लव्ही, ओटो : (३ जून १८७३-२५ डिसेंबर१९६१). जर्मन-अमेरिकन वैद्य व औषधिक्रियावैज्ञानिक. तंत्रिका आवेगांच्या रासायनिक प्रेषणाबद्दल (उद्दीपनाद्वारे मज्जेत एका ठिकाणी उत्पन्न झालेली संवेदना रासायनिक रीतीने दुसरीकडे वाहून नेण्याच्या क्रियेबद्दल) लावलेल्या शोधांकरिता त्यांना १९३६ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक ⇨ हेन्री हॅलेट डेल यांच्या समवेत विभागून मिळाले.
लव्ही यांचा जन्म मेन नदीकाठावरील फ्रँकफुर्ट येथे झाला. १८९६ मध्ये स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठातून वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर त्यांनी फ्रँकफुर्ट येथील नगर रुग्णालयात साहाय्यक (१८९७-९८), मारबर्ग विद्यापीठाच्या औषधिक्रियावैज्ञानिक संस्थेत हान्स मायर यांचे साहाय्यक (१८९९-१९०४), त्याच विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक (१९०४), व्हिएन्ना विद्यापीठात मायर यांचे साहाय्यक व पुढे साहाय्यक प्राध्यापक (१९०७-०९) म्हणून काम केले. १९०९ मध्ये ऑस्ट्रियातील ग्रात्स विद्यापीठात औषधिक्रियाविज्ञानाच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली आणि १९३८ मध्ये नाझींनी हाकलून देईपर्यंत त्यांनी तेथेच काम केले. १९४० मध्ये ते अमेरिकेला गेले व तेथे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात औषधिक्रियाविज्ञानाचे संशोधक प्राध्यापक झाले आणि मग मृत्यूपावेतो त्यांनी तेथेच काम केले.
लव्ही यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांतील तंत्रिका क्रियेसंबंधी होते. १९२१-२६ या काळात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे एका तंत्रिका कोशिकेकडून (पेशीकडून) दुसऱ्या तंत्रिका कोशिकेकडे आणि तंत्रिका कोशिकेकडून प्रतिसाद देणाऱ्या इंद्रियाकडे होणाऱ्या तंत्रिका आवेगाच्या प्रेषणात तंत्रिकांनी तयार केलेल्या रसायनांचा सहभाग असतो, याचा पहिला खात्रीलायक पुरावा सिद्ध झाला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केलेल्या प्रयोगात एका बेडकाच्या हृदयातील तंत्रिकांच्या विद्युत उद्दीपनाद्वारे त्याच्या आंकुचनाचा वेग कमी केला. मग या हृदयापासून स्त्रवणारा द्रव ज्यातील तंत्रिका उद्दीपित केलेल्या नव्हत्या अशा दुसऱ्या एका हृदयातून वाहू देण्यात आला या दुसऱ्या हृदयाचा वेगही मंदावला व त्यावरून पहिल्या हृदयातून स्त्रवलेल्या द्रवात विक्रियाशील पदार्थ असल्याचे सिद्ध झाले. प्राणेशा तंत्रिकेच्या (मेंदूपासून निघणाऱ्या दहाव्या तंत्रिकेच्या) उद्दीपनाने हा पदार्थ स्त्रवत असल्याने लव्ही यांनी त्याला व्हॅगस मटिरीयल असे नाव दिले. पुढे हा पदार्थ ॲसिटिलकोलीन असल्याचे डेल यांनी दाखविले आणि तो प्राण्याच्या ऊतकातून (कोशिका-समूहातून) डेल व हॅरल्ड डडली यांनी १९२९ मध्ये अलग केला.
तंत्रिका तंत्राखेरीज लव्ही यांनी मधुमेहावर आणि डिजिटॅलीस व एपिनेफ्रिन या औषधांच्या क्रियेसंबंधी संशोधन केले. अग्निपिंडाची कार्यक्षमता अजमावण्यासाठी त्यांनी योजलेली एपिनेफ्रिन क्लोराइडाच्या विद्रावाचा उपयोग करणारी एक परीक्षा लव्ही परीक्षा म्हणून ओळखली जाते. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.