लिटमस : (लॅकमस, टर्नसोल, लायकेन ब्ल्यू). दगडफूल अथवा शैवाक वर्गांतील वनस्पतींपासून मिळविण्यात येणारे संयुगांचे मिश्रण. याला अम्लीय विद्रावात लाल व क्षारीय (अल्कधर्मी) विद्रावात निळा रंग येतो. अशा तऱ्हेने अम्ल व क्षारक वेगळे ओळखण्यासाठी रासायनिक विश्लेषणासाठी वापरण्यात येणारे हे सर्वांत जुने व सामान्य दर्शक [⟶ दर्शके] आहे.
नेदर्लंड्समधील लेकोनोरा टार्टारिया व रोसेला टिंक्टोरम या वनस्पतींपासून हे मुख्यत्वे मिळवितात. यासाठी या वनस्पतींची पाने कुस्करून त्यांचा लगदा बनवितात आणि त्याच्यांवर अमोनिया, पोटॅश व लाइम या रसायनांची हवेत प्रक्रिया करतात. अशा तऱ्हेने किण्वनासारखी कुजण्याची क्रिया होऊन लिटमसमधील विविध रंगीत घटक निर्माण होतात. लिटमसचे अंशतः विभाजन करून १८४० पर्यंत ॲझोलिटमीन, एरिथ्रोलिटमीन, स्पॅनिओलिटमीन व एरिथ्रोलीन ही द्रव्ये अलग करण्यात आली होती. ही द्रव्येही संयुगांची मिश्रणे असल्याचे आढळले असून १९६१ साली ही संयुगे म्हणजे फिनोक्झॅझाइन या ⇨ विषमवलयी संयुगांचे अनुजात (एका संयुगापासून तयार केलेली दुसरी संयुगे) असल्याचे दिसून आले. बीटा-ऑर्सिनॉल या संयुगापासून सरळ संश्लेषणानेही (कृत्रिम रीतीनेही) लिटमस तयार करता येते. लिटमस हे जांभट रंगाचे अस्फटिकी चूर्ण असून ते पाण्यात व अल्कोहॉलात विरघळते. ४.५ ते ८.३ पीएच मूल्यादरम्यानच्या [⟶ पीएच मूल्य] कक्षेत म्हणून याचा उपयोग करतात. याच्यात चॉक, जिप्सम वगैरे मिसळून त्याच्या कांड्या, वड्या, गोळे बनवितात. नेदर्लंड्स, द. आफ्रिका व चिली लिटमसचे प्रमुख उत्पादक देश आहेत.
लिटमसचे अल्कोहॉलातील विद्राव हे रासायनिक विश्लेषणात (उदा., अनुमापनात) दर्शक म्हणून वापरतात, परंतु लिटमसचे रासायनिक संघटन वेगवेगळे असते व त्याचा पाण्यातील विद्राव अस्थिर असतो. त्यामुळे औद्योगिक प्रक्रियांमध्ये सामान्यतः याच्याऐवजी संश्लेषित दर्शके वापरतात. लिटमस कागद विशेषकरून प्रयोगशाळेत दर्शक म्हणून वापरतात. टीपकागद, गाळणपत्र वा तत्सम द्रव शोषून घेणारा कागद लिटमसच्या विद्रावात भिजवून हा कागद तयार करतात. लिंबाचा रस, शिर्का यांच्यासारख्या अम्लीय विद्रावात लिटमस कागद लालसर बनतो. उलट धुण्याचा सोडा, टाकणखार यांच्या अल्कधर्मी विद्रावांत तो निळा होतो. विशेषतः प्रयोगशाळेत दर्शक म्हणून या कागदाचा जास्त उपयोग होतो. शिवाय लिटमसयुक्त मेणाच्या पेन्सिलीही रासायनिक विश्लेषणात वापरतात. वाइन, शिर्का यांच्यात रंगीत द्रव्य म्हणून लिटमसचा वापर करतात. तसेच लिटमस टाकून रंगीत केलेले दूध व लिटमसचा अल्कोहॉलातील विद्राव यांचा सूक्ष्मजंतूच्या संवर्धनामध्ये उपयोग करतात.
रंग व हरिता या अर्थाच्या फ्रेंच शब्दांवरून लिटमस हा शब्द आला असावा.
पहा : अम्ले व क्षारक दर्शके.
पाठक, श. पु. ठाकूर, अ. ना.