लॅनसिंग : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिशिगन राज्याची राजधानी. लोकसंख्या १,३०,४१४ महानगरीय ४,७१,५६५ (१९८०). इंगम परगण्यातील हे शहर डिट्रॉइटच्या वायव्येस १३७ किमी. वर ग्रँड, रेड सीडार व सिकमॉर या तीन नद्यांच्या संगमावर टेकड्यांमधील उथळ बशीवजा प्रदेशात वसले आहे. वरील तिन्ही नद्या शहरामधून वहात असून त्यांच्यावर अनेक पूल बांधण्यात आले आहेत.
न्यूयॉर्क राज्यातील लॅनसिंगनामक एका खेडेगावातील काही कुटुंबांनी एक भूखंड खरेदी करून १८४०-४५ च्या सुमारास तेथे वसती केली व आपल्या मूळ गावाचे नाव त्यांनी या नव्या वसाहतीस दिले तेच सांप्रतचे लॅनसिंग होय. १८४७ मध्ये मिशिगनच्या विधिमंडळाने डिट्रॉइटहून राजधानी हलवून अन्यत्र वसविण्याचा निर्णय घेतला. तथापि योग्य त्या स्थानाबाबत एकमत न झाल्याने विधिमंडळाने लॅनसिंगच्या अविकसित भागातच राजधानी स्थापण्याचे ठरविले. त्यावेळी लॅनसिंग हे घनदाट अरण्यक्षेत्र होते. एक लाकूडकापणगिरणी व लाकूडसाठवण केंद्र एवढ्याच गोष्टी तेथे होत्या. परंतु राजधानी उभारण्याच्या निर्णयानंतर लोकांनी येथे एकच गर्दी केली व या क्षेत्राचा जलद विकास होत गेला. लॅनसिंगला १८५९ मध्ये शहराचा दर्जा मिळाला, त्यावेळी शहरात निर्मितिउद्योग, भांडारगृहे, हॉटेले, एक वृत्तपत्र, एक सार्वजनिक विद्यालय, एक शासकीय महाविद्यालय सांप्रतचे ईस्ट लॅनसिंग आणि विधानभवन होते. १८६० मध्ये घेण्यात आलेल्या लॅनसिंगच्या पहिल्या संघीय जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ३,०७४ होती. १८७१ मध्ये पहिली आगगाडी येईतोवर तसेच १८७८ मध्ये नवीन विधानभवन उभारले जाईपर्यंत शहराचा खऱ्या अर्थाने फारसा विकास घडून आला नाही.
लॅनसिंग हे १८७१ नंतर वाहने, चाके आणि मालगाडीचे डबे (वाघिणी) यांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र बनले. १९०० च्या सुमारास रॅन्झम ई. ओल्ड्स (१८६४-१९५०) या अमेरिकन मोटारगाडीचे उत्पादन करणाऱ्या आद्य कारखानदाराने ‘ओल्ड्समोबाइल’ व ‘रिओ’ अशा दोन मोटारींची निर्मिती करणारे कारखाने लॅनसिंग येथे उभारले. ‘मोटारगाडीयुगा’च्या प्रारंभानंतर लॅनसिंगची लोकसंख्या जलद वाढत गेली शहराकडे नवनवीन उद्योग आकृष्ट होत गेले. यामुळे लॅनसिंग हे देशातील एक महत्त्वाचे निर्मितिकेंद्र, राज्यशासनाचे प्रशासकीय केंद्र त्याचप्रमाणे राज्याच्या सघन कृषिविभागाचे पणनकेंद्र म्हणून नावारूपास आले.
शहरात मोटारगाड्या, ट्रक, ट्रेलर व त्यांचे सुटे भाग तयार करणे हे प्रमुख उद्योग असून त्यांशिवाय आघात ताडनयंत्रे (ड्रॉप फोर्जिंग्ज), पंप व एंजिने, पेट्राल बर्नर, हत्यारे व अवजारे, सिगारेटी, छते (छपरे) व तंबू, साखरबीट, पीठ, विहंग छायाचित्रण उपकरणे, जोडधातुकाम संयंत्रे, बांधकाम सामग्री, अग्निशामक यंत्रे व उपकरणे, रंग व रसायने, साखर इ. उद्योगांचाही मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.
शहरात तिसांवर सार्वजनिक विद्यानिकेतने, अनेक खाजगी शाळा, मुलांकरिता धंदेशिक्षण शाळा, ‘मिशिगन स्कूल फॉर द ब्लाइंड’ ही अंधांकरिता शाळा, लॅनसिंग कम्यूनिटी महाविद्यालय, ईस्ट लॅनसिंग ह्या भागातील मिशिगन राज्य विद्यापीठ अशा विविध शैक्षणिक सुविधा आहेत. लॅनसिंग हे रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग यांनी डिट्रॉइट व इतर मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.
प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार व लेखक रे बेकर याचे हे जन्मस्थान होय. शहरात चार नभोवाणीकेंद्रे, दोन दूरचित्रवाणीकेंद्रे, ‘लॅनसिंग सिंफनी’ हा वाद्यवृंद, मेट्रपॉलिटन फाइन आर्ट्स कौन्सिल, दोन नाट्यसंस्था आहेत. यांशिवाय १८७८ मधील ‘स्टेट कॅपिटोल’ इमारत, मिशिगन राज्य ग्रंथालय, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, प्राणिसंग्रहोद्यान, पॉटर उद्यान ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.
सावंत, प्र. रा. गद्रे, वि. रा.