लीकी, लूई सीमोर बॅझेट : (७ ऑगस्ट १९०३-१ आक्टोंबर १९७२). प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ, पुराजीवविज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ.जन्म केन्यातील ख्रिस्ती मिशनरी कुटुंबात नैरोबीजवळच्या काबेटे गावी. बालपण कीकूयू जमातीच्या मुलांत गेले. त्यामुळे कीकूयू भाषा त्याने आत्मसात केली. त्याचे सुरुवातीचे शिक्षण काबेटे येथे घरीच झाले. ऐन तारुण्यात त्याने सभोवतीचा निसर्ग आणि विशेषतः पक्ष्यांचे निरीक्षण केले आणि अश्मयुगीन काही अवशेष गोळा केले. पुढे इंग्लंडमध्ये जाऊन सेंट जॉन म्हाविद्यालयातून (केंब्रिज विद्यापीठात) पीएच्. डी. पदवी मिळविली (१९२८). तेथे तो १९३०-३५ दरम्यान अधिछात्र होता. तत्पूर्वी १९२५-२६ दरम्यान त्याने पूर्व आफ्रिकेत पुरातत्त्वीय संशोधनासाठी चार मोहिमा केल्या आणि उत्खननातही सहभाग घेतला. अधूनमधून तो इंग्लंडमधील विद्यापीठांतून आफ्रिकेतील प्रागितिहासावर व्याख्याने देई. पुढे ही व्याख्याने प्रोग्रेस अँड ईव्हलूशन ऑफ मॅन इन आफ्रिका (१९६१) या शीर्षकाने प्रसिद्ध झाली. हेन्रीएटा विलफ्रिड ॲव्हर्न या पहिल्या पत्नी पासून त्याला दोन मुले झाली तिच्याशी घटस्फोट घेतल्यावर मेरी डग्लस निकोल (जन्म ६ फेब्रुवारी १९१३) या पुरातत्त्वज्ञ-पुराजीवविज्ञ सहकारी मैत्रिणीशी त्याने दुसरे लग्न केले (१९३६). सुमारे तीस वर्षे तिने लिकीस उत्खनन-संशोधन यांत सक्रिय मदत केली. याशिवाय तिने स्वतः ‘प्रोकाँसल ॲफ्रिकॅनस’ या कवटीचा शोध लावून मानवाच्या प्राचीनत्वावर प्रकाश टाकला. तिने ओल्डुवायीसंबंधीचे आपले संशोधन ओल्डुवायी गॉर्ज : माय सर्च फॉर अर्ली मॅन (१९७९) या ग्रंथात दिले असून डिस्लोक्लोजिंग द पास्ट (१९८४) या शीर्षकाने आत्मवृत्त लिहिले. त्यांना जोनॅथन, रिचर्ड आणि फिलिप हे तीन मुलगे झाले. त्यांपैकी जोनॅथन हा ज्येष्ठ. त्याने ओल्डुवायी येथे होमो हॅबिलिसचा नमुना शोधून काढला आणि पुढे मध्य केन्यातील बॅरिंगो सरोवराजवळ सर्प शेतीचा व्यवसाय सुरू केला. रिचर्ड (जन्म १९ डिसेंबर १९४४) या मुलावर लूईने भावी संशोधनाची सर्व जबाबदारी टाकली. तो केन्याच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाचा प्रशासक-संचालक झाला (१९७२). त्याला रूडॉल्फ (तुर्कान) सरोवराजवळ (ईशान्य टांझानिया) एका सर्वेक्षण-उत्खनन मोहिमेत दोन कवट्या मिळाल्या. त्या झिंजॅनथ्रपस मानवसदृश असून ८,५०,००० वर्षांपूर्वीच्या असाव्यात, असे तज्ञांचे मत पडले. पुढे १९७२ मध्ये याच सरोवराच्या परिसरात त्याला आणखी एक कवटी मिळाली. तिचा मेंदू ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या मेंदूपेक्षा मोठा असून, कदाचित हा मानवसद्दश अवशेष अतिप्राचीन असावा, असा काही विद्वानांचा तर्क आहे. याशिवाय या परिसरात त्याला इतर प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष सापडले. ते ३० वा ५० लक्ष वर्षांपूर्वीचे असावेत. होमा नदीखोऱ्यातून त्याने आपल्या सहकार्यांच्या मदतीने सुमारे ४०० अश्मीभूत अवशेष व अश्मयुगीन हत्यारे शोधून काढली. यांत त्याला सुमारे २३० व्यक्तींच्या कवट्या मिळाल्या. यामुळे ही मानवी वस्तीची सर्वांत प्राचीन वस्ती असावी, असे मानवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. रिचर्डने उपलब्ध अवशेषांवरून अनेक अनुमाने व अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आणि ऑरिजिन्स (१९७७) आणि पीपल ऑफ द लेक (१९७८) हे दोन ग्रंथ रॉजर ल्यूअनच्या सहकार्याने प्रसिद्ध केले.
लूई मेरी आणि रिचर्ड यांच्या पुरातत्त्वीय आणि पुराजीवविज्ञानातील संशोधनामुळे प्रागितिहासातील अनेक अवशेष उजेडात आले व प्राचीन मानवाच्या अस्तित्वाविषयी भरीव पुरावे उपलब्ध झाले. लूई लीकी काही काळ (१९४५-१९६१) नैरोबीच्या कॉरिंडन मिमॉरिअल म्यूझियमचा अभिरक्षक होता पुढे नैरोबीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयातील पुराजीवविज्ञान विभागात त्याने मानसेवी व नंतर संचालक म्हणून काम केले. काही दिवस नैरोबी विद्यापीठात प्राद्यापक म्हणूनही त्याने काम केले. (१९६९). अमेरिकेत अभ्यागत व्याख्याता म्हणून त्याने काही व्याख्याने दिली.
लीकीने प्रामुख्याने पूर्व आफ्रिकेत सर्वेक्षण, समन्वेषण, संशोधन व उत्खनन करून अनेक मौलिक अवशेष उजेडात आणले. त्याने प्रामुख्याने कंजेरा, ओलोर्गे-सेली, ⇨ओल्डुवायी गॉर्ज व अन्य अनेक ठिकाणी उत्खनन केले. त्यांपैकी ओल्डुवायी गॉर्ज हे अश्मास्थी व अश्मयुगीन दगडी हत्यारांचे भांडार. येथे लूई व मेरीला २० लाख वर्षांचा मानवी क्रमविकासवादाचा इतिहास उत्खननद्वारे आढळला (१९५९). त्यातून लूई व मेरी यांनी मानवाच्या उत्क्रांतीतील महत्त्वाचे टप्पे निदर्शनास आणले आणि आफ्रिकेत २० लाख वर्षांपूर्वी मानवाची वस्ती होती, हे सिद्ध केले. त्याच्या प्रमुख शोधांत ओल्डुवायी गॉर्ज येथील केनियम ऑफ झिंजॅनथ्रपस बॉयसेई (१९५९) आणि ओल्डुवायी चाइल्ड यांचा समावेश करावा लागेल. या मानवास त्याने झिंजॅनथ्रपस हे नाव दिले. यात मोठे दात व कवटीचे तुकडे होते. या माणसाचा काळ १७,५०,००० असावा असा तज्ञांनी अंदाज वर्तविला आहे. या माणसाबरोबरच दगडी हत्यारे त्रिदली खूर असलेले घोड्याचे व हत्तीचे अश्मीभूत अवशेष उपलब्ध झाले. तसेच त्यांना होमो-हॅबिलिस या मानवाचे १८ लाख वर्षांपूर्वींचे प्राचीन अवशेष मिळाले. येथे लीकीला हातकुऱ्हाड संस्कृतीच्या भिन्न कालातील अकरा अवस्था आढळल्या. त्यामुळे आफ्रिकेतील अबेव्हिलिअन काळापासून ते उत्तर ॲश्यूलियन काळापर्यंतचा उत्क्रम मिळाला. मेरीच्या सहकार्याने त्याने अन्यत्रही उत्खनने करून काही महत्त्वाचे प्राचीन अवशेष उजेडात आणले. या अवशेषांतील ऑस्ट्रॅलोपिथेकस या मानवाची कवटी महत्त्वाची असून ती मानवशास्त्रीय भाषेत वाय्. सी. म्हणून ओळखली जाते. झिंजॅनथ्रपस हा अधुनिक मानवाचा वंशज नसून दुसरा एक अश्मास्थी होता. त्यास त्याने होमो-हॅबिलिस असे नाव दिले आणि तो झिंजॅनथ्रपसच्या समकालीन असावा, असे मत माडंले. त्याचा होमो सेपियनशी प्रत्यक्ष संबंध असावा, हा सिद्धांतही मांडला तथापि त्याच्या या मताशी काही तज्ञ सहमत होत नाहीत. त्याच्या या संशोधनामुळे पूर्वीच्या शोधांद्वारे प्रस्थापित झालेली मते मागे पडून मानवाची प्राचीन वस्ती आशियात न होता ती पूर्व आफ्रिकेत झाली, या नव्या मतास पुष्टी मिळाली. लीकीने भूगर्भीय तृतीय युगालगतच्या वरच्या भागाच्या हवामानाच्या अवस्थांचे जे उपविभाग सुचविले आहेत, ते बहुतेक भूवैज्ञानिकांनी अमान्य केले आहेत तथापि त्याच्या संशोधनाने या काऱ्यास चालना मिळाली.
लीकीने आपले संशोधन दीडशे शोधनिबंध आणि सु. वीस ग्रंथ यांद्वारे प्रसिद्ध केले. त्यांतून संशोधनाचे सारभूत विवरण आढळते. यातील मतांशी काही तज्ञांचे मतभेद असले, तरी त्याच्या संशोधनाचे मूल्य वादातीत आहे. त्याच्या ग्रंथांपैकी ॲडम्स ॲन्सिस्टर्स (१९३४), स्टोन एज आफ्रिका (१९३६), ओल्डुवायी गॉर्ज (१९५२), माऊ माऊ अँड द कीकूयू (१९५२), ओल्डुवायी गार्ज -१९५१-६१(१९६५), अन्व्हेलिंग मॅन्स ऑरिजिन (सहलेखक व्हॅन गुदाल- १९६९), ॲनिमल्स ऑफ ईस्ट आफ्रिका (१९६९), हे काही ग्रंथ मान्यवर झाले असून त्याच्या आवृत्त्याही निघाल्या. व्हाइट आफ्रिकन या नावाने त्याने आत्मवृत्त लिहिले. कीकूयूसंबंधीचे त्याचे तपशीलवार पुस्तक मरणोत्तर तीन खंडांत सदर्न कीकूयू बिफोर १९०३ या नावाने प्रसिद्ध झाले (१९७७-७८), केन्यातील माऊ माऊ चळवळ आणि कीकूयू आदिवासी या संदर्भात त्याने लिहिलेली पुस्तके केन्याच्या आदिवासी जीवनावर तसेच ब्रिटिशांच्या राजकीय धोरणावर प्रकाश टाकतात.
लूई आणि मेरी यांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार लाभले. त्यांपैकी लूईला कॅथबर्ट पीक प्राइज (१९३३), अँड्री मेडल (१९३३), हेन्रीस स्टोप्स मिमॉरिअल मेडल (१९६२), व्हायकिंग फंड मेडल (१९६५), हेल सेलेसी अवार्ड (१९६८), इ. प्रसिद्ध होत. हवर्ड मेडल (१९६२), प्रेस्टविच मेडल (१९६९), हे मान उभयतांना प्राप्त झाले. याशिवाय ऑक्सफर्ड, कॅलिफोर्निया, ईस्ट आफ्रिका इ. विद्यापीठांनी लूईला सन्मान्य डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली. केन्या नॅशनल पार्क्स, ईस्ट आफ्रिकन वाइल्ड लाइफ सोसायटी आणि युगांडा नॅचरल हिस्टरी सोसायटी आदी मान्यवर संस्थांशी त्याचे सदस्य, विश्वस्त आदी नात्याने संबंध होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ नैरोबीमध्ये आफ्रिकन प्रागितिहासाच्या संशोधन-अभ्यासासाठी इंटरनॅशनल लूई लीकी मिमॉरिअल इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापण्यात आली.(१९७७).
उत्खनन व संशोधन यांत मेरी व रिचर्ड यांनी त्याला बहुमोल सहकार्य केले. किंबहुना मेरीने शोधलेल्या काही अश्मीभूत कवट्यांमुळे आणि अश्मयुगीन हत्यारांमुळे आफ्रिकेच्या प्रागितिहासाची तज्ञांना जुळवाजुळव करणे शक्य झाले. लाएटोली येथील ३७ लाख वर्षांपूर्वीच्या मानवी पावलांचे ठसे शोधून काढण्यातही मेरीला यश मिळाले त्याने व मेरी यांनी मिळून सम स्ट्रिंग फिगर्स फ्रॉम द नॉर्थ इस्ट अँगोला (१९४९), एक्सकॅव्हेशन्स ऍट द ननोरो रिव्हर केव्ह (१९५०), हे ग्रंथ लिहिले. लंडन येथे त्याचे हृदयविकाराने निधन झाले.
लीकीने प्रारंभीच्या मानवी वसतिस्थानाचा केवळ शोधच लावला नाही, तर त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनने केली. तेथे आढळलेल्या हाडांचा व झिजॅनथ्रपसच्या अवशेषांचा अभ्यास केला. शिवाय पोटॅशिअम ऑर्गनसारख्या कालमापन पद्धतीचा उपयोग करून अवशेषांचा काळ ठरवला. पुरातत्त्वशास्त्रातील लूई लीकी व मेरी लीकी यांचे सहजीवन या शास्त्राभ्यासावर ठसा उमटवणारे ठरते.
संदर्भ : 1. Cole, Sonia, Leakey’s Luck : The Life of Louis Seymour Bazett Leakey, 1903-1972, London, 1976.
2. Daniel, Glyn Brown, Peter, Reader’s Digest : Unforgettable Louis Leakey, London, 1974.
3. Grosvenor, M. B. Ed, National Geographic, November, 1966, Washington.
4. Sherraff, Anbdrea, Ed. The Cambridge Encyclopaedia of Archacology, Cambridge, 1980.
5. Tobias, P.V. Bielicki, Ed. Studies in Physical Anthropology, Warsaw, 1976.
देशपांडे, सु. र.
“