ली, त्सुंग-डाओ : (२४ नोव्हेंबर १९२६- ) चिनी अमेरिकन सैद्धांतिक भौतिकीविज्ञ. बीटा क्षयासारख्या [⟶ किरणोत्सर्ग ] दुर्बल अणुकेंद्रीय परस्परक्रियांच्या बाबतीत समता अक्षय्यता तत्त्वाच्या [⟶ समता]  होणाऱ्याच उल्लंघनाचा शोध व त्यामुळे मूलकणांबाबत महत्त्वाचे शोध लागण्यात झालेली मदत यांबद्दल त्यांना⇨चेन निंग यांग या त्यांच्या सहकार्यांबरोबर १९५७ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

ली यांचा जन्म चीनमधील शांघाय येथे झाला. नॅशनल जजिआंग विद्यापीठात शिकत असताना जपानी आक्रमण झाल्याने त्यांना कुनमिंग येथील नॅशनल साऊथवेस्ट विद्यापीठात जावे लागले. तेथे त्यांची यांग यांच्याशी ओळख झाली. चिनी सरकारी शिष्यवृत्ती मिळाल्याने ते १९४६ मध्ये अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी एन्रीको फेर्मी यांच्या मागदर्शनाखाली काम केले व १९५० मध्ये भौतिकीतील पी. एच्‍डी. पदवी मिळविली. काही महिने यर्किझ वेधशाळेत ज्योतिषशास्त्राचे संशोधन सहयोगी म्हणून काम केल्यावर ते र्बकली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन सहयोगी व अध्यापक झाले (१९५०-५१). नंतर त्यांना प्रिस्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲबडव्हान्स्ड स्टडी या संस्थेत अधिछात्रवृत्ती मिळाली व तेथे त्यांनी १९५१-५३ मध्ये यांग यांच्या समवेत संशोधन केले. पुढे ते कोलंबिया विद्यापीठात क्रमाक्रमाने भौतिकीचे साहाय्यक प्राध्यापक (१९५३), सहयोगी प्राध्यापक (१९५५) व पूर्ण प्राध्यापक (१९५६) झाले. ,१९६० मध्ये ते इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड  स्टडीमध्ये प्राध्यापक म्हणून परत गेले. नंतर १९६३ मध्ये ते पुन्हा कोलंबिया विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक झाले व १९६४ मध्ये तेथेच एन्रीको फेर्मी प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.

थीटा-मेसॉन व टाऊ-मेसॉन हे मूलकण निरनिराळ्या समतांनुसार क्षय पावतात, म्हणून ते निरनिराळे मूलकण आहेत, असे पूर्वी मानले जात होते, किरणोत्सर्गी द्रव्यांतील बीटा उत्सर्जनासंबंधी करण्यात आलेल्या प्रयोगांवरून ली व यांग यांनी १९६५ मध्ये हे मूलकण दोन नसून एकच आहेत (त्याला आता के-मेसॉन म्हणतात) असा निष्कर्ष काढला परंतु सु. ३० वर्ष आधारभूत मानण्यात येणारे समता अक्षय्यतेचे तत्त्व एकाच कणाला विरुद्ध समता असलेल्या निरनिराळ्या तऱ्हांनी क्षय पावण्यास मज्जाव करीत असल्याने किमान दुर्बल परस्परक्रियांच्या बाबतीत समता अक्षय रहात नाही म्हणजे या तत्त्वांचे उल्लंघन होणे शक्य आहे, असे त्यांनी भाकित केले. या भाकिताची चाचणी घेण्यासाठी व त्याला पुष्टी देण्यासाठी करावयाचे प्रयोगही त्यांनी सुचविले. नॅशनल ब्यूरो ऑफ स्टँडर्ड्स  येथील सी. एस्. वू व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि कोलंबिया विद्यापीठातील व शिकागो विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञांनी असे प्रयोग करून या भाकिताची सत्यता प्रस्थापित केली. या शोधामुळे मूलकण भौतिकी सिद्धांतात महत्त्वाच्या सुधारणा घडून येण्यास मदत झाली [⟶ मूलकण]. काही विशिष्ट दुर्बल परस्परक्रियांच्या बाबतीत काल-व्युत्क्रमण अचलतेच्या होणाऱ्या उल्लंघनाचे स्पष्टीकरण देण्यासंबंधी ली यांनी १९६४ पासून महत्वाचे कार्य केलेले आहे. याखेरीज त्यांनी खगोलीय भौतिकी, सांख्यिकीय यामिकी [⟶ सांख्यिकीय भौतिकी], अणुकेद्रींय भौतिकी, ⇨क्षेत्र सिंद्धात व संक्षोभ (ज्यांत स्थानिक वेग व दाब यदृच्छ रीत्या अनियमितपणे बदलतात असे द्रवांचे वा वायूंचे प्रवाह) या विषयांतही कार्य केले आहे.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना ॲल्बर्ट आइन्स्टाइन स्मृती पुरस्कार (१९५७), प्रिन्स्टन विद्यापीठाची डी. एस्सी. पदवी (१९५८), वगैरे सन्मान मिळाले. ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे (१९६४) व अमेरिकन फिजिकल सोसायटीचे सदस्य आहेत. यांग यांच्या समवेत त्यांचे अनेक संशोधनात्मक निबंध फिजिकल रिव्ह्यू या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत.

भदे, व. ग.