राज्याभिषेक : व्यक्तीला राजपदाचे अधिकार प्राप्त करून देणारा एक धार्मिक विधी. अभिषेक या संस्कृत शब्दाचा ‘शिंपडणे’ वा ‘वर्षाव करणे’ असा अर्थ होतो. राजाला राजपदाचा अधिकार देणाऱ्या विधीमध्ये त्याच्या मस्तकावर पवित्र जलाचे सिंचन करणे, हा एक महत्त्वाचा विधी असतो. जगभरच्या विविध समाजांतून फार प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आली आहे.

राज्याभिषेकाची प्रथा भारतात वेदकाळी सुरू झाली, असे ऋग्वेदातीलकाही ऋचांवरून दिसून येते. वेदकाळी साधा असलेला राज्याभिषेकाचा विधी ‘ब्राह्मण’ कालात बराच गुंतागुंतीचा झाला. ऐतरेय ब्राह्मणाच्यामते देवांनी विजयी होण्यासाठी इंद्राची राजा म्हणून निवड केली आणि त्याला राज्याभिषेक केला. यालाच ‘ऐंद्रमहाभिषेक’ असे म्हणतात. नंतरच्या कालात या महाभिषेकाला अनुसरूनच क्षत्रियांच्या राज्याभिषेकाचा विधी निश्चित करण्यात आला.

प्रारंभीच्या काळात अराजकाची अवस्था असताना प्रजेच्या रक्षणासाठी ईश्वराने राजाची निर्मिती केली, असे मनुस्मृति वगैरे ग्रंथांनी म्हटले आहे. व्यक्तीच्या ठिकाणी हे ईश्वरी सामर्थ्य राज्याभिषेकानंतरच निर्माण होते राज्याभिषेकापूर्वी ती व्यक्ती इतरांसारखी सर्वसामान्यच असते. प्रजा अशा सर्वसामान्य व्यक्तीच्या आज्ञेचे पालन करण्याची शक्यता नसते म्हणून राजा सर्वसामान्यांहून वेगळा व श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि त्याच्या अधिकाराला पावित्र्य व मान्यता मिळवून देण्यासाठी राज्याभिषेकाचा विधी अपरिहार्य मानला जात होता.

अभिषेकाच्या विधीसाठी विविध वृक्षांची फळे, धान्ये, दही, दूध वगैरेंसारखी द्रव्ये आणि पाणी यांची आवश्यकता असे. अभिषेकाच्या वेळी राजाला प्रजेविषयीच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जात असे, तसेच त्याला इंद्रासारखे वैभव प्राप्त व्हावे, अशी शुभेच्छाही दिली जात असे. अभिषेकानंतर तो रेशमी वस्त्रे परिधान करून मस्तकावर मुकुट धारण करीत असे. त्यानंतर तो आसनावरून उतरून गादीवर आरोहण करीत असे. त्यावेळी त्याचा पुरोहित एका दंडाने त्याच्या बरगडीला स्पर्श करीत असे. ज्या दंडशक्तीच्या जोरावर राजाचे सर्व अधिकार अवलंबून असतात, ती दंडशक्ती त्याला प्राप्त झाली, असे या कृतीतून सुचविले जात असे.

राजाच्या अभिषेकाप्रमाणे ‘युवराज’ व ‘सेनापती’ यांनाही अधिकारग्रहाणाच्या वेळी विशिष्ट प्रकारचे अभिषेक केले जात असत. अग्निपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, राजधर्मकौस्तुभ इ. ग्रंथांतून राज्याभिषेकाचे तपशीलवार वर्णन आलेले आहे. रामायणात रामाच्या व महाभारतातयुधिष्ठिराच्या राज्याभिषेकाचे वर्णन विस्ताराने आले आहे. तुलनात्मक दृष्ट्या अलीकडच्या काळातील शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक प्रसिद्ध आहे.

यूरोपमधील ख्रिस्तपूर्व समाजांमध्ये नियोजित राजाला जमातीचे प्रमुख लोक खांद्यावरून मिरवत आणत आणि जमलेल्या लोकांना तीन वेळा प्रदक्षिणा घालत असत. त्यानंतर राजाला अधिकाराची भाला वगैरे प्रतीके दिली जात असत. यूरोपचे ख्रिस्तीकरण झाल्यानंतर या धार्मिक विधीचे स्वरूप बदलले आणि त्यामध्ये बायबलच्या जुन्या करारावर आधारलेल्या विधींचा अंतर्भाव झाला. या काळात राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजाच्या अंगाला तेल लावण्याच्या विधीला [⟶ अभ्यंजन] महत्त्व आले होते.

इंग्लंडमध्ये १३०७ मध्ये दुसऱ्या एडवर्डचा राज्याभिषेक झाला, तेव्हाचा धार्मिक विधी पुढे सोळाव्या शतकापर्यंत चालू राहिला. १६०३ मध्ये पहिल्या जेम्सचा राज्याभिषेक झाला, त्या वेळी धार्मिक विधींमध्ये प्रथमच इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला. १३०७ मध्ये ज्या विधीचा वापर करण्यात आला होता, तोच विधी किरकोळ फेरफारांसह विसाव्या शतकांपर्यंत चालू असल्याचे आढळते. यूरोपात इंग्लंडप्रमाणेच स्वीडन, नॉर्वे व हॉलंडमध्ये अजूनही राज्याभिषेकाचे सोहळे साजरे होतात.

साळुंखे, आ. ह.