लॅमिनेट : कागद, कापड, लाकडी तक्ते यांसारखे विविध प्रकारचे स्तर एकमेकांना घट्ट चिकटवून बनविलेला चादरीसारखा पदार्थ. लॅमिनेट बनविण्यासाठी लाकडी तक्ते, पुठ्ठे, जाड कागद यांच्याशिवाय लोकर, ॲस्बेस्टस, काच इ. तंतूंचे कापडही वापरतात. यांचे स्तर चिकटविण्यासाठी डिंक, सरस, रेझीन वगैरेंसारखे उष्णतेने घट्ट व पक्के होणारे कृत्रिम वा नैसर्गिक आसंजक (चिकटविणारे पदार्थ) वापरतात. आसंजक लावलेले वा आसंजकाचा लेप दिलेले असे स्तर एकावर एक ठेवतात आणि त्यांच्यावर दाब देऊन व उष्णतेचे संस्करण करून ते एकमेकांना पक्के चिकटविले जातात. लॅमिनेट बनविण्याच्या या प्रक्रियेला ‘लॅमिनेशन’ म्हणतात.⇨प्लायवुड हे लॅमिनेटचे सर्वपरिचित उदाहरण आहे. या प्रक्रियेने स्तरित तक्ते, पुठ्ठे, फळ्या, नळ्या, कांड्या, तक्ते इ. वस्तू बनवितात.

 

पूर्वी मुख्यतः कागद, पुठ्ठे वा लाकडी तक्ते सामान्यतः सरसाने किंवा डिंकाने चिकटवून लॅमिनेट बनवीत. मात्र असे लॅमिनेट टिकाऊ नसते. रेझिनांसारखी संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेली) आसंजके उपलबध झाल्यावर विविध प्रकारचे स्तर वापरून विविध गुणधर्मांची लॅमिनेटे बनविता येऊ लागली. अशा प्रकारे विद्युत् रोधी, जलरोधी, रसायनरोधी, उष्णतारोधी, अग्निरोधी गुणधर्मांची तसेच टिकाऊ, आकर्षक व काहीशी लवचिक लॅमिनेटे तयार करण्यात आली. मूळ स्तरांपेक्षा त्यांच्यापासून बनविलेली लॅमिनेट वापरणे सोयीचे असल्याने ती उद्योगधंदे, वाहने, दैनंदिन उपयोग यांमध्ये वाढत्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागली. लाकडी तक्ते त्यांचे सळ एकमेकांना काटकोनात येतील अशा तऱ्हेने चिकटविल्यास अधिक बळकट व सुंदर लॅमिनेट मिळते. स्वस्त व अनाकर्षक लाकडी स्तरांवर उच्च दर्जाचे व सुंदर लाकडी स्तर लावून बळकट, टिकाऊ व शोभिवंत लॅमिनेटे बनवितात.

रेझीन हे कृत्रिम आसंजक अमेरिकेत १९४३-४४ च्या सुमारास प्रथम तयार करण्यात आले. याचा वापर करून बनविण्यात येणारी लॅमिनेटे मुख्यतः लष्करी साहित्य बनविण्यासाठी वापरीत. ही लॅमिनेटे महागडी पडत असल्यामुळे त्यांचा दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी वापर करणे शक्य नव्हते. युद्धानंतर त्यांचा लष्करी कामांसाठी होणारा वापर कमी झाला. तसेच कागद, कापड इ. कच्च्या मालाच्या किंमतीही कमी झाल्या. अशा तऱ्हेने नेहमी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी लॅमिनेटांचा वापर वाढत गेला. उदा., कागद, धातूचे आणि प्लॅस्टिकचे पत्रे हे लाकडांवर लावण्यात येऊ लागले.

 

कच्चा माल : पुठ्ठे, कागद, काचेच्या तंतूंपासून बनविलेले कापड, काचेची पूड, ॲस्बेस्टस, लाकडाचा भुस्सा, प्लॅस्टिक, धातू, रंग वगैरे कच्चा माल लॅमिनेटे बनविण्यासाठी वापरतात. आसंजक म्हणून फिनॉलिक रेझीन यूरिया-फॉर्माल्डिहाइड, मेलॅमीन फॉर्माल्डिहाइड, फ्यूरान इ. ऊष्मादृढ (उष्णतेने प्रथम मऊ व प्रवाही बनणारी आणि आकार दिल्यावर कायमची कडक आणि अप्रवाही होणारी) रेझिने वापरतात. खास प्रकारच्या लॅमिनेटांमध्ये आसंजक म्हणून सिलिकोन रेझिने वापरताना. एपॉक्सी व पॉलिएस्टर रेझिने वापरताना दाब व उष्णता वापरावी लागत नाहीत. पॉलिएस्टर रेझिनांच्या बाबतीत कधीकधी मात्र थोडासा दाब देण्याची आवश्यकता भासते.

निर्मिती प्रक्रिया : सर्वसाधारणपणे लॅमिनेट तयार करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असते : प्रथम जाळीदार कागद, कापड वा पुठ्ठा यावर रेझिनाचा लेप देण्यासाठी तो रेझिनाच्या विद्रावातून नेतात. हा लेप एकसारखा होण्यासाठी तो कागद वा पुठ्ठा दोन दाबरुळांमधून नेण्यात येतो. या रुळांमधील अंतर योग्य तेवढे ठेवून जाळीवरील रेझिनाचे प्रमाण नियंत्रित केले जाते. नंतर हा जाळीदार पदार्थ उभ्या व आडव्या शुष्कन भट्टीतून जाऊ देतात. यामुळे विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) उडून जाऊन प्लॅस्टिकयुक्त कोरडा तक्ता तयार होतो व त्याची गुंडाळी बनते. नंतर तक्त्याचे तुकडे कापून ते एकावर एक असे विशिष्ट रीतीने रचतात. या तुकड्यांच्या राशीवर दाब देऊन व उष्णता संस्करण करून लॅमिनेट तयार करतात.  

 

 

ऊष्मादृढ रेझिनांपासून (१) उच्च दाब, (३) नीच दाब, (३) सँडविच व (४) दाबरहित या पद्धतींनी लॅमिनेटे तयार करतात.

उच्च दाब पद्धत : रेझिनाचा लेप दिलेले ओलसर कापड, कागद इ. कोरडे करून त्याचे योग्य आकारमानाचे तुकडे करतात. हे तुकडे एकावर एक रचतात. रचलेले तुकडे अगंज पोलादाच्या (स्टेनलेसस्टीलच्या) दोन गरम पट्टांत ठेवतात. नंतर पट्टांवर सु. ७० किग्रॅ. प्रती चौ. सेंमी. इतका दाब देतात व तापमान १२०° सें. किंवा त्यापेक्षा जास्त ठेवतात. या पद्धतीने सपाट लॅमिनेट सहज रीत्या व जलदपणे तयार करता येते. मात्र असे लॅमिनेट कडक असल्याने साच्यात घालून त्याला हवा तसा आकार देणे हे काम अवघड असते. यामध्ये रेझिनाचे प्रमाण ३०% पर्यत ठेवतात. यापेक्षा जास्त रेझिनामुळे लॅमिनेटाचे तुकडे पडतात व ते काचेला चिकटत नाही. या पद्धतीने बनविलेली लॅमिनेटे अधिक उष्णतारोधी व बळकट असतात.

 

नीच दाब पद्धत : वरील पद्धतीप्रमाणेच रेझीनयुक्त तक्त्याचे तुकडे साच्यात ठेवून त्यांना उष्णता देतात आणि ते दाबतात. या पद्धतीत तापमान सामान्यपणे १२०° ते १६०° से. एवढे ठेवतात. तापमानानुसार ते देण्याची वेळ कमीजास्त करतात. सामान्यपणे १३०° से. तापमान चार तास, १५०° सें. एक तास व १६०° से. चाळीस मिनिटे ठेवतात. दाब मात्र वरीलपेक्षा कमी असतो. रेझिनाचे प्रमाण ३० ते ३५% असते व त्यात थोडा विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) ठेवून ते चिकट राहील असे पहातात. असे लॅमिनेट कडक होत नसल्याने सर्वसाधारण तापमानाला त्याला हवा तो आकार देता येत नाही. म्हणून आकार देण्यासाठी ६०° ते ७०° से. पर्यंत ठेवतात व ०.८५ ते १.०५ किग्रॅ/ चौ.सेमी. एवढा दाब देतात.


सँडविच पद्धत : काचयुक्त प्लॅस्टिक, कागद, रेझीनयुक्त कापड, ॲल्युमिनियमाचा वा अगंज पोलादाचा पातळ पत्रा या पदार्थांच्या मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या जाळीदार तक्त्याच्या वा स्पंज-प्लॅस्टिकचा गाभा असलेल्या जाळीच्या दोन्ही बाजूंवर सँडविचप्रमाणे प्लॅस्टिकचा वा अगंज पोलादाचा पातळ पत्रा ठेवून व दाबून त्यांचे सँडविच बनवितात. या सँडविचमधील गाभा व पृष्ठभाग यांकरिता वापरलेल्या पदार्थांनुसार या लॅमिनेटाचे गुणधर्म ठरतात. अशी लॅमिनेटे सामान्यतः वजनास हलकी, चांगली बळकट, जलरोधी, उष्णतारोधी, विजेची मंदवाहक व सपाट असतात. त्यांना गोलाकारही देता येतो.

यातील सर्व निरनिराळे थर एकजीव करणे ही महत्त्वाची क्रिया आहे. 

फॉर्मायका व अन्य व्यापारी नावांनी ओळखण्यात येणारी शोभादायक लॅमिनेटे या पद्धतीने तयार करतात. शोभादायक लॅमिनेटाचा प्रमाणभूत तक्ता ०.१६ सेंमी. जाडीचा असून त्यात फिनॉलिक रेझीन भरलेले जड क्राफ्ट कागदाचे सात थर असतात. खास यंत्रावर मुद्रित केलेला आकृतिबंध असलेल्या अपारदर्शक कागदात मेलॅमीन रेझीन भरतात आणि मग तो वरील थरांच्या अगदी वर ठेवतात. सर्वांत वरच्या पृष्ठभागाकरिता मेलॅमीन रेझीन भरलेला आल्फा सेल्युलोज कागद वापरतात. या सबंध लॅमिनेटाच्या सँडविचवर मग दाब देतात आणि त्यात अंत्य पृष्ठभाग अतिशय चकचकीत पॉलिश केलेल्या अगंज पोलादाच्या पट्टाच्या संमुख ठेवलेला असतो. 

दाबरहित पद्धत : एपॉक्सी रेझीन व कठीणपणा आणणरे द्रव्य यांचे मिश्रण, तसेच काचेची पूड, वाळू, सिमेंट इ. या रेझिनात मिसळून लॅमिनेट बनवितात. रेझीन व कठीणपणा आणणारे द्रव्य यांचे मिश्रण अशा तऱ्हेने वापरतात, की तयार होणारे लॅमिनेट ऊष्मादृढ प्लॅस्टिकासारखे होईल. असे लॅमिनेट १२०° से. तापमानात १-२ तास ठेवल्यास ऊष्मादृढ होते. काचेची पूड वा काचेच्या तंतूंचे कापड व एपॉक्सी रेझीन यांपासून बनविलेली लॅमिनेटे रसायने ठेवण्याच्यां पात्रांना आतून अस्तर लावण्यासाठी वापरतात. कठीणपणा आणणाऱ्या द्रव्याच्या रासायनिक विक्रियेने व उष्णतेने ही रेझिने पक्व होतात. त्यासाठी दाब देण्याची गरज नसते. पॉलिएस्टर रेझिनांपासूनही या पद्धतीने लॅमिनेटे तयार करतात.

गुणधर्म : लॅमिनेटे सामान्यपणे वजनाने हलकी असून ती अधिक प्रसरण पावत नाहीत. त्यांची झीज विशेष होत नाही. ती उष्णतेची व विजेची मंदवाहक असतात. विशिष्ट लॅमिनेटांवर पाणी, अम्ले, क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारे पदार्थ) इ. रसायनांचा परिणाम होत नाही वा डाग पडत नाही. लॅमिनेटे बळकट व आकर्षक असतात. त्यांच्यावर छिद्र पाडणे, घासणे, गुळगुळीत करणे इ. यांत्रिक क्रिया करता येतात व त्यांमुळे ती खराब होत नाहीत. ती आगरोधक व बुरशीरोधकही असतात.

 

उपयोग : रसायने साठविण्याची पात्रे, फर्निचर, विमाने, जहाजे, मोटारगाड्या, दूरध्वनी, रडार, प्रशीतक, यंत्रांचे सुटे भाग वगैरेंमध्ये लॅमिनेटांचा उपयोग करतात. शोभादायक लॅमिनेटे घरगुती कपाटे, फडताळे, टेबलांचे वरचे पृष्ठभाग, भिंतींची तावदाने, तसेच उपाहारगृहे व हॉटेले, कार्यालये, दुकाने व भांडारगृहे अशा विविध ठिकाणी शोभादायक पृष्ठभागांसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. अमेरिकेत लॅमिनेटे सर्वांत जास्त वापरली जातात. भारतात लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कारखान्यांत लॅमिनेटे बनवितात मात्र कच्च्या मालाच्या आयातीवरील निर्बंधामुळे त्यांच्या उत्पादनावर मर्यादा पडतात. भारतीय मानक संस्थेने लॅमिनेटाकरिता काही मानके तयार केली आहेत. उदा., लॅमिनेट तक्त्यांच्या परीक्षणासाठी आय.एस. १९९८-१९६२ व शोभादायक लॅमिनेटांसाठी आय.एस. २०४६-१९६२.

पहा : प्लायवुड संमिश्र सामग्री.

संदर्भ : 1. Beach, N. E. Plastic Laminate Materials, Long Beach, calif, 1967.            2. Duffin, D. J. Nerzig, C. Laminated Plastics, New York, 1966.

           3. Mark, H. F. and Others, Ed., Kirkothmer Encyclopedia of Chemical Technology, Vol.12, New York,1967.

जोशी, अशोक मिठारी भू. चिं.