लीवर्ड बेटे : अटलांटिक महासागरातील वेस्ट इंडीज बेटांमधील लेसर अँटिलीस बेटांपैकी सर्वांत उत्तरेकडील बेटे. फ्रेंचमध्ये ‘ईल सूल व्हान’ व पोर्तुगीजमध्ये ‘इल्हास दू सोतार्व्हेतो’ या नावांनी ही बेटे ओळखली जातात. उत्तरेस व्हर्जिन बेटांपासून दक्षिणेस ग्वादलूप बेटापर्यंत लीवर्ड बेटांचा विसतार आहे. काही वेळा विडंवर्ड बेटांपैकी डोमिनिका बेटाचाही यात समावेश केला जातो. अक्षवृत्तीय विस्तार 160 ते 190 उ. व रेखावृत्तीय विस्तार 610 ते 650 प. यांदरम्यान दक्षिणेकडील मार्तीनीकपासून ग्रेनेडापर्यंतची बेटे ‘विंडवर्ड’ म्हणून ओळखली जातात. ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या संदर्भात या बेटांस लीबर्ड हे नाव दिलेले आहे. दक्षिणेकडील बेटांच्या मानाने या बेटांवर ईशान्य व्यापारी वाऱ्यांचा किंवा पूर्व पश्चिम प्रचलित वाऱ्यांचा परिणाम फारसा होत नाही. म्हणजेच व्यापारी वाऱ्यांपासून ही बेटे संरक्षित राहिली असल्यामुळे त्यांना ‘लीवर्ड बेटे’ असे संबोधले जाते. स्पॅनिशांनी सुरूवातीला लेसर अँटिलीस द्वीपसमूहाच्या संपूर्ण गटाचा विंडवर्ड बेटे असा उल्लेख केलेला होता आणि ग्रेटर अँटिलीसमधील मुख्यतः क्यूबा, जमेका, हिस्पॅनीओला व प्वेर्त रीको यांच्या गटाला लीवर्ड बेटे असे नाव दिले होते.
लीवर्ड बेटांमध्ये समाविष्ट होणाऱ्या बेटांपैकी अँटिग्वा, बारबूडा व रेडोंडा ही तीन बेटे अँटिग्वा-बारबूडा या नावाने 1981 मध्ये स्वतंत्र झाली. लीवर्डमध्येच व्हर्जिन बेटे येतात. व्हर्जिन बेटांचे र्ब्रिटिश व्हर्जिन बेटे व अमेरिकन व्हर्जिन बेटे असे दोन भाग पडतात. व्हर्जिन बेटांपैकी सेंट टॉमस, सेंट जॉन व सेंट क्रॉय ही तीन प्रमुख व इतर पन्नास द्वीपे अमेरिकेच्या ताब्यात आहेत. या बेटांचे क्षेत्रफळ 340 चौ. किमी. आणि लोकसंख्या 96,569 (1980) असून शार्ल अमाल्य ही यांची राजधानी आहे. ब्रिटिश व्हर्जिन बेटांत टॉर्टोला, व्हर्जिन गॉर्डा, ॲनगादे, जॉन व्हान डाइक, पीटर व नॉर्मन या प्रमुख बेटांचा आणि इतर चोवीस लहान बेटांचा समावेश होतो. या सर्वांचे मिळून क्षेत्रफळ सु. 153 चौ. किमी. व लोकसंख्या 12,000 (1981) असून टॉर्टोला बेटावरील रोड टाउन हे राजधानीचे ठिकाण आहे. सेंट बार्तेलमी, ग्वादलूप, मारीगालांत, देझराद, लेसँत ही बेटे व सँ मार्तेचा उत्तरेकडील दोनतृतीयांश भाग फ्रान्सच्या आधिपत्याखाली आहे. साबा, सेंट यूस्टेशस बेटे व सँ मार्तेच्या दक्षिणेकडील एकतृतीयांश प्रदेशावर डचांची सत्ता आहे. सेंट किट्स (सेंट क्रिस्तोफर)-नेव्हिस-अँग्विला ही बेटे 1983 मध्ये स्वतंत्र झाली आहेत. यांशिवाय माँसरॅत हे येथील एक महत्त्वाचे बेट आहे. ते पूर्णपणे ज्वालामुखी प्रकारचे आहे. याचे क्षेत्रफळ सु. 104 चौ. किमी. व लोकसंख्या 11,606 (1980) होती. 1871 ते 1956 या काळात लीवर्ड बेटे म्हणूनच येथील काही ब्रिटिश वसाहतींचा सामूहिक कारभार पाहिला जाई.
सर्व लीवर्ड बेटांचे क्षेत्रफळ 3,260 चौ. किमी. असून त्यांपैकी 1,780 चौ. किमी. फ्रान्सच्या ताब्यात, 608 चौ. किमी. ग्रेट ब्रिटनच्या, 340 चौ.किमी. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या, तर 88 चौ. किमी. क्षेत्रफळ नेदर्लंड्सच्या प्रशासनाखाली आहे. ग्वादलूप हे यांतील सर्वांत मोठे बेट आहे. लीवर्ड बेटे मुख्यतः ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झाली असून ओबडधोबड कटक व शंकू यांच्या स्वरूपात ही बेटे महासागर पृष्ठावर आलेली दिसतात. या समूहाच्या उत्तर भागातील बेटांची सस. पासून सरासरी उंची काही शेकड्यांत आढळते. दक्षिण भागात मात्र उंची बरीच वाढलेली आढळते. व्हर्जिन बेट म्हणजे ग्रेटर अँटिलीसमधील इतर बेटांप्रमाणेच पर्वतश्रेणींचा निमज्जन झालेला भाग आहे. अँटिग्वा, अँग्विला, बारबूडा व पूर्व ग्वादलूप यांवर प्रबाळ चुनखडकरचना आढळते. सेंट क्रिस्तोफरपासूनमाँसरॅतपर्यंतचा प्रदेश आणि पश्र्चिम ग्वादलूपचा प्रदेश ज्वालामुखी कटकांपासून बनलेला आहे. ग्वादलूप बेटावरील सूफ्रिएअर या ज्वालामुखी शिखराची उंची 1,467 मी. असून ते लेसर अँटिलीसमधील सर्वोच्च शिखर आहे.
लीवर्ड बेटांवरील वार्षिक सरासरी तापमान 240 से. ते 290 से. यांदरम्यान असते. जानेवारी ते मे हवा विशष सौम्य व आल्हाददायक असते. जून ते ऑक्टोबर या बेटांजवळून हरिकेन वादळे वाहतात. उत्तरेकडील कमी उंचीच्या बेटांवर पर्जन्यवृष्टी फारच कमी होते. येथील हवामान कोरडे आहे. बरेचसे प्रदेश तर अगदी ओसाड बनले आहेत परंतू दक्षिणेकडील बेटांच्या अधिक उंचीमुळे पाऊस अधिक पडतो, त्यामुळे तेथे वनस्पतींची भरपूर वाढ झालेली आढळते. साखर, रम, गूळ, कॉफी, कापूस, तंबाखू, लिंबूवर्गीय फळे, भाजीपाला, नारळ, मीठ, केळी ही येथील प्रमुख उत्पादने आहेत. पर्यटन हे येथील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. हिवाळ्यात पर्यटकांची अधिक वर्दळ असते. लीवर्ड बेटांवरील लोक प्रामुख्याने कृष्णवर्णीय आहेत. जे काही गौरवर्णीय आहेत, त्यांमध्ये फ्रेंच व इंग्रज मुख्य आहेत.
कोलंबसने 1493 मध्ये लीवर्ड बेटांचा शोध लावला, परंतु सतराव्या शतकात येथे ब्रिटिश आल्यापासूनच वसाहतींना प्रारंभ झाला. सर टॉमस वॉर्नर याला 1623 मध्ये सेंट किट्स बेटावर पाठविण्यात आले. त्याला याच्या सभोवतालच्या नेव्हिस, अँटिग्वा, माँसरॅत व बारबूडा या वसाहत न झालेल्या भागांचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. त्याच वर्षी किंवा 1625 वा 1627 मध्ये प्येर बलां द-नांब्यूक या फ्रेंच व्यक्तीनेही सेंट किट्स बेटावर वसाहत केली. 1632 मध्ये इंग्रजांनी जवळपासच्या बेटांवर वसाहती केल्या. त्यामुळे इंग्लंड, फ्रान्स व स्पेन या तिघा वसाहतकऱ्यांत संघर्ष सुरू झाले. या संघर्षातून स्पॅनिश लवकरच बाहेर पडले. त्यानंतर जवळजवळ दोन शतके लीवर्ड बेटे ही अँग्लो-फ्रेंच यांच्या हातातील केवळ खेळणी बनली होती. या दोन सत्तांमधील संघर्षांत अनेकवेळा यांतील बेटांच्या ताबेदारीमध्ये सतत अदलाबदल होत राहिली. 1815 मधील नेपालियनच्या पराभवापर्यंत या बेटांना न्याय मिळू शकला नव्हता.
पहा : ग्वादलूप बारबूडा वेस्ट इंडीजबेटे व्हर्जिन बेटे सेंट किट्स व नेव्हिस.
डिसूझा, आ. रे. चौधरी, वसंत