लूईस दे लेऑन : (१५२७?-१५९१). स्पॅनिश कवी व गद्यलेखक. बेलमांट, क्वेंका येथे जन्मला. १५४४ मध्ये त्याने ऑगस्टीनिअन पंथाची दीक्षा घेतली. १५६१ मध्ये सालामांका विद्यापीठातील ईश्र्वरविद्येच्या अध्यासनावर त्याची नेमणूक झाली. कॅथलिक चर्चने अधिकृत मानलेल्या बायबल संहितेच्या (व्हल्गेट टेक्स्ट) अचूकपणाबाबत टीका केल्याच्या, तसेच साँग ऑफ साँग्जचा (साँग ऑफ सॉलोमन किंवा कँटिकल्स ह्या नावानेही प्रसिद्ध. बायबलच्या जुन्या कराराचा हा एक भाग आहे आणि त्यात प्रेमगीते आहेत. ज्यू आणि ख्रिस्ती धर्मपरंपरांनी ह्या प्रेमगीतांचा आध्यात्मिक रूपकात्मक अर्थ लावण्याची पराकाष्ठा केलेली आहे) स्पॅनिशमध्ये अनुवाद केल्याच्या आरोपावरून ख्रिस्ती धर्मन्यायपीठाने त्याला पाच वर्षे तुरुंगात डांबून त्याचा छळ केला होता (१५७२-७६).
त्याने De los nombres de Cristo (१५८३-८५, ३ खंड) आणि La Perfecta Casada (१५८३) हे दोन गद्यग्रंथ (स्पॅनिश भाषेत) तसेच बायबलवरील भाष्ये (लॅटिन भाषेत) लिहिली. उपर्युक्त स्पॅनिश ग्रंथांचे लेखन करीत असताना त्याने उत्कृष्ट लॅटिन गद्यशैलीशी स्पर्धा करू शकेल अशी स्पॅनिश गद्यशैली निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. सोळाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ स्पॅनिश गद्यलेखक म्हणून त्याचा लौकिक आहे.
ग्रीक, लॅटिनआणि हिब्रू ह्या भाषा त्याला उत्तम प्रकारे अवगत होत्या. व्हर्जिल आणि हॉरिस हे त्याचे विशेष आवडते साहित्यिक. हॉरिसच्या काही उद्देशिका आणि व्हर्जिलच्या Eclogues आणि Georgics ह्या काव्यकृती ह्यांचा त्याने उत्कृष्ट स्पॅनिश अनुवाद केला.
त्याची कीर्ती आज त्याने स्पॅनिश भाषेत रचिलेल्या ३० कवितांपैकी काही थोड्या कवितांवर मुख्यतः अधिष्ठित आहे. ‘लिरा’ ह्या छंदामध्ये ह्या कविता रचिलेल्या आहेत. विश्र्वाची गूढता त्याबद्दल कवीला वाटणारा विस्मय शांत, निवांत जीवन जगण्याची उत्कट ओढ हे विषय त्याच्या कवितांतून लक्षणीयपणे येतात. त्याच्या कवितेतील आत्मपरता ठळकपणे जाणवणारी आहे.
मॉघ्रीगॉल येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.