लुकलुकणे, ताऱ्यांचे : तारे आणि पृथ्वी यांमध्ये असलेल्या परिवर्तनशील वातावरणामुळे पृथ्वीवरून पाहताना ताऱ्यांच्या स्थानांत, तेजस्वीपणात त्याचप्रमाणे आकारांत व बऱ्याच वेळा रंगांतही सूक्ष्म बदल एकसारखे द्रुतगतीने होताना दिसतात यास ताऱ्यांचे लुकलुकणे असे म्हणतात. लुकलुकणे ही क्रिया नैसर्गिक रीत्या होणाऱ्या प्रकाश प्रकीर्णनाचे (विखुरला जाण्याचे) रोजच्या व्यवहारातील ठळक उदाहरण आहे. लुकलुकण्याची प्रक्रिया ताऱ्यांच्या गुणधर्माशी संबंधित नाही. ती अनियमित प्रणमनशील (वक्रीभवनशील) वातावरणाच्या निरनिराळ्या स्तरांत प्रकाशकिरणांची वळण्याची क्रिया होऊन घडते. भूपृष्ठापासून १०,००० मी. पेक्षा अधिक उंचीवरून ताऱ्यांकडे पाहिल्यास ते लुकलुकताना दिसणार नाहीत.

 

वातावरणातील तापजन्य क्षोभामुळे ते कधीच शांत राहत नाही. सूर्यप्रकाशाने तापलेल्या क्षेत्रावरून उष्ण व हलक्या हवेचे बुडबुडे (कोश) वर जाऊ लागतात व उंचीवरील थंड हवा पृथ्वीकडे येते. यामुळे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचा खडबडीतपणा, मेघाच्छादन, वारे आणि विषम सौरप्रारण (सूर्यापासून येणारी तरंगरूप ऊर्जा) इ. कारणांनी निर्माण होणाऱ्या अभिसरणामुळे वातावरणाची घनता व आर्द्रता यांमध्ये एकसारखे बदल होत असतात व वातावरणाच्या भिन्न विभागांचा प्रणमनांक बदलत असतो. जेव्हा ताऱ्यांपासून निघालेले प्रकाशकिरण वातावरणात प्रवेश करतात तेव्हा त्या किरणांच्या मार्गात भिन्न प्रणमनांकांचे विभाग किंवा कोश येऊन ते किरणांचे मार्ग एकसारखे वळवतात. यामुळे ताऱ्यांच्या बिंदुवत प्रतिमेचे एकसारखे स्थानांतर घडून प्रतिमा नर्तन करीत (कंप पावत) आहे, असे दिसते. छायाचित्रांत ताऱ्याचे बिंदुवत स्परूप नष्ट होऊन प्रतिमेत काही सेकंदांचा कोनीय विस्तार झालेला दिसतो. हा विस्तार वाढलेला दिसल्यास खगोलीय निरीक्षणाची स्थिती फार वाईट असल्याचे समजते. काही वेळा प्रतिमा क्षणभर अधिक तेजस्वी दिसते किंवा अदृश्य होते. जितके लुकलुकणे कमी तितकी प्रतिमा रेखीव व बिंदुवत दिसते. क्षितीजाजवळील ताऱ्यांचे किरण अधिक जाडीच्या वातावरणातून प्रवास करीत असल्यामुळे त्यांच्या मार्गात भिन्न प्रणमनांकांचे कोश अधिक संख्येने येतात. वातावरणात लोलकासारखे कार्य होऊन किरणांचे अनियमित प्रणमन व अपस्करण घडते आणि तारे रंगीत दिसतात. निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशकिरणांचा मार्ग भिन्न होऊन ते निरनिराळ्या कोशांतून प्रवास करतात आणि प्रत्येक रंगाची प्रतिमा स्वतंत्रपणे लुकलुकते. कोणत्याही क्षणी डोळा एक रंग पाहतो. प्रत्येक रंगाची प्रतिमा वेगवेगळी पण दुसऱ्या प्रतिमेशेजारी असते. या उलट शेखर बिंदूकडील (डोक्यावरील) तारे तितकेसे लुकलुकत नाहीत.

 

भिन्न घनतेमुळे हवेच्या प्रकाशीय गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचे क्षीण आणि स्थूल असे दोन वर्ग करता येतात. क्षीण परिणाम पृष्ठभागाजवळच्या ३ ते ६ मी. जाडीच्या स्तरांत होतात. स्थूल परिणाम हे मोठ्या प्रमाणात असलेल्या उभ्या व आडव्या दिशांतील तापमानक्रमिकता, भिन्न घनतेचे विस्तृत स्तर व दैनिक हवामानावर अवलंबून असतात. निरीक्षणे काही उंचीवरून केल्यास भूमीजवळील क्षोभकारी घटकांचे क्षीण परिणाम टाळता येतात व चांगली प्रतिमा मिळविता येते. उच्च स्तरांतील क्षोभ व वारे यांचे परिणाम प्रतिमेवर विशेषेकरून होतात. रेडिओ, संचासह सोडलेल्या फुग्याच्या साहाय्याने केलेल्या उच्च स्तरांच्या अभ्यासात असे आढळले आहे की, प्रणमनांकांतील बदल हे स्पष्ट निर्देश करता येईल अशा स्तरात होतात व प्रकाशकिरणांचे प्रभावी प्रकीर्णन बऱ्याच प्रसंगी सु. १० किमी. उंचीवरील क्षोभ सीमेजवळ (तपांबर सीमेजवळ) होते. याहून अधिक उंचीवरील वातावरण स्थिर आणि धूळ व बाष्पमुक्त असते. प्रकाशकिरण जेव्हा वातावरणातून पृथ्वीकडे येतो तेव्हा खालच्या स्तरांत त्यावर जास्त परिणाम होतात.

 

लुकलुकण्याचे मापन करण्यासाठी डोळ्याशिवाय अन्य उपकरण पूर्वीच्या काळी उपलब्ध नव्हते. डोळा हा संवेदनशील प्रकाश निरीक्षक आहे पण त्याची संवेदनक्षमता रंगावर अवलंबून असते. तेजस्वीपणांत दिसणारे काही फरक केवळ रंगांत झालेल्या फरकामुळे झालेले वाटतात. शिवाय १/१००० सेकंद कालावधीचे फरक डोळ्याला कळू शकत नाहीत. सुमारे १/२५ सेकंद कालावधीत होणाऱ्या तेजस्वितेतील फरकांचे सरासरी मूल्य डोळ्यांना कळू शकते. त्यामुळे प्रतिमेच्या सूक्ष्म अंगामध्ये किती त्वरेने बदल होतात याचे मापन करण्यासाठी अन्य मार्ग शोधण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. दुर्बल स्पंदनी प्रकाशाकडून उपयुक्त माहिती मिळविण्यास क्षणिक दिसणाऱ्या तीव्रतेचे मापन उपयुक्त ठरत नाही. विवक्षित छोट्या क्षेत्रावर अतिशय सूक्ष्म कालावधीत पडलेल्या प्रकाशाच्या तीव्रतेचे कमीत कमी कंप्रतेच्या (एका सेकंदात होणाऱ्या कंपनसंख्येच्या) आवाक्यात मापने करून त्यांच्या समाकलनाने मध्यममान (स्थूल सरासरी मूल्य) काढणे आवश्यक असते. प्रकाशजन्य विद्युत् मापक आणि अतिशय जलद कार्य करणारे अंकीय विश्र्लेषण तंत्र यांमध्ये अलीकडेच झालेल्या लुकलुकणाऱ्या प्रतिमेच्या स्पंदनी प्रकाशाचे अंकीय पद्धतीत रूपांतर करून डोळ्यांना दिसणाऱ्या स्पंदनी घटनेचे अतिशय बिनचूक ज्ञान मिळविता येऊ लागले आहे. अशा मापनापूर्वी ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाश तीव्रतेत किती त्वरेने बदल होत असतात याची पूर्वी कल्पनाच नव्हती. प्राथमिक मापनात नवीन माहिती उपलब्ध होत आहे. वातावरणातील भिन्न प्रणमनांकी विभाग भिंगाप्रमाणे कार्य करून प्रतिमेची तेजस्विता वाढविण्यास कारणीभूत होतात.

सूर्यकुलातील ग्रहांचे लुकलुकणे मात्र लक्षात येत नाही. ताऱ्यांच्या मानाने ग्रह पृथ्वीला फारच जवळ असल्यामुळे ग्रह बिंदुवत न दिसता त्यांचे चकतीसारखे गोलाकार विस्तारित बिंब दिसते. बिंबावरील कोणत्याही बिंदूचे अल्प स्थानांतर झाले, तरी ती चकतीतच किंवर चकतीच्या लगत किंचित बाहेरच्या अंगास दिसतो. अशा तऱ्हेने बिंबावरील प्रत्येक बिंदू लुकलुकत असला, तरी सर्व बिंदूंच्या एकत्रित परिणामाने बिंब प्रकाशित व स्थिर दिसते. बिंबाच्या कडेला होणारा थोडा फरक लक्षात येत नाही. खगोलीय निरीक्षणाची स्थिती खराब असताना दुर्बिणीतून पाहिल्यास बिंबाची कडा पुसट दिसते. दिवसाचा भाग व हवामान यांवर लुकलुकण्याची क्रिया अवलंबून असते. माध्यान्ही लुकलुकणे अधिकतम असून रात्रीच्या वेळी ते किमान होते. रात्रीची निरीक्षणाची स्थिती उत्तम असल्यास बहुतेक प्रसंगी प्रतिमेची सरक ०.३ कोनीय सेकंद असते. १ कोनीय सेकंदापर्यंत सरक असल्यास निरीक्षणाची स्थिती समाधानकारक आहे, असे मानले जाते. १० कोनीय सेकंदांची सरक असल्यास खगोलीय निरीक्षणाची स्थिती वाईट आहे, असे समजण्यात येते.

पृथ्वीबाहेरील रेडिओ उद्‌गम सुद्धा रेडिओ तरंगी निरीक्षणांत लुकलुकताना आढळतात. रेडिओ उद्गम आणि निरीक्षक यांमधून सौर वाऱ्याचे भिन्न घनतेचे विद्युत् भारित कणांचे समूह जात असतात. यामुळे रेडिओ तरंगाग्र पातळी अनियमितपणे वाकते व उद्गमांच्या लुकलुकण्यास कारणीभूत होते. अगदी लहान कोनीय विस्ताराचे रेडिओ उद्गम लुकलुकतात. त्यांच्या लुकलुकण्याच्या मापनाने सौर वाऱ्याची घनता व उद्गमांचा आकार यांचा अभ्यास करता येतो. ग्रहाप्रमाणेच मोठ्या विस्ताराचे रेडिओ उद्‌गम लुकलुकत नाहीत.  

नेने, य. रा. गोखले, गो. ना.