लिलिएलीझ : (पलांडु गण). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एका गणाचे नाव. वर्गीकरणाच्या भिन्न पद्धतींनुसार यामध्ये अंतर्भूत केल्या जाणाऱ्या कुलांची संख्या भिन्न आहे. सर्वच पद्धतींत ⇨लिलिएसी (पलांडू) हे कुल अंतर्भूत असल्याने लिलिएलीझ हे गणनाम सामान्य आहे. ए. एंग्लर यांच्या पद्धतीत ह्या गणात (लिलिफ्लोरीत) नऊ तर ए. बी. रेंडेल यांच्या पद्धतीत सहा आणि जे. एन्. मित्र यांच्या पद्धतीत अकरा कुलांचा समावेश आहे. यांपैकी अनेकांचे जे. हचिन्सन यांनी स्वतंत्र गण केले आहेत. ⇨जुंकेसी (प्रनड) या कुलाचा समावेश (एंग्लर यांच्या पद्धतीत) जुंकेलिझ अथवा प्रनड गणात झाल्याने तेथे वर्णन केलेल्या मित्र यांच्या  पद्धतीतून ते वगळले आहे. लिलिएसी, ⇨ॲमारिलिडेसी (मुसली कुल), ⇨डायॉस्कोरिएसी (आलुक कुल), ⇨इरिडेसी (केसर कुल) इ. कुले सामान्य असून त्यांचे नैसर्गिक आप्तभाव निकटचे आहेत. 

लिलिएलीझ गणातील बहुतेक वनस्पती, ⇨ओषधी (नरम व लहान) किंवा लहान क्षुपे (झुडपे) असून अनेकींची खोडे कंद, दृढकंद व मूलक्षोड [→ खोडे]यांसारखी जमिनीत वाढणारी आहेत. काही थोड्या वनस्पती मोठी झुडपे, वेली व लहान वृक्ष आहेत. पाने विविध आकार-प्रकारची मूलज (जमिनींतील खोडापासून किंवा मुळांच्या शेंड्यापासून वाढणारी) किंवा स्कंधोद्भव (जमिनीवरील खोडावर येणारी) असून क्वचित ती नसतात. फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, नियमित, क्वचित एकसमात्र (एकाच उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी), अवकिंज किंवा अपिकिंज (इतर पष्पदले अनुक्रमे किंजदलांच्या खालच्या पातळीवर अथवा वरच्या पातळीवर असलेली)व त्रिभागी (प्रत्येक मंडलात तीन पुष्पदले असलेली) असतात परिदले एकूण सहा व प्रदलसम (पाकळ्यांसारखी) क्वचित हिरवट व संदलसम असतात. केसरदले (पुं-केसर) तीन किंवा सहा व किंजपुट (स्त्री-केसराचा तळभाग) तीन कप्प्यांचा असतो बीजके (अविकसित बीजे)अधोमुखी (तळाकडे बीजकरंध्र वळलेली) असतात [→ फूल]. फळ शुष्क (बोंड) किंवा रसाळ-मांसल (मृदुफळ) आणि बीज सपुष्क (दलिकाबाहेर अन्नांश असलेले) असते. फुलांचे परपरागण [→ परागण] बहुधा कीटकांद्वारे घडून येते. फुले व फुलोरे [→ पुष्प बंध] विविध प्रकारचे व आकर्षक असून त्यांमुळे ती लोकप्रिय आहेत. पाण्यात वाढणाऱ्या काही वनस्पती शोभिवंत असून काहींपासून सुगंधी द्रव्ये मिळतात काहींची पाने व खोडे (उदा., कांदा, लसूण, गोराडू, कारंदा इ.) खाद्य व काहींची औषधी (उदा., शतावरी, कोरफड) आहेत काहींचे (उदा., कळलावी) अवयव विषारी आहेत. पाण्यातील ⇨हायसिंथ तणासारखी उपद्रवकारक आहे. पलांडू (कांदा) या सर्वपरिचित वनस्पतीमुळे ‘पलांडू कुल’ व ‘पलांडू गण’ ही नावे दिलेली आहेत.

पराग, ⇨ शारीर व ⇨आकारविज्ञान इत्यादींच्या संदर्भात हा गण प्रांरभिक समजला जातो. त्याचा उगम ⇨रॅनेलीझ (मोरवेल गण) या द्विदलिकित गणापासून झाला असावा असे सर्वसाधारणपणे मानतात तथापि याबबत मतभेद आहेत.⇨सिटॅमिनी (कदली गण) व ⇨ऑर्किडेलीझ (आमर गण) हे लिलिफ्लोरीपासून अवतरले असावेत, असे एंग्लर व रेंडेल यांचे मत आहे तसेच ग्लुमिफ्लोरी [तृण गण → ग्रॅमिनेलीझ] व स्पॅथिफ्लोरी [ॲरॉइडी →डकवीड ] यांचाही उगम लिलिल्फोरीपासून झाला असावा, असे एंग्लर व हचिन्सन यांचे मत आहे.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Morphology of vascular Plants, Cambridge, 1965.

           2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

           3. Rendle A. B. The Classification  of  Flowering  plants, Vols. I and II, Cambridge, 1965.

जगताप, अहिल्या पां. परांडेकर, शं. आ.