ल कॉर्ब्यूझ्येल कॉर्ब्यूझ्ये : (६ ऑक्टोबर १८८७-२७ ऑगस्ट १९६५). विश्वविख्यात फ्रेंच वास्तुशिल्पज्ञ. ला शो-द-फाँ, स्वित्झर्लंड येथे जन्म. विसाव्या शतकात जागतिक वास्तुकलेला नवे वळण देणारे जे चार सर्वश्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञ मानले जातात, त्यांपैकी ल कॉर्ब्यूझ्ये एक होय. त्याचे मूळ नाव शार्ल एद्वार झ्हांन्रे. आपल्या एका चित्रकार मित्राच्या प्रभावामुळे त्याने १९२० मध्ये ‘ल कॉर्ब्यूझ्ये’हे टोपणनाव धारण केले. त्याचे माता-पिता घड्याळ-कारखान्यात काम करीत होते. ला शो-द-फाँ येथे त्याने वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत ‘स्कूल ऑफ फाइन आर्ट’मध्ये कलाशिक्षण घेतले. या कलाविद्यालयाच्या शिष्यवृत्तीच्या साहाय्याने त्याने इटली, जर्मनी इ. यूरोपीय देशांना भेटी दिल्या. तसेच पुढेही दोन वर्षे यूरोपभर प्रवास केला आणि तत्कालीन प्रसिद्ध वास्तुतज्ञांशी संपर्क साधला. तसेच प्रमुख शहरांतील महत्त्वाच्या वास्तूंचा अभ्यास केला. १९०८ मध्ये कॉर्ब्यूझ्येने पॅरिसमध्ये प्रसिद्ध सलोह काँक्रीट-तज्ञ ऑग्यूस्त पेरे याच्यासमवेत काम सुरू केले. १९१० मध्ये बर्लिन येथे तत्कालीन प्रसिद्ध वास्तुतज्ञ पीटर बेरेन्स याच्या हाताखाली त्याने काही महिने काम केले. नंतर १९१७ मध्ये त्याने पॅरिसमध्ये आपले व्यावसायिक कार्यालय स्थापन केले. याच काळात पॅरिसमध्ये आधुनिक चित्रकलेचे वारे वेगाने वाहत होते. त्यातील घनवादी चित्रसंप्रदायाने कॉर्ब्यूझ्येला आकर्षित केले. याच विचारप्रणालीचा प्रभाव पुढे कॉर्ब्यूझ्येच्या सर्वकष शैलीवर पडलेला आढळतो. चित्र आणि शिल्प या क्षेत्रांतही त्याने आपले चमक दाखविली परंतु वास्तुकला हेच त्याचे खरे कार्यक्षेत्र. ते पुढे विस्तारत, विकसित होत गेले. आपल्या या संमिश्र कलाध्ययनातून त्याने वास्तुशास्त्रीय संकल्पना विकसित केल्या आणि विविध प्रकारच्या कल्पक प्रकल्पांद्वारे आपले विचार व्हॅर झ्यून आरशितॅत्त्यूर (१९२३ इं. भा. टोवर्ड्‌स अ न्यू आर्किटेक्चर, १९२७) या पुस्तकाद्वारे प्रसृत केले. ह्या पुस्तकाने जगभरच्या वास्तुतज्ञांना भावी काळातील शहरीकरणाच्या समस्यांची जाणीव करून दिली. त्याला या ग्रंथामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने कन्सर्निंग टाऊन प्लॅनिं हे दुसरे पुस्तक १९४६ साली लिहिले. त्यात – (१) ३० लाख वस्तीचे गगनचुंबी इमारतींचे नगर (२) स्तंभपंक्तींवर आधारित घराच्या भौमितिक आकारांनी साकारलेले अवकाश (३) ‘घर हे रहाण्याचे यंत्र आहे.’ या त्याच्या क्रांतिकारक सिद्धांतावर अधिष्ठित अशी घरातील खोल्यांची केलेली रचना-अशा तीन मूलभूत तत्त्वांचा ऊहापोह केलेला आहे. व्यावसायिक कारकीर्दीत पुढे कॉर्ब्यूझ्येची शैली विकसित होत गेली परंतु त्यामागील वरील मूलतत्त्वे कायम राहिलेली आढळतात. शहरीकरणाबद्दलची कॉर्ब्यूझ्येची मते क्रांतिकारक होती. त्याच्या मते शहरातील वाहतूकव्यवस्था आणि निवासी व कार्यालयीन विभाग यांचा परस्परपूरक संबंध प्रस्थापित केला पाहिजे. शहरातील वाहतुकीला वाढू देता कामा नये. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो व इतरही समस्या उभ्या राहतात. त्यापेक्षा गगनचुंबी निवासी इमारतींची वाहतूकविरहित संकुले उभी करावीत. त्याद्वारे शहराच्या वाहतुकीला आळा घालता येऊ शकतो.

मानवी शरीराला आधारभूत मानून कॉर्ब्यूझ्येने प्रमाणबद्धतेच्या मापनासाठी नवीन ‘मॉड्यूलर’ तंत्र विकसित केले [⟶ रचना परिमाण]. ॲल्बर्ट आइन्स्टाइनच्या मते या प्रमाणमापन पद्धतीमुळे वाईट गोष्टींचे आकलन कठीण होते व चांगल्या गोष्टींचे सहज होते. १९२६ साली कॉर्ब्यूझ्येने वास्तुकलेविषयी फाइव्ह पॉइंट्स ऑफ मॉडर्न आर्किटेक्चर नामक पुस्तक लिहिले. त्यातील पाच प्रमुख तत्त्वे म्हणजे : (१) परंपरागत पायारचनेऐवजी आधार-स्तंभरचना (पिलोटिस) (२) गच्चीवरील वगीचाची (रूफ-गार्डन) कल्पना (३) वास्तूच्या अंतर्भागातील स्तंभ टाळून मुक्त अवकाशरचनेचा पुरस्कार (४) खिडकीचा आकार बदलून भिंतीमध्ये संपूर्ण खिडकीची पट्टी (५) याद्वारे यांत्रिक घटकांची पुनरुक्ती करून दर्शनी भागांवर केलेली काचेची पडदी (कर्टन वॉल). अशा पंचतत्त्वांनी साकारलेल्या अनेक गृहवास्तूंची निर्मिती कॉर्ब्यूझ्येने पॅरिस शहराच्या आसपास केली. उदा., ‘मॅसन स्टेन’ (१९२९), ‘मॅसन सुसी’ (१९३१) ह्या उत्कृष्ट गृहवास्तू होत. ‘हेडक्कार्ट्‌र्स अँड रिफ्युज फॉर साल्वेशन आर्मी’ (१९३३) ही पॅरिसमधील वास्तू तिच्या दर्शनी भागावरील केलेल्या पडदींच्या रचनेमुळे हवामानातील चढउतारांना तोंड देणारी ठरली. ‘पॅव्हॅलीयन टू ब्राझील’ (१९५७) ही पॅरिसमधील वास्तूही उल्लेखनीय आहे. ‘युनिते दाबितासिआँ’ (१९४७-५२), मार्से आणि ‘युनिते दाबितासिआँ,’ पश्चिम बार्लिन (१९५७) या कॉर्ब्यूझ्येने बांधलेल्या निवासी वास्तू क्रांतिकारक ठरल्या. मार्से येथील वास्तूमध्ये ३३७ सदनिका (फ्लॅट्‌स) आहेत तर बर्लिन येथील वास्तूत ४०० सदनिका आहेत. अवकाशरचना, अंतर्गत वाहतूक,वायुजीवन इ. अनेक समस्यांचे कलात्मक वास्तुशास्त्रीय मार्गानी निरसन केलेले आढळते. ‘व्हिला सव्हॉय’, प्वासी (१९२९) ही गृहवास्तू (पहा : मराठी विश्वकोश : खंड ५ चित्रपत्र २१) तिच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे क्रांतिकारक ठरली. ती आधुनिक वास्तुकलेत अत्यंत नावाजली गेली आहे.


कॉर्ब्यूझ्येची सर्वांत प्रसिद्ध वास्तू म्हणजे फ्रान्समधील रॉशँ येथील ‘नोत्र दाम द्यू ओत’ ही चर्चवास्तू (१९५०-५४) होय (पहा : मराठी विश्वकोश : खंड २ चित्रपत्र ११). दगड आणि सलोह काँक्रीट या वास्तुसाहित्याद्वारे कॉर्ब्यूझ्येने या वास्तूत साधलेले आकारसौंदर्य विस्मयचकित करणारे आहे. येथील अतिभव्य व भरीव छप्पररचना, स्तंभाकार खिडक्यांची रचना इत्यादींद्वारे अंतर्भागात निर्माण होणारे अवकाशदर्शन दिग्‌मूढ करून टाकणारे असे आहे. ‘मोनॅस्ट्री ऑफ ला टुरेट’ (१९६०), लीआँ आणि मॅसॅचूसेट्‌स येथील हार्व्हर्ड विद्यापीठाचे ‘व्हिज्यूअल आर्ट सेंटर’ (१९६४) या त्याच्या अन्य उल्लेखनीय कलात्मक वास्तू होत. १९३० साली त्याला फ्रेंच राष्ट्रीयत्व मिळाले.

पंडित नेहरुंच्या आदेशानुसार १९५० मध्ये ⇨चंडीगढ शहराची निर्मिती ल कॉर्ब्यूझ्येकडे सोपविण्यात आली. या नगरचना-प्रकल्पाद्वारे त्याने सलोह काँक्रीट माध्यमातून एकापेक्षा एक सरस अशा कलात्मक वास्तूंची निर्मिती तर केलीच शिवाय नगररचनेचा एक आदर्शही जगासमोर ठेवला [⟶ नगररचना]. तेथील सचिवालय, ‘हायकोर्ट वास्तू’ (पहा : मराठी विश्वकोश : खंड २, चित्रपत्र ११) आणि सभागृह या प्रमुख वास्तू भारतीय हवामानात तपमान-नियंत्रण कसे साधता येते, हे प्रभावीरीत्या दाखवून देतात. त्यांची दर्शनी भागांची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकंदरीतच चंडीगढच्या नगररचनेत कॉर्ब्यूझ्येने आपली सारी प्रतिभा परिपूर्ण सामर्थ्यानिशी पणास लावली आहे. त्याने भारतात इतरत्रही वास्तू बांधल्या. उदा., अहमदाबादमधील ‘मनोरमा साराभाई निवास’ (१९५६), ‘व्हिला शोधन’ (१९५६), ‘कापडगिरणी मालकांच्या संघटनेचे कार्यालय’ (१९५६), अहमदाबादच्या ‘कल्चरल सेंटर’चे संग्रहालय (१९५७) इत्यादी. कॉर्ब्यूझ्येच्या वास्तुशैलीचे प्रगल्भ व परिणत रुप भारतात पाहावयास मिळते. कॅप-मार्‌तँ, फ्रान्स येथे त्याचे निधन झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कॉर्ब्यूझ्येच्या विचारप्रणालीचा तसेच वास्तुशैलीचा प्रभाव जगभर सर्वत्र जाणवतो. 

संदर्भ : 1. Blake, Peter, Le Corbusier : Architecture and Form, Toronto, 1964.

           2. Choay, Francoise, Le Corbusier, New York, 1960.

           3. Papadaki, Stano, Le Corbusier, New York, 1948.

          ४. कुलकर्णी, अनिरुद्ध, ‘यंत्रयुगातील सिद्धहस्त’, नवभारत, ऑगस्ट १९७९.

          ५. दिक्षित, विजय, वास्तुकला : कला, आज आणि उद्या, नासिक, १९७३.

दीक्षित, विजय


‘मॅसन सुसी’, पॅरिस (१९३१)- ल कॉर्ब्यूझ्ये. ‘व्हिला शोधन’, अहमदाबाद (१९५६)-ल कॉर्ब्यूझ्ये.
सचिवालय—वास्तू, चंडीगढ-- ल कॉर्ब्यूझ्ये. युनिते दाबितासिआँ मार्से (१९४७-५२)- ल कॉर्ब्यूझ्ये.