लिंचिंग : अनेक लोकांच्या जमावाने एका व्यक्तीला किंवा थोड्या व्यक्तींना काही गंभीर व शिक्षापात्र गुन्हा केल्याच्या आरोपावरून किंवा नुसत्या संशयावरून कायदा हातात घेऊन हालहाल करून ठार मारण्याचा प्रकार. अशा मारण्याला अर्थांतच कायद्याचे पाठबळ नसते. लिंचिंगची प्रथा अमेरिकेत सुरू झाली. अमेरिकेच्या समृद्ध प्रदेशाच्या शोधानंतर यूरोपमधील अनेक राष्ट्रांतून लोकांची तिकडे जाण्याला रीघ लागली, वसाहती स्थापन झाल्या व त्यांच्या सुव्यवस्थेसाठी ब्रिटिश व अन्य राष्ट्रांच्या सरकारांनी शासनव्यवस्था हातात घेतली. ते प्रदेश पादाक्रांत करून आपल्या राज्यांना जोडले. देशांतर करणाऱ्यांच्या वसाहती अमेरिकेची पूर्व किनारपट्टी सोडून आतल्या दिसेने पसरू लागल्या. त्यांनी आपल्याबरोबर शेती व अन्य कामांसाठी निग्रो गुलामांनाही तिकडे नेले तथापि त्यांच्या मागोमाग राजकीय कायदा व सुव्यवस्थेची सुविधा कार्यवाहीत आली नाही. काही वसाहती तशाच पुढे सरकत गेल्या. अशा परिस्थितीत कायद्याला व सुव्यवस्थेला पर्याय म्हणून त्या वसाहतींत लिंचिंगच्या प्रथेचा उदय झाला. त्यामुळे काही ठिकाणी ‘लिंच कायदा’ हे नाव आजही प्रचलित आहे. अर्थात या ‘बेकायदा’ कायद्याला प्रथम तेथील निग्रो गुलामच बळी पडले परंतु पुढेपुढे गोरे लोकसुध्दा लिंचिंगच्या प्रथेला बळी पडल्याच्या घटना घडल्या.
वास्तविक पाहता असा लिंचिंगचा कायदा कोठेही झालेला नाही परंतु लोकांनी शासकीय कायद्याच्या अभावामुळे कायदा हातात घेऊन न्यायदान करण्याची पद्धत सुरू केली. अमेरिकेत सुरुवातीला असे लिंचिंग बव्हंशी निग्रो गुलामाला गोऱ्या स्त्रीवर बलात्कार करण्याच्या आरोपावरून किंवा गोऱ्या माणसाची हत्या केल्याच्या आरोपावरून होत असे. नंतर व्यक्तीविरुद्ध किंवा मिळकतीसाठी गुन्हेगाराला अशा रीतीने शिक्षा देण्याला सुरुवात झाली.
लिंचिंग शब्दाची व्युत्पत्ती तसेच या प्रथेचा उगम निरनिराळ्या घटनांवरून झाला असे मानतात. काही लोकांच्या मते सोळाव्या शतकांत आयर्लंडमध्ये गॉलवे ह्या गावच्या जोसेफ लिंच नावाच्या महापौराने स्वतःच्या मुलाविरुद्ध न्यायाधीश या नात्याने स्वतःच खटला चालवून त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावली परंतु लोकांनी त्याला पळवून नेऊ नये म्हणून त्याला घरात कोंडून ठेवून रात्री खिडकीच्या गजांना टांगून फाशी दिले. त्यावरूनच ‘लिंच’ हे क्रियापद अस्तित्वात आले. काहींच्या मते अठराव्या शतकात अमेरीकेतील व्हर्जिनिया या वसाहतीत चार्ल्स लिंच नावाचा मळेवाला व मिलिशिया सैन्याचा एक सैनिक होता व तो तेथे ‘जस्टिस ऑफ पीस’ होता. पुढे तो कर्नल झाला. त्याने अमेरिकेन क्रांतिकारकांना विरोध करणाऱ्या टोरी पक्षांच्या लोकांना स्थानिक न्यायाधीश या नात्याने झाडाला उलटे टांगून शिक्षा द्यायला सुरुवात केली. आरोपीस ठार न मारता क्लेशकारक स्थितीत ठेवून त्याच्याकडून कबुलीजबाब घेण्याचाच हेतू त्यात असे. या दोन घटना साधारणपणे लिचिंग या प्रथेची सुरुवात मानतात. नंतर कायदेशीर अधिकाराशिवाय जमावाने व्यक्तीला हालहाल करून ठार मारण्यात या प्रथेचे रूपांतर झाले. या क्रुर प्रथेला कायद्याचा कसलाही आधार नसतानासुध्दा या बाबतीत अमेरीकेत इतकी अनास्था आहे, की अगदी अलिकडील काळापर्यंत तेथील फेडरल सेनेटमध्ये या प्रतेला गुन्हा मानून प्रतिबंध करणारे विरोधक अनेक वेळा पुढे येऊनसुध्दा असा कायदा संमत होऊ शकला नव्हता.
लिंचिंगचे प्रकार मुख्यत्वे अमेरीकेत घडत असत. विशेषतः दक्षिणेकडील राज्यांत त्यांचे प्रमाण जास्त असे. अलिकडे मात्र असे प्रकार शून्यवत झाले आहेत. अमेरिकन सेनेटने नेमलेल्या समितीच्या अहवालाप्रमाणे १८८९ पूर्वी झालेल्या लिंचिंगच्या प्रकरणांमध्ये ९०% प्रकरणे दक्षिणेकडील राज्यांत घडली. १८८९ ते १९५० पर्यंत लिंचिंगच्या एकून ४,७३० प्रकरणांपैकी ३८% मानवहत्येच्या आरोपावरून २१%बलात्काराच्या आरोपावरून ८% चोरीच्या आरोपावरून ६% अपमान करण्याच्या आरोपावरून व उर्वरित इतर कारणांवरून झाली होती. यांपैकी १,२९३ हत्या गोऱ्या लोकांच्या व ३,४३७ हत्या निग्रो लोकांच्या होत्या. १९०० ते १९५० या काळात एकून १,९८६ प्रकरणे झाली होती. त्यांपैकी १८५ गोऱ्या व १,७९१ निग्रो लोकांच्या हत्येची होती. इतर राष्ट्रांतील अशा घटनांची आकडेवारी उपलब्ध नाही परंतु अमेरिकेशिवाय अन्य देशांत लिंचिंग होतच नाही, असे मानवयास जागा नाही. भारतात अलिकडे लिंचिंगची प्रकरणे घडत असल्याचे आढळून आले आहे. १ जून १९८२ रोजी. पं. बंगालमध्ये आनंदमार्गी १७ पुरुष व २ स्त्रिया यांच्या अशा रीतीने क्रुर हत्या झाल्याचे वृत्त आहे. कारण हे लोक मुले पळवून नेतात असा संशय होता. १५ जुलै १९८२ च्या सुमारास बिहारमध्ये दोन लोकांना लिंचिंग करून ठार मारल्याचे व शेवटच्या आठवड्यात चार डाकूंना एका खेड्याच्या लोकांनी लिंचिंग करून यमसदनास पाठविल्याची बातमी आहेत. या गोष्टी जेथे घडतात, तेथील लोकांचा कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्य शासनावरचा विश्वास उडत चालल्याचेही कदाचित हे द्योतक असू शकेल.
संदर्भ : 1. Franklin, John Hope, From Slavery to Freedom, New York, 1967.
2. National Association for the Advancement of Colored People, Thirty Years of Lynchings in the United states, 1889-1918, New York, 1919.
3. Southern Commission on the study of Lynching, Lynchings and What they Mean. Atlanta 1931.
भोपटकर, चिं. त्र्यं.