लिमये, दत्तात्रेय बाळकृष्ण : (३१ जुलै १८८७-२६ फेब्रुवारी १९७१). भारतीय रसायनशास्त्रज्ञ. ‘ करंजीन’ हे द्रव्य व ‘निधोन प्रक्रिया’ या शोधांबद्दल ते प्रसिद्ध आहेत.
लिमये यांचा जन्म कोकणातील मणचे गावी व शालेय शिक्षण हावनूर, नाशिक व मुंबई येथे झाले.१९१० साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी. व १९११ साली एम्. ए. (विज्ञान) या पदव्या मिळविल्या.
पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी १९११-४२ या काळात वनस्पतिज पदार्थांविषयीचे रासायनिक संशोधन केले. तेथून ते ११९४२ साली संचालक म्हणून निवृत्त झाले. करंज (पाँगॅमिया ग्लॅब्रा)या वृक्षातून मिळणाऱ्या तेलातील ‘करंजीन’ हा स्फटिकी पदार्थ त्यांनी शोधून काढला, त्याची संरचना ठरविली आणि तो संश्लेषणाने(कृत्रिम रीतीने) मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. या अनुषंगाने त्यांनी प्रथमच फ्युरोकुमारीन नावाची संरचना संश्लिष्ट करून दाखविली आणि ‘२- ॲसिल रिसॉर्सिनॉल’ या वर्गाची संयुगे बनविण्याची एक अभिनव प्रक्रिया विकसित केली. करंजिनाच्या संश्लेषणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांचे संशोधन आलेले असतानाच शेषाद्री यांनी त्याचे लिमये यांच्या आधी संश्लेषण केले.
रासायनिक संशोधनास प्रोत्साहन मिळावे व आर्थिक साहाय्य व्हावे म्हणून लिमये यांनी रसायन-निधी स्थापन केला. या निधीसाठी जमविलेली रक्कम अखेरीस त्यांनी पुणे विद्यापीठास दिली. रसायनम् हे नियतकालिक या निधीचे मुखपत्र होते आणि त्यात रसायनशास्त्रातील संशोधनपर लेख प्रसिद्ध होत. हे नियतकालिक त्यांनी १९३६-५६ या काळात चालविले. त्यांचे काही संशोधनपर लेख यात प्रसिद्ध झाले होते. याशिवाय इंडियन केमिकल सोसायटीचे जर्नल आणि जर्मन केमिकल सोसायटीचे बेरिष्ट या नियतकालिकांतही त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले होते. पुणे विद्यापीठाने डी. लिट्. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. ते पुणे येथे मृत्यू पावले.
केळकर, गो. रा.