लिटन, लॉर्डएडवर्ड रॉबर्ट बुलवर : (८ नोव्हेंबर १८३१-२४ नोव्हेंबर १८९१). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल (१८७६-८०) आणि प्रसिद्ध कवी. त्याचा जन्म सुखवस्तू उमराव घराण्यात लंडन येथे झाला. हॅरो (क्रेंबीज विद्यापीठ) येथे शिक्षणक्रम पूर्ण करून (१८४५) बॉन विद्यापीठात त्याने एक वर्ष उच्च शिक्षणात व्यतीत केले. इंग्रजी साहित्याचा त्याचा व्यासंग मोठा होता आणि विद्यार्थिदशेतच कविता रचण्याचा छंदही त्याला जडला. पदवी घेतल्यानंतर त्याने सर हेन्री बुलवर या काकांच्या हाताखाली स्वीय साहाय्यक म्हणून विनावेतन काम केले. पुढे व्हिएन्नातील ब्रिटीश वकिलातीत त्याची सचिव म्हणून नियुक्ती झाली (१८५८). पुढे यूरोपातील अनेक देशांत त्याने परराष्ट्रीय खात्यात कधी सचिव, तर कधी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. या सुमारास त्याने क्लॅरेंडनची पुतणी एडिथ व्हिलयर्झ हिच्याशी विवाह केला (१८६४). त्याच्या मुलांपैकी व्हिक्टरला पुढे सरदारकी मिळाली व मुलगी लेडी बेटी हिने लिटनला प्रशासकीय आणि वाङ्मयीन गुणांविषयी लिहिले आहे.
पंतप्रधान बेंजामिन डिझरेलीने लिटनची हिंदुस्थानात व्हाइसरॉय म्हणून नियुक्त केली (१८७६). तत्पूर्वी त्याला मद्रासचा गव्हर्नर नेमले होते (१८७५). पण ते पद त्याने नाकारले. यावेळी हिंदुस्थानात विशेषतः दक्षिण, मध्य भारत व पंजाब यांत भयंकर दुष्काळ पडला होता आणि वायव्य सरहद्दीवर रशियाकडून आक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला होता. तुर्कस्तान-रशियातील १८७७-७८ च्या युद्धामुळे इंग्लंड व रशिया यांत वैर आले. इंग्लंडला शह देण्यासाठी रशियाने आपला वकील अफगणिस्तानात पाठविला. तेव्हा लिटनने वायव्य सरहद्दीवरील अफगाणिस्तानचे संबंध दृढतर करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आणि मैत्रीची बोलणी फिसकटल्यावर अफगाणिस्तानचा अमीर शेरअली याने १८७७ मध्ये रशियाच्या वकिलास ठेवून इंग्रज वकीलास परत पाठविले. तेव्हा लिटनने अफगाणिस्तानशी युद्ध सुरू केले (१८७८). जनरल फ्रेडरिक रॉबर्ट, जनरल स्ट्यूअर्ट व सॅम ब्राऊन हे खैबर खिंडीतून अफगाणिस्तानात पोहोचले. इंग्रजांनी खिंडींचा ताबा मिळविला. शेरअली रशियाव्याप्त हद्दीत पळून गेला आणि त्याचा मुलगा याकूबाखान गादीवर बसला. त्याच्याशी गंदमक येथे तह करून (मे १८७८). कुर्रम, पिशी व तिवी हे जिल्हे इंग्रजांनी मिळविले आणि आपला वकील लूई कॅव्हनरी यास काबूलला पाठविले. अफगाणांना हा तह मान्य नसल्यामुळे त्यांनी ब्रिटीश वकील आणि काही इंग्रज अधिकारी यांचे खून केले व याकूबखानला कैद केली. त्याचा भाऊ अयूबखान याने बंड करून मैवंद येथे इंग्रजांना पराभव केला. तेव्हा इंग्रजांनी फौज पाठवून अफगाणिस्तानशी युद्ध पुकारले. लिटन राजीनामा देऊन इंग्लंडला गेला (१८८०). त्याच्या जागी आलेल्या लॉर्ड रिपनने शेरअलीचा पुतण्या अब्दुर रहमान याच्याशी तह करून हे दुसरे अफगाण युद्ध थांबविले. या युद्धामुळे इंग्रजांचे वर्चस्व अफगाणिस्तानात स्थापन होऊन रशियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद वसला. लिटनच्या कार्याचा उचित गौरव करून त्यास अर्ल करण्यात आले. पुढे त्याची फ्रान्समध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८८७-९१). तो पॅरिसमध्ये मरण पावला.
दुष्काळग्रस्त भागाच्या निवारणासाठी त्याने जमा केला आणि दुष्काळ आयोगाने केलेल्या शिफारशी अंमलात आणल्या. दळणवळण सुधारण्यासाठी त्याने सु. दीड कोटी रूपयांची तरतूद केली तथापि या दुष्काळात असंख्य लोक मृत्यू पावले आणि लिटनचे प्रयत्न अपुरे पडले. त्यातच व्हिक्टोरिया राणीने ‘हिंदुस्तानची सम्राज्ञी’ हा किताब धारण केला व त्या प्रीत्यर्थ लिटनने दिल्ली येथे १ जानेवारी १८७७ रोजी दरबार भरविला.
लिटनने परदेशी कापडावरील पाच टक्के रद्द केली आणि मिठावरील कर देशात सर्वत्र सारखा ठेवून उत्पन्नात वाढ केली. मेयोने केलेल्या आर्थिक विक्रेंद्रीकरणाच्या बाबींत बदल करून १८७७ मध्ये लिटनने काही जादा बाबी प्रांतांकडे सोपविल्या सनदी नोकरीत एक-षष्ठांश जागा हिंदी नागरिकांकरिता राखून ठेवण्यात आल्या. १८७८ मध्ये त्याने ‘व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट’ अंमलात आणून एतद्देशीय वृत्तपत्रांवर निर्बंध लादले. दुष्काळातील त्याची अकार्यक्षमता आणि वृत्तपत्रांवरील निर्बंध यांमुळे तो लोकप्रिय झाला.
तत्कालीन साहित्यिकांत लिटनला एक कवी म्हणून वेगळेच स्थान होते तथापि त्याचे एकूण काव्य शब्दजालामुळे कंटाळवाणे झाले आहे, असे समीक्षक मानतात. त्याच्या बहुतेक कविता ओवेन मेरेडिथ ह्या टोपण नावाने लिहिलेल्या आहेत. त्याचे क्लायटेमनेस्टा … अँड अदर पोएम्स (१८५५) आणि वॉन्डरर (१८५८) हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध असून पहिल्यात त्याने रॉबर्ट ब्राउनिंगच्या ‘नाट्यात्मक एकभाषित’ (ड्रॅमॅट्रिक मॉनालॉग) या वैशिष्टपूर्ण काव्यप्रकारचे अनुकरण केले आहे तर दुसऱ्यात भावगीते आहेत. ल्युसाइल (१८६०) ही त्याची आणखी एक पद्यात्मक रोमांचकारी कादंबरी. त्याने आपल्या वडिलांची-एडवर्ड जॉर्ज-पत्रे, साहित्य इ. दोन खंडांत लाइफ, लेटर्स अँड लिटररी रिमेन्स या शीर्षकाने प्रसिद्ध केले (१८८३). किंग पॉपी (१८९२) हे त्याचे कल्पनारम्य महाकाव्य उल्लेखनीय आहे.
संदर्भ : 1. Kulkarni, V. B. British statesmen in India, Poona, 1961.
2. Thompson, Edward Gerrett, G. T. Rise and Fulfilment of British Rule in India, Allahabad, 1958.
देशपांडे, सु. र.