लूटमार व दरोडेखोरी : (रॉबरी अँड डकॉइटी.) ‘लूटमार’ व ‘दरोडेखोरी’ हे जंगम मालमत्तेसंबंधीचे गंभीर तसेच दंडनीय स्वरूपाचे गुन्हे असून भारतीय दंड संहितेत अशा गुन्ह्यांचे घटक व त्यांबाबत प्रतिबंधात्मक व दंडात्मक अशा कायदेशीर उपाययोजनांची तरतूद केलेली आहे (कलम ३९० ते ४०२). लूटमारीच्या गुन्ह्यामध्ये मुख्यतः èचोरी (थेफ्ट) व बलाद्ग्रहण (इक्स्टॉर्शन) या घटकांचा समावेश असतो. चोरी अगर बलाद्ग्रहण या गुन्ह्यांमधून लूटमारीच्या गुन्ह्याचा उगम होतो. चोरी करताना किंवा चोरीचा माल नेताना किंवा चोरी करून हस्तगत केलेला माल नेण्याचा प्रयत्न करताना जेव्हा गुन्हेगार एखाद्या इसमास स्वत:हून ठार मारतो अथवा जखमी करण्याचा प्रयत्न करतो किंवा बेकायदा अटकेत ठेवतो किंवा यांपैकी कोणतेही कृत्य करण्याची भीती घालून चोरीचे उद्दिष्ट साध्य करतो, तेव्हा त्या गुन्ह्यास लूटमारीचा गुन्हा असे संबोधिले जाते. 

चोरीमध्ये कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यातून जंगम मालमत्ता त्याच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे स्वतःस अन्याय्य फायदा व दुसऱ्यास अन्याय्य तोटा अथवा नुकसान करण्याच्या उद्देशाने हलविली, तर तो चोरीचा गुन्हा ठरतो. बलाद्ग्रहणामध्ये कोणत्याही व्यक्तीने इतर दुसऱ्या कोणाही व्यक्तीस इजा करण्याची भीती घालून तिच्या संमतीविना अप्रामाणिकपणे त्या भीतिग्रस्त व्यक्तीस कोणतेही रोखे, वचनचिठ्ठी अथवा गहाणपत्र किंवा त्या स्वरूपातील मुद्रांकित व स्वाक्षरी असलेला कोणताही दस्तऐवज दुसऱ्यास देण्यास भाग पाडले अथवा प्रवृत्त केले, तर तो बलाद्ग्रहणाचा गुन्हा ठरतो. बलाद्ग्रहण स्थावर मालमत्तेच्या बाबतीतही होऊ शकते. बलाद्ग्रहण करताना कोणाही इसमाने समोर हजर असलेल्या व्यक्तीस अगर इतर दुसऱ्या कोणासही तात्काळ खून, इजा अथवा बेकायदा अटकेची भीती घालून भीतिग्रस्त इसमाकडून जागच्या जागी वस्तू देण्यास भाग पाडले, तर ती लूटमारच होय. लूटमारीमध्ये गुन्हेगार बळाचा वापर, धाकदपटशा अथवा भीती दाखवून वस्तूचा ताबा घेतो. लूटमारीच्या गुन्ह्यात गुन्हेगार एकटाही असू शकतो. लूटमारीत चोरी व बलाद्ग्रहण यांचा अंतर्भाव असला, तरी कोणता गुन्हा चोरीचा व कोणता बलाद्ग्रहणाचा हे ठरविणे कधीकधी अवघड होते. चोरी करताना अपघाताने चोराच्या हातून एखादी व्यक्ती जखमी झाली, तर तो चोरीचाच गुन्हा ठरतो, लूटमारीचा नव्हे. त्याचप्रमाणे चोरी करताना पकडल्यावर सुटका करण्याकरिता गुन्हेगाराने एखाद्यास जखम केली अथवा चोरीचा मुद्देमाल घेऊन पलायन करताना पाठलाग होऊ नये म्हणून दगडफेक केली, तरीदेखील तो गुन्हा लूटमारीचा होत नसून चोरीचाच होतो.  

 

भारतीय दंड संहितेत निरनिराळ्या प्रकारच्या लूटमारीच्या गुन्ह्यांस निरनिराळ्या शिक्षेच्या तरतुदी केलेल्या आहेत. उदा., हमरस्त्यावर सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत रात्री लूटमार केली, तर त्या गुन्ह्यास १४ वर्षांपर्यंतच्या सक्तमजुरीची व दंडाची सजा आहे लूटमार करण्याचा प्रयत्न केला, तर ७ वर्षांपर्यंतची सक्तमजुरी व दंडाची सजा आहे लूटमारीचा प्रयत्न करताना गुन्हेगाराने स्वतःहून एखाद्या व्यक्तीस जखमी केले, तर संबंधित गुन्हेगार किंवा त्याच्याबरोबरचे तसा प्रयत्न करणारे इतर गुन्हेगार या सर्वांना प्रत्येकी कमाल आजन्म कारावास किंवा १० वर्षांची सक्तमजुरी व दंड आणि लूटमार करण्याच्या हेतूने सर्रासपणे एखाद्या टोळीत सामील होऊन लूटमार करणे या गुन्ह्यास ७ वर्षांची सक्तमजुरी व दंड, अशी सजा आहे. 

 

दरोडेखोरीच्या गुन्ह्यासंबंधीची व्याख्या व अन्य कायदेशीर तरतुदी भारतीय दंड संहितेत सविस्तरपणे दिलेल्या आहेत (कलम ३९१, ३९५-४०० व ४०२). दरोडेखोरी हा लूटमारीचा गंभीर प्रकार असून चोरी व बलाद्ग्रहण या घटकांचाही तीत समावेश होतो. पाच अगर पाचांपेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा संयुक्तपणे लूटमार करतात किंवा लूटमारीचा प्रयत्न करतात किंवा संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून त्यांपैकी प्रत्येकजण लूटमारीच्या कृत्यात सहभागी होतो अथवा तसे कृत्य करण्यास साहाय्य करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या गुन्ह्यास दरोडेखोरी असे संबोधिले जाते.  

कायद्याच्या दृष्टीने दरोडेखोरीमध्ये पुढील टप्पे दोषास्पद मानले जातात : (१) दरोडेखोरीकरिता एकत्र जमणे, (२) दरोडेखोरीकरिता तयारी करणे, (३) दरोडेखोरीचा प्रयत्न करणे आणि (४) प्रत्यक्ष दरोडेखोरी करणे. या प्रत्येक टप्प्याकरिता कायद्यात शिक्षेची तरतूद केलेली आहे.  

दरोडेखोरीच्या गुन्ह्यास प्रत्येक गुन्हेगारास कमाल आजन्म कारावास (जन्मठेप) किंवा १० वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि शिवाय दंड अशी शिक्षा आहे. दरोडेखोरीच्या वेळी गुन्हेगाराने खून केला, तर प्रत्येक दरोडेखोरास देहान्त शासन किंवा आजन्म कारावास अथवा १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड होऊ शकतो. लूटमारी अगर दरोडेखोरी करताना जर एखाद्याने प्राणघातक शस्त्र वापरले किंवा कोणास गंभीर जखमी केले अथवा तसा प्रयत्न केला अथवा खून करण्याचा प्रयत्न केला, तर त्यास कमीतकमी ७ वर्षे कारावासाची शिक्षा दिली जाते. शिक्षेची ही किमान मर्यादा प्रत्यक्ष प्राणघातक शस्त्र वापरणाऱ्या गुन्हेगारासाठीच आहे. दरोडेखोरीसाठी तयारी करणे किंवा दरोडेखोरांच्या टोळीत सामील होणे अथवा अशा टोळीशी संबंध ठेवणे या गुन्ह्यांना कमाल १० वर्षे सक्तमजुरी आणि दंड अशी शिक्षा आहे. दरोडेखोरी केला नाही, पण त्या उद्देशाने पाच अगर अधिक व्यक्ती एकत्र आल्या, तर तोही गुन्हा समजला जातो व त्यास ७ वर्षे कारावास आणि दंड अशी शिक्षा आहे. कोणीही व्यक्ती सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा सभासद असल्यास तिलादेखील जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंत सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा होऊ शकते.

दरोडेखोरीमध्ये प्रत्यक्ष बळाचा वापर केला पाहिजेच असे नाही, तर गुन्हेगार नुसत्या संख्याबळावरही भीतीचे वातावरण निर्माण करून गुन्हा करू शकतात. दरोडेखोरी झाल्यानंतर अल्पावधीतच चोरीचा माल जर कोणा एखाद्या इसमाकडे सापडला, तर तो दरोडेखोरांपैकीच एक आहे, असे कायद्याने अनुमान काढता येते. तथापि आरोपीने कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला इ. गोष्टींची कायद्याने पडताळणी होऊन शिक्षेत बदल होऊ शकतो.  

कवळेकर, सुशील