ल्युटेशियम : ⇨ विरल मृत्तिका गटातील धातुरूप मूलद्रव्य. चिन्ह Lu. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ७१. अणुभार १७४.९७. आवर्त सारणीतील [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील ⟶ आवर्त सारणी] ३ ब गटातील आणि लँथॅनाइड मालेतील शेवटचे (१४ वे) मूलद्रव्य. इतर विरल मृत्तिका धातूंपेक्षा अधिक कठीण, जड व सघन आणि उच्च वितळबिंदू १,६५६° से. असलेली ही धातू रुपेरी करडी असून सर्वसाधारण तापमानाला तिची चमक टिकून राहते. उकळबिंदू ३,३१५° से. षट्कोनी घट्ट संरचनेच्या स्फटिकाची घनता ९.८४२ ग्रॅ. प्रती घ. सेंमी. (२०° से.ला). निसर्गात या मूलद्रव्याचे दोन समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) आढळतात. यांपैकी स्थिर समस्थानिकाचा द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) १७५ व प्रमाण ९७.४१% आहे. दुसरा समस्थानिक किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारा) असून त्याचा द्रव्यमानांक १७६ व अर्धायुकाल (किरणोत्सर्गाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) २.१ x १०१० वर्षे आणि प्रमाण २.५९% आहे. याचे १४ कृत्रिम समस्थानिक माहीत आहेत. विद्युत् विन्यास (अणुकेंद्राभोवतील विविध कक्षांमधील इलेक्ट्रॉनांची संख्या) २, ८, १८, ३२, ९, २. संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) ३. ऊष्मीय न्यूट्रॉन शोषण काटच्छेद १०८ बार्न्स. Lu³⁺ आयनाची ब्रिज्या ०.८४८ Å (१ Å = १०—८ सेंमी). व धातवीय त्रिज्या १.७१७ Å.
ल्यूटेशियमाचा शोध जी. यूर्बी (१९०६), सी. ए. बेल्सबाख (१९०८) आणि सी. जेम्स (१९११) यांनी स्वतंत्रपणे लावला. यूर्बी यांनी लुटेशिया (पॅरिस शहराचे प्राचीन रोमन नाव) यावरून या मूलद्रव्याला ल्युटेशियम असे नाव दिले. जर्मनीमध्ये १९५० सालापर्यंत हे मूलद्रव्य ‘कॅसिओपियम’ या नावाने ओळखले जात होते.]
विरल मृत्तिका मूलद्रव्यांमध्ये सर्वांत कमी प्रमाणात आढळणारे ल्युटेशियम अनेक खनिजांमध्ये आढळते. त्यांपैकी महत्त्वाची खनिजे गॅडोलिनाइट, यूक्सेनाइट, झेनोटाइम, समर्स्काइट आणि मोनॅझाइट ही आहेत. भूकवचाच्या २० लाख भागांमध्ये सु. १ भाग ल्युटेशियम आढळते. अणुकेंद्रीय भंजनाने (फुटण्यामुळे) निर्माण झालेल्या पदार्थांमध्येसुद्धा हे आढळते.
दुसऱ्या महायुद्धाच्या कालामध्ये आयन-विनिमय तंत्राचा विकास होईपर्यंत ल्युटेशियम भागात्मक स्फटिकीकरण आणि अवक्षेपण या क्रियांनी वेगळे व शुद्ध केले जात होते. आयन-विनिमय तंत्राने विलगीकरण केल्यानंतर निर्जल हॅलाइडांचे (उदा., ल्युटेशियम फ्ल्युओराइडाचे) क्षार (उदा., कॅल्शियम) किंवा क्षारकीय मृत्तिका धातूंनी ऊष्मीय ⇨क्षपण करून ल्युटेशियम धातुरूपात मिळते.
ल्युटेशियमाची ऑक्सिजन, पाणी, अम्ले व अधातू यांबोरबर जलद रीत्या विक्रिया होते. ते विरल अम्लांमध्ये विरघळते व त्याची रंगहीन लवणे तयार होतात. विद्रावामध्ये त्रिसंयुजी आयन तयार होतात. ल्युटेशियम क्लोराइड (LuCl₃.X H₂O), ल्युटेशियम फ्ल्युओराइड (LuF₃.2H₂O), ल्युटेशियम नायट्रेट [Lu(NO₃)₃.6H₂O] आणि ल्युटेशियम सल्फेट [Lu(SO₄)₃.8H₂O] ही ९९.९ टक्क्यांपर्यंत शुद्ध लवणे मिळू शकतात. ल्युटेशियम ऑक्साइड (ल्युटेशिया Lu₂O₃) हे संयुग हवेतील पाणी आणि कार्बन डाय-ऑक्साइड शोषते. ल्युटेशियमाची सर्व संयुगे काचेच्या बाटल्या आणि तंतुरूप काचेची पिंपे यांमध्ये साठवितात.
ल्युटेशियमाचा किरणोत्सर्गी समस्थानिक (Lu¹⁷⁶) अशनींचे पृथ्वी सापेक्ष वय ठरविण्यासाठी उपयुक्त आहे. या मूलद्रव्याच्या त्रिसंयुजी आयनांमधील उपकवचे पूर्ण भरलेली असल्यामुळे चुंबकत्वात भाग घेतील असे जोडीरहित इलेक्ट्रॉन त्यामध्ये नसतात, म्हणून हा आयन प्रतिचुंबकीय (निर्वातापेक्षा कमी चुंबकीय पार्यता असलेला) असतो. आयन त्रिज्या समान असल्यामुळे इतर विरल मृत्तिका मूलद्रव्यांबरोबर याचे घन विद्राव किंवा मिश्र स्फटिक संघटने तयार होतात. ल्युटेशियमाचा उपयोग कार्बनी अम्लांच्या अपघटनामध्ये उत्प्रेरक (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) म्हणून आणि फॉस्फर्स, अर्धसंवाहक आणि इलेक्ट्रॉनीय मंडलांतील घटक यांमध्ये होतो.
Lu³⁺ आयन असलेला रंगहीन विद्राव जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) आणि दृश्य भागांमध्ये एकमेकांपासून विभक्त असे शोषण पट्ट दर्शवीत नाही. उत्सर्जन वर्णपटविज्ञानाच्या साह्याने याचे चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येते.
ठाकूर, अ. ना.