रोहरर, हाइन्रिख : (६ जून १९३३- ). स्विस भौतिकीविज्ञ. गेर्ट बिनिग या जर्मन भौतिकीविज्ञांच्या बरोबर क्रमवीक्षण सुरंगी सूक्ष्मदर्शकाचा अभिकल्प (आराखडा) तयार केल्याबद्दल रोहरर यांना विनिग यांच्या समवेत १९८६ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाच्या अर्ध्या भागाचा बहुमान मिळाला. या पारितोषिकाच्या राहिलेल्या अर्ध्या भागाचा सन्मान ⇨एर्न्स्ट रुस्का यांना इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या अभिकल्पाबद्दल मिळाला.

रोहरर यांचा जन्म स्वित्झर्लडमधील बुक्स येथे झाला. झुरिक येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत शिक्षण घेऊन १९६० मध्ये त्यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर अमेरिकेतील न्यू ब्रन्सविक येथील रटगर्स विद्यापीठात त्यांनी दोन वर्षे संशोधन केले. १९६३ पासून ते आयबीएम झुरिक रिसर्च लॅबोरेटरी येथे संशोधनकार्य करीत आहेत. विनिग हेही याच प्रयोगशाळेत काम करीत आहेत. रोहरर यांनी सँता बार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात एक वर्ष (१९७४-७५) काम केले.

अणूंचा व्यास सु. १ Å (Å अँगस्ट्रॉम = १०-१० मी.) असतो. एकोणिसाव्या शतकापासून शास्त्रज्ञ अणूंच्या प्रतिमा मिळविणाऱ्या प्रयुक्त्या तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. प्रकाशीय सूक्ष्मदर्शक सु. २,५०० Å पेक्षा कमी आकारमानाच्या वस्तूंचे विभेदन करू शकत नाहीत म्हणजे त्या भिन्न असल्याचे दाखवू शकत नाहीत. रुस्का यांनी १९३३ च्या सुमारास तयार केलेल्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे ही मर्यादा ५ किंवा १० Å पर्यंत खाली आली. रोहरर व बिनिग यांनी अभिकल्पित केलेल्या सूक्ष्मदर्शकाचे तत्त्व इतर सूक्ष्मदर्शकांपेक्षा पूर्णतः निराळे आहे. हा खऱ्या अर्थाने सूक्ष्मदर्शक नाही कारण तो वस्तूची प्रत्यक्ष प्रतिमा देत नाही. यात वस्तूच्या पृष्ठाच्या संरचनेचे आकलन होण्यासाठी यांत्रिक प्रयुक्तीचा उपयोग केला जातो. याकरिता एका सूक्ष्म सुईचे अग्र पृष्ठावरून फिरवून त्याच्या उदग्र (उभ्या) दिशेतील हालचालीची नोंद केली जाते व त्याद्वारे पृष्ठाचा तपशीलवार स्थलाकृतिक (सर्वसाधारण मांडणीचा) नकाशा मिळू शकतो. हे साध्य करण्यासाठी पृष्ठापासून अत्यल्प पण स्थिर अंतरावर सुईचे अग्र ठेवण्यात येते. यासाठी अमेरिकेच्या नॅशनल ब्यूरो ऑफ स्टँडर्ड्‌समधील भौतिकीविज्ञ रसेल यंग यांनी क्षेत्र उत्सर्जन या आविष्काराचा यशस्वीपणे उपयोग करणारे एक उपकरण तयार केले होते. जर सुई व पृष्ठ यांच्या दरम्यान पुरेसा उच्च विद्युत् दाब (काही मिलिव्होल्ट) लावला, तर त्यांमधील अंतरानुसार तीव्रता (किंवा महत्ता) असलेला विद्युत् प्रवाह (काही नॅनोअँपिअर) वाहतो. एखादी ⇨ सेवा-यंत्रणा या प्रवाहाने नियंत्रित केल्यास तिच्या साहाय्याने हे अंतर (सुई व पृष्ठ यांचा प्रत्यक्ष संपर्क न येता) स्थिर ठेवता येते. थंग यांच्या उपकरणात सुईचे अग्र व पृष्ठ यांतील अंतर सु. २०० Å होते आणि त्यामुळे त्याचे विभेदन इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकापेक्षा कमी होते. तथापि सुरंग परिणाम या पुंजयामिकीय परिणामाचा [⟶ पुंजयामिकी] उपयोग केल्यास अधिक चांगले विभेदन मिळेल, याची यंग यांना जाणीव झाली. या परिणामामुळे इलेक्ट्रॉन (व इतरही कण) एक विशिष्ट क्षेत्र ओलांडू शकतात (मात्र रूढ भौतिकीप्रमाणे तेथे पुरेशा ऊर्जेच्या अभावी ते पोहोचू शकत नाहीत) म्हणजे वर्चस् तटातून ते पुंजयामिकीय सुरंगक्रियेद्वारे आपला मार्ग काढतात, असे म्हणता येईल (यावरूनच सुरंगी सूक्ष्मदर्शक असे नाव दिलेले आहे). याचा अर्थ सुईचे अग्र पृष्ठापासून पुरेसे (१० Å म्हणजे १-२ अणुव्यासांइतके) जवळ असेल, तर पृष्ठावरील काही इलेक्ट्रॉन निसटून वरील ‘निषिद्ध’ अवकाशात जातात व कमी विद्युत्‌दाब असताना सुद्धा प्रवाह वाहू शकतो. यात क्षेत्र उत्सर्जनाप्रमाणेच यांत्रिक संपर्काशिवाय सुईचे नियंत्रण करणे शक्य आहे. तथापि यंग यांना या संकल्पनेतील असाधारण मोठ्या अडचणींमुळे ती प्रत्यक्षात आणणे शक्य झाले नाही.

रोहरर व बिनिग यांनी क्रमवीक्षण सुरंगी सूक्ष्मदर्शक तयार करण्यात प्रथम यश मिळविले. त्यांच्या यांत्रिक अभिकल्पातील असाधारण अचूकतेमुळे त्यांना हे यश प्राप्त झाले. या उपकरणात सुईची क्षितिजसमांतर प्रतलातील परस्परांना काटकोनात असलेल्या दोन दिशांतील हालचाल नियंत्रित करण्यासाठी ⇨ दाबविद्युत् घटकांचा उपयोग करण्यात येतो व त्यामुळे सुई पृष्ठाचे समांतर रेषांवरून क्रमवीक्षण (क्रमाक्रमाने अवलोकन) करते. सुईची उदग्र दिशेतील हालचाल दुसऱ्या दाबविद्युत् घटकाने नियंत्रित करून मोजली जाते. एका खास तंत्राचा उपयोग करून एकाच अणूचे बनलेले अग्र असलेल्या सुया तयार करणे शक्य झालेले आहे. यामुळे क्षितिजसमांतर विभेदन सु. २ Å व उदग्र विभेद्न सु. ०.१ Å मिळत असल्याने व्यक्तिगत अणूंचे चित्रण करणे शक्य होते आणि त्यामुळे परीक्षण करावयाच्या पृष्ठाची आणवीय संरचना अतिशय तपशीलवार अभ्यासता येते. या तंत्राचा उपयोग ⇨अर्धसंवाहक भौतिकीत व सूक्ष्म इलेक्ट्रॉनिकीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या ⇨पृष्ठविज्ञानाच्या अभ्यासात करण्यात येत आहे. रसायनशास्त्रात पृष्ठीय विक्रियांचा अभ्यास करण्यासाठी हे तंत्र उपयुक्त आहे. डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाच्या [⟶ न्यूक्लिइक अम्ले] रेणूच्या अभ्यासातही या तंत्राचा उपयोग करण्यात आलेला आहे.

पहा : सूक्ष्मदर्शक.

भदे, व. ग.