रोग : प्रस्तुत नोंदीत ‘रोग’ या संकल्पनेचे व आनुषंगिक बाबींचे सर्वसाधारण विवरण दिलेले आहे. मानवाला होणाऱ्या शारीरिक रोगासंबंधी येथे प्रामुख्याने माहिती दिलेली असून मानसिक विकारांच्या विवेचनाकरिता ‘मानस चिकित्सा’ ही नोंद पहावी. वनस्पतींचे रोग व पशुरोग यांसंबंधीच्या माहितीकरिता ‘वनस्पतिरोगविज्ञान’ व ‘पशुवैद्यक’ या नोंदी पहाव्यात. रोगांचे मूलभूत स्वरूप व विशेषतः त्यांच्यामुळे शरीरात होणारे रचनात्मक व कार्यात्मक बदल यांचा अभ्यास करणाऱ्या वैद्यकाच्या शाखेची माहिती ‘विकृतिविज्ञान’ (रोगविज्ञान) या नोंदीत दिलेली आहे. तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था), पचन तंत्र, जनन तंत्र इ. शरीरातील विविध तंत्रांविषयीचे रोग तसेच कान, नाक, फुप्फुस, यकृत, वृक्क (मूत्रपिंड) यांसारख्या अवयवांचे रोग यासंबंधी त्या त्या तंत्राच्या व अवयवाच्या नोंदीत माहिती दिलेली आहे. याखेरीज ‘दंतवैद्यक’ व ‘नेत्रवैद्यक’ या नोंदींत दात व डोळा यांचे रोग दिलेले आहेत. हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग, कुष्ठरोग, धनुर्वात, प्लेग वगैरे महत्त्वाच्या रोगांवर स्वतंत्र नोंदी आहेत. बालरोगविज्ञान, स्त्रीरोगविज्ञान, गर्भारपणा, गुप्तरोग, त्रुटिजन्य रोग, संसर्गजन्य रोग, साथ व साथीचे रोग इ. नोंदींत संबंधित महत्त्वाच्या रोगांचे विवेचन केलेले आहे. विविध व्यवसायांतील विशिष्ट परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या रोगांची माहिती ‘व्यवसायजन्य रोग’ या नोंदीत दिलेली आहे.
व्याख्या : रोग म्हणजे काय याची सर्वसाधारण प्रत्येकाला कल्पना असली व त्याचा प्रत्येकाला अनुभव असला, तरी त्याची नेमकी व्याख्या करणे कठीण आहे. रोग म्हणजे (१) शरीराची किंवा मनाची रोगट अवस्था, (२) प्राकृतिक (सर्वसाधारण) शरीरक्रियेपासून दूर गेलेली जिवंत शरीराची अवस्था, (३) भोवतालच्या परिस्थितीशी योग्य प्रकारे जुळवून घेऊन (अनुकूलन) योग्य प्रतिक्रिया व्यक्त करण्याची शरीराची अक्षमता, (४) आरोग्यपूर्ण अवस्थेपासून दूर गेलेली शरीराची अवस्था, (५) काही गोष्टींच्या अनिष्ट प्रभावामुळे शरीरांतर्गतक्रियांचे बिघडलेले संतुलन इ. विविध प्रकारे रोगाची व्याख्या केली जाते.
रोग म्हणजे काय हे समजावून घेण्यापूर्वी या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञांचे अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे.
निरोगी अवस्था : ही मोजता येणाऱ्या काही निकषांच्या साहाय्याने ठरविता येते उदा., शरीराचे प्राकृतिक तापमान, दर मिनिटाला पडणारे नाडीचे ठोके व होणारी श्वासोच्छ्वासाची आवर्तने, रक्तदाब, वजन, उंची इत्यादी. हे निकष आणि त्यांची परिमाणे अनेक व्यक्तींच्या निरीक्षणांवरून ठरविलेली सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) परिमाणे आहेत. या निकषांची परिमाणे वय, लिंग, जात, वंश इतकेच नव्हे तर भौगोलिक प्रदेश, जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान), व्यक्तीचा व्यवसाय इत्यादींप्रमाणे बदलत असल्याने हे आरोग्याचे निरपेक्ष निकष नाहीत.
शारीरिक क्षमता किंवा तंदुरुस्ती : स्नायूंची इष्टतम ताकद, अंतर्गत अवयवांचे सुसूत्र कार्य, तरतरीतपणा व उत्साह म्हणजे शारीरिक क्षमता किंवा तंदुरुस्ती होय. यामुळे रोग नाही म्हणून निरोगी असणे व शारीरिक दृष्ट्या कार्यक्षम असणे यांत फरक आहे, असे काहींचे मत आहे.
स्वास्थ्य किंवा आरोग्य : व्यक्तींचे शारीरिक, मानसिक व भावनिक असे संपूर्ण संतुलन म्हणजे स्वास्थ्य किंवा आरोग्य होय. यात फक्त रोगाचा अभाव अभिप्रेत नसून शारीरिक क्षमता, मानसिक व भावनिक स्थिरता, बाह्य परिस्थितीबरोबर सुसंगतपणे जुळवून घेऊन योग्य प्रतिक्रिया व्यक्त करण्याची क्षमता, जीवनातील नेहमीच्या व काही वेळा कसोटीच्या प्रसंगांना योग्य प्रकारे तोंड देण्याची क्षमता इ. अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. यामुळे आरोग्य ही सर्वसमावेशक संकल्पना म्हणता येईल, तर रोग म्हणजे आरोग्यापासून दूर गेलेली शरीराची अवस्था अशी रोगाचीही सर्वसमावेशक व्याख्या करता येईल.
आजारीपणा : ही काही लक्षणांमुळे जाणवणारी रोगाची भावना आहे. अनेक वेळा रोग सुप्तावस्थेत असताना त्याची कोणतीच लक्षणे व चिन्हे न जाणवल्याने व्यक्तीला आजारीपणाची भावना होत नाही. यामुळे रुग्ण व्यक्ती आजारी असेलच असे नाही, उदा., मधुमेह, वाढलेला रक्तदाब, कर्करोगाची सुरुवातीची अवस्था यांमध्ये रोग बऱ्याच वेळा सुप्त असून रुग्ण आजारी नसतो. अप्रभावी जनुकांमुळे होणाऱ्या काही आनुवंशिक रोगांत [⟶ आनुवंशिकी] तर रोग जन्मभर सुप्तावस्थेत राहतो व पुढच्या पिढीतच त्याची लक्षणे दिसण्याची शक्यता आहे.
समस्थिती : आरोग्याच्या संकल्पनेमध्ये बाह्य परिस्थितीच्या प्रभावाबरोबरच शरीरांतर्गत परिस्थितीचाही विचार आवश्यक आहे, कारण आरोग्याच्या संकल्पनेतील संतुलन म्हणजे याच बाह्य व अंतर्गत परिस्थितींमधील संतुलन होय. शरीरांतर्गत परिस्थिती काटेकोरपणे आणि कडकपणे मर्यादित राखणे म्हणजेच समस्थिती होय. यामध्ये शरीरातील द्रव व विद्युत् विच्छेद्य (विशिष्ट पदार्थात विरघळविल्यावर विद्युत् प्रवाहाचे संवहन करू शकणारी रासायनिक संयुगे) यांच्या प्रमाणातील संतुलन, शरीरातील अम्ल व क्षारक (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ) यांचे संतुलन, शरीराचे तापमान कडक मर्यादेत राखणे आणि ⇨हॉर्मोने आणि ⇨एंझाइमे यांच्या मदतीने चयापचयाचे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचे) संतुलन राखणे या गोष्टींचा समावेश होतो. या संदर्भात अनुकूलन म्हणजे आरोग्यपूर्ण अवस्था टिकवून धरतानाच, प्रतिकूल परिस्थितीनुसार बदललेली संतुलनाची अवस्था धारण करण्याची कोशिकांची (पेशींची) क्षमता होय. जेव्हा प्रतिकूल व पराकोटीचे अपायकारक बाह्य प्रभाव कोशिकेच्या या क्षमतेचा नाश करतात तेव्हा रोग होतो.
रोग प्रथमतः एखादा अवयव, ऊतक (समान रचना व कार्य असलेला कोशिकांचा समूह) किंवा तंत्र यांत सुरू होऊन मग इतर अवयवांत, ऊतकांत, तंत्रांत व शरीरभर पसरू शकतो किंवा एकदमच सर्व शरीरभर उद्भवू शकतो.
रोग उत्पन्न होण्यास एकाच वेळी अनेक प्रकारच्या गोष्टी कारणीभूत होतात व हातभार लावतात. यामुळे रोगाचा प्रतिकार, उपचार व प्रतिबंध करण्यास अनेक पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतात.
कोणत्याही रोगाचे परिणाम हे शेवटी फक्त कोशिकेच्या नाशापुरते किंवा शरीरक्रियांच्या असंतुलनापुरते मर्यादित न राहता व्यक्ती, कुटुंब व संपूर्ण समाजाचेच आरोग्य धोक्यात आणू शकतात. एखाद्या व्यक्तीमध्येही हे परिणाम इतके खोल, दूरवर पसरलेले, दीर्घकालीन विविध रूपी असतात की, त्यांचा रोगाशी प्रत्यक्ष संबंध जोडणेही अवघड जाते. याखेरीज निरनिराळ्या व्यक्तींवर एकाच रोगाचे निरनिराळे परिणाम होऊ शकतात म्हणून रोग ही व्यक्तिनिरपेक्ष अशी वेगळी काढून दाखविता येण्यासारखी स्वयंभू गोष्ट नाही. यामुळेच उपचार करताना रोगावर उपचार करण्याऐवजी रुग्णावर उपचार करावे लागतात.
शरीराचा प्रतिकार : प्रतिकूल व अपायकारक बाह्य गोष्टींपासून शरीराचे व विशेषतः नाजूक व महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने शरीराची रचना केलेली असते उदा., डोळ्याचा समोरचा थोडा भाग वगळता बाकीचा सर्व भाग हाडांच्या खोबणीत बसविलेला असून समोरील भागावर उघडझाप करणाऱ्या पापण्या आणि पापण्यांचे केस असतात. अश्रूंच्या साहाय्याने डोळा वारंवार धुतला जातो वगैरे. ⇨प्रतिक्षेपी क्रिया शरीराला क्षणार्धात अपायकारक गोष्टींपासून दूर करतात परंतु याशिवाय रोगांना (विशेषतः सूक्ष्मजंतू, व्हायरस, कवक-बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती-इत्यादींपासून उद्भवणाऱ्या रोगांना) प्रतिकार करण्यासाठी शरीरात काही योजना केलेल्या आहेत.
त्वचा व श्लेष्मकला यांचा सुसंधपणा : काही अपवाद वगळता रोग उत्पन्न करणारे सूक्ष्मजीव त्वचेतून व श्लेष्मकलेतून (आतडी, गर्भाशय, श्वासनाल इत्यादींसारख्या शरीरातील विविध नलिकाकार पोकळ्यांच्या अंतःपृष्ठावरील पातळ बुळबुळीत ऊतक स्तरातून शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे शरीरात रोगकारकाचा शिरकाव होण्यास हा प्राथमिक संरक्षक अडथळा आहे.
शरीरातील भक्षिकोशिका : या कोशिका शरीरात शिरलेल्या सूक्ष्मजीवांचे विशिष्ट पद्धतीने भक्षण करून त्यांना नष्ट करतात. यात दोन तऱ्हेच्या कोशिका मोडतात : (१) रक्तातील श्वेत कोशिकांचे कण कोशिका व एककेंद्रक कोशिका [⟶ रक्त] हे दोन प्रकार. या कोशिका रक्तातून शरीरभर फिरत असताना जरूरीच्या ठिकाणी केशवाहिन्यांतून (अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांतून) बाहेर पडतात आणि तेथे भक्षणाचे कार्य करतात. यामुळे जरूर तेथे त्या इतर ठिकाणांपेक्षा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, तसेच जरूरीच्या वेळी त्यांची रक्तातील संख्या खूप प्रमाणात वाढते. (२) ऊतकांतील भक्षिकोशिका : या कोशिका त्या त्या ऊतकात स्थिर असून शरीरभर पसरलेल्या ⇨जालिका-अंतःस्तरीय तंत्राच्या भाग असतात. निरनिराळ्या ठिकाणांप्रमाणे व प्रकारांप्रमाणे या कोशिकांना महाभक्षिकोशिका, कुफर कोशिका (के. डब्ल्यू. फोन कुफर या जर्मन शरीरविज्ञांच्या नावावरून) इ. नावे आहेत.
शरीराची शोथ (दाहयुक्त सूज) प्रतिक्रिया : जेव्हा कोशिकांचे कोणत्याही कारणाने नुकसान होते किंवा त्या नष्ट होतात, तेव्हा त्या ठिकाणी रक्ताभिसरण व नवीन कोशिकांच्या संदर्भात आरोग्य संरक्षक घटनांची एक मालिकाच घडून येते. त्यामुळे बाह्य अपायकारक गोष्टींचा नाश करणे किंवा त्यांना एकूण शरीरापासून अलग ठेवणे शक्य होते आणि दुरुस्ती व कोशिकांच्या पुनर्जननाचा मार्ग मोकळा केला जातो. [⟶ शोथ].
रोगप्रतिकारक्षमता : ⇨प्रतिपिंड, पूरक-पदार्थ व रक्तातील लसीका कोशिका [⟶ लसीका तंत्र] यांच्या बाह्य गोष्टींविरुद्धच्या [म्हणजे प्रतिजनांविरुद्धच्या ⟶ प्रतिजन] प्रक्रियेतून व्यक्त होणारी ही शरीराची प्रतिक्रिया असते. या प्रतिक्रियेची दोन ठळक वैशिष्ट्ये म्हणजे बाह्य गोष्टी ओळखणे व त्यांची कायम स्मृती ठेवणे आणि त्या त्या बाह्य गोष्टींसाठी ती तीच विशिष्ट प्रतिक्रिया व्यक्त करणे ही होत. [⟶ रोगप्रतिकारक्षमता].
दुरुस्ती व पुनर्जनन : वरील संरक्षक योजनांच्या साहाय्याने अपायकारक बाह्य गोष्टींचा यशस्वी प्रतिकार करताना व केल्यानंतर त्या ठिकाणी नुकसान झालेल्या किंवा नष्ट झालेल्या कोशिकांची विल्हेवाट लावून तेथे नवीन कोशिकांची निर्मिती सुरू होते. त्यामुळे आरोग्य पुन्हा प्रस्थापित होऊन भावी आरोग्यरक्षणाची सिद्धता होते.
रक्तस्त्राव-प्रतिबंध : कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कारणामुळे रक्तस्त्राव होऊ लागल्यास तो थांबविण्यासाठी शरीरात दोन प्रकारच्या क्रिया सुरू होतात : (१) रक्तस्त्रावाच्या ठिकाणच्या स्नायूंचे आणि रक्तवाहिन्यांचे आकुंचन : यामुळे रक्तवाहिन्यांची उघडी टोके काही काळापर्यंत बंद होऊन रक्तस्त्राव तात्पुरता आटोक्यात येतो. तोपर्यंत रक्तस्त्राव पूर्णपणे बंद होण्यासाठी दुसरी क्रिया सुरू होण्यास अवधी मिळतो, (२) रक्तक्लथनाची (रक्त गोठण्याची) क्रिया : या क्रियेमुळे क्लथित रक्ताने रक्तवाहिन्यांची उघडी टोके बंद होतात व रक्तस्त्राव बंद होतो. [⟶ रक्तस्त्राव रक्तक्लथन].
वरील सर्व प्रकारच्या संरक्षक क्रिया बहुतेक वेळा एकदमच सुरू होतात आणि त्यांचे एकमेकींशी असणारे संबंध गुंतागुंतीचे व परस्परपूरक असतात. त्यामुळे रोगाचा शरीरात शिरकाव होण्यास व त्याचा शरीरात प्रसार होण्यास यशस्वी प्रतिबंध केला जातो.
कारणे : (संप्राप्ती). रोग असंख्य व अनेक प्रकारचे असल्याने त्यांची कारणे असंख्य व अनेक प्रकारची आहेत. त्यांत बाह्य गोष्टींबरोबरच शरीरांतर्गत रचनेतील व कार्यातील दोषांचाही समावेश होतो.
विशिष्ट कारणे : ही त्या त्या विशिष्ट रोगाप्रमाणे बदलतात. (कारणांप्रमाणे रोगांचे करण्यात येणारे वर्गीकरण पुढे दिलेले आहे).
सर्वसाधारण कारणे : रोगाच्या प्रत्यक्ष व विशिष्ट कारणांशिवाय इतर अनेक गोष्टी रोग उद्भवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करतात वा रोग होण्याला हातभार लावतात. उदा., त्या त्या ठिकाणचे जलवायुमान, पर्यावरण, परिसर, त्या त्या वेळेचे हवामानातील बदल इत्यादी. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला एखादा रोग होण्याची शक्यता ही त्या व्यक्तीचा आर्थिक-सामाजिक स्तर, वय, लिंग, जात, वंश, धर्म इत्यादींनुसार कमी-जास्त असते. व्यक्तीच्या व्यवसायाप्रमाणेही काही रोग होण्याचा धोका वाढतो. व्यक्तीची मूळ प्रकृती, तिचा आहार, वैयक्तिक आणि सभोवतालची सार्वजनिक स्वच्छता या गोष्टींनाही रोग होण्याच्या कमी-जास्त शक्यतेच्या दृष्टीने असेच महत्त्व आहे.
वर्गीकरण : रोग असंख्य व अनेक प्रकारचे असल्याने त्यांसंबंधी सर्वसाधारण कल्पना येण्यासाठी व त्यांच्या अभ्यासासाठी त्यांचे वर्गीकरण करणे भाग पडते. सोयीच्या दृष्टीने व निरनिराळ्या निकषांच्या आधारे अनेक प्रकारची वर्गीकरणे करण्यात आलेली आहेत.
(१) शरीरचनेप्रमाणे : ऊतकांप्रमाणे – उदा., हृदयाचे रोग, फुप्फुसाचे रोग, यकृताचे रोग, लहान आतड्याचे रोग, वृक्काचे रोग वगैरे- किंवा शरीराच्या मुख्य भागांप्रमाणे- उदा., डोक्याचे रोग, छातीचे रोग, पोटाचे रोग इ. सर्वसाधारणपणे याच वर्गीकरणानुसार वैद्यांचे विशेषज्ञ होण्याचे विषय ठरतात.
(२) नैसर्गिक शरीरक्रियांप्रमाणे म्हणजेच शरीरातील विविध तंत्रांप्रमाणे : उदा., तंत्रिका तंत्राचे रोग, रक्ताभिसरण तंत्राचे रोग, श्वसन तंत्राचे रोग, पचन तंत्राचे रोग, उत्सर्जन व जनन तंत्रांचे रोग वगैरे.
(३) रोगामुळे कोशिकांच्या पातळीवर होणाऱ्या अप्राकृतिक बदलांप्रमाणे (विकृतिवैज्ञानिक) : यात रोग प्रक्रियेनुसार नवीन कोशिकांच्या वृद्धीमुळे निर्माण होणारे रोग, शोथ निर्माण होणारे रोग, चिरकारी (दीर्घकालीन), संथ नाश करणारे रोग इ. प्रकार पाडले जातात.
(४) रोगाच्या शरीरातील प्रगतीप्रमाणे : उदा., तीव्र (त्वरित वाढणारे), चिरकारी, त्वरित वाढून एकदम उग्र रूप धारण करणारे, लक्षणांत सतत चढ-उतार होणारे इ. रोग.
यांशिवाय साथीच्या रोगांसाठी उपयुक्त, सांख्यिकीय दृष्टीने उपयुक्त, न्यायदानाच्या दृष्टीने उपयुक्त अशीही रोगांची वर्गीकरणे करता येतात.
वरील सर्व वर्गीकरणे ही वर्गीकरणाचा विशिष्ट हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने उपयुक्त व्हावीत अशा स्वरूपाची आहेत. ती बहुधा अपूर्ण किंवा मर्यादित असून सर्वसमावेशक नाहीत. त्यामुळे एका निकषाच्या आधारे स्थूल वर्गीकरण केल्यावर पोटवर्गीकरणांसाठी इतर निकष वापरले जातात.
वरील वर्गीकरणांखेरीज रोगाच्या कारणांप्रमाणे करण्यात येणारे वर्गीकरण महत्त्वाचे आहे. कारणांप्रमाणे रोगांचे मुख्यतः दोन अथवा तीन भाग पडतात : (अ) बाह्य कारणांमुळे होणारे : विषारी व धोकादायक रासायनिक द्रव्ये व इजा करणाऱ्या भौतिक गोष्टी यांच्यामुळे उद्भवणारे रोग, सूक्ष्मजीवांमुळे होणारे साथीचे रोग व इतर जिवंत प्राण्यांच्या वा वनस्पतींच्या प्रादुर्भावामुळे होणारे रोग (आ) शरीरांतर्गत मूळ कारण असणारे रोग (इ) रोगावरील उपचारांमुळे उद्भवणारे रोग : यांत चुकीच्या उपचारांमुळे होणारे व योग्य उपचारांच्या अटळ आनुषंगिक दुष्परिणामांमुळे होणारे रोग येतात.
कारणांप्रमाणे रोगांचे थोडे अधिक तपशीलवार वर्गीकरण खाली दिले आहे : (१) जीवोद्भव रोग : हे रोग सूक्ष्मजीव (उदा., सूक्ष्मजंतू, व्हायरस, एक कोशिकीय प्राणी-आदिजीव किंवा प्रोटोझोआ, एककोशिकीय वा अनेककोशिकीय कवके) किंवा स्थूल जीव (उदा., जंतांचे अनेक प्रकार, उवा, खरजेचे किडे इत्यादी) यांचा शरीरात प्रादुर्भाव झाल्याने होतात.
(२) चयापचय क्रियेतील किंवा ⇨अंतःस्त्रावी ग्रंथींच्या कार्यातील असंतुलनामुळे उद्भवणारे रोग.
(३) जन्मजात दोष किंवा विकृती : यांत आनुवंशिक व गुणसूत्रातील (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांतील) दोषांमुळे होणाऱ्या काही विकृती आणि गर्भारपणाच्या काळात गर्भावर होणाऱ्या अपायकारक बाह्य प्रभावांमुळे होणाऱ्या काही विकृती मोडतात.
(४) गुणसूत्रांमधील दोषांमुळे होणाऱ्या विकृती : यांत काही आनुवंशिक व काही तात्कालिक गुणसूत्र दोषांमुळे होणारे रोग मोडतात.
(५) बाह्य रासायनिक व भौतिक कारकांमुळे होणाऱ्या इजा किंवा रोग : यांत रसायनांमुळे होणाऱ्या विषबाधा, इजा आणि ॲलर्जीजन्य प्रतिक्रिया यांचा व उष्णता, थंडी, वीज, दाब, वेग यांसारख्या भौतिक गोष्टींमुळे होणाऱ्या इजा यांचा समावेश होतो.
(६) आहारातील दोषांमुळे होणारे रोग : यांत कमी व असंतुलित आहार, अती आहार, काही आवश्यक द्रव्यांची त्रुटी आणि काही द्रव्यांच्या जादा प्रभावामुळे होणारे विषबाधा सदृश्य विकार यांचा समावेश होतो.
(७) रोगप्रतिकारक्षमतेतील दोष : यांत बाह्य कारकांना शरीराने दर्शविलेली जादा प्रतिक्रिया आणि स्वतःतील द्रव्यांना वा कोशिकांना दर्शविलेली अपसामान्य प्रतिक्रिया यांचा अंतर्भाव होतो.
(८) नववृद्धी किंवा अर्बुद : यांत मुख्यत्वे सौम्य अर्बुदे व मारक अर्बुदे यांचा समावेश होतो. [⟶ अर्बुदविज्ञान].
(९) मानसिक रोग व विकृती.
नवीन परिस्थितीच्या व काळाच्या गरजेप्रमाणे या वर्गीकरणात (१०) वृद्धापकाळाचे रोग, (११) व्यवसायजन्य रोग व (१२) क्रीडाजन्य रोग यांचाही वेगळा समावेश केला जातो.
शरीरातील बदल : कोणत्याही रोगाची सुरुवात झाल्यावर त्या त्या रोगाप्रमाणे शरीराच्या रचनेत आणि/किंवा कार्यात फरक होतात. रोग मुख्यतः ज्या अवयवापुरता किंवा तंत्रापुरता मर्यादित असेल त्या अवयवाशी संबंधित अशी लक्षणे व चिन्हे सुरुवातीला उद्भवतात. त्याचप्रमाणे सर्व शरीरभर दृष्टोत्पत्तीस येणारी लक्षणेही दिसू लागतात. नंतर रोगाच्या शरीरातील प्रसाराप्रमाणे वेगळी लक्षणे दिसतात.
शरीरातील रोगजन्य बदल मुख्यतः कोशिकीय पातळीवर होतात. कोशिकांची हानी होते किंवा त्या मरतात वा नष्ट होतात. कोशिकांचे कार्य बिघडते. त्यांच्या नाशामुळे उत्पन्न होणाऱ्या अनावश्यक व विषारी द्रव्यांचे रक्तातील प्रमाण वाढते. त्यामुळे या द्रव्यांचा नाश करणाऱ्या व ती शरीराबाहेर टाकणाऱ्या अवयवांवर [उदा., यकृत, वृक्क, फुप्फुसे] ताण पडतो. या द्रव्यांच्या रक्तातील वाढलेल्या प्रमाणाचे शरीरभर परिणाम दिसून येतात. तसेच रोगाचे कारण व शरीराचा प्रतिकार यांमुळे रोगाच्या मूळ ठिकाणी व सर्व शरीरभर त्या त्या रोगाप्रमाणे लक्षणे दिसतात.
लक्षणे : विशिष्ट लक्षणे : ही त्या त्या रोगाप्रमाणे विशिष्ट असतात आणि त्यांवरून रोगनिदान होऊ शकते. उदा., गोवरात दिसणारा विशिष्ट पुरळ.
सर्वसाधारण लक्षणे : ही कमीअधिक प्रमाणात अनेक रोगांत आढळतात उदा., थकवा, अशक्तपणा, चक्कर, ताप येणे, नाडीतील बदल, रक्तदाबातील बदल, त्वचा व श्लेष्मकला यांच्या रंगातील बदल, मळमळ, उलटी, डोकेदुखी इत्यादी. शरीराच्या नैसर्गिक कार्यांतील किंवा सवयींतील बदल उदा., भूक मंदावणे किंवा क्वचित खा-खा सुटणे, झोपेच्या सवयीतील बदल, मलमूत्र विसर्जनाच्या सवयीतील बदल वगैरे. त्याचप्रमाणे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची लक्षणे, शरीराच्या जागृतावस्थेतील बदल वगैरे.
उपद्रव : रोगामुळे शरीरांतर्गत रचनेत किंवा क्रियांमध्ये बदल घडून येतात आणि या बदलांमुळे काही विशिष्ट लक्षणे व चिन्हे दिसू लागतात. अशा विशिष्ट कारणांमुळे उद्भवणाऱ्या, विशिष्ट लक्षणे व चिन्हांच्या समूहाला विशिष्ट रोग असे म्हणता येईल परंतु शरीरांतर्गत बदलांच्या प्रक्रियेतील ही एक अवस्था आहे. रोगाच्या कारणाचा प्रभावीपणा, शरीराचा प्रतिकार, उपचार व ते रोगाच्या कोणत्या अवस्थेत सुरू केले यांवर पुढील इष्ट किंवा अनिष्ट बदलांची दिशा ठरते.
या रोगजन्य बदलांमुळे जे अनिष्ट परिणाम घडतात त्यांना उपद्रव असे म्हणता येईल. ते अनेक प्रकारचे असतात : (१) रोगाची तीव्रता वाढत जाणे, (२) मूळ रोगग्रस्त अवयवाशिवाय इतर अवयवांपर्यंत रोगाचा प्रसार होणे, (३) शरीराचे संतुलन बिघडल्याने इतर अवयवांचे कार्य बिघडणे व त्यामुळे मूळ रोगाच्या लक्षणांपेक्षा वेगळीच इतर लक्षणे व चिन्हे दिसू लागणे, (४) मूळ रोग बरा होऊ लागला, तरी त्यामुळे झालेल्या नाशाचे परिणाम दिसणे, (५) मूळ रोगामुळे रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्याने इतर रोगांचा प्रादुर्भाव होणे आणि (६) रोगासाठी कराव्या लागणाऱ्या अत्यावश्यक उपचारांचे (न टाळता येणारे) अनिष्ट परिणाम वगैरे प्रकारांनी रोगापासून उपद्रव निर्माण होऊ शकतो.
उपचार करताना हे उपद्रव शक्यतो टाळण्याकडेही लक्ष पुरवावे लागते व ते झाल्यास त्या त्या वेळी त्यांचे निदान करून त्यांवरही उपचार करावे लागतात.
निरनिराळ्या रोगांपासून निरनिराळे उपद्रव उद्भवतात. महत्त्वाच्या रोगांच्या बाबतीत उद्भवणाऱ्या उपद्रवांचे विवेचन त्या त्या रोगावरील नोंदीत दिलेले आहे.
रोगनिदान : रोग अनेक असल्याने व प्रत्येकासाठी वेगवेगळे उपचार करावे लागत असल्याने योग्य उपचारांसाठी अचूक रोगनिदान आवश्यक ठरते. यामुळे रोगनिदान करताना त्यासाठी आवश्यक असा कोणताही मुद्दा दुर्लक्षित होऊ नये म्हणून तपासणीची खालील सुसूत्र पद्धत वापरतात.
रुग्णाचा इतिहास : यासाठी रूग्णाची संपूर्ण माहिती (वय, लिंग, जात, धर्म, पत्ता, व्यवसाय इ.) आणि त्याचा व त्याच्या कुटुंबियांचा आरोग्यविषयक पूर्वेतिहास मिळवून नंतर त्याच्या तक्रारींचे संपूर्ण विश्लेषण केले जाते.
वैद्यकीय तपासणी : हीत वैद्याकडून प्रथम सर्वसाधारण तपासणी, व नंतर सुसूत्रपणे प्रत्येक शरीर तंत्राची तपासणी केली जाते.
विशेष तपासण्या : वैद्याने केलेल्या तपासणीनंतर रुग्णाच्या सर्वसाधारण परिस्थितीबद्दल आणखी माहिती मिळावी व रोगनिदानास मदत व्हावी म्हणून आवश्यकतेनुसार निरनिराळ्या विशेष तपासण्या केल्या जातात. [⟶ रोगनिदान].
उपचार : रोगाच्या प्रकाराप्रमाणे मुख्यतः औषधोपचार आणि शस्त्रक्रिया या दोन रीतींनी उपचार करता येतात.
औषधोपचार : त्रास कमी करणारे : यांमध्ये रोग कोणताही असला, तरी त्यामुळे उद्भवणाऱ्या ताप येणे, कळ करणे, दुखणे, उलटी, जुलाब, चक्कर, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यांसारख्या त्रासांवर उपचार केले जातात. या उपायांमुळे रोग बरा होत नाही परंतु विशिष्ट औषधांनी रोग आटोक्यात येईपर्यंतच्या काळात रोगामुळे उद्भवणारे त्रास कमी करता येतात. उदा., आंत्रज्वर (टायफॉइड), ज्वर, हिवताप, इन्फ्ल्यूएंझा इ. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व तापांत ज्वरशामक औषधे वापरतात.
विशिष्ट : हे प्रत्यक्ष रोगावरील गुणकारी औषध असते. उदा., आंत्रज्वरासाठी क्लोरँफिनिकॉल, हिवतापासाठी क्लोरोक्विन [⟶ औषध औषधिक्रियाविज्ञान].
शस्त्रक्रिया : सर्वसाधारणपणे शरीररचनेच्या संदर्भात काही रोग झालेला असल्यास शस्त्रक्रियेची जरूरी पडते. यामध्ये मुख्यतः अवयव उघडून तपासणे, शिवणे किंवा सांधणे, दुरुस्ती करणे, अवयवाला कृत्रिम तात्पुरते वा कायमचे भोक पाडणे, अवयवाचा भाग किंवा संपूर्ण अवयव काढून टाकणे, नवीन अवयवाचे प्रतिरोपण करणे इ. प्रकारांनी शस्त्रक्रिया करता येतात. [⟶ शस्त्रक्रिया तंत्र].
या मुख्य उपचारांखेरीज अलीकडील संशोधनाप्रमाणे त्या त्या विशिष्ट रोगांकरिता ⇨प्रारण चिकित्सा, किरणोत्सर्गी द्रव्ये [⟶ किरणोत्सर्ग], ⇨लेसर, दाहकर्म, शीत शस्त्रक्रिया [⟶ नीच तापमान भौतिकी], मुतखडा फोडून काढून टाकण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग [⟶ श्राव्यातीत ध्वनिकी] वगैरे तसेच मानसोपचार, ⇨ भौतिकी चिकित्सा इ. उपचारपद्धती जरूरीप्रमाणे वापरण्यात येतात.
रुग्णाचे पुनर्वसन आणि काही वेळा व्यवसाय चिकित्सा यांशिवाय उपचार पूर्ण होत नाहीत. रोगावरील प्रत्यक्ष उपचारांइतकेच महत्त्व मोकळी, स्वच्छ व खेळती हवा, गारवा किंवा उबदार वातावरण, स्वच्छता, योग्य सकस आहार व पथ्ये, पुरेसे पाणी व इतर द्रव पदार्थ, पुरेशी विश्रांती, भोवतालचे उत्साही व मानसिक दिलासा देणारे वातावरण या गोष्टींनाही आहे.
रोगप्रतिबंध : सर्व दृष्टींनी विचार करता, रोग झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये यासाठी काळजी घेणे व प्रतिबंधक उपाय योजणे जास्त हिताचे असते.
सर्वसाधारण उपाय : यामध्ये योग्य व सकस आहार, स्वच्छ आणि मोकळी हवा, योग्य व्यायाम, निवासाची योग्य सोय, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, पुरेशी विश्रांती, व्यसनमुक्तता, कमीत कमी मानसिक ताण पडतील अशी भोवतालची परिस्थिती या गोष्टींचा अंतर्भाव होतो.
निरनिराळ्या रोगांसाठी विशिष्ट प्रतिबंधक उपाय : यासाठी रोग होण्याच्या विशिष्ट कारणांची व परिस्थितीची पूर्ण माहिती करून घेणे आणि त्या गोष्टी टाळण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करणे आवश्यक असते. विशेषतः साथीच्या आणि सूक्ष्मजीवजन्य रोगांवर प्रतिबंधक उपाय म्हणजे परजीवींचे (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या सजीवांचे) समूळ उच्चाटन व प्रतिबंधक लशीचा उपयोग हे होत.
रोगप्रतिबंध हे एकेकट्या माणसाचे काम नसून त्यासाठी व्यक्ती, कुटुंब, वैद्यकीय व्यावसायिक, सामाजिक संस्था, शासन इ. सर्व पातळ्यांवर या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. [⟶ रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक].
ऐतिहासिक व समाजशास्त्रीय महत्त्व : मानव व त्याच्या सभोवतालची परिस्थिती यांच्या परस्परसंबंधांचा विचार करताना रोगांचे इतिहासातील महत्त्व लक्षात येते. जगात रोगांमुळे सर्व युद्धांपेक्षाही जास्त माणसे मारली गेली आहेत अथवा जायबंदी झालेली आहेत.
रोग व त्यांची कारणे यासंबंधीच्या प्रचंड अज्ञानामुळे रोग आणि त्यांवरील उपचारासंबंधी अनेक गैरसमजुती व अंधश्रद्धा मानवी इतिहासाच्या अगदी सुरुवातीपासून प्रचलित आहेत आणि आज वैद्यकशास्त्रात मोठी प्रगती होऊनही अनेक कारणांमुळे या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. योग्य उपचार माहीत नसणे आणि त्याच वेळी उपचारांची तात्काळ आणि आत्यंतिक जरूरी अशा दुहेरी परिस्थितीत सापडल्याने विविध समाजांत व निरनिराळ्या काळांत अनेक असंबद्ध, हास्यास्पद, विचित्र व कित्येक वेळा अघोरी उपचार अस्तित्वात आले व आजही प्रचलित आहेत.
प्लेग, हिवताप, देवी, इन्फ्ल्यूएंझा इ. साथीच्या रोगांनी राजकीय, लष्करी आणि सामाजिक इतिहासात खूप मोठे बदल घडवून आणले. पूर्वीसुद्धा बहुधा कोलंबस यांच्याबरोबर जाऊन परत आलेल्या खलाशांनी नवीन जगातून (अमेरिकेतून) उपदंश हा रोग यूरोपात आणला व नंतर गुलामांच्या व्यापाराबरोबर हिवताप अमेरिकेत गेला. विसाव्या शतकात दळणवळणाच्या साधनांत झालेल्या प्रचंड वाढीमुळे व वेगामुळे जगातील विविध भाग जवळ आले आणि त्यामुळे एखाद्या ठिकाणी आढळलेला रोग (उदा., उपार्जित रोगप्रतिकारक्षमता-न्यूनताजन्य रोग म्हणजे एड्स) हा फक्त त्या देशाचा अंतर्गत प्रश्न न राहता जागतिक प्रश्न बनला आहे.
देवीच्या लशीचा (व नंतर लागलेले इतर प्रतिबंधक लशींचे) शोध ही ऐतिहासिक महत्त्वाची घटना होय. कारण त्यामुळे देवीच्या रोगाचे संपूर्ण निर्मूलन होऊन तो एक भूतकाळात जमा झालेला रोग झाला आहे. तसेच इतरही अनेक साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविणे शक्य झालेले आहे परंतु यामुळे व इतर काही कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण घटले व लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली. यामुळे गरिबी, बेकारी, गुन्हेगारी यांसारख्या समस्या व आजारीपणाचे प्रमाण यांतही वाढ झाली. आर्थिक व सामाजिक विषमतेमुळे एका बाजूला अपुऱ्या व अयोग्य आहारामुळे अपपोषण तर दुसरीकडे अती आहारामुळे स्थूलपणा हे रोग वाढले. सर्वसाधारण आयुर्मान वाढल्याने अतिरक्तदाब, मधुमेह, कर्करोग इ. सामान्यतः प्रौढ वयात होणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढले.
प्रचंड वैज्ञानिक व औद्योगिक प्रगतीबरोबरच प्रदूषणजन्य, प्रारणजन्य [⟶ प्रारण जीवविज्ञान] व व्यवसायजन्य रोगही वाढले आणि प्रगतीबरोबर बदललेल्या सामाजिक मूल्यांमुळे गुन्हेगारी, लैगिक रोग, व्यसनाधिनता इत्यादींसंबंधीचे प्रश्न तसेच मानसिक ताणांमुळे होणाऱ्या रोगांचे (मनोदैहिक, तंत्रिकाविकृती इत्यादींचे) प्रमाण वाढले. वैद्यकशास्त्रात झालेल्या विलक्षण प्रगतीनंतरही क्षयरोग व हिवताप यांवर पूर्ण विजय मिळविता आलेला नाही आणि पूर्णपणे बरा होत असूनही समाजातील कुष्ठरोगाची भीती घालविता आलेली नाही.
एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या रोगामुळे त्या व्यक्तीचा व तिच्या कुटुंबाचा पैसा, वेळ व स्वास्थ्य यांचे मोठे नुकसान होते. व्यक्तीची समाजातील उपयुक्तता काही काळपर्यंत कमी होते. अशा अनेक व्यक्तींच्या अगदी किरकोळ रोगांमुळे सुद्धा पर्यायाने सबंध समाजाचे व राष्ट्राचे फार मोठे नुकसान होते.
प्रभुणे, रा. प.
आयुर्वेदीय वर्णन : आरोग्याला अनिष्ट अशा आहारविहारांनी शरीराशी एकरूप होऊ न शकलेले घटक अनुरूप स्थानात संचित होतात. जोपर्यंत हे घटक शरीरात आत्मसात होत नाहीत तोपर्यंत ते बाह्य सृष्टीचे होत. हे बाह्य सृष्ट घटक शरीराला बोचतात, सलतात, शल्य होतात. निर्दोष शरीरात दोष होतात. निर्दोष शरीरातील हे दोष अधिक होतात तेव्हा ते शरीरस्थ ज्या धातूशी, अवयवाशी, समान गुणकर्माचे असतात त्या धातूत, अवयवात किंवा जो धातू, अवयव अबल असतो त्यात साचू लागतात, तेथे ते शल्यच होतात आणि तो धातू, अवयव त्याच्याबद्दल दुःख, संवेदना चिन्हे निर्माण करतो. दोषांच्या आक्रमणाच्या सुरुवातीस होणाऱ्या चिन्हांना रोगाची पूर्वरूपे म्हणतात. दोषांनी त्या धातूवर, अवयवावर ताबा बसविल्यानंतर होणाऱ्या दुःखचिन्हांना रूप-रोग म्हणतात.
रोग दोषांखेरीज विषे, कृमी, भुते (जंतू) व आघात यांनीही होतात. विषे व आघात यांनी रोग उत्पन्न केल्यावर दोष उत्पन्न होतात आणि कृमी व भुते यांचा प्रवेश शरीरात होण्यापूर्वी शरीर बहुधा दोषांनी दुष्ट असते, म्हणून त्यांना विकृती करण्यास अनुकूलता मिळते. कृमी व भुतांची संख्या शरीराच्या प्रतिक्रियेच्या मानाने फारच अधिक असली, तर निर्दोष शरीरातही रोग होतात. साथीत दुष्यंद व्यक्ती बळी पडतातच, पण निर्दोष शरीरेही सापडतात. तरीही साथीतही तिची बाधा न झालेल्या प्रतिकारी व्यक्ती पुष्कळच आढळतात.
विषे, कृमी, भुते शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर त्याच्या वाढीला अनुकूल असलेल्या स्थानांत किंवा अबल असलेल्या स्थानात आपला प्रभाव दाखवून रोग निर्माण करतात. [⟶ आतुरनिदान दोष].
जोशी, वेणीमाधवशास्त्री
संदर्भ : 1. Braunwald, E. and others, Ed. Harrison’s Principles of Internal Medicine, New York, 1987.
2. Robbins, S. L. and others, Pathologic Basis of Disease, Philadelphia, 1984.
3. Shah, S. J., Ed, A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1986.
4. Van Peenan, H. J. Essentials of Pathology, Chicago, 1966.
5. Wyngaarden, J. B. Smith, L. H., Ed., Cecil Textbook of Medicine, 2 Vols., Philadelphia, 1988.
“