लेप : प्यूरोनेक्टॉयडीई या उपगणातील बोथिडी, प्ल्यूरोनेक्टिडी, सोलिडी व सायानोग्लॉसिडी या चार कुलांतील माशांना लेप, लेपटी अशा नावांनी संबोधितात. साधातरणः हे मासे वरती पाठ व खाली पोट अशा उभट पावित्र्यातच असतात परंतु या चार कुलांतीलनेहमीच समुद्रतळावर राहणाऱ्या माशांत शैशवावस्थेत किंवा डिंभावस्थेत (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या अवस्थेत) त्यांचे सर्व शरीर उभट न होता पसरट होते दोन्ही डोळे वरच्या बाजूला येतात. संवेदनक्षम कातडीही वरच्या बाजूला व अंसपक्ष (छातीवरील पर), पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) व कटिपर शरीराच्या कडेला अशा तऱ्हेने एक मांसाची पाळ तयार होते. खालची बाजू फिकट पांढरी, तोंड थोड्या प्रमाणात वर व जास्त प्रमाणात खाली असते. असले चापट किंवा लेप लावल्यासारखे दिसणारे मासे नेहमी समुद्रतळावरच असतात म्हणून मराठीत त्यांना लेप किंवा लेपटी म्हणतात. इंग्रजीत त्यांना फ्लॅट फिश, सोल, प्लेस, हॅलिबट असे म्हणतात. त्यांपैकी काहींचे डोळे उजव्या बाजूकडून वर आलेले, तर काहीचे डाव्या बाजूकडून वर आलेले असतात (आकृती पहा). सेट्टोडिडी या कुलातील ‘भाकस’ हाही चपट्या आकाराचा व वर डोळे असणारा मासा असून तोही डिंभावस्थेतच चापट होतो. या पाच कुलांपैकी भाकस हा भारतातला सर्वांत मोठा होणारा म्हणजे ४२ सेंमी. लांब होणारा मासा आहे. हे सर्व मासे भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर सापडतात. याच उपगणातला परंतु अटलांटिक महासागरात सापडणारा हॅलिबट मात्र २ मी. लांब होतो. त्याचे उत्पादनही खूप होते. त्याच्या यकृतापासून अ आणि ड जीवनसत्त्वयुक्त पौष्टिक तेल काढले जाते.
पहा : चपटे मासे हॅलिबट.
कुलकर्णी, चं. वि.
“