रात किडा : या कीटकाचा ऑर्थॉप्टेरा गणातील ग्रायलिडी या कुलात समावेश होतो. या कीटकांचे नर ‘किर्र’ असा नादमय आवाज करतात. यांच्या सु. २,००० जाती आहेत. या कीटकांची लांबी ३ मिमी. ते ५० मिमी. इतकी असू शकते. यांच्या शृंगिका (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिये) सूक्ष्म व नाजूक असतात. मागील पाय उडी मारण्यास योग्य व यांचे गुल्फ (घोट्यासारखे भाग) तीन खंडांचे बनलेले असतात. उदरावर दोन पुच्छिका असतात. पुढचे पंख ताठर व चिवट असतात आणि नरात यावरच आवाज करण्याचे साधन असते. मागील पंख लांब व पातळ असून त्यांचा उडण्याकरिता उपयोग केला जातो.
एका पुढील पंखाच्या कडेवरील खरड यंत्रणा दुसऱ्या पुढील पंखाच्या खालच्या बाजूस असलेल्या ५० ते २५० दात्यांवर घासून या कीटकांतील नर ‘किर्र’ असा आवाज काढतात. खरड यंत्रणा व दाते पंखांवर असल्याने कोणता पंख वर व कोणता खाली आहे याला महत्त्व नसते. आवाजाची प्रभावी कंप्रता (दर सेकंदाला होणारी कंपनांची संख्या) प्रत्येक सेकंदाला किती दाते घासले गेले यावर अवलंबून असते. एका सेकंदाला मोठ्या आकारमानाच्या कीटकांत १,५०० आवर्तने, तर लहान कीटकांत १०,००० आवर्तने इतका बदल असू शकतो. आवाज हा स्पंदरूपाने निर्माण होतो. हे स्पंद एका सेकंदात २५० इतके असू शकतात. पंखाच्या प्रत्येक फटकाऱ्यास एक स्पंद याप्रमाणे आवाज निर्माण होतात. स्पंदाची गती आणि आवाजाची लय यांतील फेरबदल हे कीटकाच्या स्वभाव विशेषावर अवलंबून असतात. मादीस बोलविण्याकरिता एक प्रकारचा किर्र आवाज, मादीस मीलनास उद्युक्त करण्याकरिता दुसऱ्या प्रकारचा किर्र आवाज, शत्रूला भिवविण्याकरिता तिसऱ्याच प्रकारचा किर्र आवाज काढला जातो. नरात वा मादीत पुढील पायांच्या पोकळीत कर्णेंद्रिय असतात. त्यामुळे त्यांना आवाजाची दिशा निश्चित करता येते.
तापमानाचा रातकिड्यांच्या आवाजावर परिणाम होतो. उत्तर अमेरिकेतील झाडावर राहणारा रातकिडा इकँथस फुलटोनी हा थर्मामीटर क्रिकेट म्हणून ओळखळा जातो. कारण याची किरकिर ऐकून बाजूच्या तापमानाचा अंदाज करता येतो. माद्या आपल्या अंडनिक्षेपकाच्या (अंडी घालण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या विशेष संरचनेच्या) साह्याने त्यांची अंडी जमिनीत किंवा वनस्पतीच्या खोडावर घालतात. यामुळे वनस्पतीच्या लहान खोडास नुकसान पोहोचते. उत्तर गोलार्धात रातकिडे साधारण हिवाळ्यापूर्वी प्रौढ होतात. हिवाळ्यानंतर वसंत ऋतूत अंड्यांतून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर येतात. डिंभ ६ ते १२ वेळा कात टाकतो. प्रौढावस्थेतील रातकिडा साधारणपणे ६ ते ८ आठवडे जगतो. रातकिडा हा सर्वभक्षक प्राणी आहे. हे किडे मानवाच्या निवासात तसेच आजूबाजूंच्या उकिरड्यावर आढळतात. काही जमिनीत राहणाऱ्या जाती झाडांच्या मुळांवर जगतात आणि त्यामुळे त्यांची संख्या फार झाल्यास पिकांना व बागांना ते धोकादायक ठरतात. मासेमारीत गळाला माशाचे भक्ष्य म्हणून लावण्याकरताही यांचा उपयोग करतात. प्रयोगशाळेतही हे कीटक पुष्कळ प्रमाणात वापरले जातात. पूर्वेकडील देशांत नर त्यांच्या आवाजाकरिता पाळले जातात. चीनमध्ये करमणुकीकरिता रातकिड्यांच्या झुंजी लावण्याची प्रथा हजार वर्षांहून अधिक काळ रूढ आहे.
टोणपी, गो. त. इनामदार, ना. भा.
“