वन: मुख्यत्वेकरून मोठी झाडे (वृक्ष) असणाऱ्या वनस्पतिगटांनी व्यापलेल्या विस्तृत भूभागास वन म्हणतात. वनांत वृक्ष व इतर वनस्पतींखेरीज कीटक, पशू, पक्षी आणि या सर्वांना पोसणारे व परस्परांना जोडणारे पर्यावरण यांचा समावेश असतो. अशा तऱ्हेने झाडेझुडपे, ⇨अपिवनस्पती, ⇨ओषधी, जीवोपजीवी (अन्य सजीवांवर उपजीविका करणारे सजीव), तृण, तण, शेवाळी, ⇨कवके, बुरशी, भूपृष्ठावरचे कीटक आणि सरपटणारे, उडणारे व विहार करणारे पशुपक्षी, जमीन, पाणी व हवा हे सर्वच वनांचे घटक असतात. या घटकांच्या एकमेकांवर सतत प्रतिक्रिया चालू असतात. अशा एकत्रित व परिवर्तनशील समूहाला वन, जंगल अथवा अरण्य म्हणतात.

वृक्षप्रधान वने उष्ण महिन्यांत तापमान १०° से. पेक्षा जास्त व वार्षिक वर्षण २०० मिमी. पेक्षा अधिक असलेल्या प्रदेशात आढळतात. या जलवायुवैज्ञानिक मर्यादांतील विविध परिस्थितींत वने विकसित होतात. वनातील सजीवांच्या जातींची घटक रचना (अंशतः ही वनाच्या वयानुसार विकसित होते), वृक्षांच्या आच्छादनाची घनता, तेथे आढणारे मृदा प्रकार व प्रदेशाचा भूवैज्ञानिक इतिहास यांनुसार वनांचे प्रकार होतात. खोली, सुपीकता व बहुवर्षायू मुळांची उपस्थिती यांप्रमाणे मृदांच्या स्थितीत फरक पडतात. वृक्षांच्या आच्छादनावर प्रत्येक वन स्तरात पोहोचणारा सूर्यप्रकाश व पर्जन्यमान अवलंबून असतात. वने ही जगातील अतिशय जटिल पारिस्थितिक प्रणालींत अंतर्भूत होतात व त्यांत विस्तृत उभे स्तरीभवन आढळते. पानझडी वनांत वृक्ष आच्छादनाचे वरचा व खालचा असे दोन मजले असतात, तर पर्जन्यवनांत वृक्ष आच्छादनाचे किमान तीन स्तरांत विभाजन होते.

वनांत राहणाऱ्या प्राण्यांत उच्च विकसित श्रवणक्षमता आढळते व कित्येक प्राणी परिसरातून उभ्या दिशेत हालचाली करण्यास अनुकूलित झालेले असतात. जमिनीवरील वनस्पतींखेरीज इतर अन्न दुर्मिळ असल्याने बरेच प्राणी वनांचा फक्त आसरा म्हणून उपयोग करतात. समशीतोष्ण वनांत वाऱ्याबरोबरच पक्षी वनस्पतींच्या बियांचे वितरण करतात व कीटक परागसिंचनास मदत करतात. वन ही निसर्गाची सर्वांत कार्यक्षम परिस्थितिक प्रणाली आहे. वनांत प्रकाशसंश्लेषणाचा (प्रकाशीय उर्जेचा उपयोग करून कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांपासून कार्बनी संयुगे-विशेषतः कार्बोहायड्रेटे−तयार होण्याच्या प्रक्रियेचा) वेग उच्च असून त्याचा जटिल जैव मालिकेच्या रूपात वनस्पती व प्राणी जीवन या दोहोंवर परिणाम घडून येतो. 

वनांच्या पर्यावरण रक्षणाचे कार्य हे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने मान्य केलेल्या वनाच्या व्याख्येत स्पष्ट दिसते. या व्याख्येनुसार वनांत वृक्षांचा (उभ्या अगर कापलेल्या) प्रादुर्भाव असतो आणि त्यात लाकूड व इतर वन उत्पादनांच्या निर्मितीची क्षमता असते तसेच जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) व पाण्याचे नियमन व इतर वातावरण प्रभावित करण्याची व वन्य प्राण्यांना रक्षण देण्याची क्षमता असते. वनांची ही शास्त्रीय संकल्पना असली, तरी प्रशासनाच्या सोयीसाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व्यावहारिक भूमिकेतून कमीअधिक वृक्ष असलेले अथवा वृक्षहीन असणारे प्रदेशही प्रत्यक्षात वनात अंतर्भूत केलेले आढळतात.

पहा : परिस्थितिविज्ञान वनविद्या.

दशपुत्रे, घ. भ.