रोसेटी, क्रिस्तिना : (५ डिसेंबर १८३०-२९ डिसेंबर १८९४). इंग्रजी कवयित्री. जन्म लंडन येथे. प्रसिद्ध इंग्रजी कवी आणि चित्रकार डँटी गेब्रिएल रोसेटी ह्याची ती धाकटी बहीण. ती अँग्लिकन पंथाची आणि अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ‘प्री-रॅफे-एलाइट ब्रदरहुड’ मधील एका चित्रकाराशी तिचे लग्न ठरले होते. तथापि त्याने चर्च ऑफ इंग्लंडचा त्याग करून रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केल्यामुळे तिने ते मोडले. किशोरवयातच ती कवितालेखन करू लागली. गॉब्लिन मार्केट अँड अदर पोएम्स (१८६२) हा तिचा पहिला कवितासंग्रह होय. द प्रिन्सेस प्रोग्रेस अँड अदर पोएम्स (१८६६), सिंगसाँग : ए नर्सरी ऱ्हाइम बुक (१८७२), ए पेजंट अँड अदर पोएम्स (१८८१), व्हर्सिस (१८९३), न्यू पोएम्स (१८९६) हे संग्रह त्यानंतर प्रसिद्ध झाले. तिच्या आरंभीच्या कविता शारीर जाणिवा व्यक्त करणाऱ्या आहेत. तथापि पुढे ती धार्मिकतेकडे अधिक झुकलेली दिसते. शारीर जाणीव आणि धर्मश्रद्धा ह्यांतील संघर्षही तिच्या नंतरच्या कवितांतून दिसतो. भावाभिव्यक्तीची सूक्ष्मता आणि सामर्थ्य तिच्या कवितांतून प्रत्ययास येते.
लंडन येथेच ती निधन पावली.
संदर्भ : 1. Bell, Mackenzie, Christina Rossetti : A Biographical and Critical Study, 1898.
2. Packer, Lona Mosk, Christina Rossetti, Cambridge. 1963.
कळमकर, य. शं.