आ. १. प्रातिनिधिक रोटिफेराचे शरीर : (अ) पार्श्व दृश्य (आ) पृष्ठ दृश्य : (१) प्रमस्तिष्क गुच्छिका, (२) उपमस्तिष्क ग्रंथी, (३) पश्चमस्तिष्क कोश, (४) मॅस्टाक्स, (५) अन्ननलिका, (६) जठर ग्रंथी, (७) मूत्रजनक-वाहक नलिका, (८) जठर, (९) पार्श्व शृंगिका, (१०) मूत्राशय, (११) पादाचा बोटासारखा प्रवर्घ (१२) गुद, (१३) शेपूट, (१४) पृष्ठशृंगिका, (१५) डोके, (१६) मान, (१७) शरीर, (१८) पाद.रोटिफेरा : सूक्ष्म व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) जलचर प्राण्यांचा समूह. याच्या वर्गीकरणाबद्दल एकमत नाही परंतु साधारणपणे मान्य झालेल्या लिवी हायमन यांच्या वर्गीकरणाप्रमाणे हा ॲस्केलमिंथिस संघाचा एक वर्ग मानला जातो. रोटिफेरा आकारमानाने सूक्ष्म असले, तरी याची शरीररचना जटिल (गुंतागुंतीची) आहे. ही जटिलता त्याच्या चलनवलनातही दिसून येते. या प्राण्यांना चक्रांगधारी जीव असेही म्हणतात कारण काही जातींत याच्या शिरोभागी एक पक्ष्माभिकामय (कोशिकेपासून-पेशीपासून-निघालेल्या केसासारख्या प्रवर्धांनी युक्त) चक्र असते व त्याचा उपयोग चलन वलनास होतो. यांची लांबी ०.०५ मिमी. ते २ मिमी. इतकी असते पण पुष्कळते प्राणी ०.१ ते ०.४ मिमी. इतकेच लांब असतात. 

शरीर उपचर्माने आच्छादिलेले असते व याखाली अधिचर्म असते. डोके, मान, उदर व पाद यांत शरीर विभागलेले असते. उपचर्माच्या घड्या पासून पादाचे विभाजन झालेले आढळते. पादाच्या टोकास बोटांसारखे दोन प्रक्षेप (वाढी) असतात. या पादात ग्रंथी असतात व त्यांचे मुख गुदद्वाराजवळ उघडते. डोक्याच्या बाजूला चपटी पक्ष्माभिकामय जागा असते. हिच्यावर व तोंडाभोवती पक्ष्माभिका असतात. या सर्वास मिळून चक्रांग म्हणतात. या चक्रांगाच्या रचनेत निरनिराळ्या जातींत थोडेफार फरक आढळतात. काही रोटिफेरांत तोंडाच्या बाजूला पक्ष्माभिकांचे पुंजके असतात. पोहताना या पक्ष्माभिकांचा उपयोग होतो, तसेच अन्नाचे कण धरण्यासही होतो. काही रोटिफेरांमध्ये तोंडाजवळच्या पक्ष्माभिका अधिक लांब असतात.

पादाची पूर्ण वाढ झालेली असते. त्या वेळी त्याच्या साहाय्याने रोटिफेराला दगडाला किंवा इतर पदार्थाला चिकटता येते. काही जातींत पादाचा ऱ्हासही झालेला आढळतो. काही कायमचे चिकटलेले आढळतात. पुष्कळ रोटिफेरांत उपचर्म पातळ व लवचिक असते. काही ठिकाणी ते कठीण बनते तेव्हा त्यास लोरिका म्हणतात.

मुखापासून पक्ष्माभिका असलेली अन्ननलिका मॅस्टाक्स या भागापर्यंत येते आणि तेथे अन्नाचे चर्वण होते. येथून उदर, आंत्र (आतडे) शेवटी गुदद्वारात ती पोहोचते. गुदद्वार पृष्ठभागावर उघडते.

आ. २. रोटिफेराच्या ट्रोफसाचे दोन प्रकारट्रोफस हे रोटिफेराचे वैशिष्ट्यपूर्ण इंद्रिय होय. हे इंद्रिय इतर कोणत्याही प्राण्यात आढळत नाही. कोणते अन्न घ्यायचे व ते कशा प्रकारे घ्यायचे यांवर ट्रोफसाची रचना अवलंबून असते. ट्रोफसाला अन्नभक्षण इंद्रिय म्हणता येईल. काही अन्नभक्षण इंद्रियांचे कार्य अन्नाचे चूर्ण करणे इतकेच असते. काही जातींत हे इंद्रिय तोंडाबाहेर फेकले जाऊन भक्ष्य पकडते, तर काहींत भक्ष्यांच्या अंगातील अन्नरस शोषून घेण्याचे कार्य हे इंद्रिय करते. याच्या रचनेत सात लहान तुकडे तीन भागांत जुळविलेले असतात. हे तुकडे एकमेकांवर घासून वर वर्णन केलेल्या सर्व क्रिया होतात.

रोटिफेरांच्या शरीरभित्तीत अनुदैर्ध्य (लांबीला समांतर) व वर्तुळाकार पट्ट्यांचेस्‍नायू, अंतस्त्यांमध्ये (अंतर्गत इंद्रियांमध्ये) स्‍नायूंचे जाळे आणि अंतस्त्ये व शरीरभित्ती यांच्या दरम्यान काही स्‍नायू असतात. काही रोटिफेरांतील काही अधिक बळकट स्‍नायू ठळकपणे रेखित असतात.

तंत्रिक तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) मुख्य भागात प्रमस्तिष्क तंत्रिका गुच्छिका आणि अन्नभक्षण इंद्रिय व पाद यांच्याशी संबंधित असलेल्या तंत्रिका गुच्छिका यांचा समावेश होतो [⟶ तंत्रिका तंत्र]. या गुच्छिकांपासून लहान तंत्रिका निरनिराळ्या इंद्रियांकडे जातात. स्पर्शेद्रियाचे कार्य करणाऱ्या दोन शृंगिका शरीराच्या बाजूस पश्च भागात व एक डोक्यावर पृष्ठभागात असते. चक्रांग व पाद यांच्यावरही स्पर्शेंद्रियाचे काम करणाऱ्या पक्ष्माभिका असतात.


जठरात जठर ग्रंथी स्त्रवतात. पादात चिकट स्राव देणाऱ्या ग्रंथी असतात. यामुळे रोटिफेरांना चिकटता येते. यांशिवाय डोक्यातही काही ग्रंथी असतात पण त्यांचे प्रयोजन ज्ञात नाही.

जनन तंत्रावर रोटिफेरांचे वर्गीकरण आधारित आहे. शरीरात किती अंडकोश आहेत यावर त्यांची विभागणी केली आहे. काही रोटिफेरांत एक अंडकोश असतो, तर काहींत दोन असतात. ज्यांच्यात एकच अंडकोश असतो त्यांच्यात स्त्री-जननतंत्र अन्ननलिकेच्या अधर भागी असते. अंडकोश लहान असून त्यापासून अंडनलिका अवस्करापर्यंत (मागील बाजूच्या कोष्ठात) पोहोचते. साधारण नेहमी आढळणाऱ्या रोटिफेरांमध्ये ⇨ अनिषेकजनन असते. मादी अंडी घालते. कधी कधी ही अंडी दगडावर, झाडांच्या पानांवर किंवा आणखी काही वस्तूंवर घातली जातात, कधी ती मादीच्या अंगावरच असतात व कधी तिच्या अंडनलिकेतही वाढतात.

विकट परिस्थितीत मादी एकगुणित गुणसूत्रे [⟶ गुणसूत्र ] असलेली अंडी घालते. या अंड्यांपासून नर पिले होतात. जर ही एक-गुणित अंडी फलित झाली, तर त्यांपासून मादी पिले तयार होतात. अशा फलित झालेल्या अंड्यांतून पिले बाहेर येण्यास जास्त कालावधी लागतो.

रोटिफेरात नर मादीपेक्षा निराळा असतो. ज्या जातीत नर आढळतो त्या जातीत त्याच्या रचनेत जनन तंत्राची पूर्ण वाढ झालेली असते. इतर तंत्रे खुरटी असतात. त्यामुळे त्याचे आकारमान लहान असते. रोटिफेरांच्या काही जातींत नर आढळतच नाही. त्यांच्यात अनिपेकजननानेच प्रजोत्पादन होते.

रोटिफेरा हे सर्व जगभर आढळणारे प्राणी आहेत. ते साधारणपणे गोड्या पाण्याची तळी व जलसंचयांत आढळतात. ते पाण्यातील वनस्पतींच्या सान्निध्यात राहतात. काही सहभोजी म्हणून खेकडे, शिंपा, शंख यांच्याबरोबर राहतात. अगदी गार पाण्यातही ते आढळले आहेत. तसेच काही गरम पाण्याच्या झऱ्यांतही ते सापडले आहेत.

संदर्भ : 1. Hyman, L. H. The Invertebrata, Vol. III. New York, 1951.

           2. Ward, H. B. Whipple, C. C. Freshwater Biology, New York, 1959.

इनामदार, ना. भा.