ऱ्हीसस घटक : (Rh किंवा आरएच घटक). बहुसंख्य व्यक्तींच्या रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठावरील पटलात आनुवंशिक रीत्या आलेली अनेक वैशिष्ट्यदर्शक प्रथिनद्रव्ये असतात. ABO या मुख्य रक्तगट पद्धतीशिवाय [मुख्य रक्तगट निदर्शक प्रतिजनांशिवाय ⟶ रक्तगट] आढळणाऱ्या या अनेक घटकांना मिळून Rh घटक असे संबोधण्यात येते. ज्या व्यक्तीच्या रक्तात हे घटक आढळतात त्यांच्या रक्तगटाला Rh-धन (Rh पॉझिटिव्ह) आणि ज्यांच्या रक्तात ते आढळत नाहीत त्यांच्या रक्तगटाला Rh-ऋण (Rh निगेटिव्ह) असे म्हणतात. काही कारणाने Rh ऋण व्यक्तीच्या रक्तात Rh-धन तांबड्या कोशिकांचा प्रवेश झाल्यास हे घटक ⇨प्रतिजन म्हणून कार्य करतात म्हणजेच प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता प्रतिक्रियेला चालना देतात. ऱ्हीसस माकडाच्या [मॅकाका म्युलाट्टा⟶ माकड] रक्तात या प्रकारचा प्रतिजन प्रथम आढळल्याने याला ऱ्हीसस घटक हे नाव पडले असून Rh हे ऱ्हीससचे संक्षिप्त रूप आहे.
भारतामध्ये Rh-धन रक्तगट असलेल्या व्यक्तींची संख्या ९५% असून जगातील इतर काही प्रदेशांतील ही टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. कॉकेशियन (यूरोप), कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे ८५% बास्क्स (पिरेनीज) ६५ ते ७५% बर्बर (आफ्रिका) व बदायून (सिनाई) ७० ते ८२% वगैरे.
फिलिप लेव्हिन व आर्. ई. स्टेटसन यांना १९३९ साली हा घटक आढळला होता. १९४० साली कार्ल लँडस्टायनर व अलेक्झांडर वीनर यांनी ऱ्हीसस माकडाच्या रक्तातील तांबड्या कोशिका अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) सशाच्या रक्तात मिसळल्या. या सशापासून मिळालेला प्रतिरोधक रक्तरस माणसाच्याही तांबड्या कोशिकांविरुद्ध प्रतिक्रिया दाखवतो म्हणजेच ऱ्हीसस माकडाच्या तांबड्या कोशिकांवरील घटकासारखा घटक माणसाच्याही तांबड्या कोशिकांवर आढळतो, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनीच त्याचे ऱ्हीसस घटक असे नामकरण केले. हा घटक प्रतिजनासारखा वागतो व या पहिल्या घटकासारखे कित्येक Rh प्रतिजन तांबड्या कोशिकांवर असतात, हे नंतर कळून आले परंतु अजूनही Rh प्रतिजनांच्या जीवरासायनिक व रचनात्मक स्वरूपाची पूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही. एकसारख्या पद्धतीने वागणाऱ्या अनेक प्रतिजनांचा समावेश व त्यांची आनुवंशिकता यामुळे Rh रक्तगट पद्धती अतिशय गुंतागुतीची झाली आहे. मिळालेल्या माहितीचा आनुवंशिक संदर्भात योग्य अन्वयार्थ लावणे व या सर्व रक्तगटांना आणि त्यामागील आनुवंशिक वस्तुस्थितीला समर्पक नावे देणे याबद्दल अनेक मतभेद आहेत.
इ. स. १९४३ साली आर् .ए. फिशर व आर्. आर्. रेस यांनी या संदर्भात सुचविलेल्या सिद्धांतास फिशर-रेस सिद्धांत असे म्हणतात. त्यानुसार Rh प्रतिजनांच्या Cc, Dd, Ee अशा तीन विकल्पीय जोड्यांशी संकेतबद्ध केलेल्या एकमेकांसन्निध संलग्न असलेल्या तीन जनुकांच्या [जीनांच्या ⟶जीन] साहाय्याने Rh घटकांच्या आनुवंशिकतेचे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुलनात्मक सोपेपणा हे या सिद्धांताचे वैशिष्ट्य असले, तरी Rh घटकांच्या आनुवंशिक व रक्तरसवैज्ञानिक गुंतागुंतीचे यथार्थ व पूर्ण स्पष्टीकरण करण्यास तो पुरा पडत नाही. म्हणून उपलब्ध माहितीनुसार Rh आणि इतर अनेक रक्तगट पद्धतीसाठी अनेक विकल्पांच्या संकल्पनेला जास्त पाठबळ मिळत आहे.
जास्त गुंतागुंतीत न शिरता सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, सर्व Rh प्रतिजनांची माहिती अलिंग गुणसूत्रांच्या [⟶ गुणसूत्र] एका जोडीतील (गुणसूत्र १ मधील) आखूड भुजेच्या टोकाला व एकमेकांशी संलग्न असलेल्या जनुकांच्या तीन गटांमार्फत पुढील पिढ्यांत संक्रमित केली जाते. याप्रमाणे जवळजवळ छत्तीस विकल्प माहीत झाले असून त्यांपैकी आठ सर्वसाधारणपणे जास्त आढळतात.
Rh रक्तगट पद्धतीमध्ये जवळजवळ तीस रक्तगट निश्चित केले गेले आहेत परंतु यांतील RhO किंवा D हा एकच रक्तगट सर्वात महत्त्वाचा होय (लँडस्टायनर व वीनर यांना ऱ्हीसस माकडात प्रथम सापडलेला हाच गट होय). कारण हा एकच रक्तगट प्रतिरक्षा प्रतिक्रियेला सर्वाधिक चालना देणारा आणि म्हणून वैद्यकीय दृष्टीनेही सर्वांत महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे याच रक्तगटाच्या अस्तित्वानुसार व्यक्त Rh- धन अथवा Rh- ऋण हे ठरविले जाते.
सर्वसाधारण परिस्थितीत हा घटक व्यक्तीच्या रक्तात असला किंवा नसला तरी त्या व्यक्तीच्या आरोग्यावर या वस्तुस्थितीचा काहीही विपरीत परिणाम होत नाही. कारण प्रति-Rh-प्रतिपिंड नैसर्गिक रीत्या रक्तात आढळत नाहीत परंतु जेव्हा Rh- ऋण व्यक्तीच्या रक्तात Rh- धन रक्त मिसळते, तेव्हा त्या व्यक्तीत प्रतिरक्षा प्रतिक्रिया निर्माण होते म्हणजेच Rh- धन तांबड्या कोशिकांविरुद्ध प्रति-Rh- प्रतिपिंड (ॲग्लुटिनीन) निर्माण होण्यास सुरूवात होते. दोन प्रकारच्या परिस्थितींत अशी शक्यता निर्माण होते. (१) Rh- ऋण व्यक्तीला Rh- धन रक्त दिले जाणे (रक्ताधान) व (२) Rh-ऋण मातेने Rh-धन अपत्याला जन्म देणे.
Rh-ऋण व्यक्तीला Rh-धन रक्त दिले गेल्यास त्या व्यक्तीच्या रक्तात प्रति- Rh-प्रतिपिंडनिर्मिती सुरू होते. पहिल्या वेळी ग्राहकांमध्ये हे प्रतिपिंड निर्माण होईपर्यंत दात्याचे Rh-धन रक्त विरळ होऊन गेलेले असते व समूहनाद्वारे (एकत्र होऊन पुंजका तयार होण्याद्वारे) उद्भवणारी गंभीर प्रतिरक्षा प्रतिक्रिया निर्माण होत नाही परंतु अशा व्यक्तीला परत Rh-धन रक्त दिल्यास त्याच्या शरीरात आधीच असलेले प्रति- Rh-प्रतिपिंड Rh-धन तांबड्या कोशिकांचे समूहन व नाश करतात. समूहनाने तयार झालेल्या तांबड्या कोशिकांच्या लहान गुठळ्यांमुळे लहान रक्तवाहिन्या चोंदतात व ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचा) ऑक्सिजनाचा पुरवठा बंद झाल्याने ऊतकमृत्यू ओढवतो. तसेच रक्तविलयक (तांबड्या कोशिकांतील रक्तारुण-हीमोग्लोबिन-अलग करणाऱ्या) घातक प्रतिरक्षा प्रतिक्रियेमुळे रक्तविलयनजन्य प्रतिक्रिया (Rh-प्रतिक्रिया) हा गंभीर आजार होऊ शकतो [⟶ रक्ताधान]. यामुळे रोग्याला मृत्यूही येऊ शकतो.
सध्या रक्ताधान करताना A B O या प्रमुख रक्तगटांबरोबरच Rh-रक्तगटाशीही जुळणारेच रक्त वापरले जात असल्याने व शिवाय उलट जुळणी केली जात असल्याने या प्रकारची परिस्थिती उद्भवत नाही (अतितातडीच्या गंभीर परिस्थितीत, Rh-धन अथवा ऋण याचा विचार न करता, Rh-ऋण व्यक्तीला Rh-धन रक्त नाईलाजाने देणे भाग पडते, ही एकच अपवादात्मक परिस्थिती होय).
आता दुसऱ्या परिस्थितीचा म्हणजे Rh-ऋण मातेला Rh-धन अपत्य होण्याचा विचार करू. आनुवंशिकतेचा विचार केल्यास माता व पिता यांच्या Rh-धन अथवा ऋण असल्यामुळे अपत्य Rh-धन अथवा ऋण असण्याच्या पुढील शक्यता उद्भवतात.
आनुवंशिकतेने अपत्याला माता व पिता या दोघांकडून Rh-धन रक्त गटाचा वारसा मिळाल्यास अपत्याचा रक्तगट धन होतो. तसेच एकाकडून धन व दुसऱ्याकडून ऋण गटाचा वारसा मिळाल्यासही अपत्याचा दर्शनी रक्तगट धन होतो आणि दोघांकडूनही ऋण रक्तगटाचा वारसा मिळाल्यास मात्र अपत्य Rh- ऋण रक्तगटाचे होते.
मातेचा रक्तगट Rh-ऋण असल्यास तिचा रक्तगट ऋण-ऋण म्हणता येईल (तिच्या माता व पित्याकडून तिला मिळालेला ऋण-ऋण वारसा) म्हणजे ती आपल्या अपत्याला फक्त ऋण-वारसा देऊ शकते. पित्याचा रक्तगट Rh-धन असल्यास आनुवंशिक भाषेत तो धन-धन किंवा धन-ऋण असू शकतो म्हणजेच तो धन-धन असल्यास आपल्या अपत्याला फक्त धन रक्तगटाचा वारसा देतो आणि तो धन-ऋण असल्यास निम्म्या अपत्यांना धन व निम्म्यांना ऋण वारसा देऊ शकतो.
यावरून असे म्हणता येईल की, माता Rh-ऋण व पिता Rh-धन अशी परिस्थिती असल्यास या जोडप्यास होणाऱ्या अपत्यांपैकी काही अपत्ये Rh-धन असतील म्हणेच Rh-ऋण मातेच्या उदरात Rh-धन अपत्य अशी परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत सुरुवातीला काही प्रश्न निर्माण होत नाहीत, कारण मातेचे व अपत्याचे रक्त वारेत पूर्णपणे अलग राखलेले असते परंतु प्रसूतीच्या वेळी वार सुटी होताना होणाऱ्या रक्तस्त्रावात गर्भाचे रक्त काही प्रमाणात मातेच्या रक्तात मिसळते. याप्रमाणे अशा पहिल्या प्रसूतीच्या वेळी अपत्याचे Rh-धन रक्त मातेच्या Rh-ऋण रक्तात मिसळून मातेच्या रक्तात प्रति- Rh-प्रतिपिंडनिर्मितीत चालना मिळते परंतु प्रसूती आधीच झाल्याने पहिल्या अपत्यास त्रास होत नाही. दुसऱ्या अपत्याच्या वेळी मात्र Rh-ऋण मातेच्या रक्तात प्रति- Rh-प्रतिपिंड आधीच मोठ्या प्रमाणावर असल्याने व हे प्रतिपिंड वारेतून अपत्याच्या रक्तात मिसळू शकत असल्याने तेथे ते अपत्याच्या Rh-धन तांबड्या कोशिकांचे समूहन आणि नाश करू लागतात. अपत्याच्या तांबड्या कोशिकांच्या नाशाचा परिणाम म्हणून रक्तविलयनजन्यरोग हा गंभीर विकार होतो. गर्भावस्थेतच अपत्याला पांडुरोग (ॲनिमिया) होतो आणि नवीन तांबड्या कोशिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू होते व त्यासाठी यकृत व प्लीहा (पानथरी) यांचे आकारमान वाढते.
नाश पावलेल्या तांबड्या कोशिकांची विल्हेवाट लावताना मोठ्या प्रमाणावर रक्तारुणाचे पित्तारुणामध्ये रूपांतर होते. गर्भावस्थेत हे पित्तारुण वारेतून मातेच्या शरीरात जाऊन तेथे त्याची विल्हेवाट लावली जाते परंतु अपत्य जन्मानंतर अपत्याच्याच यकृतावर हा ताण पडतो व रक्तात पित्तारुण साठत जाऊन कावीळ होते. प्रमाणाबाहेर कावीळ वाढल्यास ‘कर्निक्टेरस’ हा विकार होतो (यात मेंदूतील काही केंद्रांत पित्तारुणाचा साठा झाल्याने त्या केंद्रांचे कार्य बहुधा कायमचे बिघडते), तसेच तीव्र पांडुरोग आणि तांबड्या कोशिकांच्या समूहनामुळे लहान रक्तवाहिन्या बंद झाल्याने ऊतकांना कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो व यामुळे ऊतकमृत्यू होऊ शकतो. यामुळे मेंदूत विकृती व हृद्रोग होऊ शकतो. अपत्याच्या अंगावर सूज येते व त्याचा मृत्यू होतो.
Rh-ऋण मातेला होणाऱ्या प्रत्येक Rh-धन अपत्याबरोबर मातेच्या रक्तातील प्रति-Rh- प्रतिपिंडनिर्मितीला अधिकच चालना मिळत गेल्याने पुढील प्रत्येक Rh-धन अपत्यात या रोगाची जास्त जास्त गंभीर लक्षणे दिसतात (रक्तविलयनजन्य रोग हा माता व गर्भाचे रक्त ABO या प्रमुख रक्तगटांच्या न जुळण्यानेही होऊ शकतो. इतकेच नव्हे तर माता व गर्भाचे Rh रक्तगट न जुळण्यापेक्षा ABO रक्तगट न जुळण्यानेच जास्त गर्भांना हा रोग होत असावा, अशी शक्यता आहे. शिवाय अशा वेळी हा रोग प्रथम गर्भालाही होऊ शकतो).
सौम्य आजारात विशेष उपचारांशिवाय हा रोग बरा होऊ शकतो. कारण अपत्याच्या जन्मानंतर मातेच्या रक्तातील प्रति- Rh-प्रतिपिंड अपत्याच्या रक्तात शिरण्याचे बंद होते व आधी शिरलेल्या प्रतिपिंडांमुळे होणारे नुकसान कालांतराने बंद होते. अशा वेळी रक्तनाशामुळे होणाऱ्या परिणामांविरुद्ध शरीरयंत्रणेतील उपाययोजना पुरेशा ठरल्यास अपत्याची प्रकृती सुधारू शकते परंतु बहुधा अपत्याचे संपूर्ण रक्ताधान करण्याचा उपाय योजतात. यामध्ये मातेच्या पोटात असताना किंवा जन्मानंतर लगेच अपत्याचे Rh-धन रक्त संपूर्णपणे बदलून त्याच्या जागी ताजे Rh-ऋण रक्त भरतात. असे एकदा किंवा अनेकदा करावे लागते. बहुतेक वेळा हा उपाय यशस्वी ठरतो व बहुधा पुढील दीर्घकालीन दुष्परिणामही टाळले जातात.
Rh रक्तगट व Rh-ऋण मातेच्या उदरात Rh-धन गर्भ असण्याचे होणारे दुष्परिणाम आता ज्ञात असल्याने त्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे (हीच काळजी आता रक्ताधान करतानाही घेतली जाते). यासाठी प्रत्येक गर्भवतीचा ABO व Rh रक्तगट तपासणे आवश्यक आहे. हा रक्तगट Rh-ऋण असल्यास तिच्या पतीचा रक्तगटही तपासणे आवश्यक आहे. तो Rh- धन असल्यास या जोडप्याची काही मुले Rh- धन असणार व त्यामुळे गुंतागुंत निर्माण होणार हे लक्षात घेऊन पहिल्या व नंतरच्याही अपत्यांच्या जन्मानंतर लगेच वारेतील रक्त तपासणीसाठी घेतले जाते. या रक्तातील पित्तारुणाचे प्रमाण पाहिले जाते आणि या रक्तावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कृम्बस परीक्षा (तांबड्या कोशिकांच्या पृष्ठावरील प्रतिपिंडाचे अस्तित्व दर्शवणाऱ्या समूहन प्रतिक्रिया) करून अपत्याला रक्तविलयजन्य रोग होण्याची शक्यता पडताळून पाहिली जाते. अशी शक्यता दिसल्यास रोगाची तीव्रता अजमावून कोणत्या प्रकारचे उपचार करावयाचे, हे ठरवले जाते. तसेच वारेतील याच रक्तावरून अपत्याचा रक्तगट ठरवला जातो. अपत्य Rh- धन असल्यास मातेला प्रति Rh – प्रतिपिंडयुक्त रक्तरसाची पुरेशी मात्रा अंतःक्षेपणाने तीन दिवसांच्या आत दिली जाते. यामुळे मातेच्या रक्तात प्रसूती वेळी मिसळलेल्या अपत्याच्या तांबड्या कोशिकांचा त्वरित नाश होऊन त्या मातेच्या शरीरात प्रति- Rh -प्रतिपिंड निर्मितीला चालना देऊ शकत नाहीत.
काही वेळा पुढील गर्भधारणेच्या कालावधीत मातेचे रक्त तपासून त्यास प्रति- Rh-प्रतिपिंड निर्माण झालेले आहेत का व झालेले असल्यास त्यात काही नवीन वाढ होत आहे का हे अजमावून पहावे लागते आणि त्यानुसार गर्भावर उपचार करण्याची आवश्यकता व उपलब्धता अजमावावी लागते.
वरील वैद्यकीय महत्त्वाच्या गोष्टींशिवाय ऱ्हीसस घटकांमुळे व्यक्तिगत रक्तगटाची निश्चिती करण्याचे काम अधिक सोपे झाले आहे. यामुळे न्यायवैद्यक व मानवशास्त्र या विषयांतही या घटकाचा उपयोग होतो.
पहा : रक्तगट रक्ताधान.
संदर्भ : 1. American Association of Blood Banks, Blood Group Antigens and Diseases, 1983.
2. Race, R. R. Sanger, R. Blood Groups in Man, Philadelphia, 1968.
ठाकूर, अ. ना. प्रभुणे, रा. प.
“