लागरलव्ह, सेल्मा : (२० नोव्हेंबर १८५८-१६ मार्च १९४०). स्वीडिश कादंबरीकर्त्री. जन्म स्वीडनमधील व्हेर्मलांड प्रांतातील मोर्बाका येथे. लहानपणी एका आजारामुळे तिच्या पायात पंगुत्व आले होते. तथापि त्यातून ती बरी झाली. काही शिक्षण घरीच घेतल्यानंतर स्टॉकहोम येथे तिने अध्यापिका होण्याच्या दृष्टीने शिक्षण घेतले आणि नंतर लांतूस्क्रूना येथे ती एका शाळेची मुख्याध्यापिका म्हणून काम करू लागली. गोश्ता बेलिंग्ज सागा (२ खंड, १८९१, इं. भा. द स्टोरी ऑफ गोश्ता बेलिंग, १८९८) ही तिची पहिली कादंबरी. त्यानंतर ‘इन्व्हिजिबल लिंक्स’ (१८९९, इं. शी.), द मिरॅकल्स ऑफ अँटीख्राइस्ट (१८९७, इं. भा. १८९९) व जेरूसलेम (२ खंड, १९०१–०२ ,इं. भा. १९१५) ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. एक अग्रगण्य स्वीडिश कादंबरीकर्त्री म्हणून तिची प्रतिमा जेरूसलेममुळे प्रस्थापित झाली. तिने कथालेखनही विपुल केले.
लागरलव्हच्या लेखनात आपल्या दैनंदिन जीवनानुभवांचे विश्व आणि पऱ्या, भुतेखेते, आख्यायिका ह्यांचे जग ह्यांच्यातील सीमारेषा एकमेकांत मिसळून गेलेल्या दिसतात. वेगवेगळ्या वेधक प्रसंगांतून आणि प्रतीकात्मकतेचे भान ठेवून, आशयाला एक संकुल घाट देण्याचे कौशल्य तिच्या ठायी होते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जुन्या उमराव संस्कृतीपुढे उभे केलेले आव्हान, हा तिच्या अनेक कादंबऱ्यांचा मध्यवर्ती विषय आहे. ती जेथे जन्मली त्या व्हेमलांडचे रंगही तिच्या लेखनातून उमटलेले आहेत. गोश्ता बेलिंग्ज सागा ही कादंबरी त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. द मिरॅकल्स ऑफ अँटीख्राइस्टमध्ये सिसिलीतील एका लहानशा जनसमूहामधील समाजवाद तिने चित्रित केला आहे. स्थलांतर करून पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या स्वीडिश शेतकऱ्यांचे चित्रण जेरूसलेम ह्या कादंबरीत आहे. प्राचीन, सनातन परंपरांना मानणारे हे शेतकरी आणि आधुनिक धार्मिक पंथवादी प्रवृत्ती ह्यांच्यातील संघर्ष जेरूसलमध्ये दिसतो. इंगमार इंगमार्सन ह्या जेरूसलेमच्या नायकाच्या रूपाने लागरलव्हने एक अविस्मरणीय व्यक्तिरेखा उभी केली आहे.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात तिने द रिंग ऑफ द लोवेनस्कोल्ड्स (१९२५, इं. भा. १९३१) शार्लट लोवेनस्कोल्ड (१९२५) आणि ॲना स्व्हार्ड (१९२८) ही कादंबरीत्रयी लिहिली. द वंडरफुल अड्व्हेंचर्स ऑफ निल्स (१९०६–०७), इं. भा. १९०७ आणि ‘फर्दर अड्व्हेंचर्स ऑफ निल्स’ (१९११, इं. शी.) ही तिने मुलांसाठी लिहिलेली भूगोलाची पुस्तके.
साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन (१९०९) तिच्या साहित्य सेवेचा जागतिक पातळीवर गौरव करण्यात आला. नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळविणारी ती पहिली स्वीडिश व्यक्ती होय.१९१४ मध्ये स्वीडिश अकादमीचे सदस्यत्व तिला मिळाले. हा मान मिळविणारी ती पहिली स्वीडिश महिला. मोर्बाका येथेच तिचे निधन झाले.
कुलकर्णी, अ. र.