वटवाघूळ : सामान्यतः उडणाऱ्या सस्तन प्राण्यांना हे नाव देतात. त्यांचा समावेश किरोप्टेरा किंवा जतुका गणात होतो. किरोप्टेराचा ग्रीक भाषेतील अर्थ ‘हस्त पंख’ असा आहे. वटवाघळांचा प्रसार दोन्ही गोलार्धाच्या समशीतोष्ण व उच्च कटिबंधात आहे. त्यांची लांबी १.९ ते ३७.५० सेंमी. व पंखांचा विस्तार १.५ मी. पर्यंत असतो. वटवाघळांची सर्वसाधारण शरीररचना उंदीर, श्यू यांसारख्या लहान सस्तन प्राण्यांसारखीच असते. उदा., त्यांचे शरीर मऊ फरने आच्छादिलेले असते, तिचा रंग पांढरा, लाल, तपकिरी, करडा किंवा काळा असतो. तोंडात दात असतात हृदय चार कप्प्यांचे असून ते फुप्फुसे वल इतर अवयवांना स्वतंत्रपणे रक्त पुरविते. माद्यांना स्तन असतात. बहुसंख्य वटवाघळे आपली उपजीविका कीटकांवर करतात. त्यांचे दात, सांगाडा व मेंदूचे आकारमान यांवरून ते कृंतक (भक्ष्य कुडतरून खाणाऱ्या) गणापेक्षा कीटकभक्षक गणाचे जवळचे आप्त असावेत. वटवाघळाच्या ठिकाणी उडण्याची क्षमता आलेली आहे, हा त्यांच्यातील आणि श्यूमधील मुख्य भेद आहे.

आ. १. वटवाघळाचे शरीर : (१) मनगट, (२) कोपर, (३) कान, (४) कर्णमेष (बाह्य कर्णाच्या भोकासमोरील वाढ), (५) बाहू, (६) प्रवाहू, (७) आंगठा, (८) तर्जनी, (९) मध्यमा, (१०) अनामिका, (११) जतुका पटल, (१२) करांगुली, (१३) प्लॅजिओपटल, (१४) पाऊल, (१५) उपांगुष्ठ, (१६) शेपूट, (१७) आंतर ऊर्विका पटल (मांड्यांमधील पटल), (१८) गुडघा, (१९) पूर्वपटल (आंतर−क्लोमीय पटल).पंख ही वटवाघळाची वैशिष्ट्यपूर्ण संरचना होय. पाठीच्या व पोटाच्या कातडीचा विस्तार होऊन पंख तयार झालेले असतात. बाहू व हात यांच्यामधील लांबट हाडांमध्ये त्वचेने दोन थर ताणले गेलेले असतात व शरीराच्या दोन्ही बाजूंनी विस्तार पावून ते नडगी व तळपायावरील कुर्चायुक्त आर (कडक, तीक्ष्ण जादा वाढ) ते शेपूट यांना जोडलेले असतात. पंखांच्या पडद्यामध्ये मांस नसते त्यांमध्ये फक्त रक्तवाहिन्या व तंत्रिका (मज्जा) तंतुयुक्त संयोजी (जोडणारे) ऊतक (समान रचना असणारे पेशीसमूह) असतात.

वटवाघळे संधिप्रकाशात व रात्रीच्या वेळी क्रियाशील असतात. अंधाऱ्या गुहांत राहणारे हे कदाचित एकमेव पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी असावेत. ती डोके खाली व पाय वर अशा अवस्थेत टांगून राहतात. चिकटून राहण्यासाठी मागच्या पायांचे रूपांतर झालेले असते. सामान्यतः पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात व नखे एवढी वाकडी झालेली असतात की, एकदा का वटवाघूळ एखाद्या फांदीला किंवा खडकाच्या खडबडीत पृष्ठभागाला चिकटून बसले की, स्नायूंचे अधिक आकुंचन होण्याची गरज नसते आणि गाढ झोपेत, शीत निष्क्रियतेत (हिवाळ्यातील सुस्तीच्या अवस्थेत) ती निश्चिंतपणे व सुरक्षितपणे टांगलेली राहतात. मृत्यूनंतरही ती अशीच टांगलेली रहातात.

आ. २. विविध जातींच्या वटवाघळांची शीर्षे : (१) जमेकन फलभक्षक वटवाघूळ (आर्टिबियस जमेकेन्सिस), (२) छोटे तपकिरी वटवाघूळ (मायोटिस ल्युसिफ्यूगस), (३) मोठ्या कानाचे वटवाघूळ (मॅक्रोफस वॉटरहाऊसाय), (४) मत्स्याहारी वटवाघूळ (नॉक्टिलो लेपोरिनस), (५) गोल्ड फलभक्षक वटवाघूळ (टेरोपस गोल्डाय), (६) उष्ण कटिबंधी अमेरिकन खोटे व्हँपायर वटवाघूळ (व्हँपायर स्पेक्ट्रम),(७) व्हँपायर वटवाघूळ (डेस्मोडस रोटुंडस), (८) लांब नाकाचे वटवाघूळ (लेप्टेनिक्टेरिस निव्हँलिस), (९) लांब जिभेचे फलभक्षक वटवाघूळ (मॅकोग्लॉसस मिनिमस), (१०) जुन्या जगातील पर्ण-नासिका वटवाघूळ (हिप्पोसिडोरॉस कॉमरसनी).गुहा, कपारी, ढोल्या, सालीच्या मागील चिरा व अशाच नैसर्गिक लपण्याच्या जागांमध्ये ती दिवसा झोपतात. ती घरटी तयार करीत नाहीत किंवा निवाऱ्यासाठी भोके पाडीत नाहीत. फायलोस्टोमिडी कुलातील उष्ण कटिबंधी अमेरिकेत आढळणारी युरोडर्मा बायलोबॅटम ही फलभक्षक जाती याला अपवाद आहे. इमारती, घरे, देवळे, मशिदी, बोगदे इ. ठिकाणीही वटवाघळे राहतात. ही प्रवृत्ती विशेषकरून वसाहती करून राहणाऱ्या जातींमध्ये प्रकर्षाने दिसून येते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला अनेक जातींच्या माद्या योग्य जागी जमा होऊन पिलांना जन्म देतात व ती मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेतात. उन्हाळ्याच्या अखेरीस वटवाघळे हळूहळू या जागा सोडून जातात.

शरीराचे तापमान व शीतनिष्क्रियता : शरीराचे तापमान व चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) यांमध्ये अगदी सहज व जलद होणारा चढउतार हा वटवाघळे व इतर बहुसंख्य सस्तन प्राणी यांतील भेद आहे. पूर्ण जागृत व क्रियाशील असताना त्यांच्या शरीराचे तापमान नेहमीच ३७° ते ४०° से. च्या दरम्यान असते. पूर्ण जागृतीच्या व क्रियाशील परिस्थितीत इतर सस्तन प्राण्याप्रमाणे ती आपल्या शरीराच्या तापमानाचे नियमन करतात. पंखांच्या विस्तृत मोठ्या पृष्ठभागातून शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते. तेव्हा पंखांतील रक्तवाहिन्या विस्फारलेल्या असतात व सापेक्षतः रक्ताची मोठी मात्रा शरीरातून पंखांत व परत वाहत असते. थंड हवामानात ह्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व त्यामुळे पंखांचे तापमान हवेच्या तापमाना एवढे होते तरीही एकूण शरीराचे तापमान कायम राखले जाते.

विश्रांती घेताना त्यांच्या शरीराचे तापमान ताबडतोब सभोवतालच्या तापमानाएवढे कमी होते व ती झोपी जातात तेव्हाही असेच घडते. त्यांच्या हृदयाचे ठोके. श्वासोच्छ्वास व शरीरातील ऊर्जेचा व्यय ही शरीराचे तापमान कमी झालेले असताना कमीच होतात. त्यामुळे ती बहुधा कमीअधिक प्रमाणात सुस्त वाटतात व उपद्रव दिला, तरी जोराचा प्रतिसाद देत नाहीत किंवा उडून जात नाहीत.


उत्तरेकडील थंड हवामानात राहणारी वटवाघळे मुख्यतः कीटकभक्षक असतात. त्यांच्यापैकी पुष्कळ वटवाघळे हिवाळ्यात शीतनिष्क्रियतेत जातात. सामान्यतः ती उन्हाळ्याच्या शेवटी व शरद ऋतूच्या सुरूवातीस शरीरात चरबी साठवू लागतात. त्यामुळे त्यांचे वजन आधीच्या वसंत ऋतूतील वजनाच्या दुप्पट होते. काही वटवाघळे स्थानांतर करतात.

पचन व जलसंवर्धन : वटवाघळांमध्ये पचन क्रिया अगदी जलद होते. ती अन्नाचे अगदी बारीक तुकडे करतात. त्यांमुळे फार मोठ्या पृष्ठभागावर पचन क्रिया होते. खायला सुरूवात केल्यानंतर अवघ्या ३० ते ६० मिनिटांत ती मलविसर्जन करतात, त्यामुळे उड्डाणाच्या वेळी वजन कमी राहते.

दिवसा पाणी न पिता काही वटवाघळे तळपत्या उन्हात विश्रांती घेतात. ऊब मिळवण्यासाठी ती अशी जागा निवडत असावीत व अशा तऱ्हेने शरीराच्या तापमानाचे नियमन करीत असावीत. तथापि पाण्याचा वापर न करता ती आपल्या शरीराचे तापमान कमी कसे करतात, हे अजून समजलेले नाही. प्रयोगशाळेमध्ये शरीराचे तापमान सु. ४०°-४१° से. पेक्षा जास्त झाल्यास ती मरतात.

दीर्घायुष्य : त्यांच्या एवढ्या आकारमानाच्या इतर प्राण्यांच्या मानने वटवाघळांचे आयुष्य जास्त असते. याचा संबंध ग्रीष्म निष्क्रियतेत घालविलेला काळ व शरीराचे कमी झालेले तापमान यांच्याशी असतो. खुणेच्या क्रमांकाचे पट्टे लावलेली वटवाघळे १०−१५ वर्षांनंतर तर काही २१ वर्षांनंतरही आढळली आहेत. पिंजऱ्यात ठेवलेली मोठी फलभक्षक वटवाघळे १९ वर्षांपर्यंत जगली आहेत.

वीण : अन्य सस्तन प्राण्यांप्रमाणेच त्यांची वीण होते. समागमाच्या वेळी नर आपले शुक्राणू मादीच्या जननमार्गात सोडतो. बहुसंख्य वटवाघळांत एका वेळी एकच पिलू होते व ते वर्षातून एकदाच होते. अमेरिकन लाल वटवाघूळ मात्र एका वेळेला तीन किंवा चार नवजात पिले घेऊन उडताना आढळले आहे व त्यांचे एकूण वजन आईच्या वजनापेक्षा जास्त असते. जन्माच्या वेळी पिले अल्पविकसित असतात. फक्त त्यांच्या नख्या चांगल्या विकसित असतात. आईच्या फरला किंवा बोंडशीला घट्ट धरण्यासाठी पिलांच्या दुधाच्या दातांचे विशेषीभवन झालेले असते. सुरुवातीच्या काही रात्रीच पिलाला अंगावर राहू देतात. नंतर त्याला वसाहतीत सोडून देतात. काही आया इतरांच्या पिलांनाही पाजतात व काही प्रमाणात स्तनपान सामूहिक प्रकारे होते. पिलांची वाढ झपाट्याने होते. छोट्या तपकिरी वटवाघळाची पिले एक महिन्याची होण्यापूर्वीच उडू लागतात. उडणारे कीटक पकडल्यास ती कशी शिकतात, हे अजून समजले नाही.

स्थानांतर: थंड हवामानात राहणारी वटवाघळे हिवाळ्यात कीटक या आपल्या अन्नासाठी उष्ण प्रदेशात स्थानांतर करतात. खुणाचे क्रमांकित धातूचे पट्टे लावलेली वटवाघळे १२,८०० किमी. अंतर पार करून परत आलेली आहेत. स्थानांतरामधील मार्गनिर्देशनासाठी म्हणजे दिशा ठरविण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. याविषयी अजून काही समजले नाही. घरट्याकडे परतण्याची क्षमताही त्यांच्या ठिकाणी जबरदस्त असते.

दिशानिश्चिती: बहुसंख्या वटवाघळांना पाहून मार्ग सापडत नाही. रात्रीची दिशानिश्चिती प्रतिध्वनी स्थाननिश्चिती पद्धतीने केली जाते. यामध्ये उडताना त्यांच्या तोंडातून किंवा नाकातून कंठ ध्वनी बाहेर पडतो. तो मानवाला ऐकू येणाऱ्या ध्वनी कंप्रतेच्या (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येच्या) वरच्या पल्ल्यातील असतो. तो प्रतिध्वनीच्या स्वरूपात परत वटवाघळाकडे येतो. त्याच्या साहाय्याने अंधारातील अडथळे टाळणे व उडणाऱ्या कीटकाचे स्थान (अंतर) निश्चित करणे त्यांना शक्य होते. कान बंद केलेले असताना वटवाघळांना आपल्या आवाजाचा मार्गनिर्देशनासाठी वापर करणे शक्य होत नाही. नव्या जगातील फलभक्षक किंवा मोठ्या झेपवणाऱ्या प्राण्यांवर उपजिविका करणारी वटवाघळे कीटकभक्षक किंवा मत्स्यहारी वटवाघळांपेक्षा एक हजारांश कमी क्षमतेच्या ध्वनी तरंगांची स्पंदने बाहेर टाकतात. सर्व वटवाघळे पाहू शकतात व काहींची दृष्टी तीक्ष्ण असते. इतर बहुसंख्य वटवाघळांपेक्षा जुन्या जगातील फलभक्षक वटवाघळे दृष्टीचा अधिक उपयोग करतात. दिशानिश्चितीखेरीज वटवाघळे आवाजाचा उपयोग भावना व्यक्त करण्यासाठी किंवा संदेशवहनासाठी करतात. पाण्याची तळी किंवा प्रवाहाच्या पृष्ठभागावर पोहून ती पाणी पितात. तेव्हा ती आपल्या खालच्या जबड्याचे टोक अलगद पाण्यात बुडवितात. काही वटवाघळे पाण्यातील कीटक तर काही मासे पकडतात.

बहुतांश वटवाघळे विश्रांती घेताना सामान्यतः डोके खाली पाय वर अशा स्थितीत टांगलेली असतात. तथापि थोडी काही गुहांत वा अन्यत्र सपाट पृष्ठभागावरही विश्रांती घेतात. डोके खाली असलेल्या (उभ्या) अवस्थेत वटवाघळाला उडायला फारच सोपे असते. तेव्हा ते फक्त पकड सैल सोडून शरीर खाली येऊ देते व मग पंख पसरते. तसेच सपाट पृष्ठभागावरूनही उड्डाण करणे त्याला फारसे अवघड नसते. उड्डाणासाठी ती हातापायांचा उपयोग करून हवेत झेपावतात. संरचनेचा विचार करता वटवाघळे पाय तसेच पंखांचा उपयोग करून उड्डाण करतात किंवा जणू हवेत पोहतात.

महत्त्व: जगाच्या काही भागांत वटवाघळांचे मांस खातात. आफ्रिका व ऑस्ट्रेलियामध्ये ८००−१,२०० ग्रॅम वजनाची वटवाघळे यासाठी विशेष पसंत केली जातात. भारतात आदिवासी, कातकरी वटवाघळाचे मांस खातात. तसेच त्यांचे तेल संबंधित व दम्यावर वापरतात.

फुलांच्या परागणाचे महत्त्वाचे कार्य वटवाघळे करतात. शिकारी पक्षी, वटवाघळासहित इतर सस्तन प्राणी व साप हे प्राणी व साप हे प्राणी वटवाघळांवर आपली उपजिवीका करतात.

रोज वटवाघळे जगभर कोट्यवधी कीटकांचा नाश करतात त्यामुळे शेतीला मदत होते. वटवाघळे बरेच कीटक खात असल्यामुळे त्यांचा ग्वानो भरपूर प्रमाणात जमतो. त्यामुळे काही वर्षात शेकडो वटवाघळांच्या वसाहतीचा जमिनीवर काही सेंमी. जाडीचा थर साचतो. दाट वस्तीच्या वसाहतींत व गुहांत, विशेषतः कार्ल्सबाद (न्यू मेक्सिको) कोट्यावधी वटवाघळे आश्रय घेतात, अशा ठिकाणी शेकडो टन ग्वानो जमतो व त्याला नैर्ऋत्य अमेरिका व इतरत्र जोरखत म्हणून व्यापारी महत्त्व आहे.

वटवाघळे फळबागांचे फार नुकसान करतात. ती मानव व पशूंना होणाऱ्या रोगांचा (उदा., पिसाळ रोग) प्रसार करतात. ज्या इमारतीत वटवाघळे राहतात तेथील रहिवाशांना त्यांचा उपद्रव्य होतो. त्यांच्याबद्दल असलेल्या अनेक अंधश्रद्धांमुळे भीतीही वाटते. इमारतीचे आढे, पाखाड्या व भिंतीतील फटी यांमध्ये ती राहतात. वटवाघळे मारण्यासाठी किंवा हुसकावून देण्यासाठी अनेक विषांचा उपयोग करतात. गधकाच्या मेणबत्त्या जाळणे हा तात्पुरता उपाय आहे तर इमारतींना असणाऱ्या फटी, बिळे बुजविणे हा उत्तम उपाय आहे.


जाती व संख्या यांचा विचार केल्यास वटवाघळे ही एकूण वन्य जीवांचा एक महत्त्वाचा भाग आहेत. कित्येक प्राणिसंग्रहालयांत वटवाघळांचे विलक्षण नमुने ठेवण्यात आलेले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातून यूरोपमधील प्राणिसंग्रहालयांत काही फ्लाईंग फॉक्स व फलभक्षक वटवाघळे ठेवण्यात आलेली आहेत. वटवाघळे संशोधनासाठी विस्तृतपणे पाळली जातात त्यांची विशेष प्रकारे काळजी घ्यावी लागते.

पुराणकथा व कलाकृती यांमध्ये वटवाघळे अंधःकार व भीतिदायक रहस्य यांची निदर्शक असतात. यूरोपीय व अन्य बहुतेक संस्कृतींमध्ये वटवाघळांचा पाताळाशी संबंध जोडतात. पिशाच्याला वटवाघळाचे  तर परीला पक्ष्यांचे पंख असलेली चित्रे काढलेली आढळतात. चिनी व इतर पौर्वात्य संस्कृतींत वटवाघळे भाग्याचे, सुखाचे व दीर्घायुष्याचे लक्षण मानतात.

जीवाश्म: (शिळारूप अवशेष). वटवाघळांचे जीवाश्म विशेष आढळत नाहीत, तथापि किमान इओसीन कालापासूनचे (सु. ५.५ कोटी वर्षांपासूनचे) चांगले जीवाश्म आढळले आहेत. बहुतेक जीवाश्म हे सध्या जिवंत असलेल्या कुलातील प्राण्यांचे आहेत. फ्लायोसीन कालातील (सु. १.२ कोटी वर्षांपूर्वींचे) कवट्या व दातांचे जीवाश्म आद्य वटवाघळांशी जुळणारे आहेत परंतु हे जीवाश्म कीटकनाक्षकांचे असण्याची शक्यताही आहे. या जीवाश्मांवरून उड्डाणाच्या क्षमतेमुळे वटवाघळे वेगळी ओळखता येतात. इओसीनच्या मध्यापासून उत्तम प्रकारे उड्डाण करणारी वटवाघळे उदयास आली. किरोप्टेरा गणाचे मेगाकिरोप्टेरो (एक कुल) व मायक्रोकिरोप्टोरा (१७ कुले) आणि सु. ९०० जाती वर्गीकरण करतात.

भारतात वटवाघळांच्या वर्तनावरील संशोधनासाठी मदुराई विद्यापीठात एम्. के. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली जर्मन प्राध्यापक गेरहार्ट न्यूवाइलर (फ्रँकफुर्ट विद्यापीठ) यांच्या सहकार्याने एक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 

संदर्भ : 1. Peterson, Russul F. Silently by Night, New York, 1964.

           2. Ripper, Charles L. Bats, New York, 1954.

           3. Walkar Ernest P. Mammals of the World, Vol. I. Baltimore, 1964.

जोशी, मीनाक्षी र. जमदाडे, ज. वि.