लॅबर्नम : फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एका प्रजातीचे नाव. हिचा अंतर्भाव ⇨लेग्युमिनोजी अथवा शिंबाशत कुलातील पतंगरूप फुलांच्या पॅपिलिऑनेटी (पॅपिलिओनिडी) अथवा पलाश उपकुलात करतात. लॅबर्नम प्रजातीतील जातींत बहुतेक सर्व सुंदर पानझडी झुडपे किंवा लहान वृक्ष असून त्यांचा प्रसार द. यूरोप व प. आशिया येथे विपुल आहे. गोल्डन चेन या इंग्रजी नावाने त्या जाती ओळखल्या जातात. यांना उपपर्णे नसलेली, संयुक्त, त्रिदली व एकाआड एक पाने असून यांचे पिवळेजर्द फुलोरे [मंजिऱ्या ⟶ पुष्पबंध] लोंबते असतात. ही फुले वसंत ऋतूच्या अखेरीस किंवा उन्हाळ्याच्या आरंभी येतात आणि त्यानंतर लवकरच हळूहळू तडकणाऱ्या लांब चपट्या व अरुंद शिंबा (शेंगा) येतात. अत्यंत आकर्षक स्वरूपामुळे लॅबर्नमच्या जाती उद्यानांतून लावतात. त्यांचे लाकूड हिरवट तपकिरी किंवा लालसर पिंगट, कठीण व जड असून त्यास उत्तम झिलई देता येते. ते कपाटे व जडावाच्या कामास उत्तम असते. या वनस्पतीचे सर्वच भाग, विशेषतः बिया, विषारी असतात. कधी कधी त्यामुळे गुरे मरतात पण सशांना हानी पोचत नाही. यांच्या मुळांना ⇨ज्येष्ठमधाप्रमाणे चव (गोडसर) असते. यांच्या काही जातींपासून नवीन संकरजे (मिश्र संतती) उपलब्ध झाली आहेत (उदा., लॅबर्नम वाटरेरी व लॅ. व्हॉसी). लॅ. आल्पिनम, लॅ. ॲनॅगिरॉइडिस (गोल्डन चेन, बीन ट्री) आणि लॅ. कॅरॅमॅनिकम या तीन जाती वर उल्लेख केल्याप्रमाणे सामान्यतः लॅबर्नममध्ये समाविष्ट असून त्या कमी अधिक काटक आहेत. निचऱ्याची सकस जमीन (चुनखडीसह सुद्धा) त्यांना उपयुक्त असते. नवीन लागवड बिया किंवा दाबकलमांनी करतात. यांपैकी कोणत्याही जातीच्या लहान वनस्पतीवर भिन्न प्रकारांची भेटकलमे करून किंवा डोळे बांधून अभिवृद्धी (लागवड) करतात. भिन्न प्रजातींतील फांद्यांच्या संयोगाने कलम-संकरजे बनलेली आढळतात. उदा., लॅबर्नोसायटिसस ॲडॅमाय हे सायटिसस पुर्पुरियसची फांदी आणि द. यूरोपातील लॅबर्नम ॲनॅगिरॉइडिसचा खुंट यांच्या संयोगापासून बनले आहे. याला ‘विचित्रोतकी’ (चिमेरा) म्हणतात. कारण या वनस्पतीत फक्त ऊतकांचे मिश्रण असते, कोशिकांचे (पेशींचे) मीलन नसते. कलम-संकरजाचे काही अवयव (शाकीय) खुंटासारखे, तर इतर अवयव (काही पाने आणि फुले) दुसऱ्या जातीतल्याप्रमाणे असतात. बहुतेक फुले मात्र फिकट जांभळी व क्वचित पिवळी असतात. शोभेच्या दृष्टीने ह्या संकरजांना महत्त्व आहे. भारतात लॅबर्नम असल्याचा उल्लेख नाही.
भारतातील बाहव्याच्या झाडाला इंडियन लॅबर्नम‘ असे म्हणतात परंतु⇨बाहवा त्याच कुलातील असला, तरी तो भिन्न प्रजातीतील (कॅसिया फिस्चुला) व भिन्न उपकुलातील (सीसॅल्पिनिऑइडी) आहे. त्याचा अंतर्भाव वर वर्णन केलेल्या लॅबर्नम मध्ये होत नाही.
पहा : लेग्युमिनोजी वनस्पति, विषारी.
संदर्भ : Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. II, New York, 1960.
परांडेकर, शं. आ.
“