ला प्लाता : अर्जेंटिनातील ब्वेनस एअरीझ प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या ४,५४,८८४ (१९८०) ब्वेनस एअरीझ या अर्जेंटिनाच्या राजधानीपासून आग्नेयीस ५६ किमी.वर रीओ द ला प्लाता नदीमुखखाडीच्या उजव्या तीरावर हे वसलेले आहे. खाडी किनाऱ्यावरील भरती-ओहोटीपासून मुक्त असलेले एन्सेनादा (लोकसंख्या ३१,५८६-१९७०) हे ला प्लाताचे खोल सागरी बंदर असून तेथपासून आत आठ किमी. अंतरावर ला प्लाता शहर आहे. देशाची राजधानी म्हणून ब्वेनस एअरीझच्या निवडीबरोबर (१८८०) प्रांताची राजधानी ला प्लाता येथे ठरविण्यात आले आणि वॉशिंग्टन डी. सी.च्या धर्तीवर अगदी नियोजनबद्ध, नमुनेदार शहराची उभारणी करण्याची योजना आखण्यात आली. १८८२ मध्ये या प्रांतीय राजधानीची स्थापना झाली. ४·८ किमी.च्या चौरसात वसविलेल्या या शहरातील प्लाझा मोरेनो हे केंद्रीय स्थान असून तेथे एक सुंदर कॅथीड्रल आहे. शहरात रुंद व सरळ रस्ते, प्रशस्त चौक, सुंदर सार्वजनिक इमारती, उद्याने व बगीचे आहेत. १९५२ मध्ये राष्ट्राध्यक्ष ह्वान दोमिंगो पेरॉन यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहराला ईव्हा पेरॉन असे नाव देण्यात आले होते परंतु १९५५ मध्ये ह्वान पेरॉन राष्ट्राध्यक्षपदावरून बडतर्फ झाले, तेव्हा पुन्हा शहराचे नाव ला प्लाता असे बदलण्यात आले.
शहरात मांस प्रक्रिया आणि वितरण, प्रशीतन, वस्त्रनिर्माण, सिमेंट उद्योग, पीठगिरणी उद्योग, लाकूड चिरकाम, खनिज तेल परिष्करण इ. उद्योगधंदे चालतात. एन्सेनादा ते ला प्लाता यांदरम्यान अनेक उद्योग उभारलेले आहेत. यांदरम्यानच बेरीसो हे मांस डबाबंदीकरणासाठी प्रसिद्ध असलेले औद्योगिक ठिकाण आहे. ब्वेनस एअरीझमुळे ला प्लाताचा विकास काहीसा खुंटलेला दिसतो. हे देशातील महत्त्वाचे खनिज तेल परिष्करण केंद्र असून तेथून ब्वेनस एअरीझ बंदरापर्यंत तेलवाहतुकीसाठी नळ टाकलेले आहेत. एन्सेनादा बंदरातून गुरे, लोकर, तेल, मांस, धान्य यांची निर्यात केली जाते.
एक सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ला प्लाता महत्त्वाचे आहे. ला प्लाता राष्ट्रीय विद्यापीठ (१८९७), वेधशाळा, अनेक प्रगत संशोधन संस्था, राष्ट्रीय ग्रंथालय, प्राणिसंग्रहोद्यान, प्रांतीय ललित कला वस्तुसंग्रहालय, गॉथिक शैलीतील कॅथीड्रल, राष्ट्रीय नौसेना आकादमी, पुराजीवविज्ञान आणि मानवशास्त्रविषयक वस्तुसंग्रहालये इ. संस्था शहरात आहेत.
सावंत, प्र. रा. चौधरी, वसंत