ऱ्यूडबॅरय, आब्राहाम व्हिक्तॉर : (१८ डिसेंबर १८२८-२१ सप्टेंबर १८९५). स्वीडिश कादंबरीकार. यन्चंपिंग येथे जन्मला. आर्थिक अडचणींमुळे त्याला आपले विद्यापीठीय शिक्षण अर्धवटच सोडून द्यावे लागले. Goteborgs handelstidning ह्या उदारमतवादी वर्तमानपत्रात तो १८५५ पासून काम करू लागला. ह्याच वर्तमानपत्रात त्याची द लास्ट अथेनियन (१८५९, इं. भा. १८६९) ही त्याला ख्याती मिळवून देणारी कादंबरी प्रसिद्ध झाली. पेगन धर्म आणि ख्रिस्ती धर्म ह्यांच्यात झालेला प्राचीन अथेन्समधील झगडा हा ह्या कादंबरीचा विषय. धार्मिक क्षेत्रातील असहिष्णुतेला आणि सनातनीपणाला त्याचा असलेला विरोध ह्या कादंबरीतून त्याने व्यक्त केला. Vapensmeden (१८९१, इं. शी. द. आर्मरर) ही त्याची कादंबरीही उल्लेखनीय आहे. स्वीडनमधील धर्मसुधारणेच्या चळवळीच्या वेळचे जीवन तीत त्याने रंगविले आहे. Bibelns Lara Om Kristus (१८६२, इं. शी. द. टीचिंग ऑफ द बायबल कन्सर्निंग ख्राइस्ट) ह्या आपल्या वैचारिक ग्रंथात त्याने येशू ख्रिस्त हा देव नव्हता, असा विचार मांडला. त्यानंतर त्याला वादांना तोंड द्यावे लागले. १८७४ साली रोमला भेट दिल्यानंतर त्याने लिहिलेल्या Romerska dagor (१८७७, इं. शी. रोमन डेज) ह्या ग्रंथात अभिजाततेने भारलेल्या प्राचीन काळाबद्दल त्याला वाटणारी आस्था प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. ऱ्यूडबॅरयला मिथ्यकथांमध्येही रस होता. ‘इन्व्हेस्टिगेशन्स इंटू जर्मानिक माय्थॉलॉजी’ (२ खंड, १८८६-८९ इं. शी.) हा त्याचा शोधग्रंथ त्या दृष्टीने निर्देशनीय आहे.
मोलाची काव्यनिर्मितीही त्याने केली. स्वीडनचा एक अग्रगण्य भावकवी म्हणून त्याने लौकिक संपादन केला. Dikter (१८८२) ह्या त्याचा काव्यसंग्रहातील कवितांतून यंत्राधिष्ठित आधुनिक समाजाबद्दलची नैराश्यजनक जाणीव त्याने व्यक्तविली आहे.
स्वीडिश संसदेचा तो काही काळ सदस्य होता. १८७७ साली अप्साला विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट त्याला देण्यात आली. १८७८ मध्ये स्वीडिश अकादमीवर त्याची निवड झाली आणि १८८४ सालापासून स्टॉकहोम विद्यापीठात तो सांस्कृतिक इतिहासाचे अध्यापन करू लागला. स्वीडनच्या सांस्कृतिक जीवनात त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. अधिकारशाही वृत्तीच्या स्वीडिश चर्चविरुद्ध त्याने जी भूमिका घेतली, तिचा समकालीनांवर प्रभाव पडला होता.
यूर्सहॉल्म येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.