लोथल : गुजरात राज्यातील पुरातत्त्वीय अवशेषांचे एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ. ते अहमदाबाद जिल्ह्यात धंधुकाजवळ अहमदाबादच्या आग्नेयीस सु. ८२ किमी.वर भगवा व साबरमती या नद्यांमधील सपाट प्रदेशात खंबायतच्या आखातापासून १९ किमी.वर सरगवाल या खेड्याजवळ वसले आहे. येथील अवशेष प्रामुख्याने एका टेकाडात मिळाले. या टेकाडाची उंची सहा मी. असून भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने १९५४ ते १९६२ दरम्यान तिथे सलग उत्खनन केले. त्यानंतरही येथे पुन्हा १९७३ मध्ये उत्खनन करण्यात आले. त्यातून सिंधू संस्कृतीशी सादृश दर्शविणारे असंख्य प्राचीन अवशेष सापडले. त्यात एका सुबद्ध नगराची रूपरेषा दिसून येते. उत्खनित अवशेषांचा काल कार्बन १४ च्या आधारे इ.स.पूस २४५० ते १६०० दरम्यान ठरविण्यात आला आहे.
लोथल येथील उत्खननामध्ये उत्खनकांच्या मते पाच स्तर आढळले असून त्यांचे प्रामुख्याने दोन स्वतंत्र कालखंड पाडता येतात. पहिल्या कालखंडामध्ये चार स्वतंत्र स्तर येतात आणि उर्वरित स्तर दुसऱ्या कालखंडात अंतर्भूत होतो. पहिल्या कालखंडातील सर्व स्तर पूर्णपणे हडप्पा संस्कृतीचे निदर्शक असून दुसरा कालखंड उत्तर हडप्पाकालीन आहे. हडप्पाकालीन संस्कृतीच्या कालखंडात लोथलचे रहिवासी मोठमोठ्या मातीच्या विटांच्या चौथऱ्यावर आपली घरे बांधीत असत. ही घरे कच्च्या विटांची आणि पक्क्या विटांची अशी दोन्ही प्रकारची असून विटा भाजण्याच्या भट्टीचे अवशेषही ज्ञात झाले आहेत. पहिल्या कालखंडातील पहिल्या स्तरात घरांची रचना रेखीव व शिस्तबद्ध होती. ही घरे मातीच्या पक्क्या विटांची बांधलेली असून त्यांपैकी बहुतेक घरांत स्वतंत्र स्नानगृहांची व्यवस्था होती. जलनिःसारणाची शास्त्रशुद्ध पद्धती त्याकाळी प्रचारात होती. या स्नानगृहांतील सांडपाणी मुद्दाम बांधलेल्या गटारांतून रस्त्यांकडेच्या मुख्य गटारात जाण्याची व्यवस्था केलेली होती. नगरात लहान-मोठे आखीव रस्ते बांधलेले असून त्यांची रुंदी सु. ३.६ मी. ते ६ मी. एवढी आढळली व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दुकाने व घरे होती. घरांतील खोल्या सर्वसाधारणपणे ३.६ x २.७ मी. अथवा २.४ x १.८ मी. क्षेत्र मी. क्षेत्रफळाच्या होत्या मात्र काही घरे यांपेक्षा मोठी असून काहींना चौक व व्हरांडेही होते. काही घरांजवळ सु. २ मी. व्यासाच्या उत्कृष्ट विटकामात बांधलेल्या विहिरीही होत्या.
राहण्याच्या वास्तुंखेरीज लोथल येथे जहाजांकरिता बांधलेली एक कृत्रिम गोदीही सापडली. अशा तऱ्हेची गोदी सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत यापूर्वी मिळालेली नव्हती. येथील गोदी साधारणतः समांतर द्विभुज चौकौनाच्या आकाराची असून तिची पूर्वेकडील लांबी २०९ मी., पश्चिमेकडील २१२ मी., दक्षिणेची ३४.७ मी. व उत्तरेची ३६.४ मी. होती. त्याचे क्षेत्रफळ साधारणतः २१४ x ३६ मी. एवढे होते. भरतीच्या वेळी पाणी आत घेईपर्यंत गोदीचा दरवाजा उघडा ठेवण्यात येई आणि ओहोटी सुरू व्हावयाच्या आतच हा दरवाजा बंद करीत. या योगाने जहाजे आत येण्याची सोय होत असे. गोदीला लागूनच विटांचा एक धक्का बांधलेला होता. गोदीच्या पुराव्यावरून समुद्र लोथपर्यत प्राचीन काळी असला पाहिजे. असे काही तज्ञांचे मत आहे. त्यावरून लोथलचे रहिवासी नौकानयनात कुशल असावेत आणि तिथल्या बंदरातून परदेशाशी व्यापार चालत असे, असा निष्कर्ष काही संशोधकांनी काढला आहे परंतु लोथल हे बंदर होते आणि तिथे आढळलेली गोदी हे त्याचे स्पष्ट द्योतक आहे, हे मॉर्टिमर व्हीलर, एस्. आर्. राव आदी पुरातत्त्ववेत्त्यांचे मत लॉरेन्स एस्. लेश्निक यांसारख्या संशोधकांना मान्य नाही. त्यांच्या मते हा पाण्याचा बांधीव तलाव असावा.
लोथल येथील रहिवासी उत्कृष्ट गुलाबी रंगाच्या शाडूची हरतऱ्हेची मडकी बनवीत. काही मडक्यांवर काळ्या रंगामध्ये नक्षी असून त्यांतून विविध आकृतिबंध आढळतात. पशुपक्ष्यांची सुरेख चित्रे असलेली काही मृत्पात्रेही उत्खननात उपलब्ध झाली आहेत. काही मोठे रांजण छिद्रे पाडलेले असून त्यांचा उपयोग नेमका कशासाठी करीत ते ज्ञात नाही. याशिवाय लहान-मोठी भांडी, तिवई (स्टॅन्ड) वरील थाळ्या, वाडगे इ. अनेक प्रकारची मृत्पात्रे पहिल्या कालखंडात आढळली. नंतरच्या दुसऱ्या कालखंडात नक्षीचे स्वरूप प्रामुख्याने भौमितिक रंचनाबंधाचेच राहिले. या कालखंडात विविध प्राणी अथवा वनस्पती यांचे चित्रण फारसे आढळत नाही मात्र दोन्ही कालखंडांत काळी-तांबडी मृत्पात्रे प्रचारात असल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारची काळी-तांबडी मृत्पात्रे हडप्पा किंवा मोहें-जो-दडो येथील उत्खननात मिळाली नाहीत. त्यामुळे लोथल येथील संस्कृती ही पूर्णतः निर्भेळ सिंधू संस्कृती नसावी. तिथे अन्य लोकांनीही वसाहती केल्या असाव्यात, असे एक मत आहे.
मृत्पात्रांशिवाय लोथल येथे वैविध्यपूर्ण दागिने, खेळणी व मूल्यवान खडे व आयुधे सापडली. त्यांवरून या लोकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीची कल्पना येते. अलंकारांत हरतऱ्हेचे सोन्याचे दागिने, मूल्यवान खडे, अंगठ्या , शंखजिरा वा संगजिरा (स्टीअटाईट), मृत्स्नामणी, मृस्त्ना व सोन्याची कर्णफुले, मृत्स्ना लोलक इ. आढळले असून तांब्याचे आरसे, तांब्याच्या सुया, पिना, छिन्न्या व मासे पकडण्यासाठी गळही ते तयार करीत असत. या वस्तू तयार करण्यासाठी विशेषतःताम्रकारांची व मणी बनविण्याची भट्टीही येथे सापडली. या लोकांची आयुधे तांब्याची व दगडाच्या छिलक्यांची असत. तांब्याच्या कुऱ्हाडी, चाकू व बाणाची टोके व वस्तू दोन्ही कालखंडांत प्रचलित होत्या. चर्ट दगडाची धारदार पाती ही फक्त पहिलया कालखंडात प्रचारात होती तर दुसऱ्या कालखंडामध्ये छोटी छोटी जास्पर व अकीक ह्या दगडांची पाती वापरात होती असे दिसते. लोथल येथे सिंधू संस्कृतीच्या, विशेषतःहडप्पासदृश अनेक मुद्रा सापडल्या आहेत. यांवर निरनिराळे प्राणी चित्रित केले असून काही मुद्रांवर सिंधू संस्कृतीच्या सांकेतिक लिपीतील अक्षरे दिसतात. काही मातीच्या लघुमुद्रांवर कापडाची व वेताची प्रतिकृती उमटविलेली आढळते. दोन्ही कालखंडांत विविध तऱ्हेची खेळणीही वापरात होती. चाके, भिंगऱ्या, प्राण्यांची चित्रे, छोट्या नावेची प्रतिकृती. इ. काही वस्तू उल्लेखनीय असून खेळण्यांमध्ये मातीचे तीन घोडे मिळाले आहेत. याशिवाय हस्तिदंती तराजूचा दांडा व एका शंखाच्या वस्तूवर कोरलेले १८०,९० आणि ४५ अंशांचे कोनही उल्लेखनीय आहेत. लोथलच्या उत्खननात काही पुरलेले मानवी सांगाडे उपलब्ध झाले. हे उत्तर दक्षिण पुरलेले असून त्यांच्याबरोबर विविध मडकी ठेवलेली होती. ही प्रेते मुद्दाम खड्डा करून पुरलेली असून काही दफनांमध्ये एकाच ठिकाणी दोन दोन प्रेते आढळून आली आहेत.
हडप्पा संस्कृतीच्या लोथल येथील वस्तीचा नाश पहिल्या कालखंडाच्या चौथ्या उपकालविभागात पुरामुळे झाला. पहिल्या कालखंडामध्ये येथील वस्तीचा विस्तार जवळ जवळ ३.३किमी. एवढा विस्तृत झाला होता आणि संबंध वस्ती सहा उपविभागांमध्ये विभागलेली होती. या भिन्न वस्त्यांचे कालखंड पहिला कालखंड वगळता कार्बन चौदा या पद्धतीनुसार इ.स.पू. २००५ ±११४, १९०० ±११५ आणि १८६५±११० असा स्थूलमानाने ठरविण्यात आला आहे. शेवटची वस्ती इ.स.पू. सोळाव्या शतकात नष्ट झाली.
संदर्भ : 1. Archacological Survey of India, Indian Archaeology : A Review, 1954-55, Delhi.
2. Possehl, Gregory, L.Ed. Ancient Cities of the Indus, Bangalore, 1979.
3. Rao, S.R. Lothal and the Indus Civilization, Lucknow, 1973 .
देव, शां.भा.
“