लिग्‍नाइट : पीट व उच्च दर्जाचा बिट्युमेनी कोळसा यांच्या दरम्यानच्या अवस्था दर्शविणारी दगडी कोळशाचा प्रकार. पीटच्या मानाने हा अधिक घट्ट व कठिण असतो पण दगडी कोळशाच्या मानाने यात कार्बन कमी प्रमाणात असतो. पीटवर दाब पडून दगडी कोळसा बनण्याच्या आधीच्या अवस्थेत हा निर्माण होत असावा. ज्या वनस्पतिज पदार्थांपासून हा बनलेला असतो त्यांपैकी पाने, सालीचे तुकडे इत्यादींचे अवशेष यात असल्याचे ओळखता येते. यामुळेच लाकूड अर्थाच्या लॅटिन शब्दावरून याचे लिग्‍नाइट हे नाव पडले आहे. मूळ लाकडाचे वयन वा पोत हे टिकून राहिलेले असल्यास याला ‘वुड कोल’ असे म्हणतात.

गुणधर्म : लिग्‍नाइट काहीसा लोणारी कोळशाप्रमाणे दिसतो व तो मऊ, हलका, संचूर्ण्य (सहज भुगा होणारा), सच्छिद्र असून त्यात ५० टक्क्यांपर्यंत कार्बन असतो. खणून काढलेल्या ताज्या लिग्‍नाइटात २० टक्के ते ६० टक्के आर्द्रता असते. उघडा पडल्यास यातील पाणी निघून जाऊन याचा भुगा बनतो व कधीकधी तो अचानक पेटतो. त्यामुळे हा साठविताना काळजी घ्यावी लागते व दूरवर पाठवावयाचा असल्यास सुकवून पाठवावा लागतो. तेलाचे संस्करण करून बनविलेले याचे विटांसारखे घट्ट गोळे मात्र २-३ महिने चांगले राहतात. याची ज्योत लांबट व धुरकट असते. 

प्रकार : आर्द्रता व खनिज द्रव्ये नसलेल्या लिग्‍नाइटामध्ये ६०-७५ टक्के कार्बन असून त्याचे उष्णतामूल्य दर किग्रॅ.ला १९,३०० किलोज्यूल असते [⟶ इंधन]. उष्णतामूल्यानुसार उत्तर अमेरिकेत लिग्‍नाइटीचे दोन प्रकार करतात. उष्णतामूल्य दर किग्रॅ.ला १४,६५० किलोज्यूलपेक्षा जास्त असणाऱ्या प्रकाराला काळा किंवा लिग्‍नाइट-ए तर याहून कमी उष्णतामूल्याच्या प्रकाराला तपकिरी किंवा लिग्‍नाइट-बी म्हणतात. इतरत्र लिग्‍नाइटाला सामान्यतः तपकिरी दगडी कोळसा म्हणतात व त्यांचे कठीण व मऊ असे प्रकार केले जातात. मऊ प्रकाराला मातकट आणि कठीण प्रकाराला मंद वा चकचकीत लिग्‍नाइट असे संबोधितात. स्थूलमानाने कठीण प्रकार लिग्‍नाइट-ए शी व मऊ प्रकार लिग्‍नाइट-बी शी तुल्य समजला जात असला, तरी त्यांच्यात तंतोतंत साम्य नसते. लिग्‍नाइटातील घटकांसाठी द इंटरनॅशनल कमिटी ऑफ कोल पेट्रॉलॉजीने प्रमाणभूत नावे सुचविली आहेत.

यूरोपात दीर्घकाळापासून लिग्‍नाइटाचे उत्पादन होत असल्याने तेथे याचे अधिक अध्ययन झालेले आहे. अमेरिका व कॅनडा येथील याच्या मोठ्या साठ्यांमुळे तेथील लिग्‍नाइटाच्या संशोधनाचा दर्जाही उंचावला आहे. अनुस्फुरक सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने याविषयी तपशीलवार संशोधन करण्यात आले आहे. अशा सूक्ष्मदर्शकात निरीक्षण करावयाच्या नमुन्यावर जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) जांभळे व कधीकधी निळे किरण टाकण्यात येतात आणि यामुळे नमुन्याकडून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणाच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या) साहाय्याने नमुन्याविषयी माहिती मिळते. 

आढळ : जगातील लिग्‍नाइटाच्या एकूण साठ्यापैकी सु. ७२ टक्के यूरोपात आहे. यांपैकी 2/3 लिग्‍नाइट जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया येथे असून यांशिवाय हंगेरी, इंग्‍लंड इ. यूरोपीय देशांतही लिग्‍नाइट आढळतो. रशियात जगातील साठ्यापैकी १८ टक्के साठे असून उत्तर अमेरिका, आशिया व ओशिॲनिया या प्रदेशात प्रत्येकी ३ टक्के साठे आहेत. लिग्‍नाइटाचे साठे मुख्यत्वे क्रिटेशस (सु.१४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) आणि तृतीय कल्पाच्या (सु. ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळांतील खडकांत आढळतात. काही ठिकाणी याचे ३० मी. पर्यंत जाडीचे थर जमिनीलगत आढळतात. मुख्यतः उघड्या खाणी चालवून लिग्‍नाइट काढण्यात येतो. चांगल्या दर्जाच्या लिग्‍नाइटात अंदाजे स्थिर कार्बन ३३ टक्के, बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) संयुगांच्या रूपांतील कार्बन ४५ टक्के, राख १२ टक्के व आर्द्रता १० टक्के असते.

उपयोग : हलक्या दर्जाचे इंधन म्हणून लिग्‍नाइटाचा वीजनिर्मितीसाठी, उद्योगधंद्यामध्ये व घरगुती कामांसाठी वापर केला जातो. दूरवर पाठविण्यापूर्वी सुकवून याच्या विटा बनवाव्या लागतात म्हणून हा दूरवर पाठविणे खर्चिक असते. त्यामुळे बहुधा हा खाणीलगत वापरला जातो, हलक्या दर्जामुळे याचा विशेष वापर होत नसला, तरी जेथे इतर इंधानांची टंचाई आहे अशा पूर्व जर्मनीसारख्या भागात हा वापरतात, पूर्वी प्रोड्यूसर वायू, द्रव इंधने व पॉलिश करण्यासाठी लागणारी खास प्रकारची मेणे बनविण्यासाठी लिग्‍नाइट वापरीत. जसजशी इतर खनिज इंधने कमी होत जातील, तसतसे लिग्‍नाइटाचे महत्त्व वाढेल आणि त्याचे इतर नवनवे उपयोग पुढे येतील.उदा., अमेरिकेत उत्तर डकोटामध्ये खाणीलगतच लिग्‍नाइटाचे वायूत रूपांतर करून तो वायू इंधन म्हणून वापरतात. लिग्‍नाइटाच्या घट्ट, काळ्या, राळेसारख्या कठीण प्रकाराला जेट म्हणतात व त्याला चांगली झिलई करता येते. हा प्रकार मुख्यतः यॉर्कशरमध्ये आढळतो आणि त्याचा दागदागिन्यांत उपयोग करतात.

भारत : भारतात तमिळनाडू (दक्षिण अर्काट, कडलोर), पाँडिचेरी, गुजरात (कच्छ), राजस्थान (पलना, जि. बिकानेर), काश्मीर (शालीगंगा, हंडवारा, बारमूल, केरळ (वरकळ, पारावूर, कननोर, कासरगोड) व प. बंगाल (जयंती, बक्सा टेकडी, दार्जिलिंग,जलपैगुरी, गंगेचा त्रिभुज प्रदेश) या प्रदेशांत लिग्‍नाइट आढळतो. कडलोर व पाँडिचेरीतील लिग्‍नाइटाचा शोध १८८४ सालीच लागला होता. दक्षिण अर्काट जिल्ह्यातील नेयवेली येथील साठा भारतातील सर्वांत महत्त्वाचा साठा असून त्याचे संशोधन १९३० सालापासून करण्यात येत आहे. येथील २.५ टन लिग्‍नाइटाचे उष्णता मूल्य १ टन दगडी कोळशाएवढे आहे. सुमारे २६० चौ.किमी. क्षेत्रातील मायोसीन व प्लायोसीन (सु. २ ते १ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील बालुकाश्म व शेल या खडकांत येथील २ अब्ज टनांचा साठा विखुरलेला आहे. येथे अंदाजे ६० मी. खोलीवर लिग्‍नाइटाचे पाच थर असून त्यांपैकी मधल्या थराची सरासरी जाडी १५.२५ किमी. व कमाल जाडी २२.७ मी.आहे. येथील सु. १२ चौ. किमी. क्षेत्रातील २० कोटी टन लिग्‍नाइट काढण्यासाठी उघडे खाणकाम १९५५ पासून करण्यात येत आहे. दरवर्षी सु. ३५ लाख टन लिग्‍नाइट येथून काढण्यात येत असून वीजनिर्मितीसाठी व यूरिया तयार करण्यासाठी तो वापरतात. राजस्थानात पलना येथील इओसीन (सू.५.५ ते ३.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत १८९६ साली लिग्‍नाइट आढळला. येथे २४-६० मी. खोलीवर लिग्‍नाइट आढळतो. काश्मीरमध्ये मायोसीन व प्लायोसीन काळांतील कारेवा नावाच्या खडकाच्या थरांत शालीगंगा आणि हंडवारा येथे अनुक्रमे ४० लक्ष व ३.२ कोटी टन तर बारमूलजवळ १० कोटी टन लिग्‍नाइट आढळला आहे. गुजरातमध्ये इओसीन काळातील खडकांत कच्छ (पानंध्रो), भडोच जिल्हा (राजपारडी) व भावनगरजवळ लिग्‍नाइटाचे साठे सापडले आहेत.

पहा : इंधन, कोळसा, दगडी.

ठाकूर, अ. ना.