ल्यौस्ये : (४७०-५३०). चिनी साहित्यसमीक्षक. सम्राट वू ह्याच्या दरबारी सेवेत होता. सम्राटाच्या अनुज्ञेने तो बौद्ध श्रमण झाला आणि श्रमणाचे जीवन जगत असतानाच त्याला मृत्यू आला.
ल्यौ स्येची कीर्ती मुख्यतः त्याच्या पन-स्यिन द्याव लूंग (इं. शी. द कार्व्ह्ड् ड्रॅगन ऑफ द लिटररी माइंड) ह्या त्याच्या साहित्य-समीक्षात्मक ग्रंथावर अधिष्ठित आहे. साहित्यकृतीच्या संदर्भात आशय आणि घाट ह्या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असून केवळ घाटाचाच विचार केल्यास ते साहित्यकृतीच्या कलात्मकतेच्या दृष्टीने हानीकारक ठरेल, असा विचार त्याने मांडला. लेखकाची प्रतिभा महत्त्वाची असली, तरी लेखकाच्या विकासावर त्याच्या सामाजिक व नैसर्गिक परिसराचाही प्रभाव असतो, हे निदर्शनास आणणारा हा पहिला चिनी साहित्यसमीक्षक होय. समीक्षकापाशी व्यासंग आणि वस्तुनिष्ट दृष्टी असली पाहिजे हा विचारही प्रथम त्याने मांडला. त्याने असेही सुचविले, की साहित्यकृतीचे मूल्यमापन करीत असताना शैलीचा दर्जा, प्रभावी मांडणी (ऱ्हेटरिक), मौलिकता, दृष्टिकोण, आशय आणि सूर (टोन) हे सहा निकष महत्त्वाचे ठरतात.
कुलकर्णी, अ. र.