लेह−२ : (आयुर्वेद). चाटण, चाटण्याचे औषध, अगदी लहान मुलांना औषध चाटवणे सोईचे असते म्हणून मधात, तुपात कालवून ते चाटवायचे असते. काढे आटवून ते किंवा साखर वा गूळ यांच्या पाकात दाटसर बनवूनच चाटण्यासारखे करतात. त्यांना अवलेह, लेह व प्राश असे म्हणतात. पौष्टिक च्यवनप्राशासारखी औषधे अशी असतात. कार्यस्थान : ही औषधे चाटण्याने घसा व अन्ननलिका या स्थानांवर राहतात. त्यामुळे फुप्फुसांवर त्यांचे कार्य अधिक प्रमाणाने होते. कास, श्वास, पार्श्वशूल व हृदयवेदना या विकारांवर लेह द्यावे. पोटात पचून नंतर खळेकपोत न्यायाने ही औषधे या अवयवांत येऊन कार्य करतातच पण ते वीर्य प्रभाव यांचे ते कार्य होते. या कार्याला मदत म्हणून औषधांच्या रसाचे आणि कंठ व अन्ननलिका यांनी ती पचवून त्यांचया पचनाने आत घेतलेले अंश अधिक प्रभावी होतात आणि हे रोग अधिक लवकर बरे होतात. म्हणून अवलेह प्रकार जन्मला आला.

जोशी, वेणीमाधवशास्त्री.