लोकर : हा प्राणिजन्य तंतू असून त्यापासून मेंढी तसेच शेळी, उंट यांसारख्या केसाळ सस्तन प्राण्यांच्या त्वचेवरील संरक्षक आवरण बनलेले असते. कापड, स्वेटर, गालिचे वगैरे नित्योपयोगी वस्तू तयार करण्यासाठी मुख्यत्वे मेंढीपासून मिळणाऱ्या लोकरीचा उपयोग करण्यात येतो.
फार पुरातन काळापासून लोकर हा एक अतिशय उपयुक्त तंतू म्हणून गणला गेलेला आहे. याला लोकरीचे खास गुणधर्मच कारणीभूत आहेत. या तंतूंचा नैसर्गिक मऊपणा, लवचिकपणा व त्यांमध्ये असलेले अंतर्गत खवल्यासारखे तरंग यांमुळे लोकरीला इतर तंतूपेक्षा एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या तंतूंबद्दल खास ध्यानात ठेवायची गोष्ट अशी की, सूतकताई केल्याने निरनिराळ्या प्रतींची लोकर मिळविता येते. ज्या प्रतीचे लोकरीचे सूत असेल त्या प्रतीशी युक्त असे लोकरी कापड त्यापासून मिळते. लांब तंतूंची समांतर अवस्थेमध्ये सूतकताई केली असता उत्तम प्रतीचे ‘वर्स्टेड’ कापड तयार होते. स्वैर रचना असलेल्या तंतुमिश्रणापासून नेहमीचे गरम कापड तयार करता येते. लोकरीच्या कपड्यांत असलेल्या लवचिकपणामुळे मागावरील व सुयांवरील अशा दोन्ही प्रकारांनी विणलेले कापड व कपडे सर्रास वापरले जातात. लोकरीच्या तंतूंच्या अंतर्गत गुणधर्मांमुळे व खास संरचनेमुळे मानवी शरीरातील उष्णता राखून ठेवणारे गरम कपडे तयार करता येतात. लोकरीच्या सुतात बऱ्यापैकी बल असते. बाहेरून आर्द्रता न जाणवता या सुतामध्ये अंगभूत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. ताणले जाण्याच्या गुणधर्मामुळे लोकरीचे कपडे लवकर फाटत नाहीत. ठराविक लोकरीच्या तंतूंस चमकदारपणाही असतो.
लोकरीच्या तंतूंचा एकमेकांत गुंतवण्याचा गुणधर्म अन्य तंतूंमध्ये नसतो. खवलेखवले असलेल्या या तंतूंच्या अंगभूत संरचनेमुळे या गुंतून बसण्याच्या प्रक्रियेला चांगलीच मदत होते. सुरकुत्या पडलेले लोकरीचे कपडे फार सहजपणे सुरकुत्याविरहित होतात. वर उल्लेखिलेल्या खास गुणधर्मांमुळे कृत्रिम पद्धतीने लोकरीसारखे तंतू निर्माण करण्यात फारच अडचणी निर्माण झाल्या. ॲक्रिलिक, बॅनलॉन यांसारखे कृत्रिम तंतू जरी उपलब्ध झालेले असले, तरी या नव्या तंतूंत लोकरीप्रमाणे उत्तम गुणधर्म नाहीत. यामुळे लोकरीची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
सामान्यतः आखूड तंतूंपासून बनविलेले लोकरीचे सूत जाड व भरलेले असते आणि त्याचा उपयोग ट्वीड कापड व ब्लँकेटे यांसारख्या उत्पादनांसाठी करण्यात येतो. वर्स्टेड सूत सामान्यतः लांब तंतूंपासून तयार करतात आणि ते तलम, नितळ, दृढ व टिकाऊ असते. ते कपड्यांच्या तलम कापडासाठी व सुटाच्या कापडासाठी वापरतात. नवीन लोकरीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे पुनःप्राप्त (शॉडी) लोकरीचाही उपयोग करतात. अमेरिकेत ग्राहकाने कधीही न वापरलेल्या कापडापासून पुनःप्राप्त केलेल्या लोकरीला पुनः प्रक्रियित लोकर आणि ज्याचा उपयोग केलेला आहे अशा कापडापासून पुनःप्राप्त केलेल्या लोकरीला पुनरूपयोजित लोकर असे म्हणतात. अशी लोकर पुनःप्राप्तीच्या प्रक्रियेत खराब होत असल्याने बहुधा हलक्या प्रतीची असते आणि त्यामुळे ती ‘लोकरी’ (वुलन्स) या नावाने ओळखण्यात येणाऱ्या कापडांत व मिश्रणांत वापरण्यात येते. लोकरीपासून गरम कपडे, शाली, नमदा (फेल्ट), गालिचे इ. अनेक प्रकारच्या उपयुक्त वस्तू जगभर व भारतातही बनविल्या जातात. लोकरीच्या मालाच्या किंमती जास्त असूनही त्याला कायम चांगली मागणी असते.
इतिहास : मानवाला लोकरीच्या तंतूची फार पूर्वीपासून ओळख आहे. इतिहासपूर्व कालीन मानव मेंढीच्या कातड्यांचा वस्त्रासारखा उपयोग करीत असे. पुढे त्यांच्या तंतुमय आवरणापासून सूत व कापड तयार करण्यास तो शिकला. अगदी आदिवासी सोडले, तर प्राचीन लोकांत वस्त्रांसाठी मेंढ्या व शेळ्या यांना माणसाळविणे व त्यांची लोकर कापणे सर्वसामान्य प्रचारात होते. मेक्सिकन, ईजिप्शियन, सुमेरियन व आर्यपूर्व सिंधू संस्कृतीतही लोकरीचा उल्लेख सापडतो.
पहिले लोकरीचे कापड ⇨फेल्ट हे असावे. त्याचा उपयोग मध्य व पश्चिम आशियातील भटके लोक वस्त्रे व तंबू यांसाठी, ग्रीक लोक शिरस्त्राणांना लावावयाच्या अस्तरासाठी व पावसापासून रक्षण करणाऱ्या कपड्यांसाठी आणि रोमन सैनिक उरस्त्राणासाठी करीत असत. फ्लॅक्सचा कदाचित अपवाद वगळल्यास कापडाच्या रूपात विणकाम केलेला लोकर हा पहिलाच तंतू होता आणि त्याचा हा उपयोग नवश्मयुगात सर्वपरिचित होता क्युनिफॉर्म लिपीतील कोरीव लेखांत विणकर, रंगारी व लोकरीचे व्यापारी यांचा उल्लेख येण्यास सुरूवात झाल्यावर इ. स. पू. ४२०० च्या सुमारापासूनची विणलेल्या लोकरीच्या कापडाची नोंद केलेली दिसून येते. सुरूवातीच्या ग्रीकांनी आशियात व उत्तर आफ्रिकेत उत्तम विकसित झालेल्या वस्त्रकलेचा अंगीकार केला. ग्रीक कवी होमर यांच्या काळापासून (इ. स. पू. नववे वा आठवे शतक) ग्रीकांचा पोषाख निश्चितपणे मुख्यत्वे लोकरीच्या कापडाचा असे व हे कापड प्रत्येक मोठ्या कुटुंबात विणले जात असे. फिनिशियन व ग्रीक व्यापारी प्राचीन जगतात सर्वत्र उत्तम प्रकारचे कापड विकत असत. रोमन लोक त्यांच्या प्रजासत्ताकाच्या प्रारंभापासूनच (इ.स.पू.सु. ५१० पासूनच) लोकरीचे कपडे वापरीत होते.
सुप्रसिद्ध ‘टोगा’ हे रोमन वस्त्र हिवाळ्यासाठी जड लोकरी कापडापासून व उन्हाळ्यासाठी हलक्या कापडापासून तयार करीत असत. प्रारंभी रोमन लोक पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशातून आयात केलेल्या कापडावर किंवा एक पूरक घरगुती उद्योग म्हणून केलेल्या लोकरीच्या विणकामावर अवलंबून होते. रोमन साम्राज्याच्या काळात काही प्रदेशांत मेंढ्यांच्या पैदाशीकडे वा कापडाच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात येऊ लागले. इ. स. दुसऱ्या शतकापावेतो पाव्हिया, पॅड्यूआ व काऑर या कापडाकरिता प्रसिद्ध असलेल्या गावांत स्पेनच्या मेरिनो मेंढ्यांपासून बराचसा कच्चा माल मिळू लागला. अशा गावांत कापड उद्योगातील व्यावसायिकांच्या ( यांत फेल्टिंग करणारे, विणकर व रंगारी सर्वांत प्रमुख होते) संघांची रोमन सम्राटांनी जोपासना केली.
रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर चौथ्या व पाचव्या शतकांतील लोकर उद्योगाच्या अवस्थेचे चित्र पुराव्याच्या अभावी अस्पष्टच राहिले आहे परंतु त्या काळी मेंढ्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास व कापडनिर्मिती चालू राहिली होती, यात शंका नाही. कापडनिर्मिती बहुधा कौटुंबिक गरज भागविण्यासाठी घरगुती व्यवसाय म्हणून करण्यात येई परंतु बऱ्याचदा स्थानिक वा आंतरराष्ट्रीयही बाजारपेठेसाठी तज्ञ कारागिरांनी चालविलेला उद्योग म्हणून ती करण्यात येत असे.
मेरोव्हिंजियन काळात (इ.स. ५०० ते ७५१) व कॅरोलिंजियन काळाच्या (इ.स.६१३ ते सु. ९८७) प्रारंभी फ्रिजियन व्यापाऱ्यांचे उत्तर यूरोपातील व्यापारावर वर्चस्व होते आणि त्यांच्या धंद्याच्या मालात मुख्यत्वे लोकरी कापडाचा समावेश असे. शार्लमेन हे स्वतंत्र बायझंटियनच्या विदेशी व महाग रेशमी कापडाऐवजी फ्रिजियन लोकरी कापड वापरीत असत, असे म्हटले जाते. व्हायकिंग लोकांनाही उत्तर अमेरिकन लोकांशी फरच्या विनिमयाकरिता अटलांटिक पार नेण्यासाठी तांबडे लोकरी कापड हाच सर्वथा योग्य माल वाटत असे. अकराव्या व बाराव्या शतकांत पश्चिम यूरोपाच्या नागरी व व्यापारी पुनरूज्जीववनात लोकरी कापडनिर्मितीचा अभूतपूर्व विस्तार निर्णायक ठरला. स्थानिक उपयोगासाठी बहुतेक सर्वत्र जाड्याभरड्या कापडाची निर्मिती चालूच राहिली तरी याच काळात बार्सेलोना, पॅरिस व मिलान यांसारख्या शहरांनी व्यापक बाजारपेठेसाठी तलम कापड उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ केला होता. अनेक लोंबार्ड व तस्कन कापडनिर्मितीच्या शहरांत फ्लॉरेन्सने हळूहळू प्रतिष्ठेचे स्थान मिळविले. चौदाव्या शतकातील ‘काळा मृत्यू’ या प्लेगच्या साथीच्या जरा अगोदर फ्लॉरेन्समधील कापड कामगारांची संख्या सर्वाधिक होती व शहराचा कापडनिर्मिती संघ सर्वांत जास्त सामर्थ्यवान होता. १३३६−३८ या काळात तेथील एकूण ३०,००० कामगार असलेल्या २०० निर्मिती संस्था दर वर्षी कापडाच्या ८०,००० नगांचे उत्पादन करीत असल्याची जोव्हान्नी व्हिल्लानी या इतिहासकारांनी नोंद केलेली होती.
फ्लेमिश लोकर उद्योग बाराव्या व तेराव्या शतकांत भरभराटीस आला. तेथील प्रदेशाचे भौगोलिक फायदे, लोकसंख्येतील वाढ व लोकरी वस्तूंना मिळालेली वाढती बाजारपेठ ही त्याची कारणे होती. इ. स. ११०० पावेतो फ्रेंच फ्लँडर्समधील ॲरास, सेंट ओमर, दूए, लील व तूर्ने ही पाच मोठी गावे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी कापडनिर्मिती करू लागलेली होती. बाराव्या शतकात त्यांच्या उत्तरेकडील ब्रूझ व गेंट या गावांत त्याहीपेक्षा अधिक कापडनिर्मिती सुरू झाली. फ्लेमिश कापड उद्योग आयात कच्च्याड मालावर जवळजवळ पूर्णतः अवलंबून होता. सर्वांत सामान्यतः वापरले जाणारे रंजकद्रव्य बुड पिकार्डीहून आणि लोकर स्पेन व इंग्लंड येथून आयात केली जाई. आयात मालावरील अवलंबित्व, अंतर्गत राजकीय व सामाजिक संघर्ष, तसेच इग्लिंश कापड व्यापाराची स्पर्धा यांमुळे फ्लेमिश उद्योगाला उतरती कळा आली. तथापि तेथे हा उद्योग नवीन भागांत (विशेषतः ब्राबांट येथे) व स्पॅनिश लोकरीपासून हलकी वस्त्रभूषा तयार करणे यासारख्या नव्या तत्त्वांवर चालू राहिला.
इंग्लंडमध्ये लोकरीच्या कापडनिर्मितीला इतर उद्योगांपासून अठराव्या शतकांपर्यंत कोणतीही स्पर्धा नव्हती. अनेक रोमॅनो-ब्रिटिश गावांत कापडनिर्मिती करण्यात येत होती. रोमन लोकांच्या प्रयाणानंतर इग्लंडच्या कापड उद्योगाला अशतः उतरती कळा आली. बाराव्या शतकात लोकरीच्या उत्पादनात झालेल्या प्रचंड विस्ताराबरोबरच लंडन व प्रांतिक शहरांत केंद्रित झालेला देशी कापड उद्योग भरभराटीस आला. ११३०−३१ विंचेस्टर, लिंकन, ऑक्सफर्ड, नॉटिंगॅम, हेटिंग्डिन व लंडन येथे विणकरांचे संघ अस्तित्वात होते, अशी नोंद आहे. दुसरे हेन्रीड यांच्या कारकीर्दीत (११५४−८९) लिंकन येथे २०० विणकर होते आणि त्यांनी तयार केलेले ‘स्कार्लेट’ या नावाने ओळखण्यात येणारे कापड इटली व स्पेन येथे जात असे.मध्ययुगात (इ. स. ५०० ते १५००) अखेरच्या काळात इंग्लंडचे कच्च्या लोकरीच्या निर्यातदारातून ब्रॉडक्लॉथ या उत्पादित मालाच्या निर्यातदारास रूपांतर झाले. हा बदल लोकर उद्योगाच्या संघटनेत क्रमशः झालेल्या बदलामुळे घडून आला. लोकरीची कापडनिर्मिती या शहरी व्यवसायाचे ग्रामीण व्यवसायात रूपांतर झाले. शहरी उद्योगावरील निर्बध व फेल्टिंग क्रियेचे यांत्रिकीकरण याला कारणीभूत झाले. फेल्टिंग यंत्रात मानवी हातांची वा पायांची जागा जलशक्तीवर चालणाऱ्या लाकडी हातोड्यांनी घेतली आणि त्यामुळे विणलेल्या कापडाचे सैल जाळे ठोकण्याची व आकुंचित करण्याची क्रिया खूपच वेगाने व कार्यक्षमतेने होऊ लागली. इंग्लंडमध्ये जॉन राजांच्या कारकीर्दीतही (११९९−१२१६) फेल्टिंग यंत्र माहीत होते पण मध्ययुगाच्या अखेरीस त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पंधराव्या शतकाच्या मध्यानंतर इंग्लंडचा पश्चिम भाग, नॉरफॉक व यॉर्कशरमधील वेस्ट रायडिंग हे कापडनिर्मितीचे मुख्य प्रदेश होते. या ग्रामीण भागांतील उद्योगाच्या संघटनेत फारशी एकसूत्रता नव्हती व त्यात कापड उत्पादकांचेच वर्चस्व होते आणि त्यांतील सर्वांत श्रीमंत उत्पादक एखाद्या मुक्त अर्थव्यवस्थेतील खऱ्या प्रवर्तकांप्रमाणे काम करीत होते. हे उत्पादक मेंढपाळां कडून लोकर विकत घेऊन तीवर सूत कातणारे, विणकर, फेल्टिंग करणारे व इतरांच्याकडून प्रक्रिया करून घेत. हे प्रक्रिया करणारे लोक घरीच उक्त्या वेतनावर काम करीत.
पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून ते अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत नवीन अधिक तलम वस्त्रभूषा प्रचारात आल्या आणि हाताने सूत कातण्याच्या पारंपरिक चरकीच्या जागी चरख्याचा झालेला प्रसार व सुयांनी विणकाम करण्याचे यंत्र यांसारख्या यांत्रिक सुधारणा झाल्या, तरी इंग्लिश लोकर उद्योगात फारसे संरचनात्मक बदल झाले नाहीत. हॉलंड, स्पेन, फ्रान्स इ. देशांची स्पर्धा अजूनही उद्योगाची भरभराट टिकून राहिली परंतु ती अंतर्गत व विशेषतः बाह्य बाजारपेठेच्या स्थितीवर अवलंबून असते. नवीन कापूस उद्योगाच्या स्पर्धेला १७८० नंतरच्या दशकात गंभीर स्वरूप आले. अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळातील तांत्रिक शोधांमुळे इंग्लंडच्या सर्वांत मूल्यवान निर्यातीच्या लोकरीची जागा कापसाने घेतली. वेस्ट रायडिंग येथील गिरण्यांत १८७०−७४ मध्ये लोकर उद्योग केंद्रित झाला. कच्च्या लोकरीचा खप १८९५−९९ पर्यंत वाढत गेला पण १९६० नंतर तो कमी झाला. विसाव्या शतकाच्या मध्यानंतर मानवनिर्मिती तंतूंचावापर मुख्यतः लोकरीबरोबर मिश्रण करण्याच्या रूपात मागावरील व सुयांनी होणाऱ्या विणकामात वाढला.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील लोकर उद्योग सतराव्या शतकाच्या मध्यास वसाहतकारांनी स्थापन केला परंतु यादवी युद्धाच्या (१८६१−६५) अखेरीपर्यंत ब्रिटनमधूनच मोठ्या प्रमाणावर लोकरीच्या कापडाची आयात करण्यात येत होती. त्यानंतर अमेरिकेतील लोकर उद्योग पुष्कळच वाढला. न्यू इंग्लंड-न्यूयॉर्क भागात व दक्षिण अटलांटिक राज्यांत हा उद्योग केंद्रित झालेला आहे.
लोकरीच्या तंतूचे गुणधर्म व प्रकार : लोकर हा एक महत्त्वाचा प्राणिजन्य तंतू आहे. प्राणिजन्य तंतू म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांच्या अंगावरील केस होत. ऊन, पाऊस, थंडी यांसारख्या निसर्गाच्या प्रभावापासून त् प्राण्यांचे रक्षण करतात. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या अंगावरील अगर कातड्यावरून काढून घेतलेले केशमय तंतू थंडीवाऱ्यापासून मानवाचे संरक्षण करतात. बहुतेक सर्व प्राणिजन्य तंतूंमध्ये एक केशमूळ व त्यावर प्रत्यक्ष केस असतो. या तंतूंमध्ये पुढील तीन मुख्य भाग असतात : (१) सर्वांत बाहेरचा अगदी पातळ थर म्हणजे उपत्वचा, (२) मुख्य तंतूमय भाग अथवा बाह्यक व (३) गाभ्यासारखा पदार्थ अथवा मध्यक [⟶केस].
अन्य प्राण्यांच्या केसांपेक्षा लोकरीचा तंतू मृदू व लवचिक असतो. तंतूंची जाडी १५ ते ४० मायक्रॉन ( १ मायक्रॉन = १०−६ मी.) असते. योग्य प्रकारे संकर घडवून आणून मेंढ्यांपासून मिळणाऱ्या तंतूंची प्रत सुधारता येते. मेढ्यांचे केस त्यांच्या कातडीवर पुंजक्या-पुंजक्याने वाढतात. एका पुंजक्यामध्ये १०० किंवा अधिक तंतू असू शकतात. मेढ्या वयाच्या आठ महिन्यांच्या आसपास असताना प्रथम त्यांच्या अंगावरील लोकर कापून घेतली जाते. सर्व तंतू टोकाकडे निमुळते झालेले असतात. तंतूची लांबी तो मेंढीच्या कोणत्या भागावर वाढला यावर व मेंढी कोणत्या जातीची आहे यांवर अवलंबून असते. जिवंत मेढ्यांप्रमाणे मृत अथवा खाटीकखान्यात मारलेल्या मेढ्यांच्या कातडीवरील लोकरही काढून घेतली जाते. मेलेल्या मेंढ्यांपासून काढलेल्या लोकरीचे कापून काढलेली व चुना लावून काढलेली असे दोन प्रकार असतात. जिवंत मेढ्यांची जेव्हा प्रथम लोकर कापून घेतात तेव्हा ती दर मेंढीमागे ८०० ग्रॅ. ते १,८०० ग्रॅ. इतकी असते. १२ अगर १४ महिन्यांनंतर लोकर काढली जाते तेव्हा ती दर मेंढीमागे साधारण १,६०० ग्रॅ. ते ३,४०० ग्रॅ. इतकी असते.
प्रकार : लोकरीचे तंतूंच्या गुणधर्माप्रमाणे पुढील तीन मुख्य प्रकार पाडता येतात. (१) मेरिनो वा साऊथ डाऊन : आखूड, मऊ व चमकदार लोकर, विंचरण्यास निरूपयोगी (२) संकरित वा ऑस्ट्रेलियन : मध्यम लांबीची परंतु विंचरण्याच्या क्रियेत योग्य अशी लोकर (३) लिसेस्टर अथवा लिंकन : लांब तंतूंची चमकदार लोकर, विंचरण्यासाठी सुयोग्य.
तंतूंच्या लांबीच्या आधारे लोकरीच्या तंतूंचे दोन मुख्य पडतात : (१) टॉप्स : लांबी भरपूर असलेले लोकरीचे तंतू. लांबी ७५−२५० मिमी. (२) नॉइल्स : आखूड लांबीचे तंतू. लांबी १२−५० मिमी.
लोकर टॉप्स स्वरूपात असली म्हणजे ती कातून व विंचरण क्रिया करून मिळणाऱ्या लांब सुतापासून वर्स्टेड कापड कापड तयार करता येते. अन्य लोकरींवर भरीव दिसण्यासाठी जी मिलिंग क्रिया केली जाते ती विंचरण केलेल्या वर्स्टेड कापडावर अगदी नाममात्रच केली जाते किंबहुना वर्स्टेड कापडामध्ये ज्या प्रकारचे विणकाम केलेले असेल ते उठून दिसेल, असा प्रयत्न केला जातो. नॉइल्स हे आखूड तंतू पिंजण क्रिया झाल्यावर कताई करून केवळ बाण्यासाठी (आडव्या सुतासाठी) वापरतात अथवा मागावर विणतात. नॉइल्सपासून तयार झालेले लोकरीचे कापड भरीव दिसावे म्हणून त्यावर बराच कालपर्यंत मिलिंग केली जाते. तंतूंची लहानलहान टोके या मिलिंग क्रियेमध्ये कापडाच्या मुख्य भागात शिरतात व कापड भरीव दिसते.
भौतिक गुणधर्म : लवचिकपणा : लोकरीचे तंतू ज्याप्रमाणे टोकाशी निमुळते होत जातात त्याचप्रमाणे तंतूवरील खवल्यासारखे तरंगही टोकाकडे झुकत जातात. या रचनेमुळे तंतू जर टोकाच्या दिशेने सरकू लागला, तर त्या सरकण्याला विरोध होतो. अंगोरा जातीच्या शेळापासून मिळणारी मोहेर व अल्पाका या उटांच्या कुलातील प्राण्यापासून मिळणारी अल्पाका या लोकरीमध्ये हे खवले एकमेकांत गुंतलेले असतात. या खवल्यांच्या रेषा जितक्या जवळ व समांतर असतील त्या प्रमाणात तंतू मऊ व चमकदार दिसतो. या खवल्यांच्या रेषा साधारणपणे लोकरीच्या प्रतीवर अवलंबून असतात व त्यांची संख्या दर मिमी. मध्ये ४० ते ८० इतकी असते. मेरिनो व सॅक्सनी या जातींच्या लोकरीपेक्षा अन्य लांब तंतूंमध्ये खवल्यांची संख्या कमी असते. वर वर्णन केल्याप्रमाणे तंतू कायम बुंध्याकडे सरकण्याचा संभव असल्यामुळे सर्व लोकरींचे सूत व कापड नेहमी आकसण्यास उद्युक्त असते व त्यामुळेच लवचिकपणा निर्माण होतो. सुरकुत्या पडलेला भाग ताणून ठेवला, तर सुरकुत्या कमी होतात व काही वेळा तर नष्ट सुद्धा होतात. तंतूंवरील खवले दोन अथवा अनेक तंतू एकमेकांत गुंतविण्याचे कार्यही करतात. आर्द्रता, उष्णता व दाब या तीन अवस्थांमध्येही आकसण्याची अधिकाधिक शक्यता असते. या खास गुणधर्मांचा उपयोग लोकरीपासून विणकाम न करताही नमद्यासारख्या लोकरीच्या जाड व जड वस्तू करण्याकडे केला जातो.
कुरळेपणा : लवचिकपणाबरोबरच लोकरीच्या तंतूंमध्ये व धाग्यांमध्ये जात्याच कुरळेपणा असतो व त्यामुळे एका प्रकारच्या लाटांनी सर्व सूत वा कापड व्यापले जाऊ शकते. या लाटांची संख्या दर सेंमी.ला २ पासून १२ पर्यंत असू शकते. अर्थातच जितक्या लाटा अधिक तितक्या प्रमाणात कुरळेपणा अधिक असतो. अन्य कृत्रिम तंतूंमध्ये अशा तऱ्हेच्या लाटा निर्माण करण्यासाठी पुष्कळच खटपट करावी लागते.
क्ष-किरण तपासणी : लोकरीच्या तंतूची क्ष-किरणांखाली तपासणी केली असता असे आढळले की, लोकरीमध्ये केराटीन या तंतुमय प्रथिन द्रव्याचे अस्तित्व घड्या पडलेल्या अवस्थेमध्ये असते व जेव्हा तंतू ताणला जातो तेव्हा या घड्या उलगडून केराटीन रेणू सरळ होतो. घड्या पडलेल्या अवस्थेतील केराटीन रेणूला ‘आल्फा केराटीन’ व घड्या उलगडून सरळ झालेल्या केराटीन या रेणूला ‘बीटा केराटीन’ म्हणावे असे डब्ल्यू. टी. ॲस्टबरी या शास्त्रज्ञांनी १९३० साली प्रतिपादन केले आणि ते सर्वमान्यही झाले. लोकरीमधील या केराटीनमध्ये पुढीलप्रमाणे रासायनिक घटक असतात, असे त्यांनी सिद्ध केले : कार्बन (४९.२५%), हायड्रोजन (७.३५%), ऑक्सीजन (२३.६६%), नायट्रोजन (१५.८६%) व गंधक (३.६६%).
लोकरीच्या तंतूच्या आडव्या छेदात (आ. १) दिसणाऱ्या पोकळ जागा निरनिराळ्या द्रवांत वाढलेल्या आढळतात. हा तंतू पाण्यात बुडवून परीक्षा केली असता असे दिसते की, तंतूची लांबी जरी फारशी वाढली नाही, तर छेदाचे आकारमान सु. ३८% वाढते.
संकरित मेंढीपासून चांगल्या प्रतीची लोकर मिळते. तंतूच्या उभ्या छेदावरून हे समजून येत (आ. २), मेरिनो मेंढीची लोकर उच्च प्रतीची असते (आ. ३).
लोकरीच्या तंतूच्या संरचनेवरून त्याच्या विविध विशेष गुणधर्मांचे स्पष्टीकरण मिळण्यास मदत होते. तंतूचा पुष्कळसा भाग लांबीच्या दिशेत असलेल्या तर्कूच्या आकाराच्या कोशिकांचा (पेशींचा) बनलेला असतो. या कोशिकांभोवती खवल्यासारख्या परस्परव्यापी कोशिकांचा थर असतो. संपूर्ण तंतू एका पातळ पटलाच्या आवरणात असतो. हे पटल द्रवाला अभेद्य असते परंतु त्यातील सूक्ष्म छिद्रांमुळे बाष्प आत शिरते व तंतू ते शोषून घेतो. लोकरीच्या तंतूच्या शोषकतेमुळे त्याचा नैसर्गिक लवचिकपणा वाढतो.
इतर भौतिक गुणधर्म : तंतूंचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, सर्व तंतूंचे रासायनिक दृष्ट्या दोन वर्ग पडतात. एक वर्ग सेल्युलोज तंतूंचा व दुसरा प्रथिनयुक्त तंतूंचा. परंतु भौतिक दृष्टीने विचार केला असता बऱ्याच मुद्यांचा विचार महत्त्वाचा वाटतो. भौतिक गुणधर्मांची परीक्षा बरीच अवघड असते. निरनिराळ्या परीक्षांमध्ये लोकरीच्या तंतूंचे जे स्वरूप दिसते त्याचा थोडक्यात परामर्ष या ठिकाणी घेणे उचित ठरते. या परीक्षा सर्वसाधारणपणे अनेक तंतू एकत्रित करून नोंदण्याचा प्रघात आहे परंतु येथे केवळ लोकरीच्या तंतूंचा विचार केला आहे.
आकारमान : लांबी ५०.८ ते ४०६.४ मिमी. ( २ ते १६ इंच)
तंतूंची लांबी :वर्स्टेड (८ डेनियर) २०३.२ मिमी. (८ इंच) वर्स्टेड ( ३ व ४.५ डेनियर) १०१.६ मिमी. (४ इंच) लोकर (४.५ डेनियर) ५०.८ मिमी. (२ इंच).
तंतूचा व्यास : जाडी भरडी लोकर ३० ते ४० मायक्रॉन उत्तम लोकर १५ ते २५ मायक्रॉन.
लोकरीचे सूत : लोकरीचा लांब तंतू बारीक असतात. त्यांची जाडीही कमी असते. किती क्रमांकाचे वर्स्टेड लोकरीचे सूत तंतूंपासून निघू शकेल त्याप्रमाणे त्या त्या सुताची जाडी (म्हणजे व्यास) असते. ३६ क्रमांका (३६S) पासून ते ८० क्रमांका (८०S) पर्यंत लोकरीचे सूत तयार होऊ शकते व तंतूंचा व्यास ३८ मायक्रॉनपासून १८.५ मायक्रॉनपर्यंत असतो. वर्स्टेड सुताचा क्रमांक डेनियरमध्ये न मोजता कापसाच्या सुताप्रमाणे त्याचा क्रमांक मोजतात. जितका क्रमांक अधिक तितका अर्थातच या वर्स्टेड सुताचा व्यास कमी असतो.
घनता : १.३२
विशिष्ट घनफळ : (पदार्थाच्या एकक द्रव्यमानाचे घनफळ). लोकरीच्या तंतूचे घनफळ वेगवेगळ्या द्रवांमध्ये बदलते. हा बदल जरी महत्त्वाचा नसला, तरी प्रक्रिया करताना कोणती अपेक्षा योग्य ठरेल याचा अंदाज या विशिष्ट घनफळावरून घेता येतो.
कोष्टक क्र. १ लोकरीच्या तंतूचे निरनिराळ्या द्रवांतील विशिष्ट घनफळ |
|
द्रव |
घनफळ गुणक |
पाणी |
०.७१६ |
मिथिल अल्कोहॉल |
०.७१४ |
एथिल अल्कोहॉल |
०.७२० |
ॲमिल अल्कोहॉल |
०.७५८ |
ओलेइक अम्ल |
०.७६१ |
बेंझीन |
०.७६३ |
कार्बन टेट्राक्लोराइड |
०.७६१ |
टोल्यूइन |
०.७६२ |
ताण : ताणला गेला असता तुटण्यापूर्वी लोकरीचा तंतू १.० ते १.७ ग्रॅ. (दर डेनियरला) इतका ताण सहन करू शकतो.
तंतू तुटण्यासाठी लागणारी प्रेरणा : १,५४७ किग्रॅ./ सेंमी.२ (२२,००० पौंड / इंच२).
तंतू तुटताना किती ताणला जातो : २८ ते ५०%
लोकरीच्या तंतूचा प्रणमनांक (प्रकाशाचा निर्वातातील वेग व त्याचा तंतूतील वेग याचे गुणोत्तर) : १.५५२ (अनेक प्रयोगाची सरासरी).
लोकरीच्या वस्त्रांचा उबदारपणा : वस्त्रे धारण करण्यात मानवाचा प्रधान हेतू शरीराचे तापमान शक्य तितके ३५.९० से. च्या जवळ असावे, हा असतो. मानवी शरीरातील अतंर्गत संतुलन योजनेच्या साहाय्याने हा प्रयत्न सतत होतच असतो परंतु सभोवतीच्या वातावरणास अनुकूल असे कपडे अंगावर घातले असता अर्थातच या स्वयंचलित संतुलन क्रियेस मदत होते. मानवी त्वचा व वातावरण या दोहोंमधील उष्णतेची देवघेव अशा रीतीने व्हावयास हवी की, शरीराचे तापमान प्रमाणित तापमानाच्या शक्य तितके जवळ राहावे. सर्वसाधारणपणे वस्त्रांचे तंतू उष्णतारोधक असतात अशी कल्पना असते पण प्रत्यक्षात तसे नाही. तंतू अगर सूत (व त्यांपासून बनविलेला कपडा) यामध्ये काही प्रमाणात हवा कोंडली जाते. ही कोंडली गेलेली हवा मात्र उष्णतारोधक असते. एकंदरीत कापडापासूनच ऊब मिळते असे आपणास वाटते पण वर दाखविल्याप्रमाणे केवळ तो कपडा ऊबदार नसतो, तर त्यात पकडली गेलेली हवा त्याला ऊबदार बनविते. काही प्रक्रियात्मक प्रयोग करून अन्य तंतूंची अंतर्रचना लोकरीप्रमाणे करणे शक्य झाले, तर ते तंतूही उबदार म्हणजे गरम कपडे देऊ शकतील. लोकरीच्या तंतूंच्या मूलभूत अंतर्रचनेमुळे अनायासेच ही गोष्ट साध्य झाली आहे.
रासायनिक गुणधर्म : लोकरीच्या रासायनिक संरचनेमध्ये १७ ॲमिनो अम्लां पासून [⟶ॲमिनो अम्ले] तयार झालेली प्रथिने असतात. त्यामुळे लोकरही एक एकसंध वस्तू नव्हे असे म्हणता येईल परंतु वरील रासायनिक घटक एक प्रकारच्या घड्याघड्या घातलेल्या अवस्थेत असतात. असे रासायनिक संघटन असलेल्या पदार्थावर पाण्याचा परिणाम पूर्णपणे अनुकूल असाच होतो व त्यामुळे आर्द्र अवस्थेत लोकरीच्या लवचिकपणात भरच पडते.तंतूमधील आर्द्रता ही लोकरीच्या अवस्थेवर अवलंबून असते. नैसर्गिक रीत्या एका ठराविक प्रमाणामध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्याचा गुणधर्म इतर काही तंतूंप्रमाणे लोकरीमध्येही असतो. हे पाण्याचे प्रमाण टक्केवारीने दोन प्रकारे मोजता येतात. एखादा तंतू पूर्णपणे वाळवून ठेवला, तर तो कालांतराने विशिष्ट आर्द्रता शोषून घेतो. या प्रमाणाला विशिष्ट पुनःशोषण प्रमाणअसे म्हणतात. पुनःशोषण प्रमाण शोषून घेतल्यावर एकंदर धाग्यात जे आर्द्रतेचे शेकडा प्रमाण असते त्यास आर्द्रता प्रमाण असे म्हणतात. हो दोन्ही गुणधर्म शेकडेवारीत (%) मोजतात.
कोष्टक क्र. २ लोकरीच्या निरनिराळ्या अवस्थांतील आर्द्रता |
||
लोकरीची अवस्था |
विशिष्ट पुनःशोषण प्रमाण (%) |
आर्द्रता प्रमाण (%) |
लोकर |
१६ |
१३.७९३ |
टॉप : तेलाने विंचरलेले |
१९ |
१५.९६६ |
टॉप : विंचरलेले |
१८.२५ |
१५.४३३ |
वर्स्टेड सूत |
१८.२५ |
१४.५३० |
पिंजलेले लोकर सूत |
१७ |
१२.२८१ |
नॉइल्स |
१४ |
१३.७९३ |
धुतलेली लोकर |
१६ |
१३.७९३ |
लोकरीचे व वर्स्टेड कापड |
१६ |
−− |
शोषित पाण्याचे अन्य परिणाम : विशिष्ट पुनःशोषण प्रमाण १४ ते १६% असताना जणू काय लोकर कोरडी आहे असेच वाटते. पाण्याचे हे प्रमाण ठराविक मर्यादेपलीकडे गेले, तरीही लोकर ओली लागत नाही. प्रयोगान्ती आढळून आले आहे की, ३५% इतकी पुनःशोषण प्रमाणाची मर्यादा ओलांडल्यावर मगच लोकर ओली झाली असे जाणवते. अन्य तंतूंनाही अशी कमाल पुनःशोषण प्रमाण मर्यादा असते.
तंतूंचे बल ओल्या अवस्थेत कमी होते. कापसाचा तंतू हा या नियमाला अपवाद आहे. लोकरीचे बलही ओल्या अवस्थेत ८०% शिल्लक राहते म्हणजे २०% घटते. अन्य बऱ्याच तंतूंच्या बाबतीत ही घट फार मोठ्या प्रमाणावर होते. तंतूमध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे यावर ही घट कमी-अधिक प्रमाणात होते. आर्द्रता १००% असेल, तर अधिक घट होते. या गोष्टीलाही कापसाचा तंतू अपवाद आहे.
ताणला असता कोणताही तंतू ठराविक ताणाने तुटतो मात्र तुटण्याआधी जशी त्याची लवचिकता असेल त्या प्रमाणात तो ताणलाही जातो. तुटण्यासाठी लागणारी प्रेरणा व किती ताणला जाणार ही मर्यादा आर्द्रतेच्या प्रमाणावर अवलंबून असते. लोकरीमध्ये बराच ताण सहन करण्याची क्षमता आहे हे सहज जाणवते. मात्र तापमान वाढवले असता लोकरीची तननक्षमता व तुटताना लागणारी प्रेरणा या दोन्हींमध्ये १५.५०से. च्या वर तापमान असल्यास फारच घट होते.
रासायनिक पदार्थांचा परिणाम : क्षारधर्मी (अम्लामबरोबर विक्रिया झाल्यास लवण तयार करण्याचा गुणधर्म असलेल्या) विद्रावांचा लोकरीवर फार अनिष्ट परिणाम होतो. अधिक तापमानात हा परिणाम अधिकच अनिष्ट होतो. विद्रावांचे pHमूल्य १० च्या जवळ [⟶पीएच मूल्य] वा त्याच्यापेक्षा अधिक क्षारधर्मी झाले, तर लोकरीचे रासायनिक अपघटन (घटक द्रव्ये अलग होण्याची क्रिया) होऊ लागते म्हणून लोकरीच्या सुतासाठी व कपड्यासाठी साबण वापरताना फारच काळजी घ्यावी लागते. ५% धुण्याच्या सोड्याच्या विद्रावात लोकर ५ मिनिटे उकळली असता सर्व लोकर विरघळून जाते. यावरून अन्य क्षार लोकरीच्या संदर्भात वापरणे किती धोक्याचे आहे याची कल्पना येईल.
अम्लीधर्मी विद्रावांचा लोकरीवर तितका परिणाम होत नाही. सल्फ्यूरिक अम्लामच्या २ ते ५ % विद्रावात जरी लोकर उकळली, तरी अनिष्ट परिणाम होत नाही. या खास गुणधर्माचा उपयोग काही खास रंजनक्रियांमध्ये करून घेता येतो. सल्फ्यूरिक अम्लापचे जास्त प्रमाण असलेल्या विद्रावाचा लोकरीवर अनिष्ट परिणाम होतो व तापमान वाढविले असता लोकर विरघळून जाते.
कार्बनी अम्लांच्या विद्रावात लोकर फुलून येते. १००% फॉर्मिक अम्लांच्या विद्रावात लोकर खूप फुलून येते व रबराप्रमाणे लवचिक होते. नेहमीच्या तापमानामध्ये लोकर अम्ल द्रव्ये शोषून घेऊ शकते. PH मूल्य ५ ते ७ या अम्ला वस्थेत प्रक्रिया घडविल्या असता लोकरीवर फारसा अनिष्ट परिणाम होत नाही.
लोकरीच्या विरंजनासाठी (रंग घालविण्यासाठी) हायपोक्लोराइट विद्रावाचा उपयोग होत नाही, कारण या रासायनिक द्रव्याचा लोकरीवर अनिष्ट परिणाम होतो. पुरेशी काळजी घेतली असता हायड्रोजन पेरॉक्साइडाचा उपयोग होतो. जरूरच असेल तेव्हा सोडियम बायसल्फाइट विद्रावाचा उपयोग विरंजनासाठी करता येतो.
काही लवणांचे विद्राव लोकरीवर परिणाम करतात. क्रोमेट व बायक्रोमेट लवणे वापरली असता त्यांची लोकरीच्या तंतूशी रासायनिक विक्रिया घडते व अशा रीतीने विक्रिया झालेली लोकर रंगबंधक पद्धतीने रंगविता येते. या रंगांमध्ये निकेल, क्रोमियम यांसारख्या धातूंच्या साहाय्याने रासायनिक घटक निर्माण झालेले असतात. अशा रंगांचा लोकर रंगविण्यामध्ये फार चांगला उपयोग होतो. कॅल्शियम थायोसायनेट या रसायनाच्या विद्रावाचा लोकरीवर विशिष्ट परिणाम होतो व सुती कापडामध्ये ज्याप्रमाणे ‘क्रेप’ हे लवचिकपणात खास परिणामकारक असते तसा परिणाम या रसायनाने लोकरीच्या कापडावर होतो.
वेगवेगळ्या कार्बनी विद्रावकांचा (विरघळविणाऱ्या द्रव्यांचा) लोकरीवर म्हणण्यासारखा असा परिणाम होत नाही.
सूतकताई : तांत्रिक दृष्टीने पाहिले असता सूतकताई ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. या प्रक्रियेमध्ये मुख्य धोरण म्हणजे उत्तम प्रतीचे लांब तंतू विंचरण्याच्या क्रियेसाठी व समांतरीकरणासाठी वेगळे करणे, मध्यम लांबीचे तंतू सर्वसाधारण उपयोगाच्या लोकरी मालासाठी वेगळे करणे आणि अगदी लहान, निरूपयोगी तंतू व तुकडे वगैरे संपूर्णतया काढून टाकणे. सारख्या लांबीचे तंतू एकत्र केले म्हणजे पेळू तयार होतात व पुढे त्या पेळूंपासून विणकामास उपयुक्त असे लोकरीचे सूत तयार होते.
लांब तंतूंच्या व उत्तम प्रतीच्या लोकरीपासून वर्स्टेड सूत तयार होते. या लांब तंतूंत सुद्धा अती लांब व लांब अशा दोन प्रती केल्या जातात. या दोन प्रकारच्या प्रक्रियांना, विशेषतः लांब तंतूंच्या लोकरीच्या सूतकताईच्या क्रियांना (१) इंग्लिश वा ब्रॅडफर्ड पद्धत व (२) फ्रेंच अथवा काँटिनेंटल पद्धत अशा संज्ञा दिल्या आहेत.
सूतकताईची प्रक्रिया थोडक्यात पुढीलप्रमाणे असते : लांब तंतूंच्या लोकरीसाठी (१) गासड्यांतून बाहेर काढलेली, दाबलेल्या अवस्थेतील लोकर मोकळी करणे, (२) कच्च्या लोकरीतील नैसर्गिक ग्रीज व अशुद्ध द्रव्ये काढून टाकणे, (३) वनस्पतिजन्य अशुद्ध भाग काढून टाकणे, (४) तंतूंचे मिश्रण करणे व त्यांना तेल लावणे, (५) अनेक वेळा तंतू सरळ करून व समांतर करून पेळू बनविणे (पिंजण क्रिया), (६) पेळूंतील लोकर लिस्टर वा नोबल पद्धतीने विंचरणे, (७) लागोपाठ पेळूंमधील लोकरीचे मिश्रण व पुन्हा तंतू सरळ व समांतर करून मिश्रण जास्तीत जास्त एकजिनसी बनविणे, (८) पेळूंपासून खेचण क्रियेने व नंतर फ्लायर (सूत गुंडाळण्यापूर्वी त्याला पीळ देणारे व त्याचे कांडीच्या लांबीभर एकसारखे वितरण करणारे साधन) वापरून मोठ्या कांड्या बनविणे व (९) सूत विणण्यास योग्य असे बनविणे.
मध्यम प्रतीच्या व त्यापेक्षा जरा कमी प्रतीच्या लोकरीसाठी वर दिलेल्या क्रियांपैकी विंचरण्याच्या क्रियेची जरूरी लागत नाही. बाकीच्या क्रिया थोड्याफार फरकाने वर दिल्याप्रमाणेच केल्या जातात. [⟶ सूतकताई].
विणकाम : लोकरीचे कापड पुढील चार पद्धतींनी तयार करण्यात येते: (१) मागावरील विणकाम, (२) यांत्रिक सुयांवरील विणकाम, (३) लेसप्रमाणे विणकाम व (४) न विणता तंतू एकमेकांत गुंतवून कापड तयार करणे. मागावरील विणकामाने लोकरीचे व वर्स्टेड कापड तयार करण्यात येते. याकरिता ताणा व बाणा अशा दोन स्वतंत्र सुतांची जरूरी असते. यांत्रिक सुयांवरील विणकामाने स्वेटर, पुलओव्हर, टोप्या, मफलर वगैरे तयार करण्यात येतात. यात एक वा दोन धाग्यांचा उपयोग करण्यात येतो. लेसप्रमाणे विणकाम करून लहान मुलांची अंगडी, टोपडी, पडदे वगैरे वस्तू तयार करतात. याकरिता एकाच धाग्याचा उपयोग करतात. न विणता तंतू एकमेकांत गुंतवून विविध प्रकारचे फेल्टचे कापड लोकरीपासून बनवितात. या क्रियेकरिता धाग्याची जरूरी नसते. अजिबात विणकाम न केलेल्या लोकरीप्रमाणेच विणलेल्या लोकरीच्या कापडावर तरंगणाऱ्या धाग्यांवर रासायनिक द्रव्यांच्या (क्षारांच्या) साहाय्याने प्रक्रिया करून कापडाची वरची बाजू तंतूंत तंतू गुंतवून एकजीव झाल्यासारखी दिसेल, असे लोकरीचे कापड तयार करता येते. फेल्टिंगची ही क्रिया ‘रोटरी मिल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या यंत्रांमध्ये घडवून आणता येते. यांत्रिक आघाताने लोकरीच्या कापडास भरीवपणा आणता येतो. याकरिता फुलिंग स्टॉक यंत्र वापरतात [⟶ फेल्ट वस्त्रे विणकाम होजियरी].
लोकरीची धुलाई : मेंढ्यांपासून लोकर मिळविली जाते तेव्हा तिच्यामध्ये अन्य अशुद्ध पदार्थ बऱ्याच प्रमाणात असतात.त्यांत मुख्यतः गवताचे तुकडे, भुसा, मातकट भाग, मेंढ्यांचा घाम, शिवाय लोकरीबरोबर असणारे मेंढ्यांच्या धर्म ग्रंथीतून स्त्रवणारे ग्रीज व अन्य चिकट पदार्थ यांचा समावेश असतो. प्रमाणाच्या दृष्टीने अशा लोकरीत पुढीलप्रमाणे सरासरी घटक असतात : कच्ची लोकर ५०%, लोकर ग्रीज १०%, शुष्क घाम व अन्य चिकट पदार्थ २०% आणि जमिनीवरून शिरणारी माती, वाळू इ. २०%. या पदार्थांमुळे यांत्रिक प्रक्रियांवरही परिणाम होत असल्यामुळे पिंजणे, विंचरणे व सूतकताई या क्रिया करण्यापूर्वीच लोकर स्वच्छ करून घ्यावी लागते. वरील अशुद्ध पदार्थ काढण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लोकरीची गरम पाण्यात वा गरम क्षार विद्रावात धुलाई करणे. क्षार विद्राव अतिशय विरल असला पाहिजे व धुलाईही काळजीपूर्वक करावी लागते. धुलाईनंतर जे लोकर ग्रीज मिळते त्याला ‘लोकर मेण’, ‘लोकर चरबी’, ‘लोकर तेल’ वगैरे संज्ञा रूढ आहेत. हे एस्टरे, अल्कोहॉले व वसाम्ले यांचे जटिल मिश्रण असून ते लॅनोलीन व त्याचे अनुजात (त्यांपासून बनविलेली इतर संयुगे) तयार करण्यासाठी, चामड्यावर प्रक्रिया करण्यासाठी, तसेच वंगण तेलांत, साबणांत व मलमांत वापरतात. लॅनोलिनाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने व शांपू यांत मृदूकारक द्रव्यांचा पायाभूत पदार्थ म्हणून करतात. लोकर ग्रीज ज्या संयुगांचे मिश्रण असते ती संयुगे ‘मेणे’ या वर्गात मोडतात[⟶ मेण].
लोकरीची धुलाई करण्यापूर्वी यांत्रिक पद्धतीने कोरडे अशुद्ध पदार्थ वेगळे केले जातात. नंतर विशुद्ध लोकर मिळविण्यासाठी पुढील तीन पद्धती वापरल्या जातात.
(१) पायस धुलाई : यात गरम केलेल्या साबणाच्या विद्रावाचा उपयोग करतात. घामट−चिकट पदार्थांमुळे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांपासून बनलेले दृढ मिश्रण) होण्यास मदत होते व पायसाच्या कर्षक शक्तीमुळे लोकर ग्रीज व अन्य चिकट पदार्थ लोकरीपासून अलग होतात.
(२) स्विंट काढून टाकणे : स्विंट म्हणजे लोकरीतील घामट चिकट पदार्थांची पोटॅशियमाशी बनलेली लवणे होत. या लवण विद्रावात लोकरीमध्ये असलेले अन्य चिकट पदार्थ व ग्रीज खेचून घेण्याची क्षमता असते. स्विंट विद्रावात अम्लांश वा क्षारांश विशेष नसल्याने (pH मूल्य ५.१ ते ८.५) ७०० से. तापमानातही उत्तम धुलाई प्रक्रिया घडवून आणता येते.
(३) विद्रावक धुलाई : ग्रीज व अन्य अशुद्ध पदार्थ विरघळवून टाकणाऱ्या विद्रावकांचा उपयोग करूनही लोकर स्वच्छ केली जाते. या विद्रावापासून शुद्ध लॅनोलीन मिळविता येते. बेंझीन, व्हाइट स्पिरिट (खनिज तेलापासून मिळणारे स्पिरिट), विद्रावक नॅप्था अथवा कार्बन टेट्राक्लोराइड यांपैकी कोणताही विद्रावक यासाठी वापरला जातो.
वरील पहिल्या व दुसऱ्या पद्धतीच्या धुलाई प्रक्रियांसाठी पुढील यंत्रे वापरली जातात : (१) हॅरो फोर्क धुलाई यंत्र : शेतीत वापरण्यात येणाऱ्या कुळवासारखी दाते असलेल्या व ⇨कॅमच्या साहाय्याने लोकर पुढे सरकविण्याऱ्या फण्या वापरणारे हे यंत्र मध्यम व तलम लोकरीच्या तंतूसाठी वापरतात. (२) स्विंग रेक धुलाई यंत्र : यात झोक्यासारखी हालचाल करणाऱ्या दाताळ्याच्या साहाय्यानेप्रत्येक कप्यातील धुलाई झालेला माल पुढे सरकविला जातो. जड अशुद्ध पदार्थ काढून टाकण्यासाठी जाड्याभरड्या लोकरींकरिता हे यंत्र वापरले जाते. (३) पातीयुक्त धुलाई यंत्र : पात्यांच्या साहाय्याने या यंत्रात पद्धतशीर धुलाई केली जाते. सर्व प्रकारच्या लोकरींसाठी हे यंत्र वापरता येते.
वर उल्लेखिलेल्या धुलाई प्रक्रियांनंतर स्वच्छ पाण्याने धुलाई करणे आवश्यक असते. धुलाई प्रक्रियेमध्ये लोकर शुद्ध केली जात असली, तरी धुलाईनंतरही लोकरीमध्ये ०.५ ते ०.७५ %ग्रीज शिल्लक राहाणे अतिशय जरूरीचे असते. अन्यथा लोकर कडक होऊन पुढे होणाऱ्या यांत्रिक व अन्य प्रक्रिया नीट होऊ शकत नाहीत. अनुभवाने वरीलप्रमाणे ग्रीजचे प्रमाण राखणे सुलभ होते.
कार्बनीकरण : मेंढ्यांच्या कातडीवर लोकर वाढत असते. कुरणांमधून मेंढ्या चरत असताना व नंतर लोकर कापून घेतल्यावरही सतत लोकरीचा वनस्पतिजन्य पदार्थांशी संपर्क येत असतो. त्यामुळे लोकरीमध्ये थोड्याशा प्रमाणात तरी असे वनस्पतिजन्य अनिष्ट पदार्थ असतातच. हे वनस्पतिजन्य अनिष्ट पदार्थ नुसत्या यांत्रिक प्रक्रियांनी नाहीसे होत नसल्यामुळे ते रासायनिक प्रक्रियने नष्ट केले जातात. सल्फ्युरिक अम्लाच्या विद्रावाचा लोकरीवर विशेष परिणाम होत नाही पण तापमान वाढविले असता वनस्पतिजन्य पदार्थाचे रासायनिक ज्वलन होते. या ज्वलनामुळे या सर्व वनस्पतिजन्य पदार्थाचे कार्बनामध्ये रूपांतर होते म्हणून या प्रक्रियेस कार्बनीकरण असे म्हणतात. लोकरीतील गवताचे सूक्ष्म तुकडे, तूस इ. पदार्थांवर ३ ते ६ % सल्फ्यूरिक अम्लाच्या विद्रावाचा परिणाम घडवून आणता येतो. माल पाण्यात बुचकळून काढल्यानंतर तो ५५० से.तापमानात वाळविण्यात येतो. नंतर हा माल ९५०−१००० से. तापमानात तापविला म्हणजे वर वर्णन केलेली कार्बनीकरणाची प्रक्रिया घडून येते. अशा तऱ्हेने अपघटन झालेले अनिष्ट पदार्थ मग यांत्रिक पद्धतीने झटकून टाकून सर्व माल शुद्ध पाण्याने धुतला जातो. लोकरीमध्ये अम्लांश शिल्लक राहिल्यास अगदी विरल क्षार (धुण्याचा सोडा) विद्रावाने धुतला जातो. शेष क्षार पाण्याच्या साहाय्याने धुवून टाकून सर्व माल वाळविला जातो.
पुनःधुलाई : वर्स्टेड मालाचे पिंजण होत असताना लोकरीचे सर्व तंतू अलग केले जातात. या क्रियेनंतर पिंजलेला माल मळकट दिसू लागतो. पुढल्या क्रियांमधून या मालाचे गुंडे तयार करून या गुंड्यांच्या स्वरूपात बहुतेक लोकरीची खरेदी-विक्री होते. किंमत ठरविताना मालाची पर्यायाने या गुंड्याची स्वच्छता मुख्यतः विचारात घेतली जाते. त्यामुळे अधिकाधिक स्वच्छ गुंडे तयार करण्याकडे उत्पादकांचे लक्ष केंद्रित होते. यासाठी कराव्या लागणाऱ्या धुलाईलाच पुनःधुलाई असे म्हणतात.
कापडाची धुलाई : जरी काही लोकरी अथवा वर्स्टेड सुताचे कापड धुलाई न केलेल्या सुतापासून बनविले जात असले, तरी अन्य सर्व लोकरीच्या कापडांमध्ये तंतू अगोदर धुतलेले असतात. परंतु सूतकताईच्या वेळी वापरलेले वंगण व विणकामासाठी सुतावर चढविली गेलेली खळ व अन्य पदार्थ हे कापडावरून धुवून काढावे लागतात. या धुलाईसाठी खास धुलाई यंत्र वापरले जाते. कापड संपूर्णपणे रूंदी उलगडलेल्या अवस्थेत अगर दोरासारख्या अवस्थेत धुतले जाते. कापडाच्या प्रतीप्रमाणे साबणाच्या विद्राव व धुण्याच्या सोड्याचा विद्राव (केवळ १ ते २%) वापरून अथवा फक्त धुण्याच्या सोड्याचा विरल विद्राव (१ ते २%) धुलाईसाठी वापरला जातो. या धुलाईसाठी पात्रातील विद्रावाचे तापमान केवळ ४००से. इतकेच ठेवावे लागते. साधारण अर्धा ते एक तास इतक्या कालावधीत धुलाई प्रक्रिया पूर्ण होते. जरूर वाटल्यास पहिल्या १५ ते २० मिनिटांचा धुलाई विद्राव सोडून देऊन नवीन विद्राव वापरतात. धुलाई क्रिया संपता संपता थोड्या प्रमाणात साबणाचा विद्राव व ट्रायक्लोरोएथिलीन हा विद्रावक वापरला असता धुलाई उत्तम प्रतीची होते.
विरंजन : नैसर्गिक रीत्याच लोकरीला पिवळटसर रंग असतो. हा नैसर्गिक रंगही दिसावयास बरा असल्यामुळे काही वेळा विरंजन न करताच त्या लोकरीपासून तयार झालेले कापड व कपडे वापरले जातात. शिवाय रंजनक्रिया करावयाची असली, तर ती नैसर्गिक रंगाच्या लोकरीवरच करता येते. या कारणांमुळे फार कमी प्रमाणात लोकरीवर विरंजनाची क्रिया करावी लागते. लोकरीच्या विरंजनासाठी मुख्यतः सल्फर डाय-ऑक्साइडाच्या साहाय्याने ⇨क्षपण करणे आणि हायड्रोजन पेरॉक्साइडाच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण [⟶ऑक्सिडीभवन] करणे या दोन पद्धती वापरण्यात येतात.या दोन्ही क्रियांमध्ये नैसर्गिक पिवळटसर रंग नष्ट होऊन शुभ्र पांढऱ्या रंगाची लोकर तयार होते. [⟶विरंजन].
रंजनक्रिया : प्राणिजन्य तंतूंच्या रंजनक्रियेमध्ये रंगद्रव्यांशी तंतूंची रासायनिक विक्रिया होते. क्षारधर्मी विद्रावांचा लोकरीवर अनिष्ट परिणाम होत असल्यामुळे क्षारधर्मी कुंडात घडून येणाऱ्या रंजनक्रिया लोकरीसाठी निरूपयोगी असतात. वरील कारणामुळे लोकरीसाठी अम्ल, क्षारकीय, रंगबंधक व सरळ या प्रकारची रंजकद्रव्येच वापरतात. काही धातुयुक्त जटिल संयुगे असलेली रंजकद्रव्ये (उदा., पॅलाटाईन,निओलॉन इ.) केवळ लोकर रंगविण्यासाठी म्हणून तयार करण्यात आली आहेत. त्यांचा पण या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
क्षारकीय रंजकद्रव्ये : ही रंजकद्रव्ये मुख्यतः लोकरीच्या लडीकरिता वापरतात. फेनद (ज्यात साबणाचा फेस होऊ शकतो असे) पाणी असलेल्या रंजकद्रव्य कुंडाचा उपयोग करतात. कुंड जरी उदासीन (अम्ल धर्मी वा क्षारधर्मी नसलेले) अपेक्षित असले, तरी थोड्या प्रमाणात ॲसिटिक अम्लय वापरले असता सर्व रंजनक्रिया एकसारखी होते. आधी कुंडात २००से. इतके तापमान किमान २० मिनिटे ठेवतात व नंतर ९००से.पर्यंत वाढवितात. रंगबंधक म्हणून कोणतेही द्रव्य वापरावे लागत नाही.
अम्ले रंजकद्रव्ये : लोकर व अम्ल यांचे प्रथम रंजकद्रव्य कुंडात संयुग तयार होते व नंतर या संयुगाची अम्ल रंजकद्रव्याशी रासायनिक विक्रिया घडते. लोकरीच्या सर्व अवस्थांमध्ये अम्ल रंजकद्रव्ये वापरता येतात. ५% ते २०% सल्फ्यूरिक अम्ल विद्रावाचा उपयोग करावा लागतो. प्रत्यक्ष रंजनक्रिया उकळण्याइतक्या तापमानात घडवावी लागते. काही रंजकद्रव्यांच्या बाबतीत कोंबट कुंडात सुरूवात करून नंतर कुंडाचे तापमान वाढवले जाते.
रंगबंधक रंजकद्रव्ये : या रंजकद्रव्यांची क्रिया घडविण्यापूर्वी लोकर पोटॅशियम डायक्रोमेटाच्या २% ते ४% विद्रावामध्ये ५०० से. तापमानात सु. ४० मिनिटे ठेवून नंतर १० मिनिटे उकळत्या तापमानात कुंडातील विद्रावात ठेवावी लागते. रंजकद्रव्याबरोबर होणारी विक्रिया साधारण ६०० से. तापमानात घडवावी लागते. रंगबंधक रंजकद्रव्याची क्रिया घडविताना क्रोमियम लवण केव्हा वापरले जावे या दृष्टीने पुढील तीन पद्धती वापरल्या जातात : (१) आधी क्रोमियम लवण (बॉटम क्रोम), (२) क्रोमियम लवण व रंजकद्रव्य एकाच कुंडात (मेटॅक्रोम) व (३) रंजनक्रियेनंतर क्रोमियम लवणाची क्रिया (आफ्टर क्रोम किंवा टॉप क्रोम) जी पद्धत अधिक स्वस्त पडेल ती अनुसरण्याचा प्रघात आहे.
सरळ रंजकद्रव्ये : लोकर व सरळ रंजकद्रव्य यांमध्ये एक प्रकारची आसक्ती असल्यामुळे रंजनक्रिया सुलभ होते. रंजकद्रव्यातील रासायनिक संयुग व लोकर यांमधील ही रासायनिक विक्रिया रंजकद्रव्याच्या विवक्षित गुणधर्माप्रमाणे कुंड थंड वा कोंबट असताना चालू होते. नंतर कुंड ६०० से. पर्यंत काही वेळ ठेवून पुढे १००० से.च्या नजीकच्या तापमानात ही विक्रिया पूर्णत्वास जाते. रंजनक्रिया पूर्ण होण्यासाठी सोडियम क्लोराइड अगर सोडियम सल्फेट यांसारख्या लवणांची मदत घ्यावी लागते. या लवणांच्या परिणामामुळे विद्रावातील उरले सुरले रंजकद्रव्य लोकरीच्या सुताकडे आकर्षिले जाते व नंतर रंजनक्रिया पूर्ण होते. काही सरळ रंजकद्रव्यांचा पक्केपणा वाढविण्यासाठी रंजनक्रिया झाल्यावर फॉर्माल्डिहाइड, कॉपर सल्फेट (मोरचूद) वा ⇨डायाझो संयुगांचे मिश्रण वापरण्यात येते.
लोकरीवर करण्यात येणारी रंजनक्रिया बहुतांशी लोकरीचे मागावर वा सुयांनी विणकाम करण्यापूर्वीच केली जाते. मोठ्या प्रमाणावर रंजनक्रिया करण्यासाठी सुताचे गुंडे वापरले जातात. रंजनक्रिया लवकर व उत्तम होण्यासाठी उच्च तापमान व उच्च दाब यांचा वापर केला जातो. तयार कपडे व लोकरीच्या अन्य वस्तू यांची रंजनक्रिया मात्र वस्तू तयार केलेल्या अवस्थेत करण्याचा काहीसा प्रघात आहे. [⟶रंजक व रंजकद्रव्ये रंजनक्रिया].
छपाई : व्हिगोरो छपाई : या नावाने संबोधिली जाणारी प्रक्रिया लोकर पेळूंच्या अवस्थेमध्ये असताना सूतकताई केली जाते. छापलेल्या पेळूंचे गुंडे वाफेच्या दाबाखाली ठेवून पुढच्या सूतकताई क्रियेमध्ये हा छापलेला भाग अन्य तंतूबरोबर संपूर्णपणे मिसळला जातो. सूतकताई, खेचण, पिंजण या क्रिया झाल्यावर तयार झालेले लोकरीचे सूत पाहिल्यास लोकर मुळापासूनच रंगीत होती की काय असे वाटते. लोकरीचे कापड बऱ्याच प्रमाणात अशा संपूर्ण रंगमिश्रित मालापासून केले जाते. ही व्हिगोरो छपाई प्रत्यक्ष रंजनक्रियेप्रमाणेच वाटते परंतु सुरूवातीस पेळूवर रंग छापले जातात म्हणून पूर्वीपासूनच या प्रक्रियेस छपाई म्हणण्याचा प्रघात पडला आहे.
अन्य प्रकारची छपाई : लोकरी तंतूंचे रासायनिक गुणधर्म व अन्य गुणधर्म वेगळे असल्यामुळे एकंदरीतच लोकर ही छपाईच्या कामास फारशी अनुकूल नसते. घट्ट छपाई मिश्रण छापणे, त्या मिश्रणातील रंजकद्रव्याची लोकरीच्या सुताशी योग्य विक्रिया होणे व नंतर हे रंजकद्रव्य सुतावर पक्के बसण्यासाठी लागणारे तापमान, बाष्पाचे प्रमाण न अन्य व्यवस्था बरीच जिकिरीची असते. सोकरीच्या केसाळ स्वरूपामुळे ती अधिकच त्रासदायक होत असल्याने जेव्हा छपाई करायची असेल तेव्हा लोकरीवर क्लोरीन प्रक्रिया घडविणे जरूरीचे असते. क्लोरीनीकरणामध्ये विरंजक चुर्णाच्या विद्रावातील क्लोरीन वायू हायड्रोक्लोरिक अम्लाच्या साहाय्याने मुक्त करून त्याची लोकरीवर विक्रिया घडवून आणावी लागते.
अम्ली रंजकद्रव्य, सरळ रंजकद्रव्य, रंगबंधक रंजकद्रव्य व विरघळणारे व्हॅट रंजकद्रव्य यांची छपाई लोकरीवर क्लोरीनीकरणानंतर करता येते पण अशा छपाईचे प्रमाण खूपच कमी असते. ज्या रंजकद्रव्याची छपाई करावयाची असेल त्या रंजकद्रव्यास पूर्णत्व आणण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रियांची व्यवस्था करावी लागते. [⟶कापड छपाई].
कापडावरील अंतिम संस्करण : विक्रीस योग्य व ग्राहकास आकर्षक असा माल तयार होण्यासाठी त्यावर कराव्या लागणाऱ्या क्रियांना अंतिम संस्करण असे म्हणतात. मालाचा खरबरीतपणा घालविणे, तयार मालाच्या दर्शनी भागावर कोणत्याही प्रकारचे तंतू अथवा तंतू अग्रे नसणे हे अंतिम संस्करण क्रियेचे मुख्य उद्दिष्ट होय. रेझिंगसारख्या खास क्रियेमध्ये कापडाच्या सर्व भागावर लोकरीचे लहान तंतू नीटपणे पसरले जाऊन लोकरीच्या कापडाला एक प्रकारचा उठाव आणण्यात येतो. फेल्टिंग क्रियेने लोकर पूर्ण भरली जाऊन ती स्पर्शाला कठीण लागते. रेझिंग केल्याने ती स्पर्शास मऊ व सुखकारक लागते. शिवाय उत्तम प्रकारच्या लोकरीच्या व वर्स्टेड कापडावरील लोंबते तंतू व तंतू अग्रे पूर्णपणे नाहीशी करण्याचे काम शिअरिंग या क्रियेने केले जाते.
रेझिंग : लोकरीच्या सुताने विणून कापड बनविले, तरी प्रत्येक सुतातून तंतूंची लहान लहान टोके कापडाच्या सर्व भागावर दिसू शकतात. जेव्हा लोकरीचे कापड अधिक उबदार व भरदार असावे असे धोरण असेल तेव्हा ही तंतू अग्रे कापडामधून पुढे खेचून सर्व कापडाच्या पृष्ठभागावर सारख्या प्रमाणात पसरून एक प्रकारे कापडाचा बाहेरचा सर्व पृष्ठभाग झाकून टाकण्यासाठी जी यांत्रिक क्रिया केली जाते तिला रेझिंग असे म्हणतात. या क्रियेला नॅपिंग असेही म्हणतात. ही क्रिया ज्या यंत्रावर घडली जाते त्याला गिग म्हणतात. त्यामुळे कधीकधी या क्रियेसही गिगिंग असे नाव दिले जाते. छोट्या छोट्या पोलादी सुयांनी मढविलेल्या दंडगोलावरून कापड अगदी चिकटून नेले जाते. सुयांचा दंडगोल फिरण्याचा वेग कापड फिरण्याच्या वेगापेक्षा जास्त ठेवतात व त्यामुळे दंडगोलावरील सुया कापडावरून तंतू अग्रांना बाहेर खेचून घेतात. आधी व नंतर ब्रशांच्या साहाय्याने तंतूंची सर्व टोके एका दिशेत ठेवली जातात. इष्ट अशा परिणामासाठी केव्हा केव्हा कापड गिगिंग यंत्रामधून पाच-सहा वेळा चालवावे लागते. योग्य अनुभवाने तंत्रज्ञ गिग यंत्राचा सर्व तपशील नक्की करू शकतो. यंत्राचा वेग, कापडाचा व दंडगोलाचा वेग, दंडगोल व कापड यांमधील अंतर व माल यंत्रामधून किती वेळ चालवायचा या सर्व गोष्टींचा अचूक अंदाज त्या कामावर बराच काळ लक्ष ठेवलेला तज्ञ सहज बांधू शकतो.
रेझींग करताना कापड थोडेसे ओले ठेवतात म्हणजे त्यामुळे कापड फाटत नाही. सूयांच्या दंडगोलासाठी मुद्दाम वाकविलेल्या व वर टोके आलेल्या तारा बसविलेले दंडगोल वापरूनही रेझिंग करता येते. मात्र यामध्ये दंडगोल कापडाच्या गतीच्या विरूद्ध दिशेने फिरतो, त्यामुळे रेझिंग लवकर होते. याखेरीज घास कागद किंवा एमरी कापड दंडगोलाभोवती गुंडाळून त्यावरून लोकरीचे कापड नेले असता अगदी थोड्या प्रमाणात रेझिंग होते.
शिअरिंग व क्रॉपिंग : या यांत्रिक क्रिया रेझिंगच्या बरोबर उलट कार्य करतात. रेझिंग पूर्ण झाल्यावर लोकरीच्या कापडातील ताणा (उभे सूत) कोणता व बाणा (आडवे सूत) कोणता हे सांगणे जवळजवळ अशक्य असते. कारण ही दोन्ही सुते तंतूंच्या टोकांनी संपूर्णपणे झाकलेली असतात. हा परिणाम फ्लॅनेलसारख्या कापडामध्ये पाहावयास मिळतो.
सर्वसाधारणपणे कापडातून डोकावणारी तंतू अग्रे दृश्य असून त्यांची लांबी कमी अधिक असते. अशा विषम लांबींच्या तंतूपटलामुळे अगदी उत्तम विणीच्या व उत्तम प्रतीच्या लोकरीच्या कापडालासुद्धा शिअरिंग करणे जरूर असते. शिअरिंग क्रियेमध्ये बाहेर डोकावणारी सर्व तंतूंची टोके सफाईदारपणे कापडाच्या बाहेरच्या पातळीबरोबर व्यवस्थितपणे छाटली जातात व कापडाचा पृष्ठभाग चांगला दिसतो. ही छाटणी करणारी धारदार पाती एका जलद गतीने फिरणाऱ्या रूळावर बसविलेली असतात. तंतूंची टोके कापडाच्या पृष्ठभागावर काटकोन करून ताठ राहावी यासाठी चोषण पंप व योग्य आकारमानाच्या नळ्या वापरल्या जातात. शिअरिंग झाल्यावरही तंतू अग्रे संपूर्णपणे नष्ट होत नाहीत. सर्व टोके कापडाच्या पातळीवर एका थरातच पसरलेली असल्यामुळे कापड शोभिवंत दिसते. छाटणाऱ्या पात्याची धारदार कड कापडाच्या पृष्टभागाच्या जितकी जवळ जाऊ शकेल तितक्या प्रमाणात छाटणीमध्ये सफाई येते. तंतू अग्रे छाटल्यावर कापडाच्या विणकामात असलेली कलाकुसर नीट दिसते. जेव्हा कापडाच्या बाहेर जरा अधिकच लांब असे लोंबणारे तंतूच छाटून टाकण्याचे काम केले जाते तेव्हा त्या यांत्रिक क्रियेस क्रॉपिंग असे म्हणतात.
अन्य संस्करणे : क्रॅविंग या क्रियेचा मुख्य उद्देश लोकरीच्या कापडास कायमचा आकार देणे हा असतो. यामध्ये प्रथम कापड उकळत्या पाण्यात बुडवून काढतात व ते एका छिद्रे असलेल्यादंडगोलाभोवती गुंडाळतात आणि नंतर त्यास वाफ देऊन काही वेळ तसेच ठेवतात. ही क्रिया कापडाच्या दुसऱ्या टोकाकडून पुन्हा करतात. त्यामुळे कापडाच्या सर्व भागावर सारखीच क्रिया होते. कधीकधी वाफ दिल्यानंतर कापड दाहक सोड्याच्या विरल विद्रावात टाकतात. त्यामुळे ते जास्त आकुंचन पावून पहिल्या लांबी−रूंदीपेक्षा त्याची लांबी-रूंदी कमी होते.
रेझिंग केल्यावर लोकरीचे कापड चक्रीय दाब यंत्रातून नेतात. यात एका मोठ्या लोखंडी दंडगोलावर वरील व खालील बाजूस दोन गोलाकार पितळेचे पॉलिश केलेले चकचकीत पट्ट बसविलेले असतात व ते वाफेने तापविलेले असतात. दंडगोलाचा पृष्ठभागही आतून वाफेने तापविलेला असतो. या दंडगोलाच्या पृष्ठभागावरून कापड नेले असता वरील व खालील बाजूने गरम पट्टांनी दाब दिला जातो. यामुळे कापड चांगले दाबले जाऊन त्यावर एक प्रकारची चकाकी येते. या क्रियेत अनावश्यक आलेली चकाकी ब्लोएइंग क्रियेने कमी करण्यात येते. यात ओलसर गरम हवा कापडाच्या पृष्ठभागावरून नेतात. त्यामुळे दबले गेलेले तंतू पुन्हा वर उचलले जातात व अनावश्यक आलेली चकाकी कमी होते.
पॉटिंग या क्रियेत लोकरीचे कापड एका दंडगोलाकार गुंडाळून ते पातळ कापडाने झाकतात व नंतर तो दंडगोल ६०० से. तापमान असलेल्या पाण्यात कित्येक तास बुडवून ठेवतात. नंतर तेच कापड उलट दिशेने दंडगोलावर गुंडाळून पुन्हा त्याच पाण्यात ठेवतात. ही क्रिया पुन्हा पुन्हा करतात. या क्रियेमुळे कापडास मऊपणा येतो व त्याला कायमचा आकारही येतो.
फेल्टिंग गुणधर्म जास्त परिणामकारक करण्यासाठी मिलिंग करतात पण सुयांनी विणकाम केलेल्या कापडाच्या बाबतीत हा तोटाच असतो. त्यासाठी फेल्टिंगचा गुणधर्म नाहीसा करावा लागतो. याकरिता हायपोक्लोराइट वापरून क्लोरीनीकरण करतात. या क्रियेमुळे कापड आकुंचनरोधकही होते. कसर व इतर कीटकांपासून लोकरी वस्तूंचे दीर्घकाल रक्षण होण्यासाठी रंजनक्रियेसारख्या आर्द्र क्रियेत कीटकनाशकाचा समावेश करतात. लोकरीचे कापड, गालिचे वगैरे वस्तूंवर घरी कीटकनाशक फवारा उडवूनही त्या कसरनिरोधक करता येतात. गिरणीत याकरिता मायटीन व यूलान ही रसायने अधिक प्रमाणात वापरण्यात येतात. फ्ल्युओरो रसायनाचे संस्करण करून लोकरीचे कापड धूळ व विविध प्रकारचे डाग यांना उत्तम रोधक असे बनवितात.[⟶कापडावरील अंतिम संस्करण].
जागतिक उद्योग : लोकरीचे स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत पुष्कळच जलद स्थलांतर होते. आंतरराष्ट्रीय व्यापारातील तीन वा चार सर्वांत मूल्यवान कच्च्या मालांत लोकरीचा अंतर्भाव होतो. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांसारख्या काही प्रमुख उत्पादक देशांच्या बाबतीत ती निर्यातीची एक महत्त्वाची बाब आहे.
पहिल्या महायुद्धाच्या अगोदर लोकरीची खरेदी विक्री खाजगी क्षेत्रात होती व जगातील प्रमुख लिलावाचा बाजार लंडन येथे होता. वॉस्टन हा जागेवरच खरेदी करण्याचा महत्त्वाचा बाजार होता. बेल्जियममधील अँटवर्प, फ्रान्समधील रूबे तूर्क्वी व अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे लोकरीच्या गुंड्यांचे वायदे बाजार होते. पहिल्या महायुद्धामुळे लोकरीच्या किंमतीत फार चढउतार होऊ लागले व सरकारी अधिकांश खरेदीला उत्तेजन मिळाले. युद्धानंतर सरकारी मालकीचे साठे दक्षिण आफ्रिका व दक्षिण अमेरिका येथील लोकरीशी स्पर्धा करू लागले व त्यामुळे किंमती खूप उतरल्या.१९२० नंतरच्या दशकात लिलावाने होणाऱ्या विक्रीत जलद वाढ झाली व सिडनी बाजारातील विक्रीने लंडन बाजाराला मागे टाकले. इतर ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकी बाजारांचे महत्त्व वाढले आणि या देशांतील जवळजवळ सर्व उत्पादित लोकरीची विक्री जाहीर लिलावात होऊ लागली. उत्तर व दक्षिण अमेरिकेतील देशांत, तसेच ब्रिटन व इतर यूरोपीय देशांत बहुतांश शेतकरी आपल्या लोकरीची व्यक्तिशः खाजगी किंवा स्थानिक लिलावात विक्री करीत राहिले. १९३४ मध्ये दक्षिण आफ्रिकी व ब्रिटिश सरकारांनी अधिकांश खरेदीसारखी व्यवस्था केली व ती दुसऱ्या महायुद्धापर्यंत चालू होती.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर कपड्यांच्या लोकरीचे नियंत्रण तत्काळ संघटित करण्यात आले. ब्रिटिश सरकारने ऑस्ट्रेलियन व न्यूझीलंड लोकर युद्धकाळात व त्यानंतर एक वर्ष खरेदी करण्यास संमती दिली. यांपैकी बरीचशी ऑस्ट्रेलियन लोकर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत साठवून ठेवण्यात आली होती व त्यांपैकी काही लोकरीची १९४७ च्या मध्यापर्यंत पुनर्निर्यात करण्यात आली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात प्रारंभी देशी लोकरीला किंमतीची हमी देण्यात आली व १९४३ मध्ये सरकारने प्रत्यक्षपणे ती ताब्यात घेतली. संरक्षण पुरवठा महामंडळाने ब्रिटनकडून काही ऑस्ट्रेलियन लोकरीची तसेच दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड येथून लोकरीची खरेदी केली, परंतु १९४५ अखेरीपर्यंत ती सर्व निकालात काढली. दक्षिण अमेरिकेत खुल्या बाजारातील लोकरीची विक्री चालू राहिली व एकूण निर्यातीपैकी बहुतांश भाग अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना जात होता. युद्धकाळात पाच प्रमुख निर्यातदार देशांतील चालू पुरवठ्यापैकी सु. दोन तृतीयांश लोकरच वापरण्यात आली व युद्धाच्या अखेरीस कपड्यांच्या लोकरीचा मोठा साठा तयार झाला. युद्धोत्तर काळाच्या प्रारंभी लोकरीचा खप पुष्कळ वाढला व १९५१-५२ च्या हंगामापावेतो या सर्व साठ्याची विक्री करण्यात आली.
बाजारपेठेचे स्वरूप व किंमत यंत्रणा या दृष्टीने लोकरीचे कपड्यांची लोकर व गालिच्यांची लोकर असे दोन प्रमुख वर्ग पडतात. यांपैकी कपड्यांच्या लोकरीचे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर उत्पादनात व व्यापारात वर्चस्व वाढले. जागतिक लोकरीच्या उत्पादनापैकी जवळजवळ तीन चतुर्थांश उत्पादन मेरिनो व संकरित प्रकारच्या कपड्यांच्या लोकरीचे असते. यापैकी बहुतेक तलम लोकरीचे उत्पादन दक्षिण गोलार्धात होते. कपड्यांच्या लोकरीपैकी बरीचशी लोकर दक्षिण गोलार्धातून तुटीच्या क्षेत्रात (विशेषतः पश्चिम यूरोपात) तसेच भरपूर प्रमाणात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत जाते. १९६५ च्या सुमारास तलम लोकरीची निर्यात करणारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेटिना, दक्षिण आफ्रिका व यूरग्वाटय हे प्रमुख देश होते आणि आयात करणारे ब्रिटन, जपान, फ्रान्स, इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे प्रमुख देश होते. एकूण निर्यातीपैकी ऑस्ट्रेलिया ५०%, न्यूझीलंड २०%,अर्जेंटिना १०% व यूरग्वा य ३% अशी होती. कच्च्या लोकरीच्या आयातीत जगात ब्रिटनचा (सु. १९%) प्रथम क्रमांक होता. त्यानंतर जपान (१८%), फ्रान्स (सु. ११%), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१०%) व इटली (सु.१०%) यांचे क्रम होते.
जगातील एकूण लोकर उत्पादनापैकी गालिच्याच्या लोकरीचे उत्पादन एक चतुर्थांशापेक्षा थोडे कमी असते. गालिच्याच्या लोकरीच्या उत्पादनापैकी फक्त एक तृतीयांश निर्यात केली जाते, तर तुलना करता कपड्यांच्या लोकरीच्या उत्पादनापैकी दोन तृतीयांश निर्यात होते. यामुळे लोकरीच्या जागतिक व्यापारात गालिच्याच्या लोकरीचा वाटा फक्त सु. १५% असतो. १९६५ च्या सुमारास गालिच्याची लोकर निर्यात करणारे न्यूझीलंड व अर्जेंटिना हे प्रमुख देश होते आणि त्यानंतर पाकिस्तान, भारत व चीन यांचे क्रमांक होते. आशिया, पूर्व यूरोप व उत्तर आफ्रिका येथे सामान्यतः सुधारलेल्या मेंढ्यांच्या जाती वापरल्या जात नाहीत आणि मेंढ्यांची पैदास व्यावसायिक पद्धतीपेक्षाबहुतांशीपरंपरागत पद्धतीनेच केली जाते. त्यामुळे तेथील लोकर घरगुती वा ग्रामीण उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते व त्यांपैकी पुष्कळशी गालिच्यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येते. गालिच्याची लोकर आयात करणारे प्रमुख देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन,जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, व नेदर्लंड्स हे होत. गालिच्याच्या लोकरी पैकी जवळजवळ निम्मी उद्योगधंद्यांत (मुख्यतः गालिच्यांच्या निर्मितीसाठी) आणि उरलेली निम्मी मुख्यत्वे अविकसित क्षेत्रात स्थानिकरीत्या घरगुती वा ग्रामीण उद्योगांत उपयोगात आणली जाते.
कोष्टक क्र. ३. काही प्रमुख देशांतील कच्च्या लोकरीचे उत्पादन (हजार टनांत). |
|||
देश |
१९८२-८३ |
१९८५-८६ |
१९८८-८९ |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
४९ |
४१ |
४१ |
अर्जेंटिना |
१६२ |
१५२ |
१६७ |
ऑस्ट्रेलिया |
७०२ |
८३० |
९४२ |
चीन |
२०२ |
१७८ |
२२४ |
तुर्कस्तान |
८४ |
८५ |
८५ |
दक्षिण आफ्रिका |
११२ |
९८ |
९८ |
न्यूझीलंड |
३७१ |
३५८ |
३३१ |
पाकिस्तान |
४१ |
४९ |
५५ |
फ्रान्स |
२५ |
२४ |
२३ |
बल्गेरिया |
३५ |
३४ |
३१ |
ब्राझील |
२८ |
२९ |
२६ |
ब्रिटन |
५० |
५८ |
६५ |
भारत |
३५ |
३५ |
२९ |
मोरोक्को |
२६ |
३१ |
३४ |
यूरग्वाय |
८२ |
८७ |
८७ |
रशिया |
४७४ |
४६८ |
४८४ |
रूमानिया |
३९ |
४४ |
४४ |
स्पेन |
३० |
३२ |
३४ |
जागतिक एकूण |
२,९३२ |
३,०३९ |
३,२२० |
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गालिच्याच्या लोकरीच्या किंमती कपड्यांच्या लोकरीच्या किंमतीशी तुलना करता मागे पडल्या. पुरवठ्याच्या मानाने कमी सक्रिय मागणी हे याचे कारण होते. मानवनिर्मित तंतूंची स्पर्धा हीही एक महत्त्वाची बाब होती. प्रत्येक वर्षातील लोकरीचा पुरवठा इतका अनिश्चित असतो की, सामान्यतः मागणी हाच घटक किंमतीवर मोठा परिणाम करतो आणि त्यामुळे लोकरीच्या किंमतीची सर्वांत अस्थिर किंमतीत गणना होते.
इ. स. १९८५ च्या सुमारास तलम लोकरीच्या उत्पादनात ऑस्ट्रेलिया, रशिया व न्यूझीलंड हे देश आघाडीवर होते, तर गालिच्याच्या लोकरीच्या उत्पादनात भारत अग्रेसर होता. लोकरीचा वापर करणाऱ्या देशांत ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व जपान हे देश आघाडीवर होते.
इ. स. १९६५ पर्यंत ब्रिटन लोकरीची उत्पादने निर्यात करण्यात जगात अग्रेसर होते. कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पश्चिम जर्मनी, जपान व स्कँडिनेव्हिया येथील बाजारपेठांत ब्रिटनची मुख्यतः निर्यात होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व सोव्हिएट रशियात मोठ्या प्रमाणावर लोकरीच्या कापडाचे उत्पादन होते परंतु त्यांपैकी फारच थोडा भाग जागतिक बाजारात जातो. ऐतिहासिक दृष्ट्या लोकरीच्या कापडाचे जवळजवळ सर्व निर्यातदार देश पश्चिम यूरोपातील आहेत. त्यात ब्रिटन, फ्रान्स, इटली, नेदर्लंड्स व बेल्जियम यांचा समावेश होतो. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमधील लोकरीच्या कापडाचा उद्योग झपाट्याने वाढला व विशेषतः उत्तर अमेरिकेत त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊ लागली.
कोष्टक क्र. ४. काही प्रमुख देशांतील लोकरीच्या सुताचे उत्पादन (टनांत) |
|||
देश |
१९८४ |
१९८६ |
१९८८ |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
५,०२,९४० |
५,३७,४०७ |
—– |
इटली |
५,३६,०८४ |
५,३४,०४१ |
५,२८,२३९ |
चेकोस्लोव्हाकिया |
५७,४६७ |
५८,६६० |
५७,६१७ |
जपान |
३,०८,११४ |
२,४२,४०६ |
२,२९,९३१ |
जर्मनी, पश्चिम |
१,५०,४७५ |
१,३५,९३० |
—– |
जर्मनी, पूर्व |
७५,५०० |
७६,००० |
—- |
पोलंड |
८३,३०० |
८२,५०० |
८३,८५० |
फ्रान्स |
१,०६,९८३ |
९७,६४७ |
७६,०३४ |
बल्गेरिया |
३६,४५५ |
३५,२४१ |
३५,६३० |
बेल्जियम |
९२,३९८ |
८६,२०५ |
८६,७५३ |
ब्रिटन |
१,२६,५७५ |
१,४८,००९ |
१,५२,०२२ |
भारत |
८०,७६० |
७१,००० |
७७,२४० |
मेक्सिको |
६,२१० |
३,६६० |
—- |
यूगोस्लाव्हिया |
५२,१६६ |
५१,८५४ |
४९,८८९ |
रशिया |
४,३३,०० |
४,२१,००० |
—- |
रूमानिया |
७३,४०० |
—– |
—- |
जागतिक एकुण |
३६,७२,५८९ |
३६,६१,७०८ |
३७,२४,३५२ |
कोष्टक क्र.५ विणलेल्या लोकरीच्या कापडाचे (ब्लँकेटांसह) काही प्रमुख देशांतील उत्पादन (टनांमध्ये). |
|||
देश |
१९८४ |
१९८६ |
१९८८ |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
४२,१३८ |
३६,९४५ |
४८,०१८ |
ऑस्ट्रिया |
४,४५९ |
४,३१६ |
३,०४५ |
इटली |
२,०३,७९८ |
१,८८,७९२ |
१,९२,४५७ |
कोरिया, दक्षिण |
२०,६०९ |
१९,५४३ |
२३,१०४ |
ग्रीस |
१४,५८२ |
१५,००० |
१५,००० |
जपान |
१,४३,२५९ |
१,३३,३६६ |
१,४४,२०३ |
जर्मनी, पश्चिम |
४२,३९६ |
३०,६३० |
२९,०९८ |
दक्षिण आफ्रिका |
१७,५६२ |
१६,८८५ |
१८,५९५ |
नेदर्लंड्स |
३,०१७ |
२,०१७ |
१,६६५ |
पोर्तुगाल |
११,८१५ |
१३,६२० |
—- |
बेल्जियम |
६,३०९ |
५,१९५ |
२,७६७ |
ब्रिटन |
३२,७८३ |
३९,११८ |
४०,७६१ |
भारत |
५०,७८७ |
३५,५८४ |
४२, २६९ |
मेक्सिको |
१२,०२० |
४,११० |
—- |
स्पेन |
१९,३०० |
२१,२०० |
—- |
स्वित्झर्लंड |
५,९४९ |
५,९४५ |
४,९७० |
हंगेरी |
११,३०९ |
९,९०० |
७,३८१ |
जागतिक एकूण |
६,९८,८०२ |
६,३८,०१४ |
६,६४,८१५ |
इंटरनॅशनल वुल सेक्रेटरिएट : या संघटनेची स्थापना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका येथील लोकर उत्पादकांनी जगभर लोकरीचा उपयोग व तिची उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने १९३७ मध्ये केली. या तीन देशांतील संसदांनी आपल्या देशात विक्री झालेल्या लोकरीवर कर बसवून या संघटनेच्या कार्याकरिता उत्पन्न मिळवून दिले. तथापि या संघटनेवर कोणतेही सरकारी नियंत्रण नाही. या संघटनेचे मुख्य कार्यालय लंडन येथे आहे. ही संघटना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत वुल व्यूरोद्वारे कार्य करते आणि तिची न्यूयॉर्क व लॉस अँजेल्स येथे कार्यालये आहेत. संघटनेची शाखा कार्यालये बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, भारत, इटली, जपान, नेदर्लंड्स, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड, ब्रिटन व पश्चिम जर्मनी या देशांत आहेत. ही संघटना प्रसिद्धी, जाहिरात, संशोधन व शिक्षण यांद्वारे लोकरीच्या वापराला उत्तेजन देण्याबरोबरच संस्थांना अनुदाने देऊन व संशोधकांना शिष्यवृत्या देऊन लोकरीसंबंधीच्या संशोधनाला पुरस्कृत करते.
लोकर उद्योगात निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविणे, नवीन उत्पादन कल्पना व संशोधन यांना मदत करणे आणि उद्योगासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी योजना आखून त्या यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणे या सेवा संघटनेच्या तांत्रिक सेवा विभागातर्फे दिल्या जातात. संघटनेच्या सर्व शाखा तांत्रिक व अतांत्रिक माहितीचा आणि साहित्याचा प्रसार करणे, अखत्यारीतील सर्व कारखान्यांना व गिरण्यांना उपलब्ध माहितीचा उपयोग होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्रे चालविण्यास मदत करणे वगैरे कार्ये करतात. जगातील प्रगत देशांतील तज्ञांना निमंत्रित करून कच्च्या लोकरीची वर्गवारी, वितरण व व्यवस्थापन, लोकरीतील ग्रीज व अशुद्ध द्रव्ये काढून टाकणे, सूतकताई, रंजनक्रिया, अंतिम सस्करण, विविध प्रकारचे कापड व कपडे तयार करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तांत्रिक ज्ञान, सुयांनी तयार करण्यात येणाऱ्या लोकरीच्या मालासंबंधीची तांत्रिक माहिती, गालिचे तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, लोकरीच्या गिरणीसाठी लागणारी महत्त्वाची यांत्रिक व तांत्रिक माहिती वगैरे विषयांतील माहिती देण्यात येते. तज्ञांनी दिलेली माहिती पडताळून पाहून लोकर उद्योगात तिचा जास्तीत जास्त उपयोग करण्याच्या दृष्टीने संघटनेच्या तांत्रिक सेवा विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. या संघटनेच्या सर्व शाखा व उपशाखा या उद्योगामधील सर्व घटक सभासदांना त्यांच्या सर्व प्रकारच्या मालाची विक्री किफायतशीरपणे होण्यासाठी मदत करतात. वेळोवेळी परिषदा व परिसंवाद घेऊन या बाबतीतील सर्व माहिती जगभर प्रसारित केली जाते.
या संघटनेची भारतातील शाखा १९४९ मध्ये स्थापन झाली. या शाखेचे कार्यालय मुंबई येथे असून लोकर उद्योगाच्या विकासासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत ती करते.
भारतीय उद्योग : भारतात वैदिक काळापासून लोकरीचा वापर करण्यात येत आहे. ऋग्वेदातील स्तोत्रांत लोकरीच्या विस्तृत उपयोगाचा उल्लेख असून लोकरीपासून तयार केलेल्या विरंजित व रंजनक्रिया केलेल्या वस्त्राची आणि ‘कंबल’ या घोंगडीसारख्या वस्त्राची स्तुती केलेली आहे. मैत्रेयी संहिता, शतपथ ब्राम्हण, गुहिल सूत्र, मनुस्मृती यांत तसेच पुराण ग्रंथांत लोकरीचा उल्लेख आढळतो. कौटिलीय अर्थशास्त्रात (इ. स. पू. चौथे शतक) त्या काळचे लोक वापरीत असलेल्या तलम लोकरी कपड्यांसंबंधी व उत्तम, अनेक रंगछटा असलेल्या शालीसंबंधी लिहिलेले दिसून येते.
लोकरीच्या विणलेल्या वस्तू तयार करण्याची परंपरा अनेक शतके चालू राहिली आणि मोगलांच्या आक्रमणाच्या वेळी भारतातील कारागीर उत्तम लोकरीची वस्त्रे, घोंगड्या, शाली व गालिचे तयार करीत होते. मोगल काळात पर्शियातील (इराणमधील) कुशल कारागीर भारतात आणण्यात आले आणि त्यांच्याशी भारतीय गालिचा उद्योगातील कारागिरांचा संपर्क आल्यावर त्यांनी त्यांची कला हळूहळू आत्मसात केली. लंडनमधील १८५१ च्या प्रदर्शनात झुबकेदार भारतीय गालिचे मांडण्यात आले व त्यांना यूरोपीय बाजारातून तत्काळ चांगली मागणी आली.
ब्रिटिशांच्या काळातही परंपरागत उद्योगाची भरभराट झाली. पंजाब व काश्मीरमधील शालीच्या लोकरीकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले. तथापि देशाच्या बहुतांशी उत्तर भागात पसरलेल्या लघू व कुटीर उद्योगाच्या स्वरूपातच लोकर उद्योग राहिला. उत्पादन हातानेच करण्यात येई. कांबळी, लोही (जाडेभरडे, जड, हाताने विणलेले कपड्यांचे कापड) व पत्तू (अंगावर लपेटण्याचा जाड, मजबूत लोकरी कपडा), गालिचे व जाजमे यांचे उत्पादन करण्यात येत असे. चांगल्या प्रतीची देशी लोकर ट्वीड व तलम ब्लँकेटे यांच्या निर्मितीत वापरीत. सैन्य हे ब्लँकेटांचे प्रमुख गिऱ्हाईक असे. सुप्रसिद्ध तलम व मऊ पश्मीना वस्त्र काश्मीरमध्ये तयार करण्यात येई.
परदेशी व्यापार वाढू लागल्यावर भारतीय लोकरीची मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊ लागली. भारतात तलम लोकरीची आयात होण्यासही प्रारंभ झाला. पहिली शक्तिचलित लोकर गिरणी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चालू करण्यात आली व आधुनिक लोकर उद्योगाची सुरूवात झाली. अशा अधिकाधिक गिरण्या उभारण्यात येऊ लागल्यावर हाताने कताई केलेल्या देशी सुताऐवजी काही प्रमाणात आयात मेरिनो व संकरित लोकरींच्या सुताचा वापर होऊ लागला.
पहिली शक्तिचलित लोकर गिरणी १८७६ मध्ये कानपूर येथे कानपूर वुलन मिल्स (लाल इमली मिल्स) या नावाने स्थापन झाली. त्यानंतर धारिवाल (पंजाब) येथे न्यू एजर्टन वुलन मिल्स (धारिवाल मिल्स) उभारण्यात आली. या पहिल्या गिरण्या उत्तरेतील सर्वांत महत्त्वाच्या हस्त विणकामाच्या भागात उभारण्यात आल्याने अनेक वर्षे त्यांत काही प्रमाणात हातमागही वापरण्यात येत होते. त्यानंतर लवकरच मुख्यत्वे कुटीर गालिचा उद्योगासाठी लागणारे सूत तयार करण्यासाठी अमृतसर येथे सूत गिरण्या उभारण्यात आल्या. पुढील दशकात मुंबई व बंगलोर येथे गिरण्या स्थापन करण्यात आल्या. प्रारंभी यंत्रमागावर जाडीभरडी वस्त्रे तयार करीत असत परंतु वर्स्टेड संयंत्रांची जोड देण्यात आल्यावर गिरण्या अधिक तलम गुणवत्तेचे कापड तयार करू लागल्या. पहिल्या महायुद्धात भारतीय यंत्रमाग व हातमाग उद्योगाला उत्तेजन मिळाले आणि त्याने सैन्याला लागणारे लोकरी कपडे पुरविले. याच काळात कित्येक नवीन गिरण्या स्थापन झाल्या व त्यांत उत्पादनासही सुरूवात झाली.
इ. स. १९३४ मध्ये भारतात १३ शक्तिचलित गिरण्या होत्या आणि त्यांत ४१,३८९ लोकरी चात्या, ३३,६९६ वर्स्टेड चात्या व १,५९५ माग होते. १९३७−४० या काळात देशी लोकर उद्योगात वर्षाला सरासरी १.९ कोटी किग्रॅ. लोकर वापरण्यात येत होती. यापैकी ५०% लोकर कांबळी, घोंगड्या यांसारख्या देशी ब्लँकेटांसाठी लघु व कुटीर उद्योगांत आणि सु. ३०% गालिचे, ट्वीड, लोही वगैरेंसाठी वापरली जात होती. दुसऱ्या महायुद्धामुळे लोकर उद्योगाला मोठे उत्तेजन मिळाले. सर्व गिरण्या संरक्षणविषयक गरजा भागविण्यासाठी पूर्ण क्षमतेने उत्पादन करीत होत्या. १९४६ मध्ये मुंबई, अमृतसर, बंगलोर, कानपूर, धारिवाल, श्रीनगर, अलाहाबाद, मिर्झापूर व बडोदे येथे एकूण १९ गिरण्या चालू होत्या आणि त्यांची क्षमता ४८,००० लोकरी चात्या, ३७,५०० वर्स्टेड चात्या, १,५०० यंत्रमाग व ५०० हातमाग एवढी होती.
पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या प्रारंभी संघटित क्षेत्रातील लोकर उद्योगात २० संयुक्त (सूत व कापड), २ सूत गिरण्या, तसेच लोकरीचे सूत तयार करणारे २२ यंत्रमाग कारखाने होते. या सर्वांत मिळून १,१६,८०० चात्या व २,०३९ माग होते. या योजनेच्या शेवटी लोकर उद्योगातील १५ सूत गिरण्या, २५ संयुक्त गिरण्या व ७९ यंत्रमाग कारखाने औद्योगिक कायद्याच्या अखत्यारित आणण्यात आले. त्या वेळी संघटित क्षेत्रात ६१,०३२ लोकरी चात्या, ९६,४१६ वर्स्टेड चात्या व ३,९५० माग एवढी क्षमता होती. १९५१ मध्ये लोकरी/वर्स्टेड सुताचे उत्पादन ७७.५ लक्ष किग्रॅ. होते ते १९५५ मध्ये ९४ लक्ष किग्रॅ. पर्यंत वाढले. लोकरी/वर्स्टेड कापडाचे उत्पादन १.११ कोटी मीटरवरून १.२४२ कोटी मीटरपर्यंत वाढले. १९५६ मध्ये लोकर उद्योगात पुनःप्राप्त सूत कातण्यासाठी वेगळे क्षेत्र निर्माण झाले.
सुताची मागणी भागविण्यास पुरेशी कताईक्षमता उपलब्ध असल्याने दुसऱ्या योजनेत तिचा अधिक विस्तार करण्यास परवानगी देण्यात आली नाही. तथापि पुनःप्राप्त सुताच्या निर्मितीस उत्तेजन देण्यात आले. योजनेच्या शेवटी संघटित क्षेत्रात २८ सूत गिरण्या व ३४ संयुक्त गिरण्या होत्या. त्यांची क्षमता ५३,५५४ लोकरी चात्या, १,२४,६६४ वर्स्टेड चात्या व ४,४१९ पुनःप्रापण चात्या इतकी होती. गालिच्याच्या व पुनःप्राप्त सुतासह लोकरी व वर्स्टेड सुताचे उत्पादन १९५६ मध्ये १.१६ कोटी किग्रॅ. होते, तर १९६१ मध्ये ते १.४८ कोटी किग्रॅ. झाले. यातील पुनःप्राप्त सुताचा वाटा २१ लक्ष किग्रॅ. होता. कापडाचे उत्पादन १.४९ कोटी मी. होते. ते १९५८ मध्ये १.७७ कोटी मी. इतके वाढल्यावर १९६१ मध्ये मात्र १.३२ कोटी मी. इतके खाली आले.
दुसऱ्या योजनेत लघू व कुटीर क्षेत्राने बरीच प्रगती केली. या क्षेत्रात कांबळी, शाली, पत्तू, भरड ट्वीड, गालिचे व रग यांचे उत्पादन झाले. योजनेच्या प्रारंभी या क्षेत्रात १ लक्ष हातमाग होते (त्यांपैकी २०,००० धावत्या धोट्याचे होते). खादी व ग्रामोद्योग मंडळाने (आता आयोग) या क्षेत्राच्या विकासाला भरीव मदत केली. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान व पंजाब ही लोकरी खादीची महत्त्वाची केंद्रे होती. १९५६-५७ मध्ये या क्षेत्राचे उत्पादन १५ लक्ष चौ. मी. होते व ते १९६०-६१ मध्ये ४० लक्ष चौ.मी. पर्यंत वाढले.
तिसऱ्या योजनेच्या काळात लोकर उद्योगाची चालू क्षमता पुरेशी असल्याने तीत विस्तार करण्यात आला नाही. योजनेच्या शेवटी (१९६६) गालिच्याच्या व पुनःप्राप्त सुतासह लोकरी व वर्स्टेड सुताचे उत्पादन १.६६ कोटी किग्रॅ. झाले होते. यातील पुनःप्राप्त सुताचा वाटा ५२ लक्ष किग्रॅ. होता. या योजनेत लोकरी व वर्स्टेड कापडाच्या उत्पादनात फारशी वाढ झाली नाही. परिधानक्षम व अपरिधानक्षम कापडांचे एकूण उत्पादन १९६६ मध्ये १.३३ कोटी मी. होते.
चौथ्या योजनेच्या प्रारंभी संघटित क्षेत्रात ९६ गिरण्या होत्या, त्यांपैकी ४४ संयुक्त व ५२ सूत गिरण्या होत्या. त्यांची क्षमता लोकरी चात्या ६६,२६० वर्स्टेड चात्या १,४०,८८० पुनःप्रापण चात्या २१,८२१ व माग (विकेंद्रित क्षेत्रासह) ३,६०० होती. त्यांची सुताची क्षमता ३.२३ कोटी किग्रॅ. होती. आयात कच्च्या मालाच्या अभावी ही क्षमता फारच थोडी वापरली गेली आणि त्यामुळे लोकरी व वर्स्टेड सुताचे (पुनःप्राप्त व गालिचा सुतासह) १९६९ मधील उत्पादन १.८८७ कोटी किग्रॅ. होते. त्या वर्षी परिधानक्षम लोकरी व वर्स्टेड कापडाचे उत्पादन १.२६३ कोटी मी. आणि अपरिधानक्षम कापडाचे ४२.३ लक्ष किग्रॅ. होते. योजनेच्या अखेरीस (१९७४) संघटित गिरण्यांची संख्या शंभरावर गेली व त्यांतील तीन सरकारी क्षेत्रात होत्या. त्या वेळी चात्यांची अंदाजित संख्या वर्स्टेड २,०४,८१८ लोकरी १,१४,५०० व पुनःप्रापण २४,४२३ अशी होती. संघटित व
कोष्टक क्र. ६. राज्यवार संघटित लोकर गिरण्यांची १९८२ मधील क्षमता |
|||||||||
राज्य वा केंद्रशासित प्रदेश |
गिरण्यांची संख्या |
क्षमता |
|||||||
सूत |
संयुक्त |
एकूण |
वर्स्टेड चात्या |
पुनःप्रापण चात्या |
लोकरी चात्या |
इतर चात्या |
एकूण |
यंत्रमाग |
|
उत्तर प्रदेश |
१३ |
१ |
१४ |
१०,९३६ |
३,७०८ |
१२,२०० |
− |
२६,८४४ |
२६० |
कर्नाटक |
२ |
१ |
३ |
२,००० |
— |
१,२०० |
११,१२४ |
१४,३२४ |
२४३ |
गुजरात |
१ |
२ |
३ |
१०,३४० |
८८० |
५,२३२ |
—- |
१६,४५२ |
१९४ |
जम्मू व काश्मीर |
७ |
२ |
९ |
१२,३१८ |
१,२०० |
२,५०६ |
—- |
१६,०२४ |
३१ |
नवी दिल्ली |
१३ |
— |
१३ |
२,४६४ |
४,८०० |
१६२ |
—- |
७,४२६ |
— |
पंजाब |
८९ |
१६ |
१०५ |
१,१३,७११ |
१७,८०४ |
२९,४८९ |
—- |
१,६१,००४ |
८६० |
पश्चिम बंगाल |
३ |
३ |
६ |
७,५१२ |
१,६२० |
१,३८० |
—- |
१०,५१२ |
८५ |
महाराष्ट्र |
२० |
९ |
२९ |
६३,२६० |
१५,४८४ |
८,४६४ |
|
८७,१९२ |
७२० |
राजस्थान |
२१ |
१ |
२२ |
२,८०० |
५,४०० |
७,६५६ |
—- |
१५,८५६ |
१० |
हरियाणा |
१८ |
— |
१८ |
४,६७० |
५,२५० |
७,१२८ |
— |
१७,०४८ |
—- |
हिमाचल प्रदेश |
२ |
— |
२ |
— |
२,९८० |
— |
—- |
२,९८० |
—- |
एकूण |
१८९ |
३५ |
२२४ |
२,३०.०११ |
५९,१०६ |
७५,४२१ |
११,१२४ |
३,७५,६६२ |
२,४०३ |
विकेंद्रित या दोन क्षेत्रांत मिळून ३,८६७ यंत्रमाग होते. वर्स्टेड सुताचे उत्पादन ८६ लक्ष किग्रॅ. व लोकरी सुताचे (गालिच्याच्या सुतासह) २.१ कोटी किग्रॅ. होते. अपिरधानक्षम लोकरी वस्तूंचे उत्पादन ५५ लक्ष किग्रॅ. तर परिधानक्षम कापडाचे २.२७ कोटी मी. होते.
राज्यवार संघटित गिरण्यांविषयीची १९८२ मधील आकडेवारी कोष्टक क्र. ६ मध्ये दिली आहे.
भारतातील वरील २२४ गिरण्यापैकी पुढील फक्त ३ गिरण्या सरकारी क्षेत्रातील होत्या : (१) राजस्थान गव्हर्न्मेंट वर्स्टेड स्पिनिंग मिल्स, चुरू, राजस्थान (२) काश्मीर गव्हर्न्मेंट वुलन मिल्स, शिरीनबाग, श्रीनगर, जम्मू व काश्मीर (३) गव्हर्न्मेंट स्पिनिंग मिल्स, नौशेरा, श्रीनगर, जम्मू व काश्मीर. खाजगी क्षेत्रातील गिरण्यांपैकी काही मोठ्या गिरण्यांची नावे व त्यांतील यंत्रमागांची संख्या (ही कंसात दिली आहे) पुढीलप्रमाणे : (१) बाँबे फाइन वर्स्टेड मॅन्युफॅक्चरर्स , कॅसल मिल्स, मुंबई (१९६) (२) द रेमंड वुलन मिल्स लि., मुंबई (१९९) (३) बिन्नी लि., बंगलोर (२४३) (४) न्यू एजर्टन वुलन मिल्स ,धारिवाल (२४०) (५) कानपूर वुलन मिल्स लि., कानपूर (२६०)(६) श्री दिग्विजय वुलन मिल्स लि., जामनगर (११४) (७) मॉडेला टेक्स्टाइल इंडस्ट्रिज लि., मुंबई (१२०) (८) श्री दिनेश मिल्स, बडोदे (८०) (९) इंडिया वुलन टेक्स्टाइल मिल्स लि., अमृतसर (१२३) (१०) ओरिएंटल कार्पेट मॅन्युफॅक्चरर्स (इंडिया)लि., अमृतसर (१००). जगातील इतर देशांतील मोठ्या लोकर गिरण्यांशी तुलना करता भारतातील लोकर गिरण्या खूपच लहान आहेत. फारच थोड्या गिरण्यांची क्षमता ५,००० वा १०,००० चात्यांच्या वर आहे. बहुतांश गिरण्यांची क्षमता ३,००० ते ५,००० चात्या एवढीच आहे.
पुनःप्रापण उद्योग : संघटित लोकर उद्योगाचे हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या उद्योगात रग, मेल्टन, ट्वीड, फ्लॅनेल, ब्लेझर, व्हेलर यांसारखी स्वस्त कापडे तसेच सैन्याला लागणारी ब्लँकेटे तयार करण्यात येतात. १९५६ मध्ये हा उद्योग सुरू झाला तेव्हा १,२६० चात्या एवढीच त्याची क्षमता होती. १९७५ मध्ये ती २४,४२३ चात्या व १९८२ मध्ये ५९,१०६ चात्या इतकी वाढली. १९७५ मध्ये या उद्योगात २८ गिरण्या होत्या आणि त्या हरियाणा (३), हिमाचल प्रदेश (१), महाराष्ट्र (१०), पंजाब (११) , उत्तर प्रदेश (१) व पश्चिम बंगाल (२) या राज्यांत होत्या. हा उद्योग कच्च्या मालाच्या बाबतीत जवळजवळ पूर्णपणे आयात निरूपयोगी (विशेषतः चिंध्यांच्या स्वरूपातील) लोकरीवर अवलंबून आहे. पुनःप्राप्त लोकरीचा दरवर्षीचा उद्योगातील खप सु. तीन कोटी किग्रॅ. इतपत आहे. या लोकरीच्या सुताचे दर वर्षीचे उत्पादन सु. दोन कोटी किग्रॅ. असून दर वर्षी सु. एक कोटी ब्लँकेटे तयार होतात.
लोकर विंचरण्याचा उद्योग : १९६१ पावेतो भारतीय लोकर उद्योग वर्स्टेड सूत तयार करण्यासाठी पूर्णपणे आयात केलेल्या पेळूंवर अवलंबून होता. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व जपान येथून पेळू मुख्यत्वे आयात करण्यात येत. उपलब्ध देशी लोकरीचे पेळू बनवून परदेशी चलन वाचविण्यासाठी १९६० मध्ये लोकर विंचरणाऱ्या गिरण्या स्थापन करण्यासाठी परवाने देण्यात आले. लोकर विंचरण्याची पहिली आधुनिक गिरणी १९६१ मध्ये कलकत्ता येथे स्थापन झाली. १९६२ मध्ये लुधियाना येथे दोन गिरण्या सुरू झाल्या. १९६९ मध्ये संकरित लोकर विंचरणाऱ्या १० गिरण्या होत्या व त्यांची परवाना असलेली एकूण क्षमता १.७६ कोटी किग्रॅ. होती. याखेरीज काही लहान प्रमाणावर लोकर विंचरणारे स्वतःच्या वापरासाठी हे काम करीत होते. या उद्योगातील एकूण फण्यांची संख्या २०० होती. १९७५ मध्ये लोकर विंचरणाऱ्या १५ गिरण्या होत्या आणि त्या हरियाणा (१), महाराष्ट्र (३), पंजाब (६), राजस्थान (२), उत्तर प्रदेश (२) व पश्चिम बंगाल(१) या राज्यांत होत्या. या गिरण्यांची क्षमता २.१ कोटी किग्रॅ. होती. देशी तसेच आयात लोकरीपासून तयार केलेल्या पेळूंचे उत्पादन १९७१ मध्ये १.४४ कोटी किग्रॅ. तर १९७४ मध्ये ते १.१७ कोटी किग्रॅ. होते. १९८२ मध्ये या उद्योगातील फण्यांची एकूण संख्या २६३ होती.
लोकरी खादी व हातमाग : लोकर उद्योगाच्या विकेंद्रित क्षेत्रात खादी (सूतकताई व विणकाम) व हातमाग (विणकाम) हे घटक येतात. हे क्षेत्र भारतात सर्वत्र पसरलेले असून विशेषतः खेड्यांत ते केंद्रित झालेले आहे. १९३१−५३ या काळात ऑल इंडिया स्पिनर्स ॲसोसिएशन ही संस्था लोकरी खादीच्या उत्पादनास व विक्रीस जबाबदार होती. खादी व ग्रामोद्योग मंडळ १९५३ मध्ये स्थापन झाले आणि नंतर खादी व ग्रामोद्योग आयोग १९५७ मध्ये स्थापन झाल्यावर त्याने लोकरी खादीच्या विकासाचे काम हाती घेतले. लोकरी खादीचे उत्पादन व विक्री दोनशेहून अधिक नोंदणीकृत संस्था वा सहकारी संस्था यांच्यातर्फे केली जाते. अखिल भारतीय हस्तकला मंडळ, अखिल भारतीय हातमाग मंडळ, विविध राज्यांतील कला विक्रयालये व विणकर औद्योगिक संस्था लोकरी खादी व हातमाग उद्योगाला उत्तेजन देतात. लोकरी खादीच्या निर्मितीसाठी बहुतांशी देशी लोकरच वापरण्यात येते. विकेंद्रित क्षेत्रात विक्रीसाठी भरड लोकरी सूत कातण्याबरोबरच कांबळी, गालिचे, हातऱ्या, शाली, भरड ट्वीड वगैरेंची निर्मिती करण्यात येते. यांखेरीज काही ठिकाणी स्वेटर, पायमोजे व हातमोजे यांचेही उत्पादन करतात. [⟶हातमाग उद्योग].
मिश्र तंतूंचे कापड : टेरीलीन हा पॉलिएस्टर तंतू भारतात १९५० नंतर प्रचारात आला. टेरीलीन व लोकर यांच्या मिश्रणाने कापड लवकरच लोकप्रिय झाले. त्यानंतर टेरीन हा पॉलिएस्टर तंतू भारतात विकसित करण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय मानकांना (प्रमाणांना) उतरणारे टेरीन−लोकर मिश्र कापड मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येऊ लागले. सुटाचे हलक्या वजनाचे टेरीन−लोकर कापड पुष्कळ लोकप्रिय झाले. मध्यम व जड वजनाचे टेरीन−लोकर व टेरीन−वर्स्टेड कापड काही गिरण्या तयार करतात. मिश्र तंतूंचे कापड टिकाऊ असते आणि त्यात आकारस्थैर्य, चुणीरोधक, घर्षणाने झीजण्यास रोधक व कृत्रिम तंतूंचे इतर सर्वसाधारण गुणधर्म असतात. टेरीन व लोकर यांची विविध गुणोत्तरे असलेली कापडे तयार करतात. त्यांपैकी हलक्या वजनाची ५५ : ४५ गुणोत्तराची व जड वजनाची २०:८० गुणोत्तराची कापडे सर्वांत लोकप्रिय आहेत.
होजियरी : भारतातील लोकरी होजियरी उद्योगाचा, काही थोडी मोठी उत्पादन केंद्रे सोडली, तर मुख्यत्वे लघू उद्योगातच अंतर्भाव होतो. जवळजवळ ९०% उत्पादन केंद्रांत २० पेक्षा कमी कामगार आहेत. हा उद्योग पंजाबमध्ये (विशेषतः लुधियाना येथे) केंद्रित झालेला असून देशातील जवळजवळ ९०% लोकरीचा होजियरी माल पंजाबात तयार होतो. १९७५ मध्ये होजियरी तयार करणाऱ्या २,८४० लघू उद्योग केंद्रांपैकी २,७९२ केंद्रे लुधियाना व त्याच्या जवळपास होती. १९५० मध्ये या उद्योगाचे उत्पादन २ कोटी रूपयांचे होते व नंतर योजना काळात ते वाढत जाऊन १९७५ मध्ये ३० कोटी रूपयांपर्यंत गेले. या उद्योगात प्रत्यक्षपणे ३,००० व अप्रत्यक्षपणे १ लक्ष लोकांना रोजगार मिळालेला आहे. या उद्योगात कार्डिगन, स्वेटर, पुलओव्हर, पायमोजे, हातमोजे, मफलर वगैरे प्रकारच्या मालाचे उत्पादन करण्यात येते. यांपैकी बहुतेक माल शुद्ध लोकरीपासून तयार करण्यात येतो पण लोकर व कृत्रिम तंतू यांपासून केलेला मालही लोकप्रिय झालेला आहे. [⟶ होजियरी].
शाली : भारतात कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात लोकरीच्या शाली सु. ५,००० वर्षे वापरण्यात येत आहेत परंतु मोगल काळातच तलम पोताच्या व नाजूक भरतकाम केलेल्या शाली तयार होऊ लागल्या. एकोणिसाव्या शतकात यूरोपात भारतीय शालींची कीर्ती पसरली. सुप्रसिद्ध पश्मीना शालीच्या विणकामाचा उद्योग जम्मू व काश्मीर राज्यातील श्रीनगर व बसोली येथे केंद्रित झालेला आहे.स्वतःच्या मागावर पश्मीना कापड विणणाऱ्या कारागीर कुटुंबांखेरीज खादी व ग्रामोद्योग आयोग, श्री गांधी आश्रम, काश्मीर गव्हर्न्मेंट आर्ट्स एंपोरियम व पश्मीन विव्हर्स इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्यातर्फे पश्मीना कापडाचे विणकाम करण्यात येते.
लोकरीच्या भरतकामाच्या उद्योग हा जम्मू व काश्मीरमध्ये सर्वांत मोठा कुटीरोद्योग असून तो श्रीनगर व त्याच्या जवळपासच्या खेड्यांत केंद्रित झालेला आहे. या उद्योगाच्या उत्पादनात बहुतांश भाग भरतकाम केलेल्या शालींचा असून टोप्या, कोट, ब्लातउझ वगैरेंचेही उत्पादन होते. स्वतंत्रपणे किंवा लहान कारखान्यांत वा गव्हर्न्मेंट आर्ट्स एंपोरियमच्या उत्पादन केंद्रात काम करणारे कारागीर भरतकाम करतात. हिमालयी आयबेक्स (मार्खोर) या रानबोकडापासून शाहतूश शाली, आयात ऑस्ट्रेलियन लोकरीपासून रफल शाली तसेच कानी व इतर विविध प्रकारच्या शाली भारतात तयार करण्यात येतात. हिमाचल प्रदेशात उपलब्ध असलेल्या लोकरीपासून रामपूर चादर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या साध्या शाली तयार होतात. [⟶शाल].
गालिचे : भारतीय गालिचा उद्योगाचे मूळ इसबी सनाच्या प्रारंभापर्यंत शोधता येते. सोळाव्या शतकात मोगल काळात पर्शियाहून आणल्या गेलेल्या कारागिरांमुळे या उद्योगास चालना मिळाली. सतराव्या व अठराव्या शतकांत या उद्योगाला मंदी आली होती. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात फक्त काश्मीरमध्येच हा उद्योग केंद्रित झालेला होता. १८६२ मध्ये पंजाब व इतर राज्यांतील काही कारागृहांत गालिच्यांचे विणकाम करण्यात येऊ लागले. यामुळे या उद्योगाला पुनरूज्जींवन मिळाले आणि त्याची समाधानकारक प्रगती होऊ लागली पण १९३० व त्यानंतरच्या काळात पुन्हा मंदी आली. १९३८ मध्ये काश्मीर सरकारने या उद्योगाच्या पुनर्वसनासाठी अर्थसाहाय्य दिले व १९४३ मध्ये उद्योगाचा चांगला जम बसल्यावर हे अर्थसाहाय्य काढून घेण्यात आले.
गालिच्याचे विणकाम हा परंपरागत उद्योगाचा भाग असल्याने बहुतांश भारतीय गालिचे हाताने तयार केलेले असतात. चांगल्या दर्जाच्या गालिच्यांसाठी मात्र यंत्राने कताई केलेले सूत वापरतात. भारतीय गालिचे विविध रंगांत, छटांत व नक्ष्यांत तयार करण्यात येतात. गालिचा उद्योग हा निर्यातीभिमुख व श्रमप्रधान कुटीरोद्योग आहे. हा उद्योग मुख्यत्वे पूर्व उत्तर प्रदेश (मिर्झापूर व भदोई, आग्रा), ग्वाल्हेर, अमृतसर व श्रीनगर येथे केंद्रित झालेला आहे. याखेरीज आंध्र प्रदेशातील एलुरू, पश्चिम उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर व बिहारमधील मधुबनी येथे गालिच्यांचे विणकाम केले जाते.
काश्मीरी गालिच्यांना पश्चिमी देशांत लाभलेल्या प्रतिष्ठेचे बरेचसे श्रेय मिचेल अँड कंपनीला जाते. या कंपनाने काश्मीरमध्ये पहिला गालिच्यांचा कारखाना चालू केला व त्यांची निर्यात करण्यास प्रारंभ केला. १९७० च्या सुमारास काश्मीरमध्ये सु. १,५०० गालिच्यांचे माग होते. त्यांपैकी १,००० खाजगी कारखान्यांत आणि उरलेले राज्य सरकारच्या वा सहकारी संस्थांच्या मालकीचे होते. बहुतांश भारतीय गालिच्यांची निर्मिती भदोही व मिर्झापूर येथे होते. तेथे ७५,००० विणकर कामाला असून अभिकल्पन (आराखडा तयार करणे), रंगकाम, धुलाई वगैरे संबंधित कामांत १५,००० कामगार गुंतलेले आहेत. या केंद्रांत तयार करण्यात येणारे गालिचे सामान्यतः जाडेभरडे असतात पण काही प्रमाणात तलम गालिच्यांचीही निर्मिती करण्यात येते. भारतीय गालिच्यांपैकी सु. ९०% गालिच्यांची निर्यात केली जाते. १९७३-७४ मध्ये २५ कोटी रूपये किंमतीचे गालिचे निर्यात करण्यात आले होते.
यंत्रनिर्मित झुबकेदार (टफ्टेड) गालिचे भारतात प्रथम भारत कार्पेट्स या कंपनीने फरिदाबाद येथे तयार केले. हे गालिचे लांब गुंडाळ्यांच्या स्वरूपात व निरनिराळ्या रूंदींचे तयार करतात आणि ते जमिनीच्या आकारमान व आकारानुसार कापता येतात. १९७३-७४ मध्ये अशा गालिच्यांचे उत्पादन २,८२,०९२ मी. झाले होते.
नमदा हे हाताने फेल्टिंग केलेले जाड्याभरड्या लोकरीचे रग जम्मू व काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात. हे गालिचे स्वस्त असून त्यांना भारतात व परदेशीही चांगली बाजारपेठ आहे. १९७३-७४ मध्ये नमद्याचे उत्पादन ५५ लक्ष रूपयांचे व निर्यात ७५ लक्ष रूपयांची झाली होती. [⟶फेल्ट].
गुभा हे जाडेभरडे व स्वस्त रग असून ते जुन्या कापडाच्या ब्लँकेटांच्या व शालींच्या तुकड्यांपासून तयार करतात. हा उद्योग जम्मू व काश्मीरमध्येच असून तो एक शतकाहून अधिक जुना कुटीरोद्योग आहे. ड्रगेट हे जाडेभरडे जमिनीवर अंथरावयाचे रग हाताने कातलेले लोकरी सूत ताणा म्हणून व कापसाचे सूत बाणा म्हणून वापरून तयार करतात. तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांत मुख्यत्वे याची उत्पादन केंद्रे आहेत. [⟶गालिचे].
भारतीय लोकर : भारतात लोकर बहुतांशी मेंढ्यांपासून मिळविण्यात येते. भारतातील मेंढ्यांची संख्या सु. ४.२ कोटी असून त्यांपासून दर वर्षी सु. ३.५ कोटी किग्रॅ. लोकर मिळते. प्रदेश व जात यांनुसार कमीअधिक प्रमाणात लोकर मिळते. एका कातरणीची लोकर दर मेंढीच्या बाबतीत तमिळनाडूत ०.५ किग्रॅ. तर राजस्थानात २.२ किग्रॅ. मिळते आणि दर कोकराच्या बाबतीत बिहारमध्ये २२७ ग्रॅ. तर राजस्थानात १ किग्रॅ. मिळते. भारतात दर मेंढीमागे सरासरीने ०.९ किग्रॅ. लोकर मिळते, तर तुलना करता ऑस्ट्रेलियन मेंढीपासून सरासरीने ४ किग्रॅ. मिळते. एकूण भारतीय लोकरीपैकी सु. ५७% लोकर जाडीभरडी वा मिश्र प्रकारची असून उरलेली कापड तयार करण्याच्या गुणवत्तेची असते. यामुळे दर वर्षी बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकर आयात करावी लागते. पश्मीना ही सर्वांत तलम भारतीय लोकर मात्र मेंढीपासून नव्हे, तर हिमालयी रानबोकडांपासून मिळते.
भारतात लोकरीचे पद्धतशीर वर्गीकरण प्रचारात नाही. निर्यातीच्या व्यापारात मेंढ्यांच्या जाती व प्रकार यांपेक्षा प्रादेशिक नामकरणानुसार असलेले वर्गीकरण वापरण्यात येते. निर्यात व्यापारात ओळखले जाणारे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे : जोरीया (उत्तम पांढरी, प्रथम पांढरी, प्रथम पिवळी, फिकट करडी) हर्णाई (पांढरी, करडी) बिकानेरी ( अतिशय पांढरी, उत्तम फिकट पिवळी, प्रथम पिवळी, सरासरी पांढरी, करडी, काळी) राजपुताना (पांढरी, पिवळी, करडी) बीव्हर (पांढरी, पिवळी, काळी) मारवाड (पांढरी, पिवळी, करडी) विकानेर वा बिकानेर त्वचा लोकर (पांढरी, पिवळी) आणि सामान्य काळी व करडी.
जगातील इतर लोकरींच्या मानाने भारतीय लोकरींत आढळणारे लवचिकपणा व झीज रोधकता हे गुणधर्म अनन्यसाधारण आहेत. जाड्याभरड्या भारतीय लोकरीच्या तंतूचा काटच्छेद तलम लोकरीच्या तंतूपेक्षा अधिक दीर्घवर्तुळाकार असतो. तिचा तलमपणा जातीनुसार व ऋतुनुसार बदलतो. तिच्या तंतूंची लांबी संकरित वा मेरिनो लोकरीपेक्षा जास्त असते. एकाच जातीच्या निरनिराळ्या मेंढ्यांत तंतूंची लांबी बरीच वेगवेगळी आढळते. बहुतेक जाड्याभरड्या लोकरीत लाटा अजिबात नसतात अथवा फार कमी असतात. भारतीय लोकरींची फेल्टिंगची क्षमता अल्प आहे आणि त्यांचे इतर तंतूंबरोबर मिश्रण करणे अवघड असते. दिलेल्या आर्द्रतेत मेरिनो लोकरीपेक्षा त्यांत कमी आर्द्रतेचे शोषण होते. संकरित वा मेरिनो लोकरींपेक्षा त्यांतील ग्रीजाचे प्रमाण सूचक इतके कमी असते. त्यांतील स्विंटचे प्रमाण मेरिनो लोकरीपेक्षा जास्त असते. प्रदेशानुसार त्यांत विविध प्रकारच्या काटेरी बिया तसेच गवते, काटक्या, काटे वगैरे वनस्पतिज पदार्थ असतात.
मेरिनो लोकरीच्या मानाने भारतीय लोकरीत गंधकाचे प्रमाण (सिस्टिन) कमी व लँथिओनिनाचे प्रमाण जास्त असते. बहुतेक भारतीय लोकरीतील गंधकाचे प्रमाण २.८ ते ३.१% असते. विविध जातींच्या मेंढ्यांच्या लोकर प्रथिनांतील (केराटिनांतील) नायट्रोजन प्रमाण साधारणपणे सारखेच आढळते. भारतीय टायरोसिनाच्या प्रमाणाचा तिच्या तलमपणाशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. जाड्याभरड्या लोकरीतील टायरोसीन प्रमाण (४.० ते ५.५%) संकरित लोकरीपेक्षा (६.७%) कमी असते. विविध भारतीय लोकरींतील ट्रिप्टोफेनाचे प्रमाण जवळजवळ सारखे (०.७५ ते ०.८०%) असल्याचे आढळते. काही भारतीय लोकरींतील लँथिओनिनाच्या उच्च प्रमाणामुळे त्या कसररोधक असतात.
भारतीय लोकरींचा रंग सामान्यतः पांढरा (चकचकीत ते हस्तिदंती), तपकिरी, काळा व करडा असतो. यांपैकी शेवटचे तीन दक्षिण भारतीय लोकरींत आढळतात. फिकट ते गर्द पिवळ्या (कॅनरी) रंगाचे न धुता येणारे डाग असलेल्या लोकरीही आढळतात. या लोकरींचे ताणबल कमी असून त्या स्पर्शाला खरखरीत असतात. भारतीय लोकरींचे रंजनक्रिया गुणधर्म सामान्य आहेत. काही भरड वा गालिच्याच्या लोकरींतील केंप व केसाळ तंतू यांमुळे त्यांच्या रंजनक्रियेत मोठी अडचण उप्तन्न होते. केंप हे आखूड, मध्यकाचे (गाभ्याचे) प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत असलेले, अतिशय ठिसूळ व रंजक द्रव्य बद्ध न होणारे तंतू असतात. भारतीय लोकरीत त्यांचे प्रमाण ० ते २०% असून गालिच्याच्या लोकरीत ५% असते.
प्रतवारी व विपणन : भारतीय लोकरीची प्रतवारी ⇨ॲगमार्क अन्वये करण्याची १९५५ मध्ये सक्ती करण्यात आली. १९३७ च्या शेतमाल (प्रतवारी व विपणन) कायद्यानुसार तयार केलेल्या आणि वेळोवेळी दुरु स्त्या केलेल्या) लोकर प्रतवारी व विपणन नियमांप्रमाणे प्रतवारी केल्याशिवाय कच्ची लोकर निर्यात करता येत नाही. लोकरीसंबंधीचे विनिर्देश प्रकार, रंग, स्वच्छता व सर्वसाधारण स्वरूप यांवर आधारलेले आहेत. देशातील महत्त्वाच्या लोकर उत्पादक प्रदेशांतील लोकरीच्या पुढील चार स्थूल प्रती ठरविण्यात आल्या आहेत : जाडीभरडी, मध्यम−१, मध्यम−२ व तलम. देशातील महत्त्वाची प्रतवारी केंद्रे भावनगर, जामनगर, मद्रास, मुंबई, अमृतसर, फाझिल्का, बिकानेर व जयपूर येथे आहेत. भारतातील महत्त्वाची लोकर विपणन केंद्रे कालिपाँग, कलकत्ता, गया, मुंबई, पुणे, राजकोट, बडोदे, मद्रास फाजिल्का, अमृतसर, पानिपत, कुलू, बंगलोर व श्रीनगर येथे आहेत.
मानके : ⇨भारतीय मानक संस्थेने कच्ची लोकर, लोकरी कापड, ब्लँकेट, फेल्ट, होजियरी, सुयांनी विणलेले कपडे, गालिचे, लोकरी हातमाग कापड वगैरेंकरिता त्यांच्या आवेष्टनाकरिता व परीक्षणाकरिता मानके तयार केलेली आहेत. उदा., लोकरीच्या तलमपणाच्या प्रती− आय एस ५९१०−१९७०, हातमाग लोकर ट्वीड−आय एस १२६५−१९५८, कच्च्या लोकरीतील केंपचे प्रमाण निर्धारित करण्याची पद्धत – आय एस १३४८−१९७१, निर्यातीच्या कच्च्या लोकरीच्या आवेष्टनाकरिता संहिता−आय एस २१५६−१९६२. इंटरनॅशनल वुल सेक्रेटरिएटने भारतीय हस्तनिर्मित गालिच्यांच्या उत्पादकांना त्यांच्या मालावर मानकदर्शक विशिष्ट (वुलमार्क) लेबल लावण्यास मान्यता दिलेली आहे.
भारतातील लोकर उद्योगातील लोकरीचे उत्पादन, विविध क्षेत्रांतील लोकरीचा वार्षिक खप व लोकरीच्या कापडाचे उत्पादन यांसंबंधीची आकडेवारी अनुक्रमे कोष्टक क्र. ७,८ व ९ यांमध्ये दिलेली आहे.
आयात व निर्यात : भारतात मुख्यतः वायव्येकडील प्रदेशांत व दक्षिणेकडील उष्ण व दमट प्रदेशांत लोकरीचे उत्पादन होते. या लोकरीचा मुख्यत्वे मध्यम व जाड्याभरड्या लोकरी मालासाठी उपयोग होत असल्याने संघटित लोकर गिरण्यांना आयातीवर अवलंबून राहावे लागते. भारतात २०−२२ जातींच्या लोकरींचे उत्पादन होत असले, तरी उत्तम लोकरी मालासाठी आयात व पर्यायाने निर्यात अत्यावश्यक आहे. भारतातून मुख्यत्वे हस्तनिर्मित गालिच्यांची व कच्च्या लोकरीची निर्यात होते तथापि लोकरी व मिश्र तंतूंचे कापड, होजियरी, सुयांनी विणलेले कापड आणि तयार कपडे या मालालाही चांगली मागणी आहे. हा माल कडक आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असल्याने या मालाचा एकूण निर्यातीत सु. ४०% वाटा असतो. भारतातून
कोष्टक क्र. ७. भारतातील कच्ची लोकर, पेळू, सूत यांचे उत्पादन व खप (लक्ष किग्रॅ.मध्ये.आकडे पूर्णाकांत). |
|||
लोकर प्रकार |
१९७८ |
१९८३ |
१९८८ |
कच्ची लोकर वर्स्टेड लोकर |
११० १७० |
१६० २१० |
१९० १६० |
अन्य तंतूचा खप अन्य लोकर मानवनिर्मित तंतू |
१५० ४० |
५०० १७० |
२५० २२० |
पेळूंचे उत्पादन लोकर मानवनिर्मित तंतू |
१०० ६० |
१५० १७० |
१७० १६० |
वर्स्टेड पेळूंचा खप (कताईसाठी) लोकर मानवनिर्मित तंतू मिश्रित |
१०० ६० |
१५० ११० |
१७० १६० |
सूत उत्पादन वर्स्टेड लोकरी |
१५० २७० |
२३० २६० |
२९० २१० |
मागावर विणण्यासाठी सुताचा खप लोकरी मानवनिर्मित तंतू मिश्रित |
२० ६० |
५० १६० |
३० २२० |
कोष्टक क्र. ८. लोकर उद्योगाच्या विविध क्षेत्रांतील लोकरीचा वार्षिक खप (लक्ष किग्रॅ.मध्ये). |
|||
क्षेत्र |
शुद्ध लोकर |
लोकर मिश्रण |
एकूण |
विणलेले कापड |
१० |
१३० |
१४० |
सुयांनी विणलेले कापड / कपडे |
१०० |
१० |
११० |
हस्तनिर्मित गालिचे |
१८० |
− |
१८० |
यंत्रनिर्मित गालिचे |
४० |
१० |
५० |
ब्लँकेट व अन्य संरक्षण साहित्य |
३५ |
१५ |
५० |
अन्य वस्तू (खादी कापडासह) |
२० |
१० |
३० |
एकूण |
३८५ |
१७५ |
५६० |
कोष्टक क्र. ९ भारतातील लोकरीच्या कापडाचे उत्पादन |
||||
कापड प्रकार |
१९७७-७८ |
१९८०-८१ |
१९८४-८५ |
१९८७-८८ |
वर्स्टेड / लोकरी कापड (लक्ष मी.) |
२३० |
३३४ |
४२३ |
५६० |
पुनःप्राप्त कापड (लक्ष मी.) |
− |
५४ |
१६५ |
५५ |
सुयांनी विणलेले कापड (लक्ष किग्रॅ.) |
५० |
११० |
१३१ |
१६० |
हस्तनिर्मित गालिचे (लक्ष मी.) |
६० |
४० |
५५ |
५० |
यंत्रनिर्मित गालिचे (लक्ष मी.) |
− |
− |
१६ |
१४ |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, रशिया, चेकोस्लोव्हाकिया, बहारीन, लिबिया, हाँगकाँग, सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन वगैरे देशांना निर्यात होते.
कोष्टक क्र. १०. भारतातून होणारी लोकर मालाची निर्यात |
|||
मालाचे वर्णन |
१९८०-८१ |
१९८५-८६ |
१९८७-८८ |
लोकरी / वर्स्टेड कापड |
२.५१ |
४.०० |
५.१० |
लोकर व अन्यतंतू मिश्रित कपडे |
०.८४ |
०.७८ |
− |
ब्लँकेटे |
४.९६ |
१.९८ |
२.१ |
गालिचे |
११३.५८ |
१३३.२० |
२००.०० |
शाली |
०.६६ |
०.५० |
५.१० |
सुयांनी विणलेल्या कापडांचे व अन्य कपडे |
४०.२४ |
५५.९३ |
६८.७५ |
वुल अँड वुलन्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल याची भारत सरकारने लोकर उद्योगाच्या व व्यापाराच्या सहकार्याने १९६४ मध्ये स्थापना केली. कच्ची लोकर, लोकरी/वर्स्टेड कापड, सुयांनी विणलेले कापड, ब्लँचकेटे, शाली, लोही, गालिचे व रग या भारतीय लोकर मालासाठी परदेशी बाजारपेठा मिळविणे व त्यांचा विस्तार करणे याकरिता हे कौन्सिल व्यापक जनसंपर्क व प्रसिद्धी कार्यक्रम चालविते.
भारतीय लोकर उद्योग आयात कच्च्या लोकरीवर व लोकरीच्या पेळूंवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कच्ची लोकर मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अर्जेंटिना येथून आयात करण्यात येते. लोकरीचे पेळू मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि जपान येथून आयात केले जातात. लोकरी कापड, ब्लँकेटे, रग, फेल्ट व फेल्ट वस्तू यांचीही आयात करण्यात येते पण ती बऱ्याच कमी प्रमाणात होते. १९६९-७० नंतर गालिच्यांची आयात करण्यात आली नाही. याखेरीज लोकर गिरण्यांना लागणारी यंत्रसामग्री मुख्यत्वे ब्रिटन, फ्रान्स व कॅनडा येथून आयात केली जाते.
संशोधन व विकास : आयात लोकरीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेने तलम लोकरीच्या मेंढ्यांसंबंधीचा संशोधन प्रकल्प हाती घेतला. यात रॅम्ब्युलेट व मेरिनो यांसारख्या विदेशी जातींचे जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांतील आणि उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान व इतर राज्यांतील निवडक भागांमधील देशी जातींशी संकरण करून कपड्यांच्या गुणवत्तेची लोकर देऊ शकेल अशा मेंढ्यांची पैदास करण्याचे उद्दिष्ट आहे. लोकरीतील केसांच्या तंतूंचे प्रमाण कमी असेल अशा मेंढ्यांच्या जाती तयार करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. मध्यम प्रतीच्या कॉरिडेल जातींच्या मेंढ्यांशी संकरण करण्याचे प्रयत्न पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांत करण्यात येत आहेत. माग्रा, मारवाडी, पुगल व जैसलमिरी या गालिच्याच्या लोकरीच्या मेंढ्यांच्या जातीही सुधारण्यात येत आहेत.
मेंढ्या व लोकर यांसंबंधीच्या संशोधन करणाऱ्या भारतातील प्रमुख संस्थांत अहमदाबाद येथील सेंट्रल शिप अँड वुल डेव्हेलपमेंट कॉर्पोरेशन व मालपुरा (राजस्थान) येथील सेंट्रल शिप अँड वुल रिसर्च इन्स्टिट्यूट यांचा समावेश होतो. यांतील दुसरी संस्था इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चच्या अखत्यारीखाली असून तिला संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेची अंशतः मदत मिळते. या संस्थेचे हरियाणातील कुलू (फर ॲनिमल ब्रिडिंग) व राजस्थानातील बिकानेर (कार्पेट वुल अँड काराकुल फेल्ट प्रॉडक्शन) येथे विभाग असून कोडईकानल येथे प्रादेशिक केंद्र आहे. या संशोधन संस्थांत मेंढ्याच्या सुधारलेल्या जाती विकसित करणे आणि मेंढ्यांचे संवर्धन, लोकर कापणे, प्रतवारी लावणे, परीक्षण करणे, प्रक्रिया करणे व मेंढीपालनासाठी जमिनीचा अधिक चांगला उपयोग करणे यांसंबंधी संशोधन करणे व प्रशिक्षण देणे ही कार्ये करण्यात येतात. उत्तर भारतीय लोकर पिवळी पडण्याच्या कारणांवरही संशोधन करण्यात येत आहे.
काश्मीरच्या लडाख प्रदेशांतील पश्मीना या रानबोकडांच्या जातीचे आकारमान व लोकरीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तिचे रशियन गोरान अल्ताक्सिया व तुर्की अंगोरा या जातींशी संकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यामुळे पश्मीना लोकरीचे उत्पादन ७०,००० किग्रॅ. पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील धुळे येथे रेमंड वुलन मिल्सतर्फे दर मेंढीमागील लोकरीचे उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने मेंढीची जात विकसित करण्यासंबंधी संशोधन करण्यात येत आहे. हे कार्य ४,३०० हे. जंगल क्षेत्रावर चालू असून अनेक वर्षांच्या संशोधनानंतर नवी भारतीय मेरिनो (गोपाल मेरिनो) जात प्रस्थापित करण्यात आली आहे.
मुंबई येथे वुल रिसर्च ॲसोसिएशन ही संस्था लोकर उद्योग व कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांच्या सहकार्याने १९६३ मध्ये उभारण्यात आली. या संस्थेत लोकरीचा तंतू व सूत, लोकरी कापडांवरील सुधारणा, लोकरीची इतर तंतूंबरोबरील योग्य मिश्रणे विकसित करणे व धुलाईनंतरच्या विद्रावातून लोकर मेण मिळविणे इत्यादींसंबंधी संशोधन करण्यात येते. ही संस्था लोकरीच्या रासायनिक व भौतिक गुणधर्मांचे परीक्षणही करते. दिल्ली येथील श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेनेही भारतीय लोकरींच्या रासायनिक व भौतिक गुणधर्मांविषयी उपयुक्त माहिती संकलित केलेली आहे.
कोष्टक क्र. ११. भारतीय लोकर उद्योगाने आयात केलेली कच्ची लोकर व इतर कच्चा माल (राशी लक्ष किग्रॅ.मध्ये व किंमत कोटी रूपयांत). |
||||||
|
१९७८ – ७९ |
१९८० – ८१ |
१९८२ -८३ |
|||
माल |
राशी |
किंमत |
राशी |
किंमत |
राशी |
किंमत |
कच्ची लोकर |
१३३.३० |
३०.५१ |
१७९.७१ |
४१.५५ |
२६५.०० |
७१.५० |
लोकरीच्या चिंध्या व संश्लिष्ट टाकाऊ माल |
१८९.८७ |
४.९८ |
४७६.४४ |
१२.९७ |
५५०.०० |
१९.२५ |
लोकरीचे पेळू |
४.३३ |
२.०२ |
११.१० |
७.१९ |
५०.०० |
३२.०० |
पॉलिएस्टर तंतू |
४.०९ |
०.३४ |
०.४१ |
०.०६ |
०.५० |
०.०७ |
ॲक्रिलिक तंतू |
७.४२ |
०.८१ |
४.८८ |
०.४५ |
५.०० |
०.४६ |
नायलॉन तंतू |
०.३६ |
०.०७ |
०.००१ |
०.०२ |
०.४० |
०.०७ |
तलम प्राणिज केस |
१.६४ |
०.३४ |
०.५३ |
०.२७ |
२.०० |
१.०२ |
व्हिस्कोज आखूड तंतू |
− |
− |
४.२६ |
०.५५ |
६.०० |
०.७८ |
एकूण |
− |
३९.१३ |
− |
६३.०८ |
− |
१२५.१६ |
नियतकालिके : मुंबई येथील इंडियन वुलन मिल्स फेडरेशन या संघटनेतर्फे वुल अँड वुलन्स ऑफ इंडिया (त्रैमासिक), नवी दिल्ली येथील वुल अँड वुलन्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे वुल न्यूज (मासिक) व वुलन्स अँड वर्स्टेड ऑफ इंडिया (द्विवार्षिक) तसेच मुंबई येथील ईस्टर्न एक्सप्रेस सर्व्हिसेसतर्फे वुल अँड वुलन (मासिक) ही लोकरविषयक नियतकालिके भारतात प्रसिद्ध होतात.
पहा : केस गालिचे तंतु, नैसर्गिक फेल्ट फ्लॅनेल मेंढी वस्त्रे विणकाम शाल शेळी सूतकताईहोजियरी.
संदर्भ : 1. Alexander, P. Hudson, R. F. Wool : Its Chemistry and Physics, London, 1964.
2. Anderson, H. M. Sheep and Wool, Melbourne, 1976.
3. C.S.I.R. The Wealth of India, Industrial Products, Part IX, New Delhi, 1976.
4. Dugan, M. Wool, London, 1979.
5. Editors of Fabrics Magazine, Encyclopedia of Textile, Englewood Clefts, N. J. 1960.
6. Fairservis, W. A. Wool Through the Ages, New York, 1955.
7. Leeder, J. D. Wool : Nature’s Wonder Fibre, Geelong, Australia, 1984.
8. Maclaren, J. A,: Milligan, B. Wool Science : The Chemical Reactivity of the Wool Fibre, Sydney, 1981.
9. Onions, W.J. Wool : An Introduction to Its Properties , Varieties, Uses and Production, New York, 1962.
10. Van Bergen, W., Ed., Wool Handbook, 2 Vols., New York, 1963.
भागवत, रा. शं. भदे, व. ग.
“