रामलिंगरेड्डि, कट्टमंचि : (१० डिसेंबर १८८० – २४ फेब्रुवारी १९५१). तेलुगू कवी, समीक्षक, विद्वान व प्रशासक. जन्म चित्तूर जिल्ह्यातल्या कट्टमंची गावी. चित्तूर व ख्रिश्चन कॉलेज, मद्रास येथे शिक्षण. १९०१ साली ते बी. ए. झाले आणि त्यांना परीक्षेत राजनीती व तत्त्वज्ञान या विषयांत पारितोषिकेही मिळाली. त्यानंतर त्यांनी काही वर्षे केंब्रिज विद्यापीठातही अध्ययन केले. बडोद्याचे महाराज गायकवाड यांच्या आर्थिक साहाय्याने ते १९०७ साली अमेरिकेस शिक्षणासाठी गेले. तेथून परतल्यावर बडोदा व म्हैसूर संस्थानांत त्यांनी उच्च शिक्षणाधिकारी म्हणून काम केले. त्यांनी कॅनडा, फिलिपीन्स, जपान इ. देशांना भेटी देऊन शिक्षणशास्त्रासंबंधी अधिक ज्ञान मिळविले. १९२० साली त्यांनी आपल्या ह्या पदाचा राजीनामा देऊन जस्टिस पार्टीत काही दिवस काम केले.

कट्टमंची रामलिंगरेड्डी

रामलिंगरेड्डी हे अनेक वर्षे आंध्र विद्यापीठाचे प्रमुख आधारस्तंभ होते. १९२६ साली ह्या विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर ते काही काळ या विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. १९३० साली सरकारने काही सत्याग्रहींना जी क्रूर वागणूक दिली, त्याचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या उपकुलगुरूपदाचा राजीनामा दिला. १९३६ साली आंध्र विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून पुन्हा निवडून आले व त्या पदावर ते अखेरपर्यंत राहिले. आज आंध्र विद्यापीठात जे अनेक सुसज्ज विभाग आहेत, त्याचे श्रेय सर्वस्वी रामलिंगरेड्डी यांनाच दिले पाहिजे.

भारतातील काही प्रमुख प्रख्यात आणि बुद्धिमान लोकांत त्यांची गणना होते. इंग्रजी आणि तेलुगू ह्या दोन्ही भाषांतील उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांचे नाव विख्यात आहे. ह्या दोन्ही भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या भाषणात उपरोध व व्यंग्य यांची रेलचेल असे. ते कविताही लिहीत असत. मुसलम्मा मरणमु (१९१४) व नवद्यामिनी  (१९३६) ही गाजलेली काव्ये त्यांच्या काव्यप्रतिभेची निदर्शक आहेत. कवितत्त्वविचारमु (१९१४) हा समीक्षाग्रंथ त्यांच्या तीक्ष्ण व आधुनिक समीक्षाशक्तीची साक्ष पटवितो. भारत आर्थिक शास्त्रमु (१९१४) हा ग्रंथ त्यांच्या अर्थशास्त्रावरील सखोल अभ्यासाची साक्ष देतो. व्यासमंजरी  हा त्यांच्या विविध विषयांवरील निबंधांचा संग्रह होय. कवी, वक्ता, समीक्षक, प्रशासक आणि पंडित हे जणू काही त्यांच्या प्रतिभेचे पंचप्राणच होत. विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणारे कट्टमंची रामलिंगरेड्डी यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व क्वचितच आढळून येते. एक तेलुगू गद्यशैलीकार म्हणूनही त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी अनेक कवी व लेखकांना प्रेरणा दिली, तसेच अनेक ग्रंथांना अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक प्रस्तावनाही लिहिल्या.

लाळे, प्र. ग.