लनॉर्मा, आंरीरने : ( ३मे १८८२-१६ फेब्रुवारी १९५१). फ्रेच नाटककार. जन्म पॅरिसला. रने लनॉर्मा ह्या संगीतकाराचा हा पूत्र, सॉर्बॉन येथे त्याने इंग्रजी साहित्याचे अध्ययन केले. विख्यात स्वीडीश नाटककार आउगुस्ट स्ट्रिन्बॅर्य, तसेच फ्रॉइड आणि त्याचे मनोविश्लेषण ह्यांचा प्रभाव त्याच्यावर होता. विशेषतः फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाने तो इतका भारला होता, की त्याचा वापर त्याने आपल्या नाट्यकृतींत केला. त्याच्या नाट्यकृतींचे विषय मुखतः शोकात्म असून माणसाचे अबोध मन आणि माणसातल्या अविवेकी (इर्रॅशनल) शक्ती ह्यांचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम त्याने आपल्या व्यक्तिरेखांतून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या विशेष उल्लेखनीय नाट्यकृती पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडात रंगभूमीवर आल्या आहेत.
त्याच्या निर्देशनीय नाट्यकृतींत ले राते ( १९१८, प्रयोग १९२०, इं. शी. द फेल्यर्स), ल तां एतँ साँज्य ( १९१९, इं शी. टाइम इज अ ड्रीम), ल मॉज्यर द रॅव्ह ( १९२२, इं. शी. द ड्रीम डॉक्टर ) आणि लॉम ए अँ फाँतॉम ( १९२४, इं शो. मॅन अँड हिज फँटम्स) ह्यांचा समावेश होतो.
ल काँफेस्याँ दँनोतर द्रामातीक ( १९४९, इं. शी. कन्फेशन्स ऑफ अ ड्रमॅटिक ऑथर ) ह्यानावाने त्याने आपल्या संस्मरणिका लिहिल्या आहेत. पॅरिस येथे तो निधन पावला.
संदर्भ : White, K.S. The Development of Lenormand’s Principles and Purpose as a Dramatist, Ann Arbor ( Mich.), 1958.
टोणगावकर, विजया