रोम : इटलीची राजधानी व जगातील प्राचीन शहरांपैकी एक प्रसिद्ध ऐतिहासिक शहर. लोकसंख्या २८,१५,४५७ (३१ डिसेंबर १९८६). रोमला प्रदीर्घ इतिहास व कलेचा समर्थ वारसा असल्याने त्याला ‘शाश्वत नगर’ असे सार्थ अभीधान प्राप्त झाले असून ते महान सांस्कृतिक, धार्मिक व बौद्धिक केंद्र म्हणूनच ओळखले जाते. रोम हे जगातील अनेक सर्वांगसुंदर शहरांपैकी एक म्हणून गणले जाते. त्याची  पूर्वीची स्मारकशिल्पे, भव्य ख्रिस्तमंदिरे व राजवाडे हे सर्व रोमच्या  गतवैभवाची, तर  शहरातील झगमगत्या नव्या इमारती ह्या शहराच्या आधुनिकतेच्या महत्तेचीही साक्ष देतात. रोमने प्राचीन पश्चिमी जगतावर प्रचंड रोमन साम्राज्याची राजधानी म्हणून अधिराज्य केले. अनेक (सहस्त्र) वर्षे रोम म्हणजे यूरोप, उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया यांवर अधिसत्ता गाजविणारे सामर्थ्यशाली केंद्र होते. प्राचीन रोमचा प्रभाव अद्यापिही त्यांच्या वास्तुकला, शासनव्यवस्था, भाषा, कायदा, न्यायव्यवस्था इत्यादींवर असल्याचे दिसून येते. पोप व धर्मोपदेशक यांचे राहण्याचे ठिकाण म्हणूनही  रोम हे रोमन कॅथलिक चर्चचे केंद्रस्थान बनले. सोळाव्या व सतराव्या शतकात  अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंनी रोमला एक आगळेवेगळेच वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी अनेक प्रख्यात चित्रकार, स्थापत्यविशारद यांच्याकरवी उत्तमोत्तम वास्तू व उत्कृष्ट शिल्पे तसेच कलाकृती रंगवून व तयार करवून घेतल्या. आजही जगातून हजारो पर्यटक प्रतिवर्षी  या अप्रतिम कलाकृती तसेच प्राचीन रोमचे भग्‍नावशेष पहावयास आवर्जून जातात.

रोम हे टायबर नदीच्या दोन्‍ही काठांवर टिरीनियन समुद्राच्या पूर्वेस २७ किमी. अंतरावर मध्य इटलीमध्ये वसले आहे. सु. २० टेकड्यांवर वसले असले, तरी त्यांच्या सीमाप्रदेशात विस्तीर्ण असे सपाट भूप्रदेश अंतर्भूत आहेत. या वीस टेकड्यांपैकी ज्या सात प्रसिद्ध टेकड्यांवर प्राचीन रोमची  उभारणी करण्यात आली होती, त्या टेकड्या पुढीलप्रमाणे होत : ॲव्हन्टाइन, सीलीअन, कॅपिटोलाइन,एस्क्विलाइन, पॅलटाइन, क्विरिनल आणि व्हिमिनल. सांप्रत रोममधील प्राचीन  व भग्‍न वास्तूंचे अवशेष ॲव्हन्टाइन, सीलीअन व पॅलटाइन या तीन टेकड्यांवर प्रामुख्याने आढळतात. पॅलटाइनवर एक आधुनिक सार्वजनिक उद्यान बांधण्यात आले आहे. एस्क्विलाइन आणि व्हिमिनल टेकड्यांवर व्यापारी कार्यालये पसरलेली आहेत. क्विरिनल या सातांमधील सर्वांत उंच टेकडीवर इटलीच्या राष्ट्राध्यक्षांचा राजप्रसाद तसेच काही शासकीय कार्यालये उभारण्यात आली आहेत. प्राचीन रोमचे रस्ते कॅपिटोलाइनपासून निघत असत, कारण कॅपिटोलाइन हे रोमन जीवनाचे मध्यवर्ती केंद्र समजले जाई. सांप्रत या टेकडीवर प्रसिद्ध कलासंग्रहालये, नगरपरिषद कार्यालय तसेच मायकेलअँजलो या सुविख्यात व श्रेष्ठ इटालियन कलावंताने बनविलेला चौक इ. वास्तू आहेत.

एका आख्यायिकेनुसार रोमची स्थापना  रोम्युलस व रेमुस या दोन बंधूंनी इ. स. पू. ७५३  मध्ये केल्याचे  सांगितले जाते. [⟶ रोमन संस्कृति ]. रोममधील अनेक सुंदर चौक गजबजलेल्या रस्त्यांनी जोडण्यात आलेले आहेत. रोमचे  हृदय समजला जाणारा ‘कोलोन स्क्वेअर’ म्हणजे बॅंका, हॉटेले, चैनीच्या वस्तूंची  दुकाने, विविध शासकीय आणि खाजगी कार्यालये व कचेऱ्या, चित्रपटगृहे रंगमंदिरे इत्यादींनी  गजबजलेला आहे. याचा कोलोन चौकामधून ‘व्हाया देल कॉर्सो’ (वे ऑफ द कोर्स) हा रोममधील प्रमुख मार्ग सु. १.६ किमी. लांबीचा असून तो दक्षिण व उत्तर अशा दोन्ही दिशांकडील आणखी दोन चौक जोडतो. मध्ययुगीन काळात अश्वशर्यतीचा मार्ग म्हणून हा रस्ता वापरला गेल्यामुळे त्याला हे नाव पडले. ‘व्हॅटिकन सिटी’ हे रोमन कॅथलिक चर्चचे प्रशासकीय व आध्यात्मिक केंद्र वायव्य रोममध्ये वसले आहे. ‘द व्हॅटिकन’ या नावाने बव्हंशी ओळखले जाणारे हे जगातील सर्वांंत लहान (क्षेत्रफळ सु. ४३.९९ हे.) परंतु स्वतंत्र राज्य आहे [ ⟶ व्हॅटिकन सिटी ].

अतिशय सधन घराण्यांच्या मालकीच्या भव्य, जुन्या रोमन उद्यानगृहांच्या मोकळ्या जागांवर अनेक वने व उद्याने नव्याने तयार करण्यात आली आहेत. १९०२ पासून जनतेला खुले करण्यात आलेले ‘व्हिला बोरगेसे’ हे सर्वांत रम्य उद्यान आहे. या उद्यानात एक प्राणीसंग्रहालय असून येथील  टेकड्या, कुरणे, जंगले ही  अगदी  निसर्गसदृश तयार करण्यात आलेली  आहेत. ‘व्हिला ॲडा’ ही प्राचीन इटालियन राजांची निवासवास्तू म्हणून ओळखली जाते. ‘व्हिला ग्‍लोरी’ हे उद्यान इटलीच्या मृत सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेले असून तेथे पाइन वृक्षांची संपन्नता आहे. ‘व्हिला शार्रा’ या उद्यानात प्रसिद्ध कारंजी  व दुर्मिळ वनस्पती आहेत. ‘जनिक्यलम’ टेकडीवरील उद्यानांचे मुलांना मोठेच आकर्षण असते.


मॅरिटाइम थिएटर : हेड्रियनांच्या राजवाड्यातील खंदकयुक्त ओसरीचे अवशेष.

संग्रहालये व कलावीथी : रोममधील अतिमौल्यवान कलासंग्रहालये व कलावीथी पाहण्यासाठी  हजारो पर्यटक या शहराला प्रतिवर्षी  भेट देत असतात. व्हॅटिकन राजप्रासादात अनेक सर्वोत्कृष्ट चित्रकृती व शिल्पे जतन करून ठेवण्यात आली आहेत. त्यांमध्ये लिओनार्दो दा व्हींची, मायकेलअँजेलो, रॅफेएल यांसारख्या चित्रकारदिग्गजांच्या सर्वोत्कृष्ट चित्रकृतींचा समावेश होतो. व्हॅटिकनचे ‘सिस्टाइन चॅपेल’चे छत व दर्शनी  भिंत ही मायकेलॲजेलोच्या अप्रतिम चित्रकृतींनी अत्यंत प्रेक्षणीय व विलोभनीय ठरली आहेत.

रोममधील कलासंग्रहाला खरा प्रारंभ १४७१ मध्ये ‘कॅपिटोलाइन संग्रहालया’पासून झाला. या संग्रहालयात जुन्या आणि प्राचीन रोमसंबंधीची अनेक अप्रतिम शिल्पे जतन करून ठेवलेली आहेत. ‘नॅशनल म्यूझीयम ऑफ द व्हिला जूल्या’ या राष्ट्रीय संग्रहालयात मध्य इटलीमधील रोमन-पूर्व काळापासूनच्या अप्रतिम कलाकृती संगृहीत करून ठेवण्यात आल्या आहेत. ‘नॅशनल रोमन म्यूझीयम’ या संग्रहालयात प्राचीन रोमन संस्कृतीच्या निदर्शक अशा अनेक वस्तू त्याचप्रमाणे ग्रीक व रोमन शिल्पे यांचा संग्रह जतन करण्यात आला आहे. ‘बोरगेसे व्हिला’ मध्ये प्रबोधनकालातील बहुतेक सर्व महान कलावंतांच्या कलाकृती जतन केलेल्या आहेत. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’  या संग्रहालयात अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमधील सर्वोत्कृष्ट चित्रकृतींचा संग्रह आढळतो.

जगप्रसिद्ध सेंट पीटर्स चर्च चर्च, राजप्रासाद, कारंजी : शहरात मूळ प्रेक्षणीय २५ चर्चवास्तू असून व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स हे जगातील सर्वांत मोठे चर्च म्हणून गणले जाते. प्रबोधन शैलीतील स्थापत्यशिल्पाचा एक अत्यंत उठावदार अथवा लक्षणीय नमुना म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मायकेलॲजेलोने सोळाव्या शतकात या चर्चचा अभिकल्प तयार करण्यात साहाय्य केले होते.

पंधराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधण्यात आलेला ‘व्हेनेत्स्या राजप्रासाद’ हा सर्वोत्कृष्ट म्हणून ख्यातनाम आहे. बेनीतो मुसोलिनीने १९२० व १९३० या दोन दशकांच्या कालावधीत आपले फॅसिस्ट कार्यालय या राजवाड्यात स्थापिले होते. सांप्रत येथे एक कलासंग्रहालय आहे. एके काळी मेदिची घराण्याचे स्वामित्व असलेल्या ‘मॅदामा राजप्रासादा’त १८७१ पासून इटलीची संसद भरते. पूर्वीचे रोमन सम्राट व पोप यांच्या मालकीच्या ‘क्विरिनल राजप्रासादा’चा उपयोग सांप्रत इटलीच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान म्हणून केला जातो.

अनेक प्रेक्षणीय ख्रिस्तमंदिरे, राजप्रासाद, कारंजी  रोममध्ये आढळून येतात. शहरात ३०० च्यावर कारंजी असून त्यांपैकी श्रेष्ठ कलात्मक गुणवत्ता व दर्जा असलेली अनेक भव्य कारंजी आहेत. १७६२ मध्ये बांधून पूर्ण झालेले ‘ट्रेव्ही कारंजे’ हे विदेशी  पर्यटकांचे मोठेच आकर्षण ठरले आहे. जे पर्यटक या कारंजामध्ये एखादे नाणे टाकतात, ते पुन्हा रोमला खचितच भेट देतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. पिॲझा नॅव्होना, लॅकस जुदुर्ने, पिॲझा एसेद्रा ही काही अन्य प्रसिद्ध कारंजी  होत. 


ट्रेव्ही कारंजे : पर्यंटकांचे प्रमुख आकर्षण. शहरातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी प्रमुख म्हणजे रोम विद्यापीठ होय. या विद्यापीठाची आठव्या बॉनिफेस पोपच्या हस्ते १३०३ मध्ये स्थापना झाली असून देशातील हे सर्वांत मोठे विद्यापीठ गणले जाते. या विद्यापीठात वास्तुकला, अर्थशास्त्र व वाणिज्य, शिक्षण, अभियांत्रिकी, विधी, साहित्य आणि तत्त्वज्ञान, गणित, भौतिकी, रसायन, वैद्यक, औषधनिर्माणशास्त्र, राज्यशास्त्र, सांख्यिकी या शास्त्रांच्या विद्याशाखा आहेत. विद्यापीठाचे स्वरूप सहशिक्षणात्मक असून त्यामध्ये सु. १,६६,९५० विद्यार्थिसंख्या व सु. ७,००० प्राध्यापकसंख्या होती (१९८५-८६). विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात सु. १०.६२ लक्ष ग्रंथ व पत्रिका आहेत.

रोमन कॅथलिक चर्चच्या विविध धर्मिक संस्थांद्वारा व्हॅटिकन सिटीमध्ये अनेक शाळा चालविल्या जातात. पंधराव्या शतकात स्थापन झालेले व्हॅटिकन ग्रंथालय हे जगातील अतिशय महत्त्वाच्या ग्रंथालयांपैकी एक गणले जाते. त्यामध्ये अतिशय जुनी व दुर्मिळ अशी लॅटिन भाषेतील हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. या ग्रंथालयात सु. ६०,००० हस्तलिखिते व सु. ९ लक्ष ग्रंथ आहेत. यांशिवाय रोममध्ये नऊ सार्वजनिक ग्रंथालये असून त्यांत सु. ३० लक्ष ग्रंथ आहेत. रोमन कॅथलिक संस्थांद्वारा आणखी पाच ग्रंथालयांची व्यवस्था पाहिली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेचे प्रधान कार्यालय रोम येथे १९५१ पासून कार्यशील असून तिच्या समृद्ध ग्रंथालयात दहा लाखांवर ग्रंथ व सु. ७,००० नियतकालिके आहेत.

रोम हे प्रथमपासूनच औद्योगिक केंद्रापेक्षा प्रशासकीय केंद्र म्हणूनच गणले गेले. येथे व्यापार, शासकीय सेवा आणि पर्यटनउद्योग यांमध्ये लोक प्रकर्षाने गुंतलेले आढळतात. अनेक रोमन रेस्टॉरंट व बांधकाम उद्योग यांमध्येही काम करतात. रोममधील एकूण कामकरी लोकसंख्येपैकी सु. २०% लोक निर्मितिउद्योगांत गुंतलेले आहेत. हे उद्योग शहराच्या वायव्य भागात मुख्यत्वेकरून एकवटले आहेत. शहरातील निर्मितिउद्योगांमधून कापड व वस्त्रे, प्रक्रियित खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन होत असते. अभियांत्रिकी , छपाई, रसायननिर्मिती, इलेक्ट्रॉनिक, प्लॅस्टिक यांसारख्या नव्या उद्योगांचा शहराच्या दक्षिण व पूर्व भागांत विकास होऊ लागला आहे. पर्यटनउद्योग हा अतिशय वर्धमानशील उद्योग असून त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात फार मोठा वाटा आहे. बांधकाम उद्योग हा लक्षणीय समजला जात असून छपाई व प्रकाशन उद्योगाला फार मोठी  ऐतिहासिक परंपरा आहे. चित्रपट-निर्मितिउद्योग हा रोमच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडणारा महत्त्वाचा घटक मानण्यात येतो. रोमपासून जवळच असलेल्या ‘सिनेसिटा’ (सिनेमा सिटी) या चित्रनगरीमध्ये या उद्योगाचे केंद्र असून महत्त्वाच्या जागतिक चित्रपटनिर्मितिकेंद्रांमध्ये रोमचा वरचा क्रमांक लागतो. इटलीच्या तसेच जगातील अनेक देशांच्या चित्रपटनिर्मितिगृहांनी रोममधील चित्रपटनिर्मितिगृहांचा तसेच विविध रस्त्यांचा चित्रपटांतील दृश्यांकरीता वापर केला आहे.

रोम हे इटलीचे मोठे वाहतूककेंद्र समजले जाते. देशातील महत्त्वाच्या मोठ्या शहरांशी लोहमार्ग व रस्ते यांनी, तर जगातील मोठ्या शहरांशी हवाई वाहतूक कंपन्यांनी हे शहर जोडलेले आहे. रोमला त्याच्या नैर्ऋत्येस २४ किमी.वरील लिओनार्दो दा व्हींची विमानतळ व आग्‍नेयीकडील ११ किमी.वरील चांपीनॉ विमानतळ अशा दोन विमानतळांद्वारा हवाई वाहतूकसेवा उपलब्ध होते. रोमचे दैनंदिन वाहतूक जीवन शहरातून धावणाऱ्या १० लक्षांहून अधिक मोटारी  व स्कूटर यांच्यामुळे अतिशय गुंतागुंतीचे बनले आहे. रोमचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक हे सबंध जगातील सर्वांत मोठ्या व सर्वांत सुंदर रेल्वेस्थानकांमध्ये मोडते. ‘द मेट्रोपोलिनाता’ ही रोमची  भुयारी रेल्वे २२ किमी. लांबीच्या मार्गावरून धावते. १९७३ पासून रोमच्या प्राचीन भागांमधून सर्व खाजगी वाहनांना वाहतूक-कोंडी, वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण यांचे निरसन करण्याच्या उद्देशाने वाहतुकीस मज्‍जाव करण्यात आला आहे.


रोमच्या गतकालीन वैभवाची साक्ष टायबर नदीच्या पूर्वेकडील भागात अवशिष्ट स्वरूपात उभ्या असलेल्या पुरातन वास्तूंवरून येऊ शकते. १८०० च्या पुढील काळात इटालियन शासनाने या भग्‍न वास्तूचा आसमंत स्वच्छ करून त्या ठिकाणी वृक्ष व उद्यानरोपे लावून सर्व परिसर शोभिवंत केला आहे. त्यायोगे प्रतिवर्षी हे प्राचीन भग्‍नावशेष पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने विदेशी पर्यटक गर्दी करतात.

फोरम : प्राचीन रोमन जीवनाचे अभिन्न अंग असलेले मोकळे चौक (ज्यांना फोरम असे संबोधण्यात येई) म्हणजे सार्वजनिक सभास्थानेच होत. ‘रोमन फोरम’ हा या चौकांपैकी सर्वांत महत्त्वाचा समजला जातो. हा म्हणजे रोमन शासनाचा केंद्रबिंदूच होय. येथील भग्‍नावशेषांमध्ये क्युरीआ (सीनेट हाउस-सिनेटगृह), सेप्टिमीअस सव्हिरसची  विजयकमान, टेंपल ऑफ सॅटर्न आणि बॅसिलिका ज्यूलिया हे विधानसभागृह इत्यादींचा समावेश होतो. अनेक रोमन राज्यकर्त्यांनी  आपल्या नावांचे फोरम वा चौक बांधले होते. त्यांपैकी ऑगस्टस, ज्यूलिअस सीझर, नर्व्ह, ट्रेजन व व्हेस्पेझ्यन या पाच रोमन सम्राटांचे फोरम भग्‍नावस्थेत अद्यापि अवशिष्ट स्वरूपात टिकून आहेत. त्यापैकी ट्रेजनचा फोरम हा सर्वोत्कृष्ट समजण्यात येतो. या फोरममधील बहुतेक वास्तू उदा., बॅसिलिका उल्पिया, टेंपल ऑफ ट्रेजन इ.- भग्‍नावस्थेत आहेत परंतु याच चौकातील ३० मी. उंचीचा ‘ट्रेजन्स कॉलम’ हा स्तंभ अभंग स्वरूपात उभा आहे. त्यावर ट्रेजनने खेळलेले युद्धप्रसंग व दृश्ये कोरलेली आढळतात. त्याच्याजवळच ‘मार्केट्‍स ऑफ ट्रेजन’ या नावाची अर्धवर्तुळाकार तिमजली दुकानांची भग्‍नावशिष्ट वास्तू आहे. यामधील एक दुकान गतकालाच्या स्मरणार्थ पुनश्च पूर्वकालीन स्वरूपात उभारण्यात आले आहे.

‘कॉलॉसिअम’ ही रोममधील एक अतिमहत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण वास्तू समजली जाते. हे एक अतिभव्य, अर्धभग्‍न रंगमंडल असून त्यामध्ये बसून पूर्वीच्या काळी रोमन प्रेक्षक ग्लॅडिएटरचे खेळ वा पशूंबरोबर खेळल्या जाणाऱ्या झुंजी, अथवा ख्रिस्ती लोकांना हिंस्त्र पशूंकरवी ठार केली जाण्याची दृश्ये पहात असत [⟶ कॉलॉसिअम].

केवळ गर्भश्रीमंत रोमनांची स्वतःची स्‍नानगृहे असत. तथापि शहरामध्ये सार्वजनिक स्‍नानगृहे मोठ्या प्रमाणात बांधलेली होती. विविध रोमन सम्राटांच्या कारकीर्दीत सार्वजनिक स्‍नानगृहांना विलासी संकेतस्थळांचे स्वरूप येत गेले. ही स्‍नानगृहे म्हणजे चौरसाकारी पोहण्याच्या तलावांसारखी दिसत असत आणि त्यांच्याभोवती उद्याने, स्तंभयुक्त आरसपानी द्वारमंडप, ग्रंथालये इ. वास्तू असत. या रोमच्या स्‍नानगृहांमध्ये गरम, थंड पाण्याने स्‍नान करण्याची तसेच वाफेच्या स्‍नानाची व मालिश करण्याची सुविधा असे.

या प्रसिद्ध स्‍नानगृहांपैकी अवशिष्ट अशी कॅराकॅला व डायोक्लीशन यांची स्‍नानगृहे होत. यांपैकी कॅराकॅलाची स्‍नानगृहे ही इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील असून ती अप्रतिम व भव्य आहेत. ती मौल्यवान संगमरवर, पुतळे, कुट्टिमचित्रणे इत्यादींनी अलंकृत करण्यात आली होती. उन्‍हाळ्याच्या दिवसांत सादर केल्या जाणाऱ्या संगीतिकांना पार्श्वभूमिदृश्ये म्हणून त्यांना मोठे महत्त्व दिले जाते. डायोक्लीशनची स्‍नानगृहे (इ. स. तिसरे शतक) ही सर्व रोमन स्‍नानगृहांमध्ये मोठी गणण्यात येतात. एका वेळी या स्‍नानगृहांत ३,००० च्या वर लोकांची सोय करण्यात येई [⟶ रोमन स्‍नानगृहे].

भूमीगत थडगी (कॅटकोम) : ख्रिस्ती दफनभूमी म्हणून ही वापरली जात. ही रोमच्या परिसरात तिसऱ्या शतकापासून अस्तित्वात होती. रोमनांकरवी होणारा छळ चुकविण्यासाठी लपण्याच्या जागा म्हणूनही या भूमिगत थडग्यांचा उपयोग करण्यात येत असे. ही भिंतींवरील व छतांवरील चित्रे, तसेच ख्रिस्ती प्रतीकचिन्हे इत्यादींनी सुशोभित केलेली असत. सर्वांत प्रसिद्ध भूमिगत थडग्यांमध्ये सान कॅलिस्टो, सेंट सीबॅस्‌चन, सेंट ॲग्‍नस इत्यादींचा समावेश केला जातो [⟶ भूमिगत थडगी].

इतर अवशेष : प्राचीन रोममधील अतिशय काळजीपूर्वक जतन करून ठेवण्यात आलेल्या अवशेषांमध्ये ‘पॅंथीऑन’- रोमनांनी आपल्या सर्व देवदेवतांच्या सन्मानार्थ (प्रतीकात्मक स्वरूपात) बांधलेली मंदिर-वास्तू-या वास्तूचा विशेषत्वाने उल्लेख करावयास हवा. त्याचप्रमाणे कॉन्स्टंटीनची तिहेरी कमान-वास्तू (सु. इ. स. ३१५) हीदेखील काळजीपूर्वक संरक्षिलेली आहे. या तिन्ही कमानींवर अप्रतिम शिल्पाकृती कोरलेल्या आढळतात. मधली कमान अधिक उंच, तर डाव्या आणि उजव्या बाजूंच्या कमानी कमी परंतु समान उंचीच्या आहेत. ‘डोमस ऑरिया’ (सुवर्णगृह) या भग्‍न वास्तूचे अवशेष एका उद्यानात आढळतात. ही वास्तू म्हणजे सम्राट नीरोचा राजप्रासादच होता. या भूमिगत वास्तूचे अवशेष विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेले आहेत. काही भिंतींवर मोठ्या चित्राकृती काढण्यात आलेल्या आहेत.  मार्कस ऑरीलीअस (इ. स. १२१-१८०) या रोमन सम्राटाच्या स्तंभावर रोमनांनी संपादिलेल्या विजय-दृश्यांची चित्रे कोरण्यात आलेली आहेत. या संगमरवरी पोकळ स्तंभातून आतल्या बाजूला बांधलेल्या पायऱ्यांवरून स्तंभाच्या वरच्या भागापर्यंत जाता येते. या ठिकाणी १५८९ पासून सेंट पॉलचा पुतळा ठेवण्यात आला आहे.सम्राट ऑगस्टस कबरीचे बांधकाम सु. इ. पू. २८ मध्ये सुरू झाले. त्या कबरीमध्ये ऑगस्टस व त्याचे कुटुंबीय यांची थडगी आहेत. याच्याजवळ ऑगस्टसने ‘शांतता वेदी’ (आल्टर ऑफ पीस) ही वास्तू उभारलेली आहे.

पहा : इटलीतील कला रोमन संस्कृति.

गद्रे, वि. रा.