लिंग : एखाद्या सजीवांच्या जीतीतील घटकांचे प्रजोत्पादनाच्या दृष्टीने नर व मादी अशा दोन गटांत विभाजन ज्या मुख्य लक्षणाला अनुसरून करता येते त्याला लिंग असे म्हणतात. नर व मादी यांतील संरचनात्मक भिन्नता नेहमीच स्पष्ट नसते (उदा., खालच्या दर्जाच्या सजीवांत), तरी कार्यात्मक भिन्नतेत निश्चितपणे नेहमी फरक करणे शक्य होते.

प्रजोत्पादनाला लिंगाची आवश्यकताच असते, असे नाही. अनेक खालच्या दर्जाचे सजीव (उदा., बहुतेक सर्व सूक्ष्मजंतू, एककोशिक म्हणजे एकाच कोशिकेचे-पेशीचे-बनलेले सजीव) लिंगाशिवाय सुलभपणे प्रजोत्पादन करू शकतात. एरवी लैंगिक प्रजोत्पादन करणाऱ्या कित्येक उच्च दर्जाच्या वनस्पतींतसुध्दा कंद, धावते खोड वगैरेंसारख्या अवयवाद्वारे शाकीय (अलैंगिक) प्रजोत्पादन होणे सर्वसामान्य आहे. 

अलैंगिक प्रजोत्पादनापेक्षा लैंगिक प्रजोत्पादनाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये संततीत अधिक मोठ्या प्रमाणात आनुवंशिक भिन्नता निर्माण होण्याची खात्री असते. अलैंगिक प्रजोत्पादनात प्रत्येक अपत्य आपल्या एकमेव पितराशी समरूप असते. याला फक्त अपवाद म्हणजे आनुवंशिक द्रव्यात उत्परिवर्तनामुळे (आकस्मिकपणे होणाऱ्या बदलांमुळे) उद्‍भवणारे भेद होत. लैंगिक प्रजोत्पादनात प्रत्येक अपत्याला दोन पितरांकडून जीनांचे (आनुवंशिक लक्षणांच्या एककांचे) तयार झालेले संयोजन प्राप्त होते व त्यामुळे प्रत्येक अपत्य एकमात्र असते. अशा प्रकारे अलैंगिक प्रजोत्पादन करणाऱ्या सजीवांच्या समूहापेक्षा लैंगिक प्रजोत्पादन करणाऱ्या सजीवांच्या समूहात खूप मोठी आनुवंशिक भिन्नता आढळते. या आनुवंशिक भिन्नतेचा एक फायदा म्हणजे पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता हा होय. आनुवंशिक भिन्नता जितकी अधिक तितकी त्या सजीव समूहात बदललेल्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक असलेली आनुवंशिक संयोजने पुढील पिढ्यांत नेतील असे संतती घटक समाविष्ट होण्याची शक्यता जास्त असते. [⟶ प्रजोत्पादन]. 

जैव क्रमविकासात (उत्क्रांतीत) लैंगिक प्रजोत्पादनाला सबळ अनुकूलता असल्याचे दिसून येते. अगदी आदिम सूक्ष्मजीवांतील नैमित्तिक आनुवंशिकीय पुनःसंयोजनाची निश्चितता राखणाऱ्या यंत्रणांपासून सुरुवात होऊन पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या सर्व इतिहासभर लिंगाचा स्वतःचा असा क्रमविकास झालेला आढळतो. ⇨नैसर्गिक निवडीच्या प्रभावाखाली लैंगिक वर्तनाचा प्रयासपूर्वक निर्माण झालेला साचा, जटिल संरचना व शरीरक्रियात्मक सूक्ष्म संतुलन यांचा विकास झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक पिढीत नवीन जीन संयोजनाचा विपुल पुरवठा होऊन जातीचे अखंड अस्तित्व टिकविण्यात निश्चितता आलेली आहे.

संशोधन इतिहास : वनस्पती व प्राणी यांत लिंगभेद असतो हे बहुधा प्राचीन मानवला ठाऊक असावे. इ.स.१६९४ मध्ये आर्. जे. कॅमरेअरियस यांनी जेंव्हा उच्च प्रतीच्या वनस्पतींमध्ये लिंगभेद आढळतो असे विधान केले त्या वेळी अनेक शास्त्रज्ञांनी या विधानाला खूप विरोध केला. व्हान लेव्हेनहूक यांचे शिष्य एल्‍. हॅम यांनी १६७७ मध्ये मानवाच्या शुक्राणूचा (पुं-जनन कोशिकेचा) शोध लावला. जी न्यूपोर्ट या शास्त्रज्ञांना १८५४ मध्ये बेडकाच्या प्रजोत्पादनाचा अभ्यास करताना असे आढळले की, अंडकोशिकेमध्ये (स्त्री-जनन कोशिकेमध्ये) शुक्राणूने प्रवेश केल्याने निषेचन (फलन) होते. ओ. हेर्टव्हिख यांनी अंडातील केंद्रकाबरोबर (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाबरोबर) शुक्राणूतील केंद्रकाचे मीलन झाल्याने निषेचन क्रिया होते, असे सिद्ध केले. 

लिंगभेद व प्रजोत्पादन : जीवसृष्टीतील लिंगाच्या लक्षणाबाबत दोन समज प्रचलित आहेत. (१) लिंगभेद हे अजैव व जैव सृष्टीत आढळतात. पॅरॉझॉक्सी बेंझॉइक-अम्‍ल-एथिल-एस्टर या लवणाचे मृदू स्फटिक एकमेकांशेजारी ठेवले, तर ते एकमेकांत विलीन होतात. काही वेळाने ते वेगवेगळे होतात. (२) जैव सृष्टीमध्ये लिंगभेद हळूहळू दिसून येतात. अनेक खालच्या दर्जाच्या जातींच्या प्राण्यांत लिंगभेद स्पष्ट नसतात परंतु या सृष्टीचा जसजसा क्रमविकास होत गेला, तसतसे वरच्या दर्जाच्या जातींच्या प्राण्यांत लिंगभेद स्पष्ट होऊ लागले. यासंबंधी क्लॅमिडोमोनॅडस या शैवलाचे उदाहरण देता येईल. या शैवलात त्यांना मिळणाऱ्या अन्नाच्या प्रकारावरून लिंगभेद निर्माण होतात. जर हे शैवल अन्नयुक्त द्रावणात ठेवले, तर ते अलैंगिक प्रजोत्पादन पद्धत अवलंबिते परंतु जर ते शुद्ध पाण्यात ठेवले, तर ते लैंगिक प्रजोत्पादन पद्धत अवलंबिते. या शैवलात नर व मादी प्रकारची युग्मके (पक्व जनन कोशिका) उत्पन्न होतात. या युग्मकांचे मीलन होऊन युग्मज तयार होते व त्यापासून नवे शैवल तयार होते.

सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्यापेक्षा उच्च दर्जाच्या जीवसृष्टीत नर व मादी असे दोन प्रकार आढळतात. वनस्पतिसृष्टीमध्ये युलोथ्रिक्स ही एक जलवनस्पती अलैंगिक व लैंगिक अशा दोन्ही पद्धतींनी प्रजोत्पादन करते. ही वनस्पती दोऱ्यासारखी लांब असून एका टोकाने पाण्यातील दगडाला घट्ट चिकटून राहते. तिचे दुसरे टोक फुगीर असते. ही वनस्पती एकापुढे एक अशा पद्धतीने असलेल्या कोशिकांची बनलेली असते. प्रजोत्पातन कालात यांपैकी काही कोशिकांची बनलेली असते. प्रजोत्पादन कालात यांपैकी काही कोशिकांतील केंद्रकांचे अनेक वेळा विभाजन होते. या प्रत्येक लहान केंद्रकाभोवती काही कोशिकाद्रव्ये गोळा होऊन असंख्य सूक्ष्म कोशिका तयार होतात. या सूक्ष्म कोशिकांवर दोन किंवा चार रोम (ताठ केस) असतात. ज्या कोशिकेवर चार रोम असतात अशा कोशिका मूळ कोशिकेवरील आवरण तुटल्याने बाहेरील पाण्यात शिरतात आणि एखाद्या दगडावर घट्ट चिकटून राहतात. काही दिवसांनी या सूक्ष्म कोशिकेपासून नवीन युलोथ्रिक्स वनस्पती तयार होते. ज्या सूक्ष्म कोशिकेवर दोन रोम असतात अशा कोशिकेपासून लैंगिक प्रजोत्पादन होते. या कोशिका युग्मकाचे कार्य करतात. मूळ कोशिकेचे आवरण तुटल्यावर या सूक्ष्म कोशिका पाण्यात शिरतात. नंतर दोन कोशिका एकमेकींत मिसळून युग्मज तयार होतात. या युग्मजाचे नंतर युलोथ्रिक्स वनस्पतीमध्ये रूपांतर घडते. या प्रजोत्पादन पद्धतीला लैंगिक पद्धत म्हणतात. तिला संयुग्मन असेही नाव आहे. 


प्राणिसृष्टीतील प्रोटोझोआ (आदिजीव) संघातील सिलीएटा वर्गातील ⇨ पॅरामिशियम या प्राण्यात लैंगिक पद्धतीचे प्रजोत्पादन आढळते. या पद्धतीत दोन प्राणी भाग घेतात. पॅरामिशियमाच्या शरीरात दोन केंद्रक असतात एक मोठा बृहत्‍ केंद्र व एक लहान लघुकेंद्रक. जे प्राणी प्रजोत्पादन करण्यास योग्य असतात ते एकमेकांजवळ येऊन आपल्या अधर बाजूंनी परस्परांना चिकटतात. नंतर बृहत् केंद्रक कोशिकाद्रव्यात विलिन होतो. लघुकेंद्रक आकारमानाने वाढतो व त्यांचे दोन वेळा विभाजन होतो. त्यामुळे चार लघुकेंद्रक तयार होतात. त्यांपैकी तीन केंद्रक नष्ट होतात. चवथ्या केंद्रकाचे पुन्हा विभाजन होऊन दोन प्राक्‍केंद्रक तयार होतात. चिकटलेल्या प्राण्यांच्या शरीरात यांपैकी एक प्राक्‍केंद्रक शिरून परस्परांच्या दुसऱ्या प्राक्‍केंद्रकात मिसळतात. यामुळे एक लघुकेंद्रक तयार होतो. यानंतर हे दोन प्राणी परस्परांपासून वेगळे होतात. नंतर या लघुकेंद्रकाचे तीन वेळा विभाजन होते. पहिली दोन विभाजने अर्धसूत्रन विभाजने [⟶ कोशिका] असतात. या विभाजनांमुळे आठ लघुकेंद्रक तयार होतात. त्यांपैकी एक आकारमानाने खूप मोठा होऊन बृहत् केंद्रक बनतो. दुसरा मूळच्याच आकारमानाचा राहतो व बाकीचे सर्व नष्ट होतात.

अशा रीतीने पॅरामिशियमाचे लैंगिक प्रजोत्पादन हे युलोथ्रिक्साच्या लैंगिक प्रजोत्पादनापेक्षा वेगळ्या पद्धतीचे असते. युलोथ्रिक्सामध्ये लैंगिक प्रजोत्पादनासाठी एकाच वनस्पतीची गरज असते. तर पॅरामिशियमाला दोन प्राण्यांची गरज असते. तथापि अशा प्रकारच्या लैंगिक प्रजोत्पादनामध्ये भाग घेणाऱ्या दोन पॅरामिशियमांना बाह्य लक्षणांत ओळखण्याजोगा फरक नसल्याने नर किंवा मादि असे संबोधता येत नाही [→ लैंगिक द्विरूपता] लैंगिक प्रजोत्पादनासाठी चार गोष्टींची आवष्यकता असते. (१)दोन युग्मके, (२) द्रव माध्यम, लैंगिक क्रिया व (४) युग्मजाची निर्मिती. 

युग्मके एक प्रकारच्या लैंगिक कोशिका आहेत. प्रोटोझोआ संघातील प्राणी शैवल व अळिंब (भूछत्र) यांमध्ये एकाच प्रकारचे युग्मक आढळतात. याला समयुती अशी संज्ञा आहे. उच्च दर्जाच्या वनस्पती व प्राणी यांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची युग्मके आढळतात. याला विषमयुती असे म्हणतात. युग्मके अंडकोशिका व शुक्राणू अशा दोन प्रकारची असतात. अंडकोशिका आकारमानाने मोठी असते. तिच्यात अन्नाचा साठा केलेला असतो. अंडकोशिकेला मादी युग्मक मानतात. शुक्राणू आकारमानाने लहान असतो. त्याला असणाऱ्या शेपटीसारख्या भागाने तो हालचाल करतो. शुक्राणू नर युग्मक आहे. स्पंजासारख्या प्राण्यात अंडकोशिका आपला आकार वारंवार बदलत असते व हालचाल करते. जंतासारखे कृमी, खेकडे व झिंगे यांच्या शुक्राणूंना शेपटीचा भाग नसतो. सर्वसाधारणपणे अंडकोशिकांच्या अनेक पटींनी जास्त इतक्या संख्येने शुक्राणू उत्पन्न होतात. अनेक प्राण्यांत अंडकोशिका व शुक्राणू यांचे परस्परप्रमाण १ : १,००,००० इतके असते. यामुळे अंडकोशिकेचे शुक्राणूकडून निश्चितपणे निपेचन होते. अशा रीतीने युग्मके उत्पन्न करण्याची क्षमता वनस्पती व प्राणी यांच्यात निर्माण होते. यालाच लिंग असे म्हणतात. काही वनस्पती व प्राणी नराची व काही मादिची लक्षणे दाखवितात. ही लक्षणे कशामुळे उत्पन्न होतात याचे विवरण खाली केले आहे. 

बहुतकरून उच्च दर्जाच्या वनस्पतींत व प्राण्यांत द्विलिंगता आढळते म्हणजेच नर व मादी प्राणी (वा वनस्पती) भिन्न असतात. त्यांच्यातील लिंगभेद वर्तनावरून शरीरातील जनन तंत्राच्या (संस्थेच्या) रचनेवरून व शरीरावरील दुय्यम लैंगिक लक्षणांवरून ठरविला जातो. उदा., सिंहाला आयाळ असते तर सिंहिणीला नसते. मोराला पिसारा असतो, तर लांडोरीला नसतो. कोंबडीचे लिंग तिच्या शरीरावरील पिसे, डोक्यावरील तुऱ्याचा आकार व पायावरील नख्या यांवरून ठरवितात. माणसामध्ये आवाज, अंगावरील केस, हनुवटीवरील दाढी मिशा व शरीराची ठेवण यांसारख्या बाह्य लक्षणांवरून लिंग ठरविता येते परंतु अनेक जातींच्या प्राण्यांत लिंग ठरविणारी अशी बाह्य लक्षणे आढळत नाहीत. आपणास असेही म्हणता येईल की, केवळ बाह्य लक्षणांवरून लिंग निश्चित केले जाते असे नसून विशिष्ट लिंगामुळेच बाह्य लक्षणे निर्माण होतात.

स्पायरोगायरा या तंतुमय जलवनस्पतींचे लिंग बाह्य लक्षणांवरून न ठरविता तिच्या वर्तनावरून ठरविले जाते. या जलवनस्पतीच्या प्रजोत्पादन कालात दोन तंतू एकत्र येतात. अनेक कोशिका एकापुढे एक अशा पद्धतीने रचल्यामुळे हे तंतू तयार होतात. दोन निरनिराळे तंतू एकमेकांजवळ येऊन परस्परांना पोकळ नळ्यांसारख्या भागांनी जोडले जातात. यामुळे हे दोन तंतू एखाद्या शिडीसारखे दिसतात. नंतर कोशिकेमधील कोशिकाद्रव्याचा केंद्रकासह एक गोळा तयार होतो. दोन तंतूपैंकी एका तंतूच्या कोशिकेतील गोळा आपली कोशिका सोडून मधल्या नळीवाटे दुसऱ्या कोशिकेतील गोळ्यात विलीन होतो. या गोळ्याला नर युग्मक असे म्हणतात. आपल्या कोशिकेतच राहणाऱ्या गोळ्याला मादी युग्मक म्हणतात. ज्या तंतूमध्ये नर युग्मके तयार होतात तो नर तंतू व ज्यात मादि युग्मक तयार होतात तो मादी तंतू मानण्यात येतो. खालच्या दर्जाच्या वनस्पतींत व प्राण्यांत नर युग्मके (शुक्राणू) व मादी युग्मके (अंडकोशिका) निर्माण करणाऱ्या निश्चित जागा अगर अवयव नसतात परंतु उच्च दर्जाच्या प्राण्यांत व वनस्पतींत युग्मक उत्पन्न करणाऱ्या ग्रंथी असतात, म्हणून त्यांना लैंगिक ग्रंथी अगर अवयव म्हणतात. लैंगिक ग्रंथींना इजा झाली. तर युग्मके निर्माण होण्यात अडचण येते. त्यामुळे लैंगिक प्रजोत्पादन होत नाही, परंतु याला अपवाद काही खालच्या दर्जाच्या वनस्पतींत अगर प्राण्यांत आढळतात.

व्हाऊचेरिया ही हिरव्या रंगाची जलवनस्पती तंतूसारखी दिसते. स्पायरोगायराप्रमाणेच अनेक कोशिका एकीपुढे एक अशा पद्धतीने असलेल्या कोशिकांमुळे हा तंतू तयार होतो. प्रजोत्पादन कालात या तंतुमय वनस्पतींवर काही कोशिकांपासून शाखा फुटतात. या शाखांच्या मुळांशी एक पडदा तयार होतो. काही शाखांत अंडकोशिका, तर काहींत शुक्राणू तयार होतात म्हणून या शाखांना अनुक्रमे अंड ग्रंथी (अंडाशय) आणि शुक्र ग्रंथी (वृषण) म्हणतात. शुक्राणू आपल्या शाखांमधून बाहेर पडल्यावर या शाखा आकुंचन पावतात. निषेचित अंडकोशिकेपासून युग्मज तयार होतात. युग्मज मूळ तंतुमय वनस्पतीपासून अलग होतात. कालांतराने या युग्मजापासून नवीन तंतुमय वनस्पती तयार होते. अशा तऱ्हेने व्हाऊचेरिया ही वनस्पती उभयलिंगी आहे.

प्राणिसृष्टीत सीलेंटेरेटा या संघातील पाण्यात राहणाऱ्या हायड्रा या प्राण्यात साध्या प्रकारचे लैंगिक अवयव प्रजोत्पादन काळात उत्पन्न होतात. हिवाळ्यात जेव्हा पाण्याचे तापमान कमी होते त्या वेळी हायड्रा लैंगिक प्रजोत्पादन करतात. काही जातींच्या हायड्र्‌यांमध्ये फक्त अंडकोशिका किंवा शुक्राणू तयार होतात. असे हायड्रा मादी किंवा नर प्रकारचे असतात काही जातीच्या हायड्र्यांमध्ये अंडकोशिका व शुक्राणू हे दोन्ही उत्पन्न होतात. असे हायड्रा उभयलिंगी असतात. अशा उभयलिंगी प्राण्यांच्या स्पर्शकांखालील भागात एक लहान आकारमानाची शुक्र ग्रंथी किंवा वृषण असते. तिच्यात शुक्राणू तयार होतात. या शुक्र ग्रंथीच्या खालील बाजूस एक मोठ्या आकारमानाची अंड ग्रंथी उत्पन्न होते. तिच्यात अंडकोशिका तयार होतात. अंडकोशिकेत अन्नाचा साठा असतो व तिला एक सूक्ष्म छिद्र असते. या छिद्रामधून एक शुक्राणू अंडकोशिकेत प्रवेश करतो व तिला निषेचित करतो. शुक्राणू पाण्यात सोडले जातात. जर काही कारणांने अंडकोशिका निषेचित झाली नाही, तर ती हायड्र्याच्या शरीरात विलिन होते. निषेचित झालेली अंडकोशिका हायड्र्याच्या शरीरापासून वेगळी होते व तिचे हायड्र्यात रूपांतर होते.


अशा रीतीने व्हाऊचेरिया व हायड्रा यांत काही कालापुरतेच लैंगिक अवयव उत्पन्न होतात. या अवयवात युग्मके निर्माण होऊन त्यांच्या मीलनामुळे युग्मज तयार होतात. युग्मजाचे नंतर व्हाऊचेरियात अगर हायड्र्यात रूपांतर होते. प्रजोत्पादनाचे कार्य पार पाडल्यानंतर लैंगिक अवयव नाश पावतात व पुन्हा पुढच्या प्रजोत्पादन काळात ते उत्पन्न होऊन कार्यक्षम होतात. 

गांडूळ, गोगलगाय यांसारख्या प्राण्यांत नर व मादी यांच्या प्रजोत्पादक ग्रंथी व अवयव एकाच प्राण्यांत आढळतात. अशा प्राण्यांना उभयलिंगी प्राणी म्हणतात. दोन ऊभयलिंगी प्राणी एकत्र येऊन प्रजोत्पादन करतात. प्रत्येकी प्रत्येक प्राणी नर व मादी यांचे कार्य करतो. या प्राण्यांत स्वयंविवेचन होत नाही. [→ उभयलिंगता]. 

लैंगिक प्रजोत्पादनात विविध प्रकार आढळतात. जीवसृष्टीचा प्रजोत्पादनाच्या दृष्टीने आढावा घेतला, तर असे आढळते की, कोणत्याही दोन जातींच्या वनस्पतींचे अगर प्राण्यांचे प्रजोत्पादन एकाच पद्धतीने होत नाही. ज्या प्राण्यात फक्त नर किंवा मादीचे प्रजोत्पादक अवयव आढळतात. अशा प्राण्यांना एकलिंगी प्राणी म्हणतात. 

लिंगनिश्चिती : प्राण्यांच्या शरीरात अनेक प्रकारच्या ⇨ अंतःस्त्रावी ग्रंथी असतात. ⇨ पोष ग्रंथी निर्माण करीत असलेले एक हॉर्मोन (उत्तेजक स्त्राव) शुक्र ग्रंथी आणि अंड ग्रंथी यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. यामुळे प्रजोत्पादन कालात शुक्राणू व अंडकोशिका निर्माण होतात आणि शुक्राणू अंडकोशिकांना निषेचित करतात.

शुक्राणू व अंडकोशिका यांच्या केंद्रकात गुणसूत्रांचा (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सूक्ष्म सुतासारख्या घटकांचा) एकेक संच असतो. त्यांचे परस्पर मीलन झाल्यावर युग्मज तयार होतो. या वेळी हे दोन गुणसूत्रांचे संच एकमेकांत विलिन होतात. गुणसुत्रांत माता पित्याचे गुण धारण करणारे जीन असतात. यामुळे युग्मजापासून उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांत माता पित्याच्या गुणांचे मिश्रण आढळते. याच वेळी या प्राण्यांचे लिंग निश्चित केले जाते. लिंगनिश्चितीची पद्धत खालीलप्रमाणे आहे. 

युग्मकात X व Y या प्रकारची गुणसुत्रे असतात. शुक्राणूत X Y प्रकारची गुणसूत्रे तर अंडकोशिकेत X X प्रकारची गुणसूत्रे असतात. याचाच अर्थ नर प्राण्यात विषम युग्मकता आढळते व मादी प्राण्यात समयुग्मकता आढळते. युग्मजात ज्या वेळी नर व मादी युग्मकांचे मिश्रण होते, त्या वेळी हे लिंग निश्चित होते. युग्मजात मादी व नर यांच्याकडून गुणसूत्रांचा प्रत्येकी एकेक संच येऊन ते एकमेकांत मिळतात. जर मादीकडून X व नराकडून X गुणसूत्रांचा संच आला तर युग्मज X X म्हणजे मादी लिंगाचा होईल. जर मादीकडून X व नराकडून Y गुणसूत्रांचा संच आला, तर युग्मज X Y म्हणजे नर लिंगाचा होईल, पोष ग्रंथी पुटकोद्दिपक हॉर्मोन व पीतपिंडकर हॉर्मोन या नावाची जनन तंत्राचे नियंत्रन करणारी हॉर्मोने निर्माण करते. तसेच शुक्र ग्रंथी व अंड ग्रंथी अनुक्रमे ⇨ पौरुषजन व ⇨ स्त्रीमदजन या नावांची हॉर्मोने निर्माण करतात. ही हॉर्मोने रक्तात मिसळतात आणि त्यामुळे नर व मादी प्राण्यांत लैंगिक उपलक्षणे उत्पन्न होतात, त्यांच्या जनन ग्रंथी कार्यक्षण होतात व हे प्राणी प्रणयाराधनासारखे लैंगिक वर्तन करू लागून प्रयोत्पादनाला उद्युक्त होतात.

लिंग विपर्यय : काही प्राण्यांत लिंगाचा विपर्यय (प्राण्यांच्या आयुर्कालात त्याची लैंगिक लक्षणे क्रमाक्रमाने नराकडून मादीकडे किंवा याउलट बदलणे) झाल्याचे आढळते. याला अनेक कारणे आहेत. (१) हार्मोनांच्या प्रभावामुळे (२) जीनांच्या प्रभावामुळे (३) परजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) प्राण्यांच्या प्रभावामुळे व (४) स्त्री पुंरुपता. 

हॉर्मोनांचा प्रभाव : काही वेळा गायीसारख्या जनावरांना जुळे होते. तेव्हा जुळे दोन्ही नर, दोन्ही माद्या अगर एक नर व दुसरे नर मादी अशा मिश्रलिंगाचे होते. मिश्रलिंगी वासराला वंध्ययमी (फ्रिमार्टीन) म्हणतात. या वासराची बाह्य जननेंद्रिये व लैंगिक लक्षणे मादीसारखी दिसत असली, तरी त्यांच्या शरीरातील जनन तंत्र नराचे असते. असे घडण्याचे कारण की, या वासराची जेव्हा गर्भावस्थेत वाढ होत असते त्या वेळी नर व मादी हॉर्मोने त्याच्या शरीरात प्रवेश करतात. त्यांच्या गर्भवाढीवर विपरीत परिणाम होऊन गर्भाची अनैसर्गिक वाढ होते. 

पक्ष्यांमध्येही हॉर्मोनांचा प्रभाव दिसून येतो. काही मादी पक्ष्यांत डाव्या बाजूंची जनन ग्रंथी अंड ग्रंथीचे काम करते. उजव्या बाजूच्या जनन ग्रंथीची वाढ होत नाही. जर काही कारणांने अंड ग्रंथीला इजा झाली अगर ती अकार्यक्षम झाली, तर उजव्या बाजूच्या जनन ग्रंथीची वाढ झपाट्याने होते आणि ती शुक्र ग्रंथीचे कार्य करते. या वेळी हा पक्षी नर पक्षाचे कार्य करतो. त्याच्या शरीरावरील पिसांचा रंग, आकार तसेच त्यांचे वर्तन नरासारखे असते. 

जीनांचा प्रभाव : गुणसूत्रे व जीन यांच्यात घडणाऱ्या फेरबदलांमुळे लिंगाचा विपर्यय होऊ शकतो. ड्रॉसोफिला व जिप्सी पतंग या कीटकांत गुणसूत्रांत व जीनांमध्ये घडणाऱ्या फेरबदलांमुळे नराचा मादी कीटकात किंवा मादीचा नर कीटकात विपर्यय होतो, असे आढळले आहे. हा विपर्यय दोन वेगवेगळ्या जातींच्या कीटकांचा संकर केल्यामुळे होतो. 

परजीवी प्राण्यांचा प्रभाव: खेकड्यांच्या शरीरात अनेक जातींचे परजीवी प्राणी राहतात. हे परजीवी प्राणी नर खेकड्यांच्या जनन ग्रंथीवर विपरीत परिणाम घडवून नर खेकड्याचे मादी खेकड्यांत रूपांतर घडवितात. मादी खेकड्यांत हे परजीवी प्राणी कोणताच विपरीत परिणाम घडवू शकत नाहीत म्हणून मादी खेकडा त्याच लिंगांची राहते. अशाच तऱ्हेचा लैंगिक विपर्यय मधमाश्या, गांधील माश्या, पानावरील तुडतुडे इ. कीटकांतही घडून येतो. 

स्त्री-पुंरूपता : काही जातींचे कीटक कोळी यांच्या जीनांमध्ये घडून येणाऱ्या फेरबदलांमुळे हॉर्मोनाच्या स्त्रावातही बदल होतो. या पाण्याची बाह्य लक्षणे एका बाजूस नर प्राण्याची व दुसऱ्या बाजूस मादी प्राण्यांची अशी दिसतात. 

प्राण्यांचा प्रजोत्पादन काल अगर लैंगिक चक्र : काही प्राण्यांत दर वर्षी फक्त एक वेळा तर काही प्राण्यांत अनेक वेळा प्रजोत्पादन केले जाते. हा काळ विशिष्ट ऋतूतील तापमान व प्रकाशकाल यांवर अवलंबून असतो. विशेषतः वसंत ऋतुमध्ये हा प्रजोत्पादन काल येतो. या कालात पक्षी आपली घरटी बांधतात, प्रणयाराधन करतात. व मीलनानंतर घरट्यांत अंडी घालतात. सस्तन प्राण्यांत प्रजोत्पादन कालात मादीचा ऋतुकाल सुरू होतो, त्या वेळी मादी मीलनोत्सुक असते. पूर्वी म्हटल्याप्रमाणे पोष ग्रंथी व जनन ग्रंथी यांनी निर्माण केलेल्या हॉर्मोनांमुळे प्राण्यांचे प्रजोत्पादन कालातील वर्तन घडते. 


प्रणयाराधन : प्रजोत्पादन कालात नर व मादी मीलनापूर्वी प्रणयाराधन करतात. या वेळी परस्परांना एकमेकांकडे आकर्षित करण्यासाठी शरीरावरील पिसावर अगर केसावर निरनिराळे रंग निर्माण होतात. तसेच शरीरावरील विशिष्ट ग्रंथीमधून सुगंधी द्रव्य पाझरते किंवा सुरेल आवाज काढून अगर नर्तनासारखे हावभाव करून परस्परांना आकर्षित केले जाते. विशेषतः नर मादीला वश करण्यासाठी वरील प्रकार अवलंबितो. हॉर्मोनांच्या प्रभावामुळे प्रणयाराधनाचे वर्तन घडते. [⟶ प्रणयाराधन].

निषेचन क्रिया : समुद्रात राहणारे अनेक प्राणी आपली युग्मके हजारोंच्या संख्येने पाण्यात सोडतात. तेथे अंडकोशिका व शुक्राणू यांचे मीलन होऊन निषेचन क्रिया पूरी होते व युग्मज तयार होतो. अनेक युग्मजे इतर जलचर प्राणी खाऊन टाकतात, तर काहींना एकत्र येण्याची संधी मिळत नाही. 

उच्च दर्जाच्या प्राण्यांना प्रजोत्पादनाला योग्य असे लैंगिक अवयव असतात. या अवयवांच्या साह्याने नर प्राणी मादीच्या जननमार्गात आपले शुक्राणू सोडतो. त्यामुळे अंडकोशिकेबरोबर त्यांचे मीलन निश्चितपणे होते व निषेचन क्रिया घडते. मॉलस्का संघातील एंटोकाँकिडी कुलातील प्राणी समुद्रात राहणाऱ्या सागरी काकडी या प्राण्यांच्या शरीरात आढळतात. मादी आकारमानाने मोठी असते. तर नर आकारमानाने लहान असतो आणि त्याच्या शरीरात फक्त शुक्रग्रंथीची वाढ झालेली असते. बोनेलिया या प्राण्यात मादी आकारमानाने मोठी असून तिच्या जननमार्गात लहान आकारमानाचा नर कायमचा राहतो व अंडकोशिकेचे आपल्या शुक्राणूंनी निषेचन करतो. निषेचित अंडी पाण्यात सोडली जातात. या अंड्यांमधून डिंभ (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसलेल्या अवस्थांतील प्राणी) बाहेर पडतात. काही डिंभ मादीपासून दूर अंतरावरील दगडावर स्थिर होतात. त्यांचे मादी प्राण्यांत रूपांतर होते. जे डिंभ मादीच्या शुंडेवर चिकटतात त्यांचे नरात रूपांतर होते. ते मादीच्या जननमार्गात शिरतात व कायमचे तेथेच राहतात. 

सर्वसाधारणपणे निसर्गात नर व मादी यांच्या परस्पर संख्येचे प्रमाण १ : १ असते परंतु काही जातींच्या प्राण्यांत नरांची संख्या माद्यांपेक्षा जास्त असते.

लैंगिक पद्धतीने प्रजोत्पादन करणाऱ्या प्राण्यांत अंडी घालण्याच्या पद्धतीत निरनिराळे प्रकार आढळतात. काही प्राणी निषेचित अंडी आपल्या शरीराबाहेर टाकतात. अशा प्राण्यांना अंडज म्हणतात. काही प्राणी निषेचित अंडी आपल्या जननमार्गात ठेवतात व पिलू जन्माला आल्यावर ते मादीच्या शरीरातून बाहेर पडते. अशा प्राण्यांना अंडजरायुज असे म्हणतात. काही जातींचे प्राणी (उदा., सॅलॅमॅंडर) त्यांची पूर्ण वाढ झाली, तरी डिंभासारखे दिसतात व प्रजोत्पादन करतात. त्यांची लैंगिक वाढ पूर्ण झालेली असते. या प्रजोत्पादन पद्धतीला ⇨ चिरडिंभता असे म्हणतात.

काही प्राण्यांची अंडी निषेचित न होताही पिलांना जन्म दिला जातो. या प्रजोत्पादन पद्धतीला अनिषेकजनन असे म्हणतात. काही प्राण्यांत एका निषेचित अंड्याचे अनेक वेळा विभाजन होऊन प्रत्येक भागापासून एक प्राणी तयार होतो. अशा रीतीने एका अंड्यापासून शेकडो प्राणी तयार होतात (उदा., परजीवी गांधील माश्या). या प्रजोत्पादन पद्धतीला बहुगर्भत्व असे म्हणतात.

पहा : अंड अंडकोश आनुवंशिककी उभयलिंगता जनन तंत्र प्रजोत्पादन लैंगिक द्विरूपता लैंगिक निवड वृषण शुक्राणु हॉर्मोने.

संदर्भ : 1. Berril, N. J. Sex and the Nature of Things, New York, 1953.

           2. Stabnke, H. L. Biotic Principles, New Delhi, 1964.

           3. Wendt, H. Tr. Winston R. W. Winston, C. The Sex Life of Animals, New York, 1965

           4. Williams, G. C. Adaptation and Natural selection, Princeton 1966.

रानडे, द. र.