वतनसंस्था : गावाकरिता किंवा देशासाठी करीत असलेल्या कर्तव्यबद्दल त्या व्यक्तीच्या उपजीविकेकरिता, मानमरातब राखण्यासाठी आणि जनतेचे दिलेले व वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन. यात चाकरी, वृत्ती, अधिकार, हक्क, नेमणूक यांचा अंतर्भाव होतो व हे हक्क आणि तदानुषंगिक कर्तव्ये उपभोगण्याची राजमान्य आणि लोकमान्य पद्धत म्हणजे वतनसंस्था होय. ‘वतन’ या संज्ञेच्या व्युत्पत्तीसंबंधी भिन्न मत-मतांतरे आहेत. काही विद्वानांच्या मते हा शब्द ‘वर्तन’ या संस्कृत शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ उपजीविकेचे शाश्वत साधन किंवा उदरनिर्वाह वा वेतन असा आहे तर काही विद्वान तो अरबी शब्द असून वतन् म्हणजे जन्मभूमी−घर असा अर्थ देतात. उत्पन्नाची शाश्वती ही वतनदार पद्धतीतील मूलभूत कल्पना आहे. वंशपरंपरेने काम करण्याचा हक्क असणारा, वतन धारण करणारा गावकरी, मग तो कोणत्याही धंद्यावर पोट भरो, वतनदार ही सामान्य संज्ञा आहे.

ग्रामसंस्थांचा कारभार नीटपणे चालावा म्हणून प्राचीन काळ राज्यकर्त्यांनी या वतनसंस्थेस मान्यता दिली आणि मग राजेही आपल्या मर्जीतील व्यक्तींना, विशेषतः नात्यागोत्यांतील इसमांना, गावे इनाम देऊ लागले. जे आपल्या हुषारीने किंवा पराक्रमाने, राज्य मिळविण्यासाठी व त्याचे रक्षण करण्यासाठी राजांना मदत करीत. त्यांना अशी इनामे कायमची मिळू लागली. शासनव्यवस्थेत उच्च अधिकारपदांसाठीही अशी जमीन तोडून देण्याची प्रथा सुरू झाली. राजे किंवा सरदार हे देवालयांच्या योगक्षेमासाठीही जमीनी व गावे इनाम देऊ लागले. अग्रहार देण्याची प्रथा जुनीच होती, ती चालू होतीच. अशा प्रकारे वतनदारी ही पद्धती राजमान्य व धर्ममान्य ठरली.

वतनदारीचे दोन प्रमुख प्रकार आढळतात : एक, राजाला हवी असेल तेव्हा लष्करी किंवा इतर मदत देण्याच्या अटीवर जी वतने दिली जातात, ती सरंजामशाही वतने आणि दोन, गावकामगारांना गावकीकडून (गावसभा) ग्रामव्यवस्थेच्या विशिष्ट कामासाठी मिळतात ती वतने. यांशिवाय बलुतेदार म्हणजे निरनिराळे कारागीर-कामगार, गावासाठी जी विशिष्ट सेवा करीत, त्याबद्दल त्यांना मेहनतान्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून कायमस्वरूपी ठराविक धान्य मिळत असे.

वतनसंस्था भारतातील सामाजिक व्यवस्थेत निश्चितपणे केव्हा प्रविष्ट झाली, याबद्दल विद्वानांत एकमत नाही. काहींच्या मते ती इसवी सनाच्या प्रारंभापासून अंशतः अस्तित्वात असावी व पुढे मध्ययुगात संरजामशाहीच्या विकासाबरोबर अधिक दृढतर झाली तर काही विद्वान असे मानतात की महाराष्ट्र−कर्नाटकात चालुक्य−राष्ट्रकूट काळात (६०६−९७५) ग्रामव्यवस्थेत महत्तर (वयस्कर पुढारी) आणि व्यापारी श्रेणींचे प्रतिनिधी यांचे महत्त्व असे. ग्रामसंस्थेतील कारभारात काही अधिकारपदे काही कुळांकडे वंशपरंपरेने दिली जात आणि त्या कुळांना काही जमीन कायमची इनाम देण्याची प्रथा असे. त्यामुळे त्या त्या कुळातील अधिकारी आपापली कामे दक्षतेने करीत असत. यादवकाळापूर्वी ही संस्था व्यवस्थित कार्यरत असल्याचे दाखले शिलालेखांतून आणि ताम्रपटांतून मिळतात. यादवकाळात (९८०−१३१८) वतनदारी पद्धत पूर्णतः प्रस्थापित झालेली दिसते. ग्रामव्यवस्थेत पाटील हा सर्वांत मोठा वतनदार आढळतो. तसा देशमुख किंवा देशग्रामकूट होय. पाटील हा जसा गावचा राजा, तसा देशमुख हा आपल्या हाताखालच्या प्रदेशाचा नायक असे. वतनाच्या अधिकाराचे महत्त्व मोठे असले, तरी कर्तव्यपालनाची इच्छा त्यापेक्षा अधिक असे. वतनदार हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकांच्या हितासाठी झटणारे असल्यामुळे लोक त्यांना मान देत. वतनदारांनीही आपल्या वतनाचा व आपल्या अधिकाराचा मोठा अभिमान वाटे. ग्रामसंस्था ही प्रत्येक गावात असे आणि तिचा कारभार ग्रामपंचायत नावाची सभा करीत असे. पुढे मात्र ही व्यवस्था थोडी बदलली आणि ग्रामीण भागात देशकसत्ता आली. देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, चौगुला आणि प्रमुख ग्रामस्थ या सर्वांना मिळून ‘देशक’ म्हणत. गावाच्या कारभारासाठी ज्या सभा भरत, त्यांत बारा बलुतेदार, शेतकरीस जोशी या सर्व जानपदस्थ लोकांचा समावेश असे. यांतील सर्वजण वजनदार असत. त्यामुळे राजसत्त बदलली, तर अधिकारी बदलत पण लोकव्यवहाराचा कणा बनलेली वतनदार मंडळी कायम असत. म्हणून यादवांच्या सीमाभागात परमार, शिलाहार, काकतीय इ. वंशांतील राजांनी अधूनमधून हस्तक्षेप केला किंवा यादवांना प्रसंगोपात काही प्रदेश सोडावा लागला तरी स्थानिक कारभारात त्यामुळे विशेष गोंधळ झालेला दिसत नाही. त्या काळी देशवहीत सर्व घटनांची नोंद करण्याची पद्धत होती व वतनी अधिकाऱ्यांनी ती अप्रतिहत चालू ठेवली होती. यादवांच्या नंतर मुसलमानी अंमल (१२१८ ते १७०७) आला. दक्षिण हिंदुस्थानात मध्ययुगात बहमनी सत्ता (१३४७ ते १५३८) व पुढे तिचे पाच शाह्यांत−आदिलशाही, कुत्बशाही, बरीदशाही, निजामशाही व इमादशाही−विभाजन झाले पण वतन संस्थेत लक्षणीय बदल झाले नाहीत कारण राजसत्ता बदलली, तरी स्थानिक कारबारात विशेष फरक पडला नाही. फक्त राजनिष्ठेत फरक झालेला दिसतो. मुसलमानांनी ही सर्व वतने चालू ठेवलेली दिसतात.

मराठेशाहीत या वतनसंस्थेत आमूलाग्र बदल झाला नाही, तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी देशमुख−देशपांडे यांची प्रसंगोपात वतने जप्त करून वेतनपद्धती आणण्याचा प्रयत्न केला आणि वसूल गोळा करण्यासाठी त्यांनी देशमुख−देशपांडे या जुन्या वतनदारांवर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे पगारी अधिकारी नेमले. त्यामुळे वचनदारांच्या चढेलपणास पायबंद बसला. शक्यतो नवीन वतने न देण्याचे तत्त्व त्यांनी पाळले तथापि सर्वच जुनी वतने त्यांनी काढून घेतली असे नव्हे फक्त त्यांवर काही निर्बंध लादले. शिवकाळात वतनसंस्थेची स्थिती थोडी वेगळी होती. अनेक वतनदार देशमुख स्वराज्यनिष्ठ होते तर काही शत्रूला सामील होते. रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात शत्रूशी संधान बांधण्याऱ्या वतनदारांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याचा उद्योग आरंभताच, असे काही मुस्लिम स्वामीनिष्ठ वतनदार त्यांच्या विरूद्ध गेले होते.

त्यावेळी राजसत्तेच्या खालोखाल देशकसत्ता म्हणजे देशमुख, कुळकर्णी, देशकुळकर्णी, पाटील, बलुतेदार इ. वतनदारांची लहानमोठे अधिकार असलेली उतरंड होती. हीतच प्रमुख गावकरी रयतेचा अंतर्भाव होतो. देशकसंस्थेला वतन म्हणत आणि गोत म्हणजे ग्रामसंस्था. त्यालाही वतन म्हणत. ह्या ग्रामसंस्थेला फार महत्त्व होते. गावातील वतनाचे भांडण-तंटे ग्रामसंस्थेमार्फत निकालात काढण्याचा प्रघात होता. त्यावेळी महाराष्ट्रात कडेकपारी अनेक खेडी होती. त्यांपैकी प्रत्येक गाव बव्हंशी स्वयंपूर्ण होते. गावात शेतीखेरीज कारागिरी करणाऱ्यास बलुते अशी संज्ञा असे. त्यास पोटाकरिता जमिनीच्या उत्पन्नानुसार धान्यादी वस्तू मिळत व जमीन इनाम मिळे.


शिवकालीन ग्रामसंस्था कुटुंबतत्त्वावर आधारित होती. वतनदार कुळकर्णी हा गावचा मिरासदार असे. कुळकर्ण्याचा निर्वंश झाल्यास त्याच्या जागी दुसरा कुळकर्णी वंशपरंपरेने नेमण्याचा हक्क ग्रांमस्थांना असे. तत्पूर्वी ग्रामस्थ तात्पुरता मुतालिक नेमून नव्या कुळकर्ण्याचा शोध घेत. ग्रामस्थांनी अशी वतने बहाल केली, तरी त्यांवर परण्याच्या देशमुखांचे शिक्के व देशपांड्यांचे दस्तक असावे लागत. एकदा वतन दिल्यानंतर त्याला कोणी हरकत घेतली, तर सारा गाव वतनदाराची पाठ राखीत असे. कुळकर्ण्याप्रमाणे पाटीलसुद्धा मिरासदार होता. पाटील मृत्यू पावला त्याचा खून झाला, तर त्याच्या बायकोच्या आणि अज्ञान मुलाच्या हातून ग्रामस्थ कारभार चालविण्यास मदत करीत. शिवकालीन समाजात वतनासक्ती जबरदस्त होती व वतनासंबंधी भांडणे पिढीजात चालू राहत परंतु वतनाच्या भांडणात राजसत्ता अखेरचा निकाल ग्रामसभांवर सोपवी. राजाकडून फिर्यादीस मुळातच हुकूम असे की, ‘हे मिराशीचे काम आहे, तरी उभयता वादी गोतामध्ये जाऊन कागद रूजू करून निवाडा करून घेणे.’ गोतदेशकसभेत त्या मंडळींनी खऱ्या साक्षी द्याव्या, अशी त्यांना शपथ घालण्यात येई. शिवाजी महराजांनी खोटी साक्ष देणाऱ्याची जीभ कापण्याचा हुकूम दिला होता.

शिवाजीनंतरच्या राज्यकर्त्यांनी हे धोरण सोडवे आणि सरंजामशाहीला प्रारंभ झाला. शाहू छत्रपतींच्या (कार. १७०७-४९) वेळी एखाद्या सरदाराने नवीन प्रदेश जिंकून घेतला, की त्यालाच तो जहागीर म्हणून देण्याची प्रथा पडली. त्यांमुळे पुढे पेशवाईत मराठी साम्राज्याचा विस्तार होऊनही या सरंजामशाहीमुळे एकसूत्री राज्य राहिले नाही आणि स्वतंत्र संस्थाने उद्यास आली. पुढे ब्रिटिशांनी हिंदुस्थान पादाक्रांत केल्यानंतर अव्वल इंग्रजी अंमलात ही संस्थाने कायम ठेवली. ग्रामसंस्थेतील पाटील, कुळकर्णी, महार ही वतने तशीच चालू ठेवली पण देशमुख−देशपांडे यांची सरंजामी वतने नष्ट केली. पुढे स्वातंत्र्योत्तर भारतात संस्थानांच्या विलीनीकरणाबरोबर सर्व वतनेसुद्ध संपुष्टात आली.

कुलकर्णी, पाटील, चौगुला, देशमुख−देशपांडे, महार, महाजन वगैरेंच्या वतनांसंबंधी त्यांचे हक्क व कर्तव्ये मानमरातब आणि उपजीविकेची साधने इ. माहिती पुढे दिली आहे.

कुलकर्णी: प्राचीन ग्रामसंस्थेचील एक अधिकारी व वतनदार. त्याला मिळालेल्या वतनाला ‘लिखनवृत्ती’ म्हणत असत. हे वतन सु. एक हजार वर्षांचे जुने असावे, असे मानतात. गावातील एकूण जमिनीचा पंचविसावा हिस्सा पाटील, कुळकर्णी व चौगुला यांना इनाम देण्याची वहिवाट होती. यांना जमिनीवर शेतसारा नसे. गाव-पाटलाचा लेखक-मदतनीस या नात्याने गावाच्या वसुलाचा हिशोब ठेवण्याचे काम कुळकर्ण्याकडे असे. किल + करण या सामाजिक शब्दावरून कुळकर्णी हा शब्द वनला असून कुल म्हणजे जमिनीचा भाग वा शेतकरी व करण म्हणजे लिखनवृत्ती होय. कुळवार हिशोब लिहिणारा तो कुळकर्णी, असेही त्याचे व्यवसायानुरूप वतननाम बनले असावे. याला स्थलपरत्त्वे ‘पटवारी’ अथवा ‘पांड्या’ म्हणतात. बहुधा कुळकर्णी ब्राह्मण असत परंतु प्रभु, मराठे, लिंगायत व मुसलमान या ज्ञातीतही कुळकर्णी वतनदार आढळतात. शिवकालात यांना दोन चवाळी, जोडा, मुंडासे, धोतरजोडी, रूमाल, पासोडी वगैरे हक्कबाबी असत. यांशिवाय गावातील धंदेवाल्यांकडून तेल, पाने, सुपारी, गूळ, केळी इ. मुशाहिरा मिळे. गावाचे दप्तर, शिवाराचे कमाल क्षेत्र, आकार व वर्णन ह्यांचा आकारबंद, शेतवारपत्रक,लावणीपत्रक, पडपत्रक, वसुलीबाकीपत्रक, त्याची फाळणी व जमाखर्च, गुरे-माणसांची गणती वगैरे लेखी कामे तो करी. त्याचा सामाजिक दर्जा चांगला असे. स्वातंत्र्योत्तर काळात ही वतने जाऊन त्याजागी तलाठ्यांची शासनाने नियुक्ती केली.

पाटील: प्राचीन ग्रामसंस्थेतील गावाचा मुख्य वतनदार अधिकारी. भिरासदारांपैकी पाटलाचे घराणे प्रमुख व ते गावात मानाने सर्वांत वडील असावयाचे. ‘पट्टकील’ या संस्कृत शव्दांवरून ‘पाटील’ हा शब्द बनला आहे. कापसाचे विणलेले पट्ट गावकीच्या नोंदी विहिण्यासाठी पूर्वी वापरीत आणि ते वेळूच्या नळीत जतन करीत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. या शब्दावरून पुढे पट्टकील, पाटैलू, पाटेल, पाटील, या क्रमाने तो शब्द प्रचारात आला. वि. का. राजवाड्यांच्या मते चालुक्यादी घराण्यांच्या वेळी गणसंघातील काही गण गावगन्नाचे पाटैलू बनले आणि काही गण कुणबी झाले. तज्ञांच्या मते पाटीलकी हे वतन जमिनीच्या नांगरपटीबरोबरच उदयास आले असावे. पाटलाला ग्रामसंस्थेत प्रदेशपरत्वे कमी-अधिक मानमराबत असत. पाटलाला गावपाटील किंवा पाटील-मोकदम असेही म्हणतात. पाटील घराण्यात सर्वच पाटील आडनाव लावीत असले, तरी पाटीलकी उपभोगणाराच खरा पाटील असतो. पाटीलकी हे वतन महार, मुसलमान, ब्राम्हण, कुणबी इ. जातींत असल्याचे उल्लेख आढळतात. देशमुखीखालोखाल पाटीलकीला महत्त्व होते आणि त्याचे वतनही वंशपरंपरागत चाले. जुन्या काळी पाटील हा जणू गावचा राजाच असे. महाराष्ट्रात प्रदेशपरत्वे त्यास भिन्न नावे आढळतात. पूर्वीच्या कोल्हापूर−सांगली संस्थानांत त्याला ‘चौधरी कामगावुंड’ असेही म्हणत तर कोकणात ‘चौगुला’ आणि इतरत्र पाटील म्हणतात. जातपाटील, सरपाटील, जडेपाटील असेही भेद आहेत. यांशिवाय पोलीस पाटील व मुलकी पाटील, अशी एखाद्या गावात कामविभागणी असे. पाटील हा गावचा मुख्य मिरासदार असून त्याच्याकडे मुलकी, दिवाणी व फौजदारी अधिकार असत. गावचा सारा वसूल करणे, ही पाटलाची जबाबदारी असे. एखाद्या वर्षी रक्कम जमली नाही, तर ती त्यास भरावी लागत असे. पाटलाचे काम गावीची सुव्यवस्था ठेवून शांतता राखणे हे असे. गावाच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी त्याच्या वर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे त्याचावर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपमे गावकुसाजवळ बहुधा शत्रूच्या माऱ्याच्या ठिकाणी बांधलेली सर्वत्र आढळते. एका ऐतिहासिक कैफियतीत पाटील म्हणतो, ‘‘गावाची चाकरी, लावणी, उगवती वगैरे जे सरकारचे काम पडते, ते करीत असतो’’. यावरून त्याचा कर्तव्यांची कल्पना येते. त्यामुळे पीकपाणी, बलुतेदारांच्या तक्रारी, वतनदार, सामाजिक संस्थांची वतने, भांडण-तंटे इत्यादींची देखरेख व निवारण ही त्याची प्रमुख कामे होत. यांशिवाय सरकारी हुकुमांची अंमलबजावणी, गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांची रबर मिळविणे इ. कामे असत. महार, कुलकर्णी आणि पोतदार यांच्यामार्फत पाटील कामे उरकीत असे. या कामासाठी पाटलाला वार्षिक मुशाहिरा मिळत असे. त्यांना वतन इनामी जमिनीही दिलेल्या आढळतात. विविध समारंभाच्या प्रसंगी−शिमगा, दसरा, पोळा−पाटलाचा मान पहिला असे. भोसले, दाभाडे, पवार, गायकवाड, शिंदे, होळकर या सरदारांनी संस्थाने निर्मिली, तरी ते पाटीलकीला कवटाळून राहिले व त्यांनी नवीन पाटील वतने संपादक केली. अव्वल इंग्रजी राजवटीत पाटीलकीचे महत्त्व असाधारण होते. स्वातंत्र्योत्तर काळात हे पद नाममात्रच राहिले आहे.


चौगुला : प्राचीन ग्रामसंस्थेतील गावाची व्यवस्था ठेवण्याच्या कामी पाटलास मदत करणारा एक वतनदार अधिकारी. त्याचा दर्जा पाटलाच्या खालोखाल असे. चौकुला (चार कुळे बाळगणारा) या मूळ शब्दावरून हा शब्द रूढ झाला असावा. देशचौगुला असाही त्याचा उल्लेख करतात. हा साधारणतः कुणबी असे परंतु कोणाही वतनदारास पूर्वी आपल्या वतनाचा भाग दुसऱ्यास देण्याचा किंवा विकण्याचा हक्क असल्यामुळे वाणी, मराठा, ब्राम्हण, लिंगायत वगैरे जातींतही चौगुला वतनाची परंपरा आढळते. गावाच्या एकंदर जमिनीचा पंचविसावा हिस्सा पाटील−कुलकर्णी व चौगुले यांना इनाम म्हणून साऱ्यावाचून देण्याची वहिवाट होती. याशिवाय त्यांना दुसरेही हक्क असत. गावची कोठारे, गुदामे यांची व्यवस्था त्याच्याकडे असे. चौधरी व चौगुले हे साधारणतः एकाच दर्जाचे वतन होते. महाळनाईक हे वतनदार भिल्ल, रामोशी किंवा कोळी असत.

देशमुख-देशपांडे व देसाई : हे उच्चश्रेणीतील परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. देशमुखी म्हणजे लष्करी व फौजदारी अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी, तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख-देशपांडे यांनी अमूक एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे, शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत. कर्नाटकात देशमुख-देशपांडे यांनाच अनुक्रमे ‘नाडगावुडा’आणि ‘नाडकर्णी’ म्हणत. हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. शिवाजीनी देशमुख−देशपांडे वतनदारांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले.

देशमुख−देशपांडे यांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. त्यास ‘रूसूम’ म्हणत. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. पाटील−कुलकर्ण्यांप्रमाणेच परागण्याच्या पंचायतीत त्यांना हक्कबाबी असत. भेट, तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल वगैरे वस्तू बलुत्याप्रमाणेच त्यांनाही अधिक प्रमाणात मिळत असत. परागण्याच्या जमाबंदीचे सर्व दप्तर देशपांड्यांच्या ताब्यात असे. त्यांच्या हाताखाली ‘मोहरीर’ नावाचा एक कारकून हे काम पाही. निरनिराळ्या वहिवाटदारांचे, वतनदारीचे हक्क व जमिनीची प्रतवारी, तिचे वर्णन इ. बारीकसारीक बाबींची नोंद या हिशोबात केलेली असे. देशपांडे विविध गावांच्या कुलकर्ण्यांनी पाठविलेले सर्व हिशोब संकलित करून सर्व परगण्यांचा ताळेबंद तयार करीत असे. कोकणात व कर्नाटकात हे काम देसाई हे वतनदार करीत. कोकणातील प्रभुपणाचा हुद्दाही देसायांच्याच जोडीचा असे. काही वेळा प्रभुदेसाई असा वतन-हुद्याचा उच्चार करीत. देशपांडे-देसाई हे देशमुखाच्या हाताखालील वतनदार असत. काही ठिकाणी देशपांड्यासच देशकुलकर्णी असेही म्हटले आहे. मुसलमानी अंमलात वतनाच्या घालमेली झाल्या. त्यावेळी मराठे पाटील व मराठे देशमुख हे बरेचसे स्थानभ्रष्ट होऊन त्यांच्या जागी ब्राम्हण देशमुख आले. वतनाप्रीत्यर्थ मुसलमान झालेले देशमुख−देशपांडे, परगणे−नाईक क्वचित काही ठिकाणी दृष्टोत्पत्तीस येतात. अव्वल ब्रिटिश अंमलात देशमुख−देशपांडे यांचे वतनदारी अधिकार कमी करण्यात आले मात्र त्यांचा रूसूम चालू होता.

महार वतन : जागत्या, वेसकर इ. महारकीच्या कामाचे पोटविभाग असल्यामुळे अनेक ठिकाणी त्यावेळी ही सर्व कामे महार करीत असत आणि तिन्ही प्रतींचे बलुते घेत असत. महार जागले हे पाटील−कुलकर्ण्यांचे हरकामे शिपाई होत. सरकारी कामानिमित्त ज्या इसमाची त्यांना गरज लागते, त्याला बोलावणे गावात कोणी परकी मनुष्य आला जनन, मरण किंवा गुन्हा झाला, काळी-पांढरीतली सरकारी मालमत्ता, झाडे, हद्दनिशाण्या यांचा बिघाड झाला किंवा सरकारी जागेवर कोणी अतिक्रमण केले, तर त्याबद्दलची बातमी पाटील−कुलकर्ण्यांना देणे गाव स्वच्छ ठेवणे गस्त घालणे पाटील-कुलकर्ण्यांबरोबर काळी-पांढरीत व परगावाला सरकारी कामानिमित्त जाणे गावचा वसूल, कागदपत्र व सरकारी सामान ठाण्यात किंवा परगावी पोहोचविणे पलटणीचा बंदोबस्त, सरकारी अंमलदारांचा सरबराई, गाड्या धरणे वगैरे कामांत पाटील-कुलकर्ण्यांना मदत करणे इ. कामे महार जागले करीत असत. जागले वतन हे अवलच्या महार वतनाचा एक पोटभाग असल्याने अमके काम महाराचे व तमके काम जगल्याचे असा स्पष्ट भेद करता येत नाही तथापि महार मुलकीकडील व जागले पोलीसकडील नोकर असल्याने वरील कामांपैकी जी मुलकी अंमलदारांकडून चालतात, ती महार करतात व जी पोलीसांकडून चालतात, ती जागले करीत असत. महारांची काठी कोठे अक्षय्य तृतीयेला, तर कोठे भावईच्या अमावस्येला बदलते. महारांना रोख मुशाहिरा नाही. बहुतेक गावी महारांना इनाम जमिनी आहेत, त्यांना ‘हाडकी हाडोळा’ म्हणतात. ज्या गावी महारांना इनाम नाही, त्यांतल्या क्वचित गावांत त्यांना जागल्याप्रमाणे रोख पाच-दहा रूपये सालिना मुशाहिरा सरकार देते.

जोशी वृत्ती : या नावाने प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या ग्रामसंस्थेतील हा एक वतनदार वृत्तिवंत समाज आहे, त्यांचा उल्लेख ‘ग्राम जोशी’, ‘कुडबुडे जोशी’, ‘गिडबिडकी’ इ. नावांनी करण्यात येतो आणि या नावांप्रमाणे त्यांच्या व्यावसायातही फरक आढळतो. यांची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांत असून पूर्वी जोशी हे भिक्षेकरी होते. मराठे, धनगर, माळी इ. जातींचा यात भरणा असे. जोशांचे ‘खास जोशी ’ व ‘अकरमासे जोशी’ असे दोन पोटभेद असून त्यांच्यात रोटीव्यवहार होता, पण वेटीव्यवहार होत नसे. त्यांच्या सर्व चालीरीती मराठ्यांप्रमाणे होत्या. ग्रामजोशी मात्र जुन्या ग्रामव्यवस्थेतील एक धार्मिक अधिकारी होता. पंचांग सांगणे, लग्न लावणे, अंत्यसंस्काराचे पौरोहित्य करणे आणि प्रसंगोपात उपाध्येपणा करणे, हा ग्रामजोश्याचा अधिकार असे. त्याच्याकडे ग्रमदेवतेची पूजा-अर्चा, नैवेद्य आणि शकुन-अपशकुन पाहणे ही कामे असत. तो जातीने ब्राम्हण असे आणि कुणव्याकडून धान्याचा शेकडा एक या प्रमाणात त्याला पेंढ्या मिळत. याशिवाय नैमित्तिक शिधा व दक्षिणा वेगळी असे. गिडबिडकी जोशी हे प्रामुख्याने महाराष्ट्र−कर्नाटकांत आढळतात. ते डमरू वाजवून भिक्षा मागतात, म्हणून त्यांना गिडबिडकी किंवा कुडबुडे म्हणतात. यांच्या चालीरीती मराठ्यांप्रमाणेच असून हे पिंपळानामक पक्ष्याचा शब्द एकून भविष्य कथन करतात.

शेट्ये-महाजन : या वतनाचा संबंध व्यापाराशी, प्रामुख्याने वाणी व्यवसायाशी, निगडीत असून गुजरात−महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आणि ग्रामव्यवस्थेतही त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. इतर वतनांबरोबरच हे वतन वृद्धिंगत झाले. अर्थव्यवहाराचे नियमन करणारी संस्था म्हणून तिचे महत्त्व होते. व्यवहाराचे शिरस्ते ठरविणे, लवाद करणे, सरकार-दराबारी दाद मागणे इ. सर्व महत्त्वाचा कारभार महाजन चालवीत असे. व्यापारी व सावकार मिळून एकच महाजन संस्था असे. तिला ‘महाजनकी’ म्हणत. महाजनांच्या प्रमुखास नगरशेठ अशी संज्ञा होत व विशेषतः गुजरातेत त्यास मान असे.


गावोगावी बव्हंशी सेवाकार्ये करणारे जुने वतनदार म्हणजे अलुतेदार आणि बलुतेदार होत. बलुतेदार हे प्रत्येक गावातील व्यवहाराकरिता व दैनंदिन व्यवहाराकरिता अपरिहार्य नसलेले वतनदार होते. पूर्वापार प्रत्येक गावास वंशपरंपरेच्या हुद्देदारांची संख्या २४ असे. त्यांपैकी बाराजणांना ‘अलुतेदार’ असे संबोधण्यात येई. पेशवाईअखेर या अलुते-बलुतेदारांची संख्या इतकी फोफावली की, या २४ अलुते-बलुतेदारांच्या जोडीस तितक्याच लोकांची भर पडली व त्या सर्वांना वतनदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. प्रत्येक गावात हे सर्वच्या सर्व असतच असे नव्हे. प्रदेशपरत्वे त्यांच्या संख्येत फरक आढळतो. सुतार, लोहार, चांभार, न्हावी असे सतत ज्यांची गरज भासते, असे बलुतेदार बहुतेक गावांत राहत तर तेली, तांबोळी, साळी, सनगर, माळी, गोंधळी असे नैमित्तिक अलुतेदार हे वाड्यांवर वस्ती करून राहत असत. अर्थात आपापल्या शेतीवाडीजळच राहणे सोयीचे असल्यामुळे मुख्य गावठाणाजवळ जमीन असलेले वतनदार गावठाणात राहत, तर लांबवर जमीन असलेले वतनदार रानात वस्ती करून राहत. हळूहळू त्यांच्या वस्तीच्या बाड्या बनत. काही अलुतेदार दरसाल ठराविक हंगामात एका गावाहून दुसऱ्या गावी येत-जात असत. यांपैकी गोंधळी, घडशी, घिसाडी हे प्रमुख होत. [⟶ अलुते-बलुते].

दरसाल ठराविक हंगामात व्यवसायपरत्वे गावोगाव भटकणारे असे फिरस्तेही कालांतराने वतनदार बनलेले दिसतात. अशा वतनदारांत तीर्थोपाध्याय, डोंबारी, मांगगारूडी, दरवेशी, नंदीबैलवाले, कलावंत, कुडमु (बु)डे जोशी, वासुदेव इत्यादींचा अंतर्भाव होतो. अलुते-बलुतेदारांस वर्षाकाठी सुगीच्या वेळी धान्यरूपाने अगर खळ्यावर पेंढ्यांच्या रूपाने ठराविक मोबदला मिळत असे. फिरस्ते मात्र प्रत्येक शेतकऱ्याकडून विकलेल्या मोबदल्यात किंवा हत्यारे-अवजारांची दुरूस्ती केल्यास, त्याचा मोबदला म्हणून किंवा केलेल्या खेळकरमणुकीच्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पोटी देणग्यांच्या ऐपतीस व वसूल करणाऱ्यांच्या ताकदीस अनुसरून धान्य अगर शेतातून पेंढ्या वसूल करणाऱ्यांच्या ताकदीस अनुसरून धान्य अगर शेतातून पेंढ्या वसूल करीत. ते दरसाल नियमाने विशिष्ट हंगामात फिरू लागल्याने साहजिकच वहिवाटीनुसार ते वतनदार बनले आणि विशिष्ट कामापोटी गावकऱ्यांकडून मोबदला वसूल करणे हा आपला हक्क आहे, असे ते मानू लागले.

वतनसंस्थेने प्रत्येक व्यवहारात त्या त्या कुटुंबांची मक्तेदारी आणि एकाधिकार निर्माण केला. यामुळे आपापसांतील स्पर्धा नाहीशी होऊन धंदा-व्यवसायसुद्धा सांप्रदायिक बनला. गावातील गिऱ्हाईक-कुटुंबे बांधली गेली. त्या त्या कुटुंबाला अलुत्या-बलुत्यांच्या शिरस्त्याप्रमाणे वस्तू अगर सेवा बहाल करणे, हा वतनदारीचा हक्क बनला. इतका की, कामानिमित्त शहरात गेलेला एखादा कुणबी तेथे केशकर्तनालयात दाढी करून परतला, तर गावाचा वतनदार न्हावी त्याला पंचापुढे खेचत असे. अशा बाबतीत पंचायतीनेसुद्धा वतनदार बलुतेदाराचा हक्क मान्य केल्याची उदाहरणे आहेत. वाटेल त्या न्हाव्याकडून आपण हजामत करून घेऊ, असे रयतेला वाटणे साहजिकच आहे परंतु हा समज कसा भ्रामक आहे, हे १९१९ साली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालावरून उघड झाले आहे. या निकालात उच्च न्यायालयाने असे ठरवले की, वतनदार न्हाव्याचे हक्क वतनदार जोश्यांप्रमाणेच आहेत. म्हणजे रयतेने वतनदार न्हाव्याकडूनच क्षौर करून घेतले पाहिजे व वतनदार न्हाव्याला वगळून जर दुसऱ्या न्हाव्याकडून क्षौर करून घेण्यात आले, तर यजमानावर व क्षौर करणाऱ्या बिनवतनदार न्हाव्यावर अधिकार प्राप्त होईल. गावकरी कुणब्यांच्या संबंधात अलुते-बलुतेदारांच्या दृष्टीने कर्तव्य वाटत असे, तर तेच वतनदार अलुते-बलुतेदारांच्या दृष्टीने हक्क बनत असे. गिऱ्हाइके अशा रीतीने बांधली गेल्यामुळे वतनदारांच्या एकाधिकारास तडा जाण्यास सुतराम् वाव नव्हता. वतनदारीच्या ऱ्हासाची किंवा विनाशाची बीजे यातच सामावलेली आहेत.

अव्वल इंग्रजी अंमलात ब्रिटीश शालनाने १८७४ मध्ये वतनविधी अंमलात आणून अलुते-बलुतेदारांसह अनेक वतने नष्ट केली मात्र पाटील, कुलकर्णी आणि महार असे तीन गावकामगार वतनदार व कारणपरत्वे चौथा जागल्या एवढेच वतनदार ठेवण्यात आले. या वतनदारांत महार वतनदारांच्या कामांसंबंधी कोणतेच निश्चित नियम नव्हते. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत असत, म्हणून बाबासाहेब आबेडकरांनी नांदगाव (नासिक जिल्हा) आणि रहिमतपुर (सातारा जिल्हा) येथील महार समाजाच्या जाहीर सभांत महारकी वतनाच्या संदर्भात काही महत्त्वाचे ठराव संमत केले. पुढे या विषयाची साद्यंत चर्चा बहिष्कृत भारताच्या अनुक्रमे दि. २, १६ व ३० सप्टेंबर आणि दि. ४ नोव्हेंबर १९२७ च्या अग्रलेखांतून केली व ३ ऑगस्ट १९२८ रोजी महार वतन नष्ट करण्याचे विधेयक तत्कालीन कायदेमंडळात मांडले. या विधेयकात त्यांनी महारांचा मुशहिरा बलुत्यांच्या रूपात देण्यात येत असल्याकारणाने महार वतनाला अत्यंत घाणेरडे व किळसवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे स्पष्ट मत मांडले. बलुते म्हणजे पगार, मुशाहिरा किंवा नोकरीचा मोबदला असा जो महाराजांचा व रयतेचा समज व्हावयाचा तो तसा न होता बलुते म्हणजे भीक व महार म्हणजे भिकारी, असा उभयपक्षांचा ग्रह होऊन बसला आहे. या वतनामुळे महार समाज स्वाभिमानशून्य झाला आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. एकूण या प्रश्नाची बाबासाहेबांनी मूलगामी चिकित्सा करून महार वतनाविरूद्ध परखड तोफ डागली होती पण सरकारने निवड समिती नेमून विधेयकाच्या मूळ उद्देशावरच घाव घातला आणि महारांना अपायकारक अशा दोन दुरूस्त्या सुचविल्या. बलुत्याएवजी नगद पगार मिळावा, ही तरतूद गाळण्यात आली. तसेच शेतसारा घेऊन इनाम जमिनी मालकीच्या करण्यात याव्यात, ही दुसरी दुरूस्ती नाकारण्यात आली. परिणामतः बाबासाहेबांना विधेयक मागे घेण्यावाचून अन्य पर्याय उरला नाही. पुढे आंबेडकरांनी या विधेयकाचा १९३७ मध्ये पुन्हा पाठपुरवठा केला. यावेळी मुंबई कायदेमंडळाचे अधिवेशन पुण्यास असताना दिनांक १७ सप्टेंबर १९३७ रोजी त्यांनी कोकणातील खोती पद्धत नष्ट करण्याविषयी आणि वेठबिगारीला आळा घालावा म्हणून एक विधेयक मांडले. त्याचवेळी त्यांनी महार वतनाच्या संदर्भात पुन्हा विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या मृत्यूनंतर १९५९ मध्ये या बाबतीत कायदा होऊन महार वतन रद्द करण्यात आले.


इंग्रजी राजवटीतील राजकीय हस्तक्षेप, औद्योगिकीकरण व शहरीकरण तसेच वाहतुकीची साधने, संदेशवहनाच्या सुविधा आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क वाढला. परिणामतः जात-पंचायत व ग्रामपंचायत यांच्या अनिर्बंध सत्तेला मर्यादा पडल्या. गावकऱ्यांच्या नित्यनैमित्तिक गरजा भागविकण्याकरिता बाजारात सर्व प्रकारच्या वस्तूंची, उपकरणांची विक्री होऊ लागली. विनिमयाकरिता धान्याचे माध्यम देवघेवीच्या व्यवहारात कालबाह्य होऊन कुचकामी ठरू लागले. त्याचप्रमाणे ताळेबंदाच्या काटेकोरपणातही ते गैरसोईचे ठरले. साहजिकच दैनंदिन व्यवहारात पैशाच्या चलनाचा वापर सुरू झाला. त्यामुळे शेतकरी शहरी बाजारपेठांकडे वळले आणि सुतार, लोहार इ. बलुतेदारकारागीर खेड्यात स्वतःचा धंदा चालेना म्हणून मोलमजुरीसाठी खेड्याबाहेर पडले. महाराष्ट्रात १९४७-४८ मध्ये संमत झालेल्या कुळकायद्यामुळे अनुपस्थित जमीनदारांच्या कसणाऱ्या कुळांकडे आपाततः गेल्या. त्यामुळे अनुपस्थित मालकी असलेले देसाई, देशमुख, देशपांडे इत्यादींची वतने संपुष्टात आली. संस्थानातील इनामे नष्ट करण्याच्या १९५५ च्या कायद्यामुळे या सरंजामी वतनदारांचा खेड्यांशी संबंधही तुटला व ते कायमचे शहरवासी बनले. अशा प्रकारे विसाव्या शतकाच्या मध्यम सु. हजार-दीडहजार वर्षे अव्याहत चालत आलेली वतनसंस्था अखेर संपुष्टात आली.

पूर्वी वतने देण्याच्या पद्धतीमुळे जुन्या समाजव्यवस्थेचा−ग्रामीण समाजव्यवस्थेचा−तत्कालीन राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार उपयोग करून घेतला. अर्थात आधुनिक काळातसुद्धा काही प्रमाणात राज्यकर्त्यांचा हाच प्रयत्न व उद्योग चालू असल्याचे आढळते. उदा., निरनिराळी अभिकरणे (एजन्सीज) पक्षातील सदस्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना महत्त्वाची स्थाने देऊन राज्यकर्ते आपली सत्ता बळकट करतात. ही स्थिती प्रगत आधुनिक सामाजिक, राजकीय व आर्थिक रचनेत दिसून येते. अर्थातच या परिस्थितीचे आविष्कार स्थलकानुरूप बदलत असतात. तेव्हा त्यातून एक प्रकारच्या गतिशीलतेचा अनुभव येतो.

संदर्भ : १. आत्रे, त्रिं. ना. गांव-गाडा, मुंबई, १९५९.

           २. ओतुरकर, रा. वि. भारताचा सांस्कृतिक इतिहास, पुणे, १९५२.

           ३. गणवीर, रत्नाकर, संपा. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे बहिष्कृत भारतातील अग्रलेख, भुसावळ, १९७६.

           ४. गाडगीळ, ध. रा. पुणे शहरांतील महाजन व नगरशेठ, पुणे, १९६२.

           ५. गायकवाड, आर्. डी. सरदेसाई, बी. एन्. व इतर, मराठेकालीन संस्था व विचार, कोल्हापूर, १९९०.

           ६. जोशी, शं. ना. अर्वाचीन महाराष्ट्रेतिहासकालांतील राज्यकारभारांचा अभ्यास (भाग १ ला), पुणे, १९६०.

           ७. पानसे, मु. ग. यादवकालीन महाराष्ट्र, पुणे, १९६३.

           ८. शाह, गो. गो. पूनाना श्री. वारनात महाजननो इतिहास, पुणे, १९५६.

           ९. सरदार, गं. वा. संपा. महाराष्ट्र-जीवन, पुणे, १९६०.

देशपांडे, सु. र.