लुशाई : पूर्व भारतातील आदिम जमातींचा एक समूह. मिझोंच्या एका उपजमातीला ही संज्ञा रूढ झाली असली, तरी सांस्कृतिक दृष्ट्या लुशाईंत अनेक भेद स्पष्ट दिसतात. त्यामुळे त्यांना जवळजवळ स्वतंत्र जमातीचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांची वस्ती प्रामुख्याने ईशान्य भारतातील लुशाई टेकड्यांत आढळते. १९८१ साली त्रिपुरात त्यांची लोकसंख्या ३,६७२ होती.
लुशाई गटामध्ये अनेक जमातींचा अंतर्भाव होतो. पैते हीसुद्धा त्यांची एक पोटजमात वा कुळी असून प्रारंभी त्यांची वस्ती लुशाई टेकड्यांतील स्थानिक संस्थानिकांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या खेड्यात होती. लुशाई हे मूळच्या थांगूर वंशीय राजांच्या एका कुळीचे नाव होते. या राजांची सत्ता अठराव्या शतकात प्रबळ झाली आणि त्यांनी काचारमधल्या जुन्या कुकी लोकांवर सत्ता गाजवून त्यांना नमविले व तिथून हुसकून लावले. काही कुळींना त्यांनी आपल्यात सामावून घेतले. त्या कुळी म्हणजेच थांगुर राजांची प्रजा. आता लुशाई नाव कुलसमूहवाचक झाले आहे. तेथील रहिवाश्यांमध्ये खुद्द लुशाईंना ‘दुल्हिअन’ असे नाव आहे आणि त्या पहाडातील, म्हणजे लुशाई पहाडातील रहिवाश्यांचे मिझो असे नाव तेथील लोकांत रुढ आहे. त्यांच्या शाळा लुशाई भाषेत चालतात. या लोकांची केशरचना वैशिष्ट्यपूर्ण असते. लांब डोके, जाड भुवया, बसके नाक, भुरे केस व मोठी जिवणी ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून उजव्या हाताखालून डाव्या खांद्यावर टाकलेले एक वस्त्र एवढाच त्यांचा पोशाख असतो.
मणिपुरातले लुशाई हे भटके असून ते झूम पद्धतीची फिरती शेती करतात. त्यांची गावे नेहमी नव्याने बसवली जातात अगर उठवलीही जातात.
ते भातशेती प्रामुख्याने करतात. भात पिकायला उशीर लागतो, म्हणून मकाही ते पिकवतात. त्याशिवाय ते ज्वारीचे पीक घेतात. लुशाई लोक शिकार करण्यात फार पटाईत आहेत. वाघ, हरिण, माकड, अस्वल यांची शिकार करतात. सर्वांत कठीण शिकार हत्तीची असते. उत्तम शिकाऱ्यांचा एक मोठा घोळका हत्ती पकडण्यासाठी लागतो. मासेमारी हा उपव्यवसायही ते करतात. लुशाई सर्व जनावरांचे मांस खातात. कुत्रे तर त्यांना फार आवडते. त्यांच्या आवडीचे पेय म्हणजे कुठल्यातरी धान्याची कांजी. ते तांदळापासून केलेली सौम्य मद्ये घेतात. त्याला ‘झू’ म्हणतात. बारसे, लग्न, मर्तिक, किंवा पाहुणा आल्यानंतर मद्यप्राशन हा मुख्य कार्यक्रम असतो. लुशाईंत प्रत्यक्ष गुलामगिरी नसली, तरी बोई नावाची पद्धत रूढ आहे. फक्त राजाच बोई ठेवू शकतो. भुकेने गांजलेले लोक बोई होतात. राजाकरिता ते झूम शेती करतात. मात्र एका राजाचे बोई त्याला सोडून दुसऱ्या राजाकडे किंवा प्रमुखाकडे जाऊ शकतात. गुन्हे केलेले लोक पकडले जातात, तेव्हा ते राजाकडे धाव घेतात आणि या शरणागतांना राजा अभय देतो व बोई करतो. लुशाईंमध्ये विवाहपद्धत साधी असून कुळींची गुंतागुंतीची गोत्रपद्धत अस्तित्वात नाही. सख्खी बहीण व आई वगळून पुरुष कोणत्याही स्त्रीशी लग्न करू शकतो. यांच्यात लग्नात मुलीचे देज द्यावे लागते. घटस्फोट व विधवाविवाह यांना मान्यता आहे.
लुशाई लढाई व शिरोमृगयेसाठी प्रसिद्ध आहेत. शत्रूच्या गावावर छापे घालून लूटमार करणे व त्यांची डोकी कापणे, हे पराक्रमाचे लक्षण मानले जाते.
भुताखेतांवर त्यांचा विश्र्वास आहे. त्यांना ते ‘हुआई’ म्हणतात. नशिबाला ते ‘खुआबांग’ म्हणतात. भुतीमार्फत ते नशिबाची परीक्षा ठरवतात. मरणोत्तर जगाबद्दल लुशाईंच्या काही कल्पना आहेत. पहिला मानव (पुपवला) मेला तेव्हा सर्वांत आधी मरणाराही तोच होता. हा पुपवला तीराने माणसे मारतो. तायो नदीच्या तीरावर एक रस्ता आहे. त्याला सात रस्ते मिळतात. त्या सात रस्त्यांच्या नाक्यावर पुपवलाचे घर आहे. पुपवलाने तीर मारलेली माणसे ऱ्हिंगलांग पहाडावर जातात. तेथे लुंगलो नदी आहे. तिचे पाणी स्वच्छ आणि गोड असते. लुंगलोचा अर्थ भावनाशून्य अथवा भावनांचा नाश करणारी नदी असा आहे. तिच्या काठी ‘हविलोपार’ नावाची फुले होतात. हविलोपार याचा अर्थ फिरून मागे पाहू नका असा होतो. मृतात्मे ही फुले तोडतात व स्वतःच्या डोळ्यांमागे ठेवतात आणि लुंगलोचे पाणी पितात असे केले म्हणजे त्यांना मग फिरून मृत्यूलोकी येण्याची इच्छा रहात नाही.
हे मृत व्यक्तीला काळ्या कापडात गुंडाळून घराबाहेर पुरतात. प्रेताबरोबर बटवा, चिलीम, इ. दैनंदिन वापराच्या वस्तू पुरतात. अपघाती व्यक्तीला गावाबाहेर पुरतात. यांच्यात क्वचित दहनदी आढळते. मृताची स्मारके उभी करतात.
संदर्भ : 1. Dev, Bimal J., Lahiri, Dilipkumar, Lushai Customs & Ceremonies, Delhi, 1983.
2.Shakespeare, J. The Lushai Kuli Clans, London, 1912.
भागवत, दुर्गा
“