लांज : हा मासा लांजा या नावानेही ओळखला जातो. याचा समावेश ऱ्हिनोबॅटिडी कुलात होतो. याच्या शरीराचा आकार गिटार या वाद्यासारख्या असल्यामुळे त्यांना ‘ गिटार फिश ’ हे सर्वसामान्य इंग्रजी नाव दिले जाते. वरील कुलाच्या ऱ्हिनोबॅटस प्रजातील ऱ्हिनोबॅटस ग्रॅन्युलेटस, ऱ्हि.आर्मॅटस व ऱ्हि.ऑब्च्युसस या तीन जातींना लांज हे नाव दिलेले आढळते. ऱ्हि. थौनी या जातीला मात्र मराठी नाव आढळत नाही (कधीकधी ऱ्हिंकोबॅटस जीडेन्सीस ही जातीही लांज नावाने ओळखली जाते). यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधी सागरांत आहे. भारताच्या किनाऱ्यांवर हे विपुल प्रमाणात आढळतात. हे रेताड ते चिखलट समुद्रतळ जास्त पसंत करतात.
लांज माशाचे शरीर लांबट व खळगे असलेले असते. श्वासरंध्रे मोठी आणि विशाल असून डोळ्यांच्या लगेच मागे असतात. मुस्कट लांबोडके असते व कवटीची कूर्चा निर्माण झालेली असते. तिच्या व अंसपक्ष (छातीवरील पर पक्ष किंवा पर म्हणजे हालचाल करण्यासाठी व तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणारी स्नायुमय घडी) यांच्यामधील जागा पटलाने भरली गेलेली असते. नाकपुड्या तिरक्या व मोठ्या असतात. दात विशालकोनी व कंगोरेदार असतात. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) बिनकाटेरी असतात. ते अधरपक्षाच्या खूप मागे असतात. त्यांना खालचे शेपटीचे खंड (भाग) नसतात.
आंध्र किनाऱ्यावर विशाखापट्टणम् ते मसुलीपट्टणम् भागात यांची मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. हे मुख्यतः खाण्यासाठी वापरले जातात.
जमदाडे, ज. वि.
“