लेपिडोडेंड्रेलीझ : (शल्कवृक्ष गण इं. जायंट क्लब मॉसेस). कार्‌बॉनिफेरस कल्पात (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) असलेल्या परंतु हल्ली फक्त जीवाश्म (शिळारूप अवशेषांच्या) रूपात खडकांत आढळणाऱ्या व बहुधा वृक्षासारख्या वनस्पतींचा एक गण. याचा अंतर्भाव वाहक घटकांनी युक्त असलेल्या व बीजे नसलेल्या वनस्पतींच्या लायकोपोडिनी या वर्गात [⟶वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] केला जातो याचा आधुनिक वर्गीकरणात लायकोप्सिडा (लेपिडोफायटा) या उपसंघात (संघ : ट्रॅकिओफायटा) अंतर्भाव करतात. ⇨लायकोपोडिएलीझ (क्लब मॉसेस) या गणाशी असलेल्या साम्यामुळे व मोठ्या आ. १. लोपेडोडेंड्रेलीझ : (अ) लेपिडोडेंड्रॉन वृक्ष : (१) मूलदंड (स्टिग्मॅरिया), (२) खोड, (३) पर्णतल्प, (४) फांद्या (पाने व लोंबते शंकू यांसह) (आ) लेपिडोडेंड्रॉनचे पर्णतल्प (अतिविस्तरित) : (१) पर्णतल्पाचा वरचा भाग, (२) जिव्हिकेची खाच (खातकिण), (३) पर्णतल, (४) पर्णकिण, (५) पर्णलेश (किण), (६) प्रकिण, (७) पर्णतल्पाचा खालचा भाग (इ) सिजिलॅरिया वृक्ष : (१) मूलदंड (स्टिग्मॅरिया), (२) खोड, (३) पर्णतल्प, (४) पाने व शंकूंसह फांदी (ई) लेपिडोस्ट्रॉबस शंकूचा उभा छेद : (१) गुरुबीजुककोश, (२) लघुबीजुककोशआकारमानामुळे त्यांना इंग्रजीत जायंट क्लब मॉसेस म्हणतात. मध्य व उत्तर डेव्होनियन (सु. ३८.५ ते ३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) ते पर्मियन (सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात या गणातील एकूण सु. नऊ प्रमुख प्रजातींतील (लेपिडोडेंड्रॉन, सिजिलॅरिया, बॉथ्रॉडेंड्रॉन, स्टिग्मॅरिया, लेपिडोस्ट्रॉबस, लेपिडोकार्पॉन, लेपिडोफ्लॉइओस, मियाडेस्मिया व मॅझोकॉर्पान) जातींचे अनेक शिळारूप अवशेष आढळतात त्यांवरून ह्या गणांचे प्रतिनिधी जगभर पसरले होते असे दिसते. जीवाश्मांच्या अभ्यासातील प्रस्थापित संकेताप्रमणे प्रजातींची ही नावे भिन्न अवयवांच्या संबंधात वापरली जातात त्यांचा समावेश सामान्यपणे ‘लेपिडोडेंड्रेसी’ व ‘सिजिलॅरिएसी’ या दोन कुलांत करतात तथापि त्यांतील बीजासारखी इंद्रिये धारण करणाऱ्या निदान दोन प्रजातींचे (मियाडेस्मिया व लेपिडोकार्पॉन) लेपिडोस्पर्मी या नावाचे एक उपकुल काही शास्त्रज्ञ मानतात जी. एम. स्मिथ यांनी वरील दोन कुलांशिवाय आणखी दोन कुले (लेपिडोकार्पेसी व बॉथ्रोडेंड्रेसी) लेपिडोडेंड्रेलीझ गणात समाविष्ट केली आहेत.

बाह्यलक्षणे : ह्या गणातील काही वृक्षांची उंची सु. ३० मी. क्वचित ४५ मी. सुद्धा असून त्यांच्या खोडांचा व्यास सु. ०.५ मी. असतो खोड सरळ व तळाशी आणि टोकाशी पुनःपुन्हा दुभंगून (द्विशाखाक्रमाने) वाढते. तळाकडील मूलक्षोडासारख्या (जमिनीत वाढत राहून त्यावर मुळे असणाऱ्या खोडाप्रमाणे) फांद्यांवर (मूलदंडावर) काही मुळे व तुटून गेलेल्या मुळांचे वण (किण) दिसतात. मूलदंडाची संरचना खोडाप्रमाणेच असते त्यांनाच स्टिग्मॅरिया हे प्रजातिनाम वापरतात. मूलदंड लेपिडोडेंड्रॉन, सिजिलॅरिया, बॉथ्रोडेंड्रॉनलेपिडोफ्लॉइओस या प्रजातींत आढळले आहेत. मुख्य खोड व फांद्या यांवर पानांचा आधार देणारे व पानांच्या तळांशी असलेले विविध आकारांचे पर्णतल्प म्हणजे उशीसारखे उंचवटे असतात व त्यांवरून भिन्न प्रजाती ओळखणे शक्य असते. टोकाकडच्या अनेकदा विभागलेल्या फांद्यांवर लहान लांबट, अरुंद व रेषाकृती किंवा आराकृती पाने सर्पिल पद्धतीने उगवलेली असतात. खोड अथवा फांदी दुभंगून वाढताना, नवीन फांद्या सारख्याच असतात असे नाही मात्र उत्तरोत्तर त्या लहान होत जातात. सिजिलॅरियाच्या खोडास फांद्या नसतात किंवा फार कमी असतात. पाने (लेपिडोफायलम लेपिडोफायलॉइड्‌स) सु. १ सेंमी. ते १ मी. लांब असून त्यात एकच मध्यशीर असते परंतु सिजिलॅरियाच्या पानात (सिजिलॅरिओफायलम) निदान तळाशी दोन मध्यशिरा असतात. सर्वच प्रजातींत पानांच्या बगलेत वरच्या बाजूस एका खाचेत जिव्हिका (लहान जिभेसारखे पातळ उपांग) असते ⇨आयसॉएटिस व ⇨सिलाजिनेलेलीझ यांमध्ये जिव्हिका असते पण ⇨लायकोपोडिएलीझमध्ये नसते. बहुतेक प्रजातींत खोडावर असलेल्या पर्णतल्पांना विशेष महत्त्व आले आहे. खोडांवरचे पान पडून गेले असल्यास तल्पावर पर्णकिण व जिव्हिकेच्या खाचेचा वण (खातकिण) असतो, लेपिडोडेंड्रॉनच्या बाबतीत याशिवाय पर्णकिणाखाली ‘आडे’ नावाचा उभा कंगोरा असतो.  

लेपिडोफ्लॉइओस सबलेपिडोफ्लॉइओसमध्ये पाने गळून पडताना पर्णतल्पाच्या पृष्ठभागावरचा उंचवटा मागे राहतो, त्यास पर्णतल म्हणतात तसेच या प्रजातीत पर्णतल्पाची उंची कमी आणि रुंदी अधिक असून लेपिडोडेंड्रॉनमध्ये त्याउलट प्रकार असतो तसेच ते पर्णतल्प काहीसे समभुज चौकोनी आहेत. सिजिलॅरियाबॉथ्रोडेंड्रॉनमध्ये पर्णतल्प फार कमी उंच असतो किंवा अजिबात नसतो. सिजिलॅरियाच्या खोडावरच्या पर्णतल्पांच्या रांगा उभ्या असतात परंतु लेपिडोडेंड्रॉनमध्ये त्या तिरप्या असल्याने दोन्ही ओळखणे सोपे जाते. सिजिलॅरियाच्या पर्णतल्पांचा आकार काहीसा षट्‌कोनी असतो.


शारीर : या गणातील जातींच्या खोडात भरीव किंवा मध्ये पोकळी असलेले प्रारंभिक प्रकाष्ठ (जलवाहक भाग) असून त्याभोवती प्रारंभिक परिकाष्ठ (अन्नरस वाहक भाग) असते. ह्या मध्यवर्ती स्तंभापासून निघालेले आ. २. लेपिडोडेंड्रेलीझ : (अ) मियाडेस्मिया : डावीकडे संपूर्ण गुरुबीजुकपर्णाने वेढलेला गुरुबीजुककोश उजवीकडे संपूर्ण गुरुबीजुककोशाचा उभा छेद : (१) गुरुबीजुकपर्ण, (२) गुरुबीजुककोशाचे आवरण, (३) गुरुबीजुक (स्त्री-गंतुकवारी), (४ ) जिव्हिका, (५) वाहक वृंद (आ) लेपिडोकार्‌पॉन : डावीकडे संपूर्ण बीजुकपर्णाचा उभा छेद (शंकुशी समांतर), उजवीकडे संपूर्ण बीजुकपर्णाचा आडवा छेद (वरील छेदाशी काटकोनात असलेला) : (१) बीजुकपर्ण, (२) बीजुककोशाचे आवरण, (३) बीजुककोशातील पोकळी, (४) बीजुक, (५) जिव्हिका, (६) वाहक वृंद, (७) बीजुकरंध्र. शाखायुक्त पर्णलेश (लहान स्तंभ-शाखा) व त्यांच्या बाजूस दोन मृदूतकाचे (नरम कोशिकांच्या-पेशींच्या-समूहाचे) पट्टे (प्रकिण) असतात या प्रकिणांच्या कार्याबद्‌दल गूढच आहे. त्याचा संबंध वनस्पतीत हवा खेळवण्याशी असावा, असे एक मत आहे. काही जातींत द्वितीयक [प्रारंभिक वाढीनंतर नवीन विभज्येपासून बनलेले ⟶शारीर, वनस्पतींचे] प्रकाष्ठ व परिकाष्ठ आढळते, तसेच अनेक खोडांतील मध्यत्वचेत विभाजी कोशिकांपासून बनलेले लांबट घनकोशिकांचे रुंद वलय [⟶दृढोतक] सालीच्या आतील बाजूस असते द्वितीयक प्रकाष्ठाचे प्रमाण ह्या वृक्षी वनस्पतींत जास्तीत जास्त एकूण गाभ्याच्या (व्यापाच्या) / ते /१० असल्याने खोडाला बळकटी आणण्यास या वलयाची आवश्यकता असते. खोडावर ⇨परित्वचा (जाडसर बाहेरील साल) आढळते.

प्रजोत्पादक अवयव : यांची संरचना शंकूसारखी असून त्यातील सुटे भाग (बीजुकपर्णे) दोन प्रकारचे आहेत : लघुबीजुके व गुरुबीजुके बीजुककोशात (स्वतंत्र पिशवीसारख्या कोशात) धारण करणारे व रूपांतर पावलेले पानासारखे भाग. लेपिडोफ्लॉइओसलेपिडोडेंड्रॉन यांच्या शंकूंना लेपिडोस्ट्रॉबस, लेपिडेंड्रॉनच्या काही शंकूंना लेपिडोकार्पॉनबॉथ्रोडोडेंड्रॉनच्या शंकूला बॉथ्रोडेंड्रॉस्ट्रॉबस म्हणतात. सिजिलॅरियाच्या शंकूंना सिजिलॅरिओस्ट्रॉबस मॅझोकार्‌पॉन म्हणतात. मियाडेस्मियाची धारक वनस्पती (खोड) अद्याप निश्चित मानलेली नाही. तथापि जी. एम्‌. स्मिथ याच्या मते ती सिलाजिनेलासारखी होती म्हणून या प्रजातीचा अंतर्भाव सिलाजिनेलेलीझ गणात त्यांनी केला आहे. लेपिडोस्ट्रॉबस शंकूत दोन्ही प्रकारचे बीजुककोश असून लेपिडोकार्‌पॉनचे शंकू दोन प्रकारचे व स्वतंत्र आहेत आणि प्रत्येक प्रकारात एकच प्रकारचे बीजुककोश (लघु-किंवा गुरु) असतात. गुरुबीजुककोशांची उंची रुंदीपेक्षा बरीच कमी असून त्याभोवती गुरुबीजुकपर्णाचे आवरण असते (त्याला ‘अध्यावरण’ असेही म्हणतात पण खरे अध्यावरण बीजी वनस्पतीत बीजकावर किंवा बीजाच्या बाहेरच्या बाजूस असते). ह्या आवरणाच्या वरच्या बाजूस एक लांबट फट (चीर) पडते, तिला बीजकरंध्र असे म्हटलेले आढळते परंतु ते पूर्ण सत्य नव्हे [⟶बीज]. बीजुकपर्णात वाहक वृंद (वाहक घटकांचा संच) असतो. बीजुककोशात चार गुरुबीजुके असून त्यांपैकी एकातच स्त्री-गंतुकधारी (स्त्री-गंतुके किंवा स्त्री-कोशिका निर्मिणारे अवयव ‘अंदुक कलश’ असणारी पिढी) बनतो. त्यावर अंदुक कलश दिसले असून बीजुककोशाच्या पोकळीत काही लघुबीजुके आढळली आहेत. अशा अवस्थेत तेथेच फलन (नर-व स्त्री-कोशिकांचे मीलन) होत असावे.

परागनलिकांचा अभाव आढळतो. चलनशील रेतुके असणे शक्य दिसते तथापि प्रत्यक्ष गर्भ आढळलेला नाही. अशा अवयावांना ‘बीजे’ असे म्हटले, तरी ‘अध्यावरणाचे’ खरे स्वरूप विशेष प्रकारच्या गुरुबीजुकपर्णापेक्षा निराळे किंवा अधिक मानले जात नाही. मियाडेस्मियांची बीजे यापेक्षा अधिक जटिल व पग्रत आहेत, तथापि तीही खरी बीजे मानीत नाहीत, कारण त्यांत गर्भविकास झालेला नसतो. खऱ्या बीजात गर्भ प्रसुप्तावस्थेत असतो व तो बीजुकाच्या आवरणांनी वेढलेला असतो. मॅझोकार्‌पॉनच्या गुरुबीजुककोशात आठ गुरुबीजुके असल्याने ते लेपिडोकार्‌पॉनपासून सहज वेगळे ओळखू येते शिवाय ती सर्व मृदूतकाने वेढलेली असून कार्यक्षम असतात कधी त्यांतील काही गुरुबीजुके अकार्यक्षम असतात हे गुरुबीजुककोश बीजुकपर्णासह मूळ वनस्पतीपासून अलग होतात. तसेच मॅझोकार्‌पॉन ‘बीजे’ सिजिलॅरियाच्या खोडावर किंवा मोठ्या फांद्यांवर बाजूस लटकलेली असतात, हीच सिजिलॅरिओस्ट्रॉबस या नावाने काहींनी वर्णिली असण्याची शक्यता मानतात. याउलट, लेपिडोडेंड्रॉनचे शंकू बहुधा फांद्यांच्या टोकांस असलेले आढळले आहेत. बीजासारख्या इंद्रियामुळे ह्या वनस्पती क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टीने बीजी वनस्पतींच्या जवळ आलेल्या आहेत [⟶वनस्पति, बीजी विभाग] असे दिसते. कार्‌बॉनिफेरस काळातील दलदलीत  

वाढणाऱ्या वनस्पतींपासून बनलेल्या दगडी कोळशात लेपिडोडेंड्रेलीझ वनस्पतींचा बराच मोठा वाटा आहे. एखाद्या सरीसृपाच्या (साप, सरडे, सुसरी इत्यादींसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) अंगावरील खवल्यांप्रमाणे लेपिडोडेंड्रेलीझ गणातील जातींच्या खोडावर व फांद्यांवर असलेले पर्णतल्प दिसतात म्हणून त्या अर्थाच्या ग्रीक नावावरून गणाचे शास्त्रीय नाव दिले आहे.

भारतात कार्बॉनिफेरसपूर्व काळातील लायकोपोडांचे जीवाश्म अद्याप आढळलेले नाहीत परंतु गोंडवन भूमीच्या इतर देशांत आढळतात. भारतात बॉथ्रोडेंड्रॉन (आता या प्रजातीला सायक्लोडेंड्रॉन म्हणतात) प्रजातीच्या जातीची नोंद झाली आहे. ही बॉथ्रोडेंड्रॉन लेस्लीची जाती उत्तरेकडील बॉथ्रोडेंड्रॉनपेक्षा फार निराळी वाटल्याने आर्. क्रॉसेल आणि पी. रांगे (१९२८) यांनी तिला सायक्लोडेंड्रॉन हे नाव दिले.

पहा : पुरावनस्पतिविज्ञान.

संदर्भ : 1. Andrews, H.N. Studies in Fossil Botany, New York, 1967.

           2. Arnold, C. A. An Introduction to Palaeobotany, New York, 1947.

           3. Dittmer, H. J. Phylogeny and Plant Form in the Plant Kingdom, New York, 1964.

           4. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

           5. Smith G.M. Cryptogamic Botany, Tokyo, 1955.

          6. Strasburger, E. Textbook of Botany, London, 1965.

          7. Surange, K. R. Indian Fassil Pteridophytes, New Delhi, 1966.

परांडेकर, शं. आ.