि रेतुकाशय म्हणतात (उदा., फ्युनेरिया, रिक्सिया, अँथोसिरोस इ.). वाहिनीवंत अबीजी वनस्पती (टेरिडोफायटा) ह्या विभागातील वनस्पतींची प्रजोत्पादक इंद्रिये शेवाळीतल्यासारखीच असून पाणी व अन्नरसाची ने-आण करणाऱ्या विशिष्ट वाहक ऊतकांचे (समान रचना आणि कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांचे) वृंद व बीजी वनस्पतीतल्याप्रमाणे शरीराच्या अंतर्बाह्य संरचना सर्वसाधारणपणे आढळते. यात ⇨नेचे, ⇨एक्किसीटेलीझ, ⇨लायकोपीडिएलीझ, ⇨सिलाजिनेलेलीझ, ⇨आयसॉएटेलीझ इत्यादींचा समावेश होतो.
आधुनिक विचारसरणीप्रमाणे शेवाळी (ब्रायोफायटा) हा एकच नैसर्गिक गट मानतात व त्याला विभागाचा दर्जा दिला जातो. शैवले, शैवाक व कवक संज्ञा सामान्य मानल्या असून सर्व अबीजी वनस्पतींचे १४ विभाग केले आहेत व त्यांना नैसर्गिक गट मानतात. शिवाय शैवाकांचा एक स्वतंत्र वर्ग मानला जातो. अबीजी वनस्पतींतील जातींची संख्या सु. १,१०,००० असावी. त्यांचा प्रसारही फार मोठा आहे. यांतल्या कित्येक वनस्पती फार प्राचीन आहेत इतकेच नव्हे, तर काही सर्वात आरंभी निर्माण झालेल्या असाव्यात, असे मानले जाते.
पहा : कवक कायक वनस्पति पुरावनस्पतिविज्ञान वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग शेवाळी शैवले शैवाक.
संदर्भ : 1. Lawrence G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
2. Mukherji, H. Ganguly, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.
3. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vols. I and II, Tokyo, 1955.
परांडेकर, शं. आ.