रौतराय, शचि : (१३ मे १९१६- ). ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात आधुनिक ओडिया कवी, कथाकार, कादंबरीकार व निबंधकार. मूळ नाव सच्चिदानंद तथापि साहित्यक्षेत्रात शची रौतराय (राउतराय) या नावानेच ते अधिक प्रसिद्ध आहेत. जन्म पुरी जिल्ह्यातील खूर्द येथे. १९३९ मध्ये कटक येथील रॅव्हनशा महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर औद्योगिक संबंधविषयक विशेष शिक्षण त्यांनी घेतले. नंतर कलकत्ता येथील बिर्ला उद्योगसमूहाच्या कार्यालयात (केसोराम कॉटन मिल्स लि.) ते दीर्घकाळ (१९४२-६२) उच्चपदस्थ अधिकारी होते. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया येथील कामगार प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी ते विदेशी गेले (१९५२). जिनीव्हा येथील ILO या प्रसिद्ध संस्थेत शिक्षण घेऊन ते भारतात परतले (१९५५). सध्या ते कटक येथे आपला स्वतंत्र व्यवसाय सांभाळतात.
‘पद्मश्री’ (१९६२), कविता काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४), सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार (१९६५) आणि भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार (१९८६) हे बहुमान त्यांना मिळाले. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असून, बाविसाव्या पुरस्कार मिळविणाऱ्या या साहित्यिकामुळे ओडिया साहित्याला हा सन्मान दुसऱ्यांदा लाभला. यापूर्वी १९७३ मध्ये ⇨ गोपीनाथ महांती आणि ⇨ द. रा. बेंद्रे यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला होता. आंध्र (१९७७) आणि बेऱ्हमपूर (१९७८) विद्यापीठांनी रौतरायांना सन्मान्य डी.लिट्. देऊन गौरव केला.
अखिल भारतीय कविसंमेलनाचे अध्यक्ष (१९६८), ओरिसा राज्य साहित्य अकादेमीचे अध्यक्ष (१९७८-८१), ‘ओरिसा बोर्ड लि., कटक’चे कार्यकारी संचालक (१९५९-७५), कटक येथील ‘दिगंत म्यूझियम अँड रिसर्च सेंटर’चे संस्थापक-संचालक (१९७८) इ. मानाची पदे त्यांनी समर्थपणे भूषविली. कला-विज्ञान यांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला व्याख्याते म्हणून हार्व्हर्ड विद्यापीठाकडून निमंत्रण, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियात कामगार प्रश्नांसाठी झालेल्या परिषदांत सहभाग (१९५२), बांगला अकादेमी व बांगला कृषी विद्यापीठाकडून व्याख्यानांची निमंत्रणे (१९७२), डाक्का येथे व्याख्यानसत्रे, तसेच अमेरिका, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, थायलंड, श्रीलंका येथील कित्येक आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदांत सहभाग या निमित्तांनी त्यांना अनेकदा परदेश प्रवास करावा लागला.
रौतराय यांनी काव्य, कथा, कादंबरी, निबंध इ. प्रकारांत विपुल लेखन केले असून, आजवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांची संख्या सु. ३५ होईल (१९८६). त्यांतील उल्लेखनीय साहित्यकृती अशा : काव्य-पाथेय (१९३२), पूर्णिमा (१९३३), रक्तशिखा, पल्लिश्री (१९४१), बाजी राउत (१९४४), पांडुलिपि (१९४६), भानुमतीर देश (१९४८), अभिज्ञान (१९४९), हसंत (१९५०-विनोदी कविता), कविता (१९६२) इत्यादी कादंबरी-चित्रग्रीव (१९३७) कथा-मशाणिर फुल(१९४५) संशोधनपर-साहित्यर मूल्यबोध (१९८३). त्यांच्या निवडक लेखनाचे संकलन शची रौतराय ग्रंथावली (२ खंड) नावाने प्रसिद्ध झालेले आहे, तसेच त्यांच्या निवडक कथा-कवितांची इंग्रजी भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. कटक येथून निघणाऱ्या दिगंत पत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.
आपल्या शालेय जीवनातच पाथेयसारखा कवितासंग्रह प्रकाशित करून त्यांनी आपली साहित्यिक कारकीर्द सुरू केली आणि नंतर आधुनिक ओडिया साहित्याच्या प्रमुख मानकऱ्यांत त्यांनी स्वतःचे स्थान निश्चित केले. साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत त्यांनी बहुमोल सेवा केली असली, तरी प्रतिभासंपन्न कवी म्हणूनच त्यांचा ठसा विशेषत्वे उमटलेला दिसतो. आरंभापासूनच मुक्तशैलीत त्यांनी कविता लिहिल्या. पारंपरिक रचनातंत्राचे निर्बंध झुगारून देऊन मोजके, चपखल शब्द व प्रमाणबद्धता या वैशिष्ट्यांनी युक्त अशा स्वतःच्या खास शैलीत ते कविता लिहीत गेले आणि आधुनिक ओडिया काव्याचे भगीरथ म्हणून त्यांची कीर्ती झाली. पाथेय आणि पांडुलिपि या दोन कवितासंग्रहांमुळे ओडिया काव्यात आधुनिकतेचे एक नवे युग सुरू झाले. अतिवास्तववाद, प्रतिमावाद, अभिव्यक्तिवाद, वास्तवाभिमुख आदर्शवाद इ. आधुनिक वाङ्मयीन प्रणालींचे सहेतुक दर्शन त्यांनी आपल्या काव्यातून घडविले. त्यांच्या कवितेने रसिकांना केवळ रिझवलेच नाही, तर आपल्या या उत्कट अनुभूतीचा प्रत्यय रसिक मनापर्यंत नेऊन पोचविला.
ग्लानी आलेल्या समाजाविरुद्ध रौतरायांनी आवाज उठविला. फ्रॉइड आणि युंग यांसारख्या मानसशास्त्रज्ञांच्या मनोविश्लेषणात्मक विचारांची ओडिया भाषिकांना त्यांनी आपल्या कथांमधून व चित्रग्रीव या कादंबरीतून ओळख करून दिली. त्यांची साहित्यविचार, साहित्यर मूल्यबोध, आधुनिक साहित्यर केतको दिगा ही पुस्तके वाङ्मयीन अभ्यासाच्या व समीक्षेच्या दृष्टीने मोलाची ठरली आहेत. बाजी राउत ह्या वीररसातील दीर्घ काव्यामुळेही त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. पल्लिश्रीमध्ये त्यांनी ग्रामीण जीवनाचे अत्यंत जिवंत व वास्तव दर्शन घडविले आहे. नंतरच्या पिढीतील अनेक ओडिया कवींवर त्यांचा खूपच प्रभाव पडला आहे.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) कापडी, सुलभा (म.)
“