लिनीअस, कार्ल : (लिनीअस, कॅरोलस). (२३ मे १७०७-१० जानेवारी १७७८). स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञ. वनस्पतींचे वर्गीकरण व द्विपदनाम पद्धती यांसंबंधीच्या मौलिक संशोधनकार्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत. वर्गीकरणात्मक वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान यांचे पिता अशी त्यांची ख्याती आहे.
लिनिअस यांचा जन्म स्मोलांडातील दक्षिण रोशल्टमध्ये झाला. त्यांची फुलांबद्दलची आवड लहानपणीच दिसून आल्यामुळे ‘बाल वनस्पतिशास्त्रज्ञ’ असे द्विपदनाम त्यांना वडिलधाऱ्या मंडळीकडून मिळाले होते.त्यांचे शिक्षण प्रथम व्हेक्श व नंतर लंड येथे झाले आणि अप्साला विद्यापीठातून ते वैद्यकाचे पदवीधर झाले. तेथे त्यांचा प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ वूलाफ सेल्सिअस यांच्याशी परिचय झाला या घटनेचा त्यांच्या जीवनावर फार प्रभाव पडला. १७३० मध्ये ते वनस्पतिशास्त्राचे अध्यापक झाले व १७३२ मध्ये ॲकॅडेमी सायन्सेसतर्फे त्यांना लॅपलँडातील वनस्पतींच्या शोधाकरिता पाठविले गेले. त्या संशोधनाचा तपशील १७३७ मध्ये ॲम्स्टरडॅम येथे Flora laponica या ग्रंथात प्रसिद्ध झाला. तत्पूर्वी १७३५ मध्ये Systema naturae व १७३७ मध्ये Genera Plantarum हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध झाले होते. या ग्रंथांमुळे त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. Systema naturae मध्ये वनस्पतींच्या फुलांतील प्रजोत्पादक अवयव (केसरदले व किंजदले) लक्षात घेऊन वर्गीकरणाची लैंगिक पद्धत त्यांनी मांडली होती [⟶ वनस्पतींचे वर्गीकरण]. ती कृत्रिम असूनही गरजेच्या दृष्टीने अत्यंत सोयीची वाटल्याने फार लोकप्रिय झाली. Systema naturae च्या पहिल्या खंडात प्राण्यांच्या शास्त्रीय नावांची माहितीहि आढळते (१७६८).
इ. स. १७३८ मध्ये त्यांनी वैद्यक व्यवसाय सुरू केला व १७३९ मध्ये त्यांचा विवाह सारा मोरीया यांच्याशी झाला. १७४१ मध्ये त्यांची अप्साला विद्यापीठात वैद्यकाचे प्राध्यापक म्हणून व १७४२ साली वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली, १७४५-५३ या काळात अध्यापनाबरोबर त्यांनी वनस्पती आणि प्राणी ह्यांसंबंधीचे संशोधन केले व यांविषयीची माहिती सात ग्रंथांत प्रसिद्ध केली. यांपैकी Species Plantarum व Genera Plantarum मध्ये वनस्पतींच्या प्रजातींची व जाती नावे ग्रथित केली असून ती आज पावेतो बव्हंशी प्रमाण मानली गेली आहेत. प्रजाती व जाती निश्चित करण्याची तत्त्वे त्यांनी निश्चितपणे मांडली आहेत. १७६१ मध्ये त्यांना १७५७ पासून सरदारकीचे फर्मान मिळाले व त्यांच्या नावात कार्ल फॉन लिन्ने असा बदल झाला. १७६३ मध्ये चहाचे जिवंत झाड यूरोपमध्ये आणले गेल्याने त्यांना आनंद झाला. प्राणी व वनस्पती या सजीवांच्या कोटीतील जातींच्या वर्गीकरणाच्या पद्धती शोधून काढून त्या कोटींना नेटके स्वरूप देण्यात त्यांनी परिश्रम केले इतकेच नव्हे तर खनिजांचेहि वर्गिकरण केले व रोगांच्या प्रकारांवर ग्रंथ लिहिला. १७७८ मध्ये ते अप्साला येथे मृत्यू पावले व १७८१ मध्ये त्यांच्या अनेक संशोधनांची जंत्री आर्. पल्टनेरी यांनी जनरल व्ह्यू ऑफ दि राइटिंग्ज ऑफ लिनोअस या नावाने प्रसिद्ध केली. लिनीअस यांचा संपूर्ण ग्रंथसंग्रह व वनस्पतिसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर सर जे. ई. स्मिथ यांनी विकत घेतला. पुढे हे संग्रह लंडनच्या लिनीअन सोसायटीकडे आले.
पहा : वनस्पतिनामपद्धति, वनस्पतींचे वर्गिकरण.
संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
2. Mukherji, H. Ganguly, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.
परांडेकर, शं. आ. जमदाडे, ज. वि.
“