ललित नारायण मिथिला विद्यापीठ : बिहार राज्यातील एक विद्यापीठ. शासनाच्या अध्यादेशानुसार कामेश्वरनगर (दरभंगा) येथे स्थापना ( ५ ऑगस्ट १९७२). विद्यापीठाच्या क्षेत्रात दरभंगा, मधुबनी, समस्तीपूर, बेगुसराई, कटिहार, पूर्णिया आणि सहरसा हे जिल्हे येतात. कला, वाणिज्य, शिक्षण, विधी, विज्ञान, वैद्यक ह्या विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्न असून हिंदी व इंग्रजी हे अध्यापनाचे माध्यम आहे. १ जून ते ३१ मे असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष आहे. विद्यापीठात ६१ घटक महाविद्यालये, १४ संलग्न महाविद्यालये, १ शिक्षणसंस्था व ३ शासकीय महाविद्यालये आहेत. वसतिगृहे, वैद्यकीय सेवा, संशोधन विद्यावेतने, गुणवत्ता शिष्यवृत्त्या, बहिःस्थ शिक्षण इ. सुविधा विद्यापीठात उपलब्ध आहेत.
बिहार राज्यातील शासकीय/निमशासकीय सेवेत असणाऱ्या कोणत्याही स्त्री-पुरुषांना सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत एक वर्षाच्या अंतराने महाविद्यालयीन पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेस बसण्याची विद्यापीठ संमती देते. तीन वर्षांचा अनुभव असलेल्या प्रयोगशाळा साहाय्यकांना, त्यांनी प्रयोग केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास, शिक्षण मंडळ एक विशेष सवलत म्हणून बी.एस्सी. किंवा एम्.एस्सी. ह्या परिक्षांना बसण्याची संमती देते.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात सु. १,७५,२२५ ग्रंथ नियतकालिके होती. विद्यापीठात सु. १,२५१ अध्यापक व सु. १,१०,३६६ विद्यार्थी असून त्याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न सु. १.७५ कोटी रु.होते (१९८७-८८).
मिसार, म. व्यं.